'आमच्या घरात, सूनबाई जोरात'
फोटो साभार: गुगल |
सासू म्हणजे 'सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको' अशी व्याख्या कोणी जाणकाराने केली आणि बहूतेक सर्वानांंच ती पटलेली आहे. पण, काळ बदलतो आहे एकदम तापट जाच करणाऱ्या कासोट्यातल्या सासूबाई आज राहिल्या नाहीत, त्याचप्रमाणे फक्त नवऱ्याला स्विकारून त्याला आपल्या मुठीत ठेवणाऱ्या सूनबाई आता उरल्या नाहीत. म्हणून या व्याख्या बदलून सासू म्हणजे 'सावली सुखाची' व सून म्हणजे 'सुगंधी नजराणा' अशी करायला हवी.
माझी मैत्रिण लता हिला सुप्रिया नावाची सुशिक्षित इंजिनिअर असलेली नोकरी करणारी, समंजस, सुस्वाभावी सून लाभलीय. तिचे पती - अशोकराव स्वभावाने तापट, एककली स्वभावाचे त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या धाकात रहावे लागले. मुलाच्या लग्नात अगदी शुल्लक कारणावरून लताच्या माहेरच्यांशी अशोकरावांचा वाद झाला. आपला अपमान झाला असे समजून गेली चार वर्षे माहेरी न जाण्याचा हुकूम सोडण्यात आला आणि तो लताने पाळलाही. आपल्या भावनांना मुरड घालत पतींची मर्जी सांभाळली. पण, कालच भावाचा फोन आला की लताची आई अत्यावस्थ असून दवाखान्यात ऍडमिट आहे. सासूबाईंची घालमेल सुप्रियाला समजली. तिने सरळ रेल्वेची तिकीटे काढून आणली, सासूबाईंची बॅग भरली व सासरेबुवांना म्हणाली, "आईंना मी माहेरी पाठविण्यास निघाले आहे. जन्मदात्री आई आजारी असताना मान-अपमान कशाला घेऊन बसलात. तुम्ही आईबरोबर जायला तयार आहात का बघा? नाहीतर मी रजा काढून आले आहे." सूनेचे हे तडफदार बोलणे ऐकून अशोकराव निमुटपणे पत्नीबरोबर निघाले. आहे की नाही? लताची सून 'सुगंधी नजराणा'.
व्याख्यान केसरी विजय आवटी यांनी व्याख्यानात एक किस्सा सांगितला. सासू-सुनांची एक ट्रिप गेली होती. एका गाडीत सगळ्यांच्या सासवा होत्या तर दुसऱ्या गाडीत सगळ्या सूना होत्या. अर्थात सासूबाईंची गाडी पुढे होती. आपापल्या वयाला अनुसरून एन्जॉय करत गाड्या निघाल्या होत्या. दुर्दैवाने सासूबाईंच्या गाडीचा अपघात झाला. अपघात गंभीर असल्याने जवळजवळ सर्वच सासवांची प्रकृती गंभीर होती. काही गतप्राण झाल्या होत्या. सर्वच सूना आक्रोश करू लागल्या. पण एक सूनबाई फारच आक्रोश करू लागली व तिचे सासूप्रेम खूपच उठावरदारपणे जाणवू लागले. म्हणून बरेचजण तिला सावरू लागले. बाकीच्या सूनांचा आवेग ओसरला पण, हिचा आक्रोश वाढला. एकीने तिला त्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, "अहो, अपघात झालेल्या गाडीत माझी सासू नव्हती. ऐनवेळी आजारी पडली म्हणून घरीच राहिली."
या उदाहरणातील सासूबाई व्हायचे नसले तर सासूने काहीपथ्ये पाळली पाहिजेत. नव्याने सून येताक्षणीच तिच्याकडून शंभर टक्के बिनचूक कामाची अपेक्षा करू नये, तिला हळू हळू मायेने आपल्या घरातील रीतीभाती शिकवाव्यात. सासूबाईंनी प्रत्येकवेळी आमच्या वेळी असं नव्हंत, ही सी.डी लावू नये. भाषेत माधुर्य ठेवून आपले अनुभव सांगावेत. आपल्या व सूनबाईंच्या वयात किमान २०/२५ वर्षाचे अंतर आहे. दोन पिढ्यात अंतर पडणार हे गृहित धरून समजूतीने वागावे. तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करू द्याव्यात. तिने केलेल्या चांगल्या कामाचे इतरांसमोर कौतूक करावे. घरातील छोट्या मोठ्या निर्णय प्रक्रियेत तिचे मत जाणून घ्यावे, तिला स्वातंत्र्य द्यावे. तिच्या काही गोष्टी खटकत असतील, तर समोरासमोर बसून चर्चा करावी, प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारूनच केली पाहिजे, हा आग्रह सोडून द्यावा. आपले लक्ष संसारिक जबाबदारीतून काढून घेऊन आपल्या आवडत्या छंदात घालवावा. मग सूनबाई म्हणतील 'माझी सावली सुखाची' कुठे जाऊ नये.
सूनबाईंनी सासरी आल्याबरोबर सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणेच घडाव्यात अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. सासूसमोर 'माझी आई अशी' हे तुणतुणे वाजवू नये. आपल्या वहिनीने आपल्या आईला कसे वागवावे असे आपल्याला वाटते तसेच आपण सासूबाईंशी वागावे. सासूबाईना योग्य मान द्यावा. शक्यतो त्यांना विचारूनच सर्व गोष्टी कराव्यात. आपले अनुभव त्यांच्याशी शेअर करावेत. तब्येतीची विचारपूस करावी. आपल्या आधी हे घर त्या सांभाळत होत्या. त्यांनी आपल्या नवऱ्याला लहानाचे मोठे केले आहे हे कधीही विसरू नये. बाहेर जाताना, खरेदी करताना सासूबाईना सोबत घ्यावे. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे गिफ्ट जरूर द्यावे. आपल्या हातून चूक झाल्यास माफी मागावी. चुक भूल देत घेत सुनेची भूमिका पार पाडावी मग सासूबाई म्हणतील, परमेश्वराने माझ्यासाठी पाठविलेला हा 'सुगंधी नजराणा' माझ्या नजरेआडही होवू नये.
सुनेची पावलं घराबाहेर पडणं, कमवतं असणं ही जर काळाची गरज असेल, तर सासूबाईंनाही दोन पावलं मागं यायला हवं, तिला घर कामात यथाशक्य मदत करायला हवी, सुनेनेही सासूबाईंना आईचा दर्जा द्यायला हवा. सासू सुनेच्या नात्याला फक्त समजूतदारपणाची झालर लावली तर हे नातं आई मुलीपेक्षाही जास्त फुलतं, हे मी स्वानुभवानं सांगते.
सासू-सूनेच्या मनाच्या तारा मायेच्या रेशमी धाग्यांनी जुळल्या तर
सूनबाई म्हणतील 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि
सासूबाई म्हणतील 'आमच्या घरात सूनबाई जोरात!'
सावली सुखाची, सुगंधी नजराणा👌👌
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा