बुधवार, २२ जुलै, २०२०

वेळ द्या मुलांसाठी - मराठी संस्कार कथा.

 

" वेळ द्या मुलांसाठी "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



        हर्ष स्वरूपादेवी व सयाजीराव पाटलांचा एकुलता एक मुलगा. अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल या शहरातील प्रख्यात स्कूलमधील फिफ्थ स्टँडर्डमध्ये शिकणारा स्टुडंट. सयाजीराव उत्कर्ष शुगर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या पिताश्रीनी या कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या अकाली निधनामुळे सयाजीरावाच्यांवर सर्व जबाबदारी येऊन पडली होती. वारंवार होणारी शेतकरी संघटनांची अंदोलने, कामगारांचे विविध मागण्यांसाठी होणारे संप, संचालक मंडळाच्या अंतर्गत कुरघोडी यामध्ये सयाजीरावांच्या कार्य कुशलतेची कसोटी लागायची. बहुतेक सर्व वेळ यासाठीच द्यावा लागायचा. याशिवाय वडिलांनी उभारलेले विशाल फार्म हाऊसकडेही लक्ष द्यावे लागायचे. या सर्व व्यापात कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा हे ओघाने आलेच. स्वरूपादेवी उच्चशिक्षित होत्या, कर्तबगार होत्या. सयाजीरावांच्या घराकडील दुर्लक्षामुळे ऐषोआरामात,नेत्रदीपक ऐश्वर्यात असूनही चार भिंतीत कोंडून घेणे त्यांना रुचले नाही. त्यानी स्वःताची एक प्रतिमा उभी केली होती. समाजसेविका म्हणून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत होत्या. त्यांचाही बराचसा वेळ घराबाहेरच खर्च होई. त्या सतत सभा समारंभात मग्न असत.

        घरात, आलिशान बंगल्यात भरपूर नोकर चाकर होते. हर्षला सांभाळण्यासाठी दोन स्पेशल आया होत्या. त्याला स्कूलमध्ये नेण्या आणण्यासाठी स्पेशल कार होती. हर्ष ज्यावेळी त्या देखण्या कारमधून उतरायचा त्यावेळी इतर विद्यार्थी ती कार पहाण्यासाठी गोळा व्हायचे, मनात म्हणायचे, हर्ष किती भाग्यवान आहे. किती ऐटीत येतो स्कूलला.असा रूबाब आमच्या नशिबी केंव्हा येईल का? हर्षकडे स्कूलमधील सर्व टीचर्स जातीने लक्ष द्यायचे. त्यांचे पप्पा दरवर्षी स्कूलला मोठी देणगी द्यायचे.

        त्या स्कूलमधील मोहिते सर  एक उपक्रमशील शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ते नेहमी विविध उपक्रम राबवायचे. यावेळी त्यांनी माझे आईबाबा या विषयावर निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली होती. सगळीकडे फक्त माझी आई असो कि माझे बाबा असा विषय दिला जातो. सरांनी माझे आईबाबा हा विषय देऊन वेगळेपण जपत विद्यार्थ्यांना मुक्तपणे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचे अवाहन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुक्तपणे आपले विचार मांडले होते.

        हर्षचा निबंध सर्वांना चक्रावून सोडणारा होता. त्याने लिहिले होते माझे आईबाबा खूप श्रीमंत आहेत. त्यांच्यामुळे अनेक परिवाराना उद्योग मिळाला आहे. ते अनेकांचे भाग्यविधाते आहेत. माझे आईबाबा माझ्यासाठी दैवत आहेत. हे खरे पण त्यांच्याविषयी माझी खूप मोठी तक्रार आहे. तुम्ही माझ्यासाठी हे वैभव उभे केले पण माझ्यासाठी, माझ्याकडे लक्ष देण्यासाठी तुमच्या कडे वेळ कुठे आहे. बाबा, तुम्ही घरासाठी फार कमी वेळ देता. जेंव्हा घरी असता त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्यांची गर्दी असते. माझ्याशी बोलायला खेळायला, माझे लाड करायला वेळ कुठे असतो तुम्हाला? आपल्या जुन्या मोटरसायकल वरुन बाबांच्या समवेत जे स्कूलमध्ये येतात ते मित्र माझ्यापेक्षा भाग्यवान आहेत असे मला वाटते. ते ज्यावेळी बाय करून आपल्या मुलाला निरोप देऊन कौतुकाने मुलाकडे पहातात त्यावेळी बाबा मला तुमची आठवण होते. ड्रायव्हरला बाय करण्यात तो आनंद मिळतो का बाबा?

        मी आमच्या बंगल्याच्या खिडकीतून जेंव्हा बाहेर नजर टाकतो त्यावेळी पहातो की आई आपल्या मुलांना प्रेमाने घास भरवते. मांडीवर खेळवते, छान अंगाईगीत म्हणून झोपवते. माझ्या आईने असे कधी केल्याचे मला नाही आठवत. या सर्व गोष्टी माझी मावशी आया करते. पण आईची जागा ती घेऊ शकेल? परवा खिडकीतून मी एक सुंदर दृष्य पाहिले. माझ्या एवढाच एक मुलगा मैत्रिणीशी गप्पा मारण्यात गुंतलेल्या आईच्या पदराशी खेळत. होता. पदराची छान गुंडाळी करत होता. पदराने तोंड पुसत होता. त्याची आई त्याला कांहीही म्हणत नव्हती. माझी आई मला हा आनंद नाही घेवू देत कारण ती असते चुडीदार लेगिन किंवा जीन्समध्ये वर्षातून एक दोनदा साडी नेसते पण मला त्या साडीला हातही लावू देत नाही कारण किमती असते ना! ड्रायक्लीन, स्टार्च केलेली. शाळेतून परत आल्यावर शाळेत घडलेल्या गमती जमती सांगाव्याशा वाटतात. पण मी सांगत असताना माझ्याकडे लक्ष देत नाही.

        मी बाबाना एकदा विचारूच पाहिले की, बाबा तुम्ही एका दिवसात किती रूपये मिळवता? बाबानी सांगितले हजारो रूपये. एवढ्यात कुणीतरी भेटायला आलं त्यांना. त्यांच्यासाठी विषय तेथेच संपला. पण मी विचार करतोय मी अजून लहान आहे. थोडा मोठा झाल्यावर हजारो रुपये मिळवून आणून बाबाना देईन व सांगीन हे घ्या हजारो रूपये आणि एक दिवस माझ्यासाठी घरी रहा, माझ्याशी बोला, खेळा, माझ्या सोबत रहा. छान आहे ना आयडिया? आवडली तुम्हाला.

        शेवटी मोहिते सरांचे आभार मानतो कारण त्यांनीच संधी दिली आई बाबाबद्दल एवढं लिहीण्याची. आता थोडं मोकळं वाटतय मला, बाय 
आपला हर्ष

        हर्षने व्यक्त केलेले विचार व्यस्त आईबाबांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. मुलांना पैसा अडका, धनदौलत नको असते. त्यांना बालपणी आईवडिलांच्या मायेची, त्यांच्या गोड सहवासाची गरज असते. म्हणून आईवडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी वेळ दिला पाहिजे. त्यांना चांगल्या शाळेत ऍडमिशन, उत्तम क्लासला पाठवणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे न मानता मुलांच्या भावना समजून घ्या, त्याच्यात समरस व्हा.असे केलात तरच ठराल नवयुगातील ग्रेट आईबाबा. बनणार ना मग असे आईबाबा?

३ टिप्पण्या: