गुरुवार, २३ जुलै, २०२०

लोकगीतातील नागपंचमी - विशेष मराठी लेख


लोकगीतातील नागपंचमी

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

 

फोटो साभार: गुगल


 श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे।

 

               अशा श्रावणात अनेक सण आणि उत्सवांची झुंबड उडते. नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी,असे एक ना अनेक सण आणि त्यात पावसाच्या सरीवर सरी येत असतात. ऊन पावसाचा लपंडाव रंगलेला असतो. सृष्टीदेवता टवटवीत हिरवीगार दिसत असते. खरीपाची पेरणी आटोपल्याने शेतकरी खुषीत व निश्चींत असतात. श्रावणातला प्रत्येक दिवस जणू उत्सवाचा, कथाश्रवणाचा व आनंदाचा असतो. अशा या नितांतसुंदर श्रावणातील शुद्धपंचमी म्हणजेच नागपंचमी होय.

 

               पूर्वीच्याकाळी श्रावण महिना व त्यात येणारी नागपंचमी ही स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी होती. नागपंचमीच्या सणाला भारतीय संस्कृतीत मोठे महत्व आहे. हा सण जवळ आला की स्त्रियांच्या मनामध्ये अनेक सुरम्य, सुरेख आठवणींचे झुले झुलू लागायचे. त्या झुल्यामध्ये विराजमान झाल्यावर गत आयुष्यातील मोरपंखी क्षण पिंगा घालू लागायचे. फेर, झोपाळे, झिम्मा-फुगडी, पिंगा यातून आनंदाने भारून गेलेले दिवस आठवायचे. या सणाला सासुरवाशिणी माहेरी येत. कधी नव्हे तो मिळणारा मोकळेपणा हसण्या-खेळण्यात घालवत. कारण पूर्वी स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत. त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम एकच असे तो म्हणजे 'रांधा, वाढा व उष्टी काढा' त्यामुळे नागपंचमीचा सण म्हणजे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची, खेळण्याची, व्यक्त होण्याची नामी संधी असायची. 

 

               नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या. सासुरवासात नांदून आलेल्या स्त्रिया मनाच्या कुपीत साठवून ठेवलेल्या लोकगीतातून आलेले सुख-दु:खाचे कढ व्यक्त करायच्या. पंचमीच्या सणाला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतीराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशिण, सासूला म्हणते _ _ _ _ _

 

पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला|

बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला|

 

सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला

सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला |

 

               अशा प्रकारे तिची माहेरी जाण्यासाठी अडवणूक व्हायची. पूर्वी सासुरवास, छळ, कुचंबना स्त्रिच्या पाचवीलाच पूजलेली होती. माहेरहून सासरी जाताना तिला अतीव दु:ख व्हायचे. डोळ्यातून अश्रूधारा ओघळू लागायच्या. आपले दु:ख स्त्रिया नागपंचमीच्या खेळातून व्यक्त करायच्या. असे दु:ख व्यक्त करणारे हे लोकगीत.

 

दारी जास्वंदीचा वेल, त्याला करंजीएवढी फुलं

तुला न्यायला कोण ग आलं |

 

सासरे आले न्यायला दारी

माझ्या डोळा आले पाणी |

 

               अशाप्रकारे सासू, दीर, नणंद न्यायला आलेले पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचे. गीतात शेवटी पतीदेव न्यायला यायचे तेंव्हा ती म्हणायची.

 

आई कर ग बांधाबाधी

मी जाते आता सासरी

 

               सासर कितीही द्ववाड असलं तरी मनाच्या खोल कप्प्यात सासरबद्दल जिव्हाळा असायचा. दीर, नणंदा, जावा यांच्याबद्दल आपुलकी वाटायची. स्वतःला दाग-दागिन्यांची हौस असतानाही दागिने घालताना ती नणंद, जावा यांचा विचार करायची. त्या काय म्हणतील ? असे तिला वाटायचे हे या लोकगीतात पहा. 

 

काळ्या रानामधी, कारल्याचा वेल,

तिथं उतरिला सय्याप्पा सोनार

त्यानं घडविलं घडविलं, पैंजणाचं जोड,

दादा म्हणितो म्हणितो, ले ग ले ग राधा

ले ग ले ग राधा कशी लिवू मी दादा

घरी सासू-नणंदा, दारी जावा-भावा

त्या करतील करतील माझा हेवा-दावा

 

               सासूबाई, नणंदा, जावा यांच्याबद्दल तिच्या मनात आदरयुक्त भिती असायची. दीर-भावजयीचं नातं बऱ्याच ठिकाणी भावा-बहिणीप्रमाणे असायचे. त्यांच्यात चेष्टा-मस्करीही चालायची. हे दाखवणारे हे लोकगीत.

 

पाच फडीचा नागोबा, एका फडीची नगदारी

पडली ग माझ्या पायावरी, दीर म्हणितो वैनी |

 

साखळ्या कशानं मोडल्या

तुमचं काय गेलं आमच्या बापानं घडविल्या |

 

मोडल्या तर मोडल्या हिन्नाच्या

करून आणीन मी सोन्याच्या |

 

               पूर्वीची स्त्री सासरी दबलेली असली तरी अशाप्रकारे गीतातून का होईना माहेरबद्दलचा अभिमान व्यक्त करायची. अशाच एका सासूबाईंची सुनेला माहेरी न पाठवण्याबद्दलची कारणे या सुरेख लोकगीतातून कशी व्यक्त झालीत पहा.

 

बंधू आलेत माहेरी न्यायला

सासूबाई, जावू का हो माहेरा |

 

कारल्याचे आळे कर ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा |

 

कारल्याचे आळे केलं हो सासूबाई

जाऊ का हो माहेरा |

 

कारल्याला पाणी घाल ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा |

 

               अशा प्रकारे कारल्याचे बी पेरून कारली लागेपर्यंत, त्याची भाजी करेपर्यंत सासूबाई माहेरी जाण्यास परवानगी देत नाही. बहीण-भाऊ, दीर-भावजय, बहिणी-बहिणी यांच्याप्रमाणेच जिव्हाळ्याचं नातं असतं नणंद-भावजयीचं. त्या दोघीजणी खेळत असताना एके दिवशी गंमत होते ती या गीतात पहा.

 

नणंद-भावजा दोघीजणी, घरात नव्हते तिसरे कोणी |

खेळता खेळता डाव रंगला, भावजेवरती डाव आला |

 

यादवराजा राणी रुसून बसली कैसी |

सासरे गेले समजावयाला, चला चला सूनबाई आपल्या घराला |

 

तिजोरीच्या किल्या देतो तुम्हाला |

 

               अशाप्रकारे रुसलेल्या त्या स्त्रीला समजवण्यासाठी सासू, दीर, नणंद, जाऊ येतात. तिला कांंही-बाही देण्याचे आश्वासन देतात. पण ती कांंही उठत नाही. शेवटी तिचे पतीदेव येतात व तिला म्हणतात.

 

चला चला राणी आपल्या घराला 

लाल लाल चाबूक देतो तुम्हाला |

 

               पतीदेवांचे हे बोलणे ऐकून ती चटकन घरी जाते. या गीतातील चित्रदर्शी वर्णनाची प्रासादिक रचना सोप्या चालीमुळे चटकन मनाची पकड घेते.

 

               पूर्वीच्या स्त्रिया कितीही दबलेल्या असल्या, दुय्यम नागरिकांच्या भूमिकेत असल्या तरी त्यांच्या जीवनप्रेरणा उत्कट आहेत. त्या आपल्या सृजनाचा आनंद पाककलेत, विणकाम, शिवणकाम, भरतकामात शोधतात. स्त्री गीतात, जात्यावरच्या ओव्यात, आपल्या प्रतिभा फुलवतात. नागपंचमी हा असाच प्रतिभेला फुलोरा देणारा सण. सासर-माहेराबरोबरच रामायणातील प्रसंग गीतातून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न या नागपंचमीच्या गीतातून करतात.

 

अलीकडं नारळाचं बन, पलीकडे नारळाचं बन |

मधी सीताची ग कुटी, जोगी गेला दानयाला |

 

मी नाही दान करायाची, मी नाही दान करायाची |

तुझ्या पायरी बसीन, तुझा सत्तव घेईन |

 

               या गीताप्रमाणेच झिम्मा खेळताना रामायणातील पुढचा प्रसंग सांगणारे हे गीत. 

 

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा |

 

रामासंगे जानकी नांदताना काननी |

सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी |

 

सांबर मला भावाला, सीता सांगे राघवा |

कातड्याची कंचुकी, त्याची मला लेववा |

 

राम गेले धावुनी, बाण भाता घेऊनी |

सीता पाहे वाटुली, दारी उभी राहुनी |

 

साद आला दूरचा, कोणी मला वाचवा |

ओळखीचा साद तो, बावरली सुंदरा |

 

रामामागे धाडिले, लक्ष्मण देवरा |

 

               पूर्वीच्या अशिक्षित स्त्रियांनी मौखिक पद्धतीने आईकडून लेकींच्याकडे अशा लेकरवारसाने ही स्त्रीगीते जतन केली आहेत. कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेतलेल्या स्त्रियांनी केलेल्या या रचना अद्वितीय आहेत. फेराच्या या लोकगीतांंमध्ये विविधता आढळते. आता हे एक सुंदर लोकगीत सुरेख शब्दांनी, उत्कृष्ठ यमक साधत स्वतःबद्दलचा अभिमान सांगणारे आहे. 

 

झाड-झबाक, फूल टबाक बाई शोभिलं दोघं |

दार-चौकट त्यात मी बळकट बाई शोभिलं दोघं |

झरोका-खिडकी त्यात मी लाडकी बाई शोभिलं दोघं |

दौत-लेखणी त्यात मी देखणी बाई शोभिलं दोघं|

 

               स्त्रिया फेर धरून गाणी म्हणायच्या. त्या गाण्यात विनोदी गीतांचीही रेलचेल असायची. घरजावई झालेल्या एका पुरुषाची व्यथा सांगणारे हे एक विनोदी गीत.

 

केली होती बहुत पुण्याई|

कसा झालो मी घरजावई |

 

सासूची लुगडी धुतो मी|

बायकोचीही घालतो वेणी |

सांभाळतो मी धाकटी मेहुणी|

 

पहा आमच्या बायकोचे गोड रुप

अंगावर खरुज खूप |

 

रंगाने काळी शाई|

कसा झालो मी घरजावई |

 

               असे हे गीत म्हणताना फेरातील स्त्रियांची हसून हसून पुरेवाट व्हायची. 

 

               अशी सुरेख लोकगीते तुमच्या-माझ्या आजीच्या आजीकडून लेकवारसाने आली आहेत. अशा पद्धतीची सलग तीन तास चालणारी गीतंही पूर्वीच्या स्त्रियांना मुखोद्गत होती. अशा रचनातून तिचे आत्मप्रगटीकरण होत असावे. पूर्वी भोगावा लागणारा सासुरवास, संसाराच्या अपार कष्टाचं ओझं अशा सणाच्या निमित्ताने खेळता खेळता गीतातून व्यक्त करायच्या. इंदिरा संत, सरोजिनी बाबर, शांता शेळके यांसारख्या थोर स्त्रियांनी आपल्या परीने हे संचित साठवलं आहे. काळाच्या ओघात हा लोकगीतांचा वारसा नाहीसा होत आहे. कॉम्पुटर, इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअप च्या जमान्यात अशी लोकगीते काळाच्या ओघात लोप पावत असली तरी माझ्या सारख्या असंख्य स्त्रियांच्या मनात या गीतातील गोडवा कायमपणे रुजला आहे. न्हवे तो कर्णशिंपल्यातून अखंड झिरपत राहिला आहे. स्त्री गीतांचा हा परंपरागत वारसा आपल्या परीने जतन करण्याचा प्रत्येक लेकीसुनेने प्रयत्न केला पाहिजे. हे 'संस्कृती-धन' हा आपला इतिहास आहे आणि ज्यांना इतिहास आहे त्यानांच भविष्य आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे.

 

               भारतासारख्या कृषिप्रधान देशात नागपंचमीचे महत्व विशेष आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाच्या क्षेत्रात आपण स्वावलंबी व स्वयंपूर्ण होत आहोत. एकूण उत्पादनाच्या पंधरा टक्याहून अधिक अन्नधान्याची नासाडी उंदीर करतात. उंदीर हे नागाचे भक्ष्य आहे. अशा उंदराचे उत्पादन अन्य प्राण्यांच्या तुलनेत शेकडो पटीने अधिक आहे. उंदराचा नायनाट करुन धान्य वाचविणारा एक उपकारकर्ता म्हणून नागाचे संरक्षण करण्याची गरज आहे. केवळ नागदेवता म्हणून नव्हे तर मानवाचा मित्र म्हणून त्याची जोपासना व्हावी ही अपेक्षा. नागमैत्री वृद्धींगत होण्यास या सणाचा उपयोग व्हावा ही अपेक्षा.

 

 


२ टिप्पण्या: