मंगळवार, ३० जून, २०२०

नका म्हणू डस्टबिन (मराठी कविता)


एकदा दोन मैत्रिणींचा संवाद ऐकला.

पहिली: अगं काल तुझ्यासाठी एक स्थळ येणार होतं, कसं आहे?

दुसरी: स्थळ चांगलं आहे, नोकरी पगार चांगलं आहे, दिसायलाही छान आहे. जमेल असं वाटतंय.

पहिली: अगं डस्टबीन किती आहेत, एक का दोन?

दुसरी: दोन आहेत पण ते गावीच राहणार आहेत.

पहिली: बरं झालं बाई नाहीतर आमच्या ताईकडे तीन डस्टबीन आहेत. सासू-सासरे आणि सासऱ्याची विधवा बहीण.

खरंच आजकाल ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबातील स्थान नकोशी व्यक्ती असेच झाले आहे. आम्ही दोघं राज-राणी, घरात नको तिसरे कोणी असे मुलामुलींना वाटत आहे. ज्या दिवशी डस्टबिन हा शब्द ऐकला त्याच दिवशी ह्या कवितेचा जन्म झाला. तर अशी ही कविता

"नका म्हणू डस्टबिन"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

कुणीतरी ज्येष्ठांना डस्टबिन म्हणाले
ऐकून मन फारच उदास झाले |

राब राब राबून तुम्हा वाढवले
पोटाला चिमटा काढून तुम्हा भरवले ।

आमचे शिक्षण झाले कमी
म्हणून तव शिक्षणाची घेतली हमी ।

पै पै साठवून बांधलाय बंगला
तो वाटतो ना आरामात चांगला ।

जिवाच रान करून घेतले शेत
तेच विकायचा तुम्ही केलाय बेत ।

मोठे झाल्यावर फुटलेत पंख
डस्टबिन म्हणून का मारता डंख

नका म्हणू ज्येष्ठांना डस्टबिन
अशानं ऊसवेल नात्यांची वीण।

ज्येष्ठांचा राखा मानसन्मान
तरच वाढेल तुमची शान।


1 टिप्पणी: