ऑनलाईन शिक्षण: शाप की वरदान
मार्च २०२० महिना सुरु झाला. उन्हाळ्याची चाहूल लागली. उन्हाच्या झळांबरोबरच आणखी एकाची चाहूल लागली. ती होती कोरोना नावाच्या महाभयंकर, प्रखर महामारीची, ज्या महामारीने जगाची जीवनशैलीचं बदलून गेली. सगळं कांही बंद झालं. लॉकडाऊन नावाचा भयानक शब्द उदयास आला. बागेतील टपोऱ्या, टवटवीत फुलांंप्रमाणे शाळेत बागडणारी गोड मुले घरबंद झाली. त्यांचं नाचणं, बागडणं, हसणं, उड्या मारणं घरातच बंद झालं. शाळेला सुट्टी मिळाली म्हणून आनंदित झालेला विद्यार्थीवर्ग थोड्याच दिवसात उदास व हिरमुसलेला दिसू लागला. मुलांना शाळेत पाठवून कांही काळ सुखाचा श्वास घेऊ पहाणाऱ्या मातापालकांना उपजतच खोडकरपणा मिळालेल्या पाल्यांनी मेटाकुटीला आणले. विद्यार्थ्यांचा लळा लागलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कांहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले आणि लॉकडाऊनचा भाऊ ऑनलाईन उदयास आला. त्यांच्या मदतीला मोबाईल नावाचा प्रचंड शक्तीमान असलेला भाऊ आला आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मरगळलेल्या जिवात जीव आला. बुडत्याला काडीचा आधार मिळाला. विद्यार्थ्यांना शिक्षक जेंव्हा मोबाईलवर दिसले त्यावेळी त्यांना हरवलेले पालक सापडल्याचा आनंद झाला. त्यांचे मित्रही मोबाईलवर हाय हॅलो करू लागले आणि दिशाहीन अवस्थेत भटकणाऱ्या शिक्षण नौकेला एक नवी दिशा मिळाली. युनिफॉर्म घालून, नवी पाठ्यपुस्तके घेऊन विद्यार्थी वर्गात बसल्याच्या अविर्भावात मोबाईल समोर बसू लागली. या निमित्ताने पुस्तके उघडली गेली. होमवर्क दिले जाऊ लागले. पूर्ण केलेला होमवर्क शिक्षकांच्या मोबाईलवर सहजपणे पाठवले जाऊ लागले. ज्युनिअर केजीत शिकणारा चार वर्षाचा विद्यार्थी मोबाईल ऑपरेट करायला शिकला. तंत्रज्ञ, तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्या अंगभूत कौशल्याने कठीण पाठ्यांशाचे मनोरंजक व्हिडीओज तयार केले. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे आनंददायी अध्ययन सुरू झाले. मध्यंतरी एका मुलीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डोंगरावर छोटीशी झोपडी बांधून व्हेटर्नरी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. रेंज प्रॉब्लेमवर मात केली. हे चित्र आशादायी आहे.
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ऑनलाईन शिक्षणाने असा विकास होणे शक्य आहे का? हा चिंतनाचा विषय आहे. ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला आणि विद्यार्थी शिक्षणाबरोबरच गेम खेळण्यात तरबेज झाला. त्यांच्या कोवळ्या स्नायूंवर ताण पडू लागला. चष्मा असलेल्यांचा नंबर वाढला. चष्म्याच्या काचा सोडावॉटरच्या बनल्या. चष्मा नसलेल्याला चष्मा लागला. मोबाईल सतत पाहण्याने विद्यार्थ्यांला पाठदुखी सुरु झाली. मुलांना मोबाईल देणे, नेमक्या वेळी मोबाईलसमोर बसवणे, तो क्लासकडे लक्ष देतो का? याकडे सतत लक्ष देणे ही पालकांची डोकेदुखी सुरू झाली. मुलाचा ऑनलाईन क्लास सुरू असताना त्याच्या छोट्या भावंडांना शांत बसविणे ही मातापालकांची कसरत ठरू लागली आहे. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी काय करायचे? हाही प्रश्न उपस्थित आहे. काही पालक मोबाईलसह ड्युटीवर जातात. मोबाईल घरी नसतो. अशावेळी सायंकाळी सातची वेळ ठेवण्यात येते. यावेळी विद्यार्थी दमलेले असतात, जांभया देत बसतात नाईलाजाने, कारण पालकांचा खडा पहारा सुरू असतो. मॅडमनी प्रश्न विचारला की एकसाथ उत्तरे दिली जातात. एकच गोंगाट सुरु होतो. मध्येच लाइट जाते. कांही वेळा रेंज नसते. अशा वेळी अख्ख्या कुटूंबाला मनःस्ताप होतो.
ऑनलाईन शिक्षणाच्या कांही मर्यादा आहेत. मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑपरेशन चे शिक्षण ऑनलाईन देता येईल का? सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांला बांधकामाचे शिक्षण याप्रकारे देता येईल का? त्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षणच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी ऑनलाईन दूर करता येतील का? पालकांचे दुर्लक्ष झाल्या मुळे ऑनलाईन शिकत असलेला विद्यार्थी हुंदक्याने दाटला तर त्याचे अश्रू ऑनलाईन पुसता येतील का? मोबाईल समोर बसलेला विद्यार्थी शिकता शिकता झोपी गेला तर त्याचवेळी जागे करून त्याला समजवता येईल? ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यावर कितीतरी पाल्यांनी मोबाईल घेवून दिला नाही म्हणून आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण? ऑनलाईन शिक्षण गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहचणे अवघड आहे हेच खरे आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळे घराघरात अनेक गमतीजमती घडत आहेत. एक दादीमाँ आपल्या तीन वर्षांच्या नातवाला बडबडगीत म्हणायला सांगत असते.
दो चोट्यावाली, आम्मदकी साली।
आम्मद बुलाता, पेरू खलाता
पेरुमें शक्कर, तेरी मेरी टक्कर ।
असे म्हणत नातवाला टक्कर देणार असते, इतक्यात तिचा सात वर्षाचा नातू म्हणतो, "दादीमाँ टक्कर ऑनलाईन दे दो। उसको कोरोना हो जायेगा।कोरोना काळात इतक्या जवळून टक्कर द्यायची नसते."
मोबाईल विश्वात न गुरफटलेला एक मुलगा सकाळी उठल्याबरोबर ब्रश करत असतो. ते पाहून मोबाईल विश्वातील मुलगा पळतच आईकडे जातो व म्हणतो, "आई बघ ना तो वेडा, उठल्याबरोबर मोबाईल बघायचं सोडून ब्रश करत आहे." म्हणून म्हणते ऑनलाइन शिक्षण म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविणे होय, तो सर्वोत्तम उपाय नव्हे.
ऑनलाईन शिक्षणाने वेड लागले मोबाईलचे।
या वेडाला वेळीच आवरावे।
नाहीतर मातेरे होईल जीवनाचे।
ऑनलाइन शिक्षण ना शाप ना वरदान।
ते तर केवळ ऑनलाइन ज्ञानदान।
ऑनलाईन शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर निश्चित त्याचा फायदा होईल... छान शब्दांकन
उत्तर द्याहटवा