मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

कोरोनापूर्वीचं जग - मराठी कविता


कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपलं सुंदर जग बदलून गेले. माणसं माणसापासून दूरपर्यंत गेली की काय? ते पहा या भावस्पर्शी कवितेतून.....

" कोरोनापूर्वीचं जग..."

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

कोरोनापूर्वीचं जग किती सुंदर होतं
उघड्या तोंडानं फिरता येत होतं।
आता नाकातोंडाला झाकावं लागतं
घरात बसून बसून गुदमरावं लागतं।

फुलासारखी मुलं शाळेत जात होती
हसत, खेळत, बागडत शिक्षण घेत होती।
आज आहेत बिचारी घरातच दबलेली
टी.व्ही. मोबाईलद्वारे शिकत असलेली।

सासरच्या चिमण्या माहेरी येत होत्या
माहेरच्या मायेने चार्ज होत होत्या।
आज त्या चिमण्या त्यांच्याच घरी बसल्या
माहेरच्या आठवणीने व्याकुळ होऊ लागल्या।

लेकरांच्या लग्नाची हौस मोठी होती
धुमधडाक्यात लग्नाची जुळणी केली होती।
मिळे आता सवलत पन्नास माणसांची
माती झाली मिरवायच्या हौस मौजेची।

देवाआज्ञा झाल्यावर नातलग जमत होते
दुःखाचा भार हलका करत होते।
आता अंत्यविधी नातलगाविना झाले
चारसुदधा कर्मचारी मिळेनासे झाले।

गुरुवार, ३० जुलै, २०२०

झोपडीची राणी - मराठी कविता


सुख शेवटी मानण्यावरच असतं. एखाद्या बंगल्यातील महिला स्वतःला भिकारीण समजते तर एखादी झोपडीतील महिला स्वतःला राजाची राणी समजते. कसे ते पहा या श्रीमंत कवितेतून...

"झोपडीची राणी"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

ना खिडकी ना दार
नाही भिंतीचा आधार।

तीन काठ्या मेढी आठ
दोन धाबळ्या एक माठ।

ताडपदरी जुनीपानी
ठिगळांन झालीय शानी।

नको विटा दगड माती
सिमेंट वाळू दूर राहती।

तवा परात भांडी चार
गाढवावर होती स्वार।

पोरांबाळानी झोपडी भरली
कुत्र्या कोंबड्यांनी चिंता सरली।

संसार माझा सुटसुटीत
बसतो बघि एकाच पेटीत।

मिळे सोबत सूर्य चंद्राची
नसे भिती ऊन पावसाची।

येता थंडी गार वारा
नाही पंखा एसीला थारा।

मी हो राणी झोपडीची
मला नाही भिती चोरांची।


शुक्रवार, २४ जुलै, २०२०

करु या कोरोनाचा बिमोड - मराठी कविता


               कोरोनाच्या भितीने घाबरलेल्या सख्याला त्याची सखी नाना परीने त्याला समजावत आहे. भिऊ नकोस सख्या, काहीतरी कर असं भिऊन कसं चालेल मनातलं बोलून टाक, मला सांग मोकळा हो. नियम पाळून आपण जोडीने कोरोनाचा सामना करू शकतो. हे ती पटवून सांगत आहे या छान कवितेतून

" करु या कोरोनाचा बिमोड "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

बोल सख्या बोल, मनातलं बोल
आहे जीवन आपले, फारच अनमोल।

सांग सख्या सांग, साठवलेलं सांग
दोघे मिळून फेडू या, सर्वांचे पांग।

काढ सख्या काढ, सुरेख चित्र काढ
सुख समाधानात, करू या वाढ।

पळ सख्या पळ, जोरात पळ
 मिळेल त्यामुळे, सर्वानाच बळ।

बस सख्या बस, आरामात बस
मीच ओळखते तुझी, दुखरी नस।

चाल सख्या चाल, भरभर तू चाल
नको करू या, कुणाचेच हाल।

झोप सख्या झोप, निवांतपणे झोप
दोघे विणू या, संसाराचा गोफ।

वाच सख्या वाच, लक्षपूर्वक वाच 
जोडीने सोसू या, कोरोनाचा जाच।

वापर सख्या वापर, मास्क तू वापर 
कोरोनाच्या माथ्यावर फोडू या खापर।

सोड सख्या सोड, भिती तू सोड
नियम पाळून करू या, कोरोनाचा बिमोड।

सोमवार, २० जुलै, २०२०

श्रावण - मराठी कविता


          आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना हा सर्व महिन्यांचा राजा आहे कारण निसर्ग हिरवागार झालेला असतो, मने आनंदाने भरलेली असतात. अशा सुंदर श्रावणाचे वर्णन करणारी ही नितांत सुंदर कविता


" श्रावण "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




आला श्रावण नाचत
सृष्टी डोलाया लागली
हिरव्या स्वप्नांची चाहूल
धरणी मातेला लागली।


होती मृत्तिका आतूर
पानाफुलांची भुकेली
झेप घेऊन बियांनी
पिके डोलाया लागली।


ऋतुराजा हा लहरी
लपंडाव तो दाखवी
इंद्रधनूची मध्यस्थी
रंग मनास मोहवी।


हिरवे होताना शिवार
धनी हरखे मनात 
मालकीण करतीया विचार
बांगड्या करीन हातात।


रविवार, १९ जुलै, २०२०

"अशी बनते कविता माझी" - मराठी कविता


"अशी बनते कविता माझी"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



विचारांचा येतो पूर
तेंव्हा शब्द पळतात दूर दूर
भावनाच मारतात बाजी
अशी बनते कविता माझी ।।१।।

वृतांचे नाही ज्ञान
अलंकाराची नाही जाण
कळ्याविनाच फुले उमलती ताजी
अशी बनते कविता माझी ।।२।।

भाषा ज्ञान असे थोडे
अनुभव येती लाडे लाडे 
मग प्रतिभा होत राजी
अशी बनते कविता माझी ।।३।।

विषय सुचता समय नसे
समय असता शब्द न गवसे
बिन बियांची उगवते भाजी
अशी बनते कविता माझी ।।४।।

लंगड्या असुनी भावना
करती तुझी साधना 
प्रार्थना शारदे तुला हीच माझी
अशी बनते कविता माझी ।।५।।

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

शब्द - मराठी कविता

                   

             
        शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असे म्हटले जाते. शब्दांचे सामर्थ्य खूप मोठे आहे. शब्दानी मने जोडली जातात. शब्दानी मने घायाळ ही होतात . शब्द कसे असतात? शब्द काय काय करतात? हे सांगणारी ही आगळी-वेगळी कविता

" शब्द "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

शब्द फसवे
जाळे जणू माशांचे
धनदौलत गुंतवे
रंक होती रावांचे।

शब्द रडवे रडवे
पूड जणू मिरचीची 
थोडी जाता मनामधी
अश्रू गाली पसरवी।

शब्द बोचरे बोचरे 
जणू कट्यार धारेची
बसता घाव वर्मावरी
जखम होई जन्माची।

शब्द घातकी घातकी
 पदरातील निखारे 
ध च्या जागी मा होता
प्राण गमविती बिचारे।

शब्द कोवळे कोवळे
 कळी जणू गुलाबाची
प्रेमे फुंकर घालती
फुले जननी अत्तराची।

बुधवार, १५ जुलै, २०२०

बरे वाटते (मराठी कविता)


" बरे वाटते "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



पूर्वज आमचे माकड होते
ऐकतानाही बरे वाटते ।।धृ।।


स्वार्थाच्या बाजारात
लबाडीच्या साम्राज्यात
महागाईच्या अंधारात 
चाचपडणे झाले नसते ।।१।।
 
स्पर्धेच्या युगात
वशिल्याच्या फेऱ्यात
भ्रष्टाचाराच्या चिखलात
खितपणे झाले नसते ।।२।।
 
कॉपीची खोटी पदवी
डोनेशनची अरेरावी
अधिकारी बडेजावी
ठेवणे तरी झाले नसते ।।३।।
 
गोताच्या चैनीसाठी
सत्तेच्या खुर्चीसाठी
एक दोन मतासाठी 
आश्वासने झाले नसते ।।४।।
 
आयुष्यभर कष्ट करून 
स्वतः उपाशी राहून
मुलांना शिक्षण देवून
वृद्धाश्रमात गेले नसते ।।५।।
 
औषधाचा मारून फवारा
व्हिटामिनचा नाही वारा 
दोन फळांना रूपये सतरा
फळे जोकून खाल्ले नसते ।।६।।


सोमवार, १३ जुलै, २०२०

प्राक्तन (मराठी कविता)


"प्राक्तन"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




जीवनयात्रेची एक प्रवासी

म्हणून जन्मले खरी

पण दिशा नव्हती बरी

समोर घनदाट जंगल

मागे खोल खोल दरी

नव्हते तिथे रविकिरण

नव्हता चंद्र नि चांदण्या

क्षितिजाचा नव्हताच पत्ता

पण एक मात्र खरे

दिलेस प्रचंड मनोबल

पुढे टाकण्या एकेक पाऊल

नायनाट केलास भितीचा

म्हणूनच रम्य असा खेळ

झाला माझ्या प्राक्तनाचा

दाखवून दिलेस लंगडाही

धावू शकतो इच्छा शक्तीने

जिंकू शकतो शर्यत धावण्याची

सार्थकी लागते नौका जीवनाची।


रविवार, १२ जुलै, २०२०

जाहिरात गोळीची (मराठी कविता)


जाहिरात गोळीची

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



हवी का तुम्हा ही गोळी
गोळी एक पण उपचार अनेक

वैध्यक शास्त्राची कमाल
औषध विक्रेत्यांची धमाल

सोनेरी पँकिंगचा माल
करणार नाही तुमचे हाल

लोकल टँक्स् नाही जाचक
किंमत आहे फारच माफक

पण आहे शक्ती वर्धक
खात्री लायक चिंतानाशक

मिळेल तुम्हा समाधान
सुखाची न पडेल वाण

मिळेल तुम्हा सदा मान
कुळाची वाढेल शान

पण अट असे एकची
जेवल्यावरच घ्यायची

तिला नाही चोखायची
एकदम गिळून टाकायची

अहो ही तर गोळी
'दुःखाची व अपमानाची'

बुधवार, ८ जुलै, २०२०

झिरो बल्ब (मराठी कविता)


झिरो बल्ब

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


मुलांनी खूप शिकावं
उतुंग यश मिळवावं
स्पर्धेच्या युगात टिकावं
सुख त्याला भरभरून लाभावं
असं समस्त पालकांना वाटतं
ते वाटणं स्वाभाविक असतं

पालकांंनो त्याला नामांकित शाळेत घाला
स्पेशल ट्युशन लावा
अभ्यास चांगला होण्यास्तव
खास  करा

पण आणू नका दबाव
जरी दिसला प्रगतीचा अभाव
पाल्याची क्षमता वेळीच ओळखा
घालू नका त्याला तुलनेचा विळखा

नसेल हँलोजन तो हजार वँटचा
सबंध चौक उजळून टाकणारा
पालकहो ज्या पाखराला मायेचे पंख देता
त्या पंखांची क्षमता नाही येत ओळखता

येऊ दे पंखात बळ
घेऊ दे भरारी बाळ
करू नका त्या पंखाना रक्तबंबाळ

करतील असा विचार सर्वच पालक
पाहतील सद्रुढ व सुसंस्कृत बालक

असा विचार केला असता सर्वच पालकांनी
तर जीवनयात्रा संपवली नसती कित्येक बालकांनी।
                  

मंगळवार, ७ जुलै, २०२०

फक्त बाबा म्हण ! (मराठी कविता)


फक्त बाबा म्हण !

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


ओळखलस का बाळ मला
दारी आलोय मी
कपडे आहेत चुरगळलेले
डोळ्यामध्ये पाणी

रस्ता चुकलो, खूप घाबरलो
आलोय रिक्षा पकडून
हार्ट अटॅक पाहुणा आला
बसलाय शरीरात घुसून

जवळच्या पाहुण्यासारखा
कांही घटका रमला
रिकाम्या हाती जाईल कसा?
प्राण तेवढा वाचला

शरीर खचलं, अवसान गळालं 
बँक बँलन्सही संपला
थकलेल्या शरीरात प्राण तेवढा वाचला

तुझ्या आईच्या साथीने
लेकीच्या मायेने
औषधगोळ्या खातो आहे
पथ्यपाणी सांभाळतो आहे

चेकबुक कडे हात जाताच
हसत हसत उठले, पैसे नकोत म्हणाले
आठवणीने तुझ्या थोडे वाईट वाटले

थकले माझे शरीर तरी थकले नाही मन
गालावर हात ठेवून फक्त बाबा म्हण,फक्त बाबा म्हण

कणा कवितेवर आधारित


रविवार, ५ जुलै, २०२०

नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर। (मराठी कविता)


नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर।

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




हुंड्यासाठी सुनेला
गाडीसाठी वहिनीला
हौसेसाठी पोरीला
जाळणे आता बंद कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।१।।

निराश होते कुणी
मुलगी झाली म्हणुनी 
चाचणी तिची पाहुनी
हत्या करणे बंद कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।२।।

थापा ऐकुनी पुरूषी
सवत नको बनूस
पोटासाठी स्वतः ची
अब्रू विकणे बंद कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।३।।

सासूला मान आई
वेगळ्याची नको घाई
सुखाची तव भलाई
आश्रमी धाडणे बंद कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।४।।

पुढे गेली भगिनी
उच्च ठेव विचारसरणी
मुलीला विनाकारणी
बंधन घालणे बंद कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।५।।

रस्ता,गटार गल्लीबोळ
मुक्तीचाच नको घोळ
सर्व स्वच्छ करण्याआधी
मनातील जळमटे दूर कर
नारी तुला मुक्त व्हायचे असेल तर ।।६।।

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

कोरोनानं शिकवलं जगायला


"कोरोनानं शिकवलं जगायला"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


कोरोनानं शिकवलं जगायला
दुजानाही स्वस्थ जगवायला

घरातच शांत बसायला
स्त्रीचं दुःख जाणायला
तिला मदत करायला
घरी घरचंच खायला

आरोग्य नीट सांभाळायला
 परिसर स्वच्छ ठेवायला
निसर्गाला वाचवायला
पर्यावरण समतोल राखायला

प्रदूषण सारे रोखायला
काटकसर करायला
लग्नखर्च वाचवायला
थोडक्यात अंत्यसंस्कार करायला

मोठे कार्यक्रम विसरायला
ताज्या भाज्या खायला
प्रतिकारशक्ती वाढवायला
विना मेकअप रहायला

समभाव जपायला
मीच लई भारी विसरायला
आपले छंद जोपासायला
संकटाला सामोरे जायला
जीवनाचं मूल्य जाणायला।

मंगळवार, ३० जून, २०२०

नका म्हणू डस्टबिन (मराठी कविता)


एकदा दोन मैत्रिणींचा संवाद ऐकला.

पहिली: अगं काल तुझ्यासाठी एक स्थळ येणार होतं, कसं आहे?

दुसरी: स्थळ चांगलं आहे, नोकरी पगार चांगलं आहे, दिसायलाही छान आहे. जमेल असं वाटतंय.

पहिली: अगं डस्टबीन किती आहेत, एक का दोन?

दुसरी: दोन आहेत पण ते गावीच राहणार आहेत.

पहिली: बरं झालं बाई नाहीतर आमच्या ताईकडे तीन डस्टबीन आहेत. सासू-सासरे आणि सासऱ्याची विधवा बहीण.

खरंच आजकाल ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबातील स्थान नकोशी व्यक्ती असेच झाले आहे. आम्ही दोघं राज-राणी, घरात नको तिसरे कोणी असे मुलामुलींना वाटत आहे. ज्या दिवशी डस्टबिन हा शब्द ऐकला त्याच दिवशी ह्या कवितेचा जन्म झाला. तर अशी ही कविता

"नका म्हणू डस्टबिन"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

कुणीतरी ज्येष्ठांना डस्टबिन म्हणाले
ऐकून मन फारच उदास झाले |

राब राब राबून तुम्हा वाढवले
पोटाला चिमटा काढून तुम्हा भरवले ।

आमचे शिक्षण झाले कमी
म्हणून तव शिक्षणाची घेतली हमी ।

पै पै साठवून बांधलाय बंगला
तो वाटतो ना आरामात चांगला ।

जिवाच रान करून घेतले शेत
तेच विकायचा तुम्ही केलाय बेत ।

मोठे झाल्यावर फुटलेत पंख
डस्टबिन म्हणून का मारता डंख

नका म्हणू ज्येष्ठांना डस्टबिन
अशानं ऊसवेल नात्यांची वीण।

ज्येष्ठांचा राखा मानसन्मान
तरच वाढेल तुमची शान।


सोमवार, २९ जून, २०२०

तूच सांग देवा...... - मराठी कविता


तूच सांग देवा....

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी





तू तर देवा कुलूपात, मुक्त कधी होणार
भक्त बसले घरात, गाऱ्हाणी कधी ऐकणार?

कोरोनाव्हायरस ची ऐकताच वाणी
कामगार निघाले स्वगृही अनवाणी
गरिबांची दशा झाली केविलवाणी
सगळ्यांच्या डोळ्यात दुःखाचे पाणी
तूच सांग देवा सरकार अशावेळी काय काय करणार ||१||

डॉक्टर नर्सेस ना चोवीस तास कामाला लावलेस
बायका पोरं सोडून पोलिसांना रस्त्यावर डांबलेस
दानशूरांना दान करण्यास प्रवृत्त केलंस
समाजसेवकांना सेवा देण्याचे काम लावलंस
तूच सांग देवा या आस्मानी संकटाला कोण कसे पुरणार ||२||

लाखोने पगार घेणाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम केले
सफाई वाले भाजीवाले मात्र रस्त्यावर फिरू लागले
सुट्टीचा आनंद लहान थोर घेऊ लागले
गृहिणींचे काम मात्र दररोज वाढू लागले
तूच सांग देवा हे भयंकर संकट कधी टळणार ||३||

चीनच्या कुरापतीनी जवान शहीद झाले
चक्रीवादळाने संसार उध्वस्त झाले
पेट्रोल डिझेल चे भाव आकाशाला भिडले
महागाईने आता डोके वर काढले
तूच सांग देवा सामान्य माणसं आता कशी जगणार ||४||



रविवार, २८ जून, २०२०

का करतोस आत्महत्या वेड्या मुला - मराठी कविता



       रोजचे वर्तमानपत्र उघडावं तर कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाच्या छातीत धस्स करणाऱ्या बातम्या व त्याबरोबरच प्रत्यक्ष आत्महत्येच्या बातम्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूड अभिनेत्त्याने आत्महत्या केली म्हणून एका युवतीनेही आत्महत्या केल्याचे ऐकले. कोरोना लॉकडाउन मुळे ऑनलाइन लेक्चर साठी मोबाईल फोन दिला नाही म्हणून आत्महत्या, अशा रोजच्या वर्तमानपत्रात किमान सहा सात बातम्या आत्महत्येच्या असतातच. तर अशा प्रसंगी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विचार करायला लावणारी सुचलेली ही छानशी कविता

"का करतोस आत्महत्या वेड्या मुला?"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




का करतोस आत्महत्या वेड्या मुला
देवाने दिलय किती सुंदर जीवन तुला

अनंत कळा सोसून जन्म दिला मातेने
अपार कष्टाने वाढवले तुला पित्याने
त्यांचे ऋण जराही न फेडताच
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||१||

भावाने केले खूप लाड तुझे
बहिणीने राखीने सजवले मनगट तुझे
त्यांचे रक्षण जराही न करताच
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||२||

भरपूर शिक, पदवी मिळवून साहेब हो
गाडी घे, बंगला बांध, श्रीमंत हो
पण त्याचा जराही उपभोग न घेता
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||३||

पुष्कळ से जिवाभावाचे मित्र ठेव राखून
त्यांच्याशी खुशाल मनातले टाक बोलून
मनातले दुःख मनातच साठवून
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||४||

जीवनात यश-अपयश येतच राहणार
यशाने हुरळू नका, अपयशाने खचू नका
जिद्दीच्या जोरावर यश मिळवायचे सोडून
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||५||


वरील कविता युट्युबवर पाहण्यासाठी लिंक 👆