मंगळवार, १४ जुलै, २०२०

तुझी आई नशीबवान - मराठी कथा


तुझी आई नशीबवान

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गुगल


          जानकीबाईंचा कंठ दाटून आला होता. आयुष्यभर साथ देणाऱ्या घराला, जिवाला जीव देणाऱ्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, लेकराप्रमाणे वाढवलेल्या झाडावेलीना सोडून आपण दूर जात आहोत, ही भावना त्यांना सहन होत नव्हती. पण करणार काय नाईलाजको क्या ईलाज म्हणत, दुःखाचे कढ  गिळत होत्या गतस्मृतींना उजाळा देत मनाची तयारी करत होत्या. गेल्या चार दिवसापासून सूनबाई फारच खुशीत दिसत होत्या, वृदाश्रम किती छान आहे, तिथलं वातावरण तुम्हाला निश्चित आवडणार, असं वारंवार सांगत होत्या. परवाच मैत्रिणी बरोबर तिच्या सासूबाईना भेटून आल्या होत्या ना तेंव्हा पासूनच त्या अभयचे कान भरत होत्या आणि माझा अभय तिचं ऐकून माझी रवानगी वृद्धाश्रमात करायला तयार झाला होता.

     जानकीबाई विचार करत होत्या, लग्नानंतर सात वर्षानी अभयचं आगमन झालं. त्यावेळी किती नवस बोलले होते मी. अभय तू पाच वर्षाचा होईपर्यंत एकेक नवस फेडत होते मी तुझ्यासाठी, हाताचा वडोळ्यांचे दिवे केले. तुझ्या शिक्षणासाठी किती कष्ट उपसले आम्ही दोघांनी. आज तुझी आई तुझ्यापासून दूर निघाली, याचं काहीच दुःख  तुला वाटत नाही इतका कसा व्यवहारी झालास रे बाबा? भलंबुरं काहीच कळू नये इतका संवेदनाशून्य झालास असं जानकीबाई मनात म्हणत होत्या.

     आश्रमात जाण्याचा दिवस उगवला. दारात रिक्षा उभी राहिली. जानकीबाईचं सामान भरून तयार होतं. चार पाच साड्या, अंथरूण, त्यांचे जुने फोटो, पोथ्या पुराण, ताट वाटी, टेकायची काठी, बादली तांब्या सगळं तयार होतं. आई इथून गेल्यावर, आईची आठवण सुद्धा येऊ नये, अशी दक्षता घेतली होती दोघांनी. अभयने सामान रिक्षात चढवलं व आईच्या शेजारी बसला निर्विकार चेहऱ्याने. जानकीबाई त्याला म्हणाल्या, अभय तू कशाला येतोस माझ्याबरोबर एक दिवस सुट्टी आहे, कशाला दगदग करून घेतोस. आराम कर. मी जाईन एकटी. जानकीबाई चं बोलणं संपायच्या आतच आज्ञाधारक मुलाप्रमाणे अभय रिक्षातून उतरला व रिक्षा चालू झाल्या बरोबर पाठ फिरवून निघून गेला.

     रिक्षा वृद्धाश्रमच्या दारात आली. जानकीबाई नी रिक्षाचे भाडे दिले. एकेक सामान उतरून घेऊ लागल्या. रिक्षावाला उतरला. त्याने जानकीबाईंच्या हातातील सामान घेतले व चौकशी करून त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवले व जानकीबाईना नमस्कार करून तो चालू लागला. जानकीबाईनी त्याला थांबवले व त्याच्या हातावर वीस रुपयांची नोट देऊ लागल्या. त्याने विचारले हे कशाचे पैसे देत आहात? जानकीबाई म्हणाल्या, सामान आत आणून दिल्याबद्दलचे. तो म्हणाला ठेवा मावशी ते तुमच्या जवळ, मला पण तुमच्या सारखी आई आहे. आईकडून कामाचे पैसे घ्यायचे असतात का? असे म्हणत तो निघून गेला. जानकीबाई मनात म्हणाल्या, तुझी आई नशिबवान।

1 टिप्पणी: