शिक्षकाने घडविले माणुसकीचे दर्शन
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
कोरोनामुळे माणसाचे जीवन बदलून गेले आहे. जीवन किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय येत आहे. प्राप्त परिस्थितीत कोरोनायोद्धे आपले प्राण पणाला लावून लढत आहेत. पोलिस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी, बँक अधिकारी, शिक्षक बांधव जे कार्य करत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. शिक्षक बंधू भगिनी घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांच्या बरोबरीने प्रत्येक कुटूंबाची माहिती घेत आहेत. आरोग्य सल्ले देत आहेत. प्रत्येक कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची सेवा करत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रस्नेही शिक्षक आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. शिक्षिका कुटूंबाची जबाबदारी घेत, विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ तयार करत आहेत. विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधून शिक्षणाची नौका कौशल्याने पैलतीरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
परवाच ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक करत असलेल्या उचित कार्याचा यथोचित गौरव झाला. ७ सप्टेंबर २०२० रोजी दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये माझ्या एका शिक्षक बांधवाने केलेल्या छोट्याशा पण महत्वपूर्ण कार्याची बातमी वाचली आणि मला याचा खूपच अभिमान वाटला.
आलास बुबनाळ हायस्कूल, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे कार्यरत असलेले हेरवाड या गावचे रहिवासी श्री. विजय नरसगोंडा पाटील यांनी केलेले कार्य असे की, हेरवाड गावातील स्मशानभूमीत कांही कोरोनाबाधित मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले गेले होते मात्र स्मशानशेडच्या आवारात अनावश्यक असे बरेच साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या शेडजवळूनच पंचगंगा नदीच्या पाणवठ्यावर जाणारा रस्ता असल्याने तेथून महिला व नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या अनावश्यक साहित्यामुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाटील सरांनी सामाजिक बांधिलकी स्विकारून स्मशानभूमी परिसरातील अनावश्यक साहित्य एकत्र करून ते सर्व जाळून टाकले व स्मशानभूमीचा सर्व परिसर जंतूनाशक व औषध फवारणी केली आणि शिक्षकांमध्ये ठासून भरलेल्या माणुसकीचे दर्शन घडविले.
अशा संवेदनशील, प्रसंगावधानी शिक्षकाला अगदी मनापासून मानाचा मुजरा. देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांना घडवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वच कोरोनायोद्धा शिक्षकांना खूप खूप धन्यवाद.
बातमी संदर्भ: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र दि. ०७ सप्टेंबर २०२० पृष्ठ क्रमांक २.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा