३१ ऑक्टोबर हा भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस त्यानिमित्ताने हा विशेष लेख
इंदिरा गांधी: एक कणखर नेतृत्व
लेखिका: डॉ ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गूगल
आज मी जिवंत आहे. कदाचित् उद्या मी नसेनही. पण कांहीं झालं तरी माझ्या रक्ताचा थेंबन् थेंब देशाच्या कामी येईल. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात बिहार प्रांताच्या पाच दिवसाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी, दौऱ्याच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात त्यांनी वरील उद्गार काढले होते. जणू कांही त्यांना आपलं भविष्य कळलं असावं.
२७ मे १९६४ रोजी पंडीत नेहरू स्वर्गवासी झाले. इंदिराजींचा खंबीर आधार गेला. पण पित्याप्रमाणे पाठीशी असलेल्या लालबहादूर शास्त्रीजी नेहरूजींच्या नंतर पंतप्रधान झाले. त्यांनी इंदिराजींना नभोवाणी प्रसारणमंत्री केले. इंदिराजींनी केवळ अठरा महिन्यात आपल्या खात्यात सुधारणा केल्या. टेलिव्हिजनवर लहान मुलांचे कार्यक्रम, शालेय कार्यक्रम सुरु केले. त्या कालावधीत त्यांनी रशियाचा दौराही पार पाडला. भारत आणि पाकिस्तान या युद्धाबाबत चाललेल्या बैठकीमध्ये भारताची बाजू परराष्ट्राच्या लोकांना पटविण्यात इंदिराजीना यश मिळाले.
११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींचा मृत्यू झाला आणि इंदिराजींना पंतप्रधानपद मिळाले. २४ जानेवारी १९६६ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी इंदिराजींना पंतप्रधानपद मिळाले. जगातील दुसऱ्या स्त्री पंतप्रधान म्हणून सर्वांनी त्यांचा गौरव केला. संकटसमयी विचारपूर्वक निर्णय त्या घेत असत. त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. रोज एक तास जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवायचे काम त्या करीत असत. देशाला पुढे आणण्यासाठी, इतर देशांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी त्या झटत असत.
अनेक संकटांंशी सामना करून इंदिराजींनी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान पासून पूर्व बंगालमधील जनता स्वतंत्र होऊ इच्छित होती. त्यासाठी त्यांनी पूर्व बंगालच्या जनतेच्या मदतीला भारतीय सैन्य पाठविले. या मदतीमुळेच १९७१ साली पूर्व बंगाल स्वतंत्र झाला. सन १९७२ सालच्या निवडणूकीत इंदिराजींच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. १९७५ साली त्यांनी आणीबाणी पुकारली. त्यांचा हेतू असंतोष रोखण्याचा होता पण कांही सहकाऱ्यांमुळे आणीबाणीतील अधिकाराचा दुरूपयोग झाला. त्यामुळे लोकमत बिघडले. १९७७ साली त्यांच्या पक्षाचा फार मोठा पराभव झाला. १९८० च्या जानेवारीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी परत इंदिराजींना प्रचंड बहुमताने निवडून दिले. हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा विजय होता.
२३ जून १९८० रोजी त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. इंदिराजींवर फार मोठा आघात झाला पण त्यातूनही सावरून त्यांनी जुलै महिन्यात नऊ दिवसाचा अमेरिका दौरा केला व भारत अमेरिका संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. तेथील लोकांचे प्रेम संपादन केले. त्याच वर्षी त्यांच्या पुढाकाराने भारतात नवव्या 'एशियाड' खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १९८३ च्या सात ते दहा मार्च यादरम्यान नवी दिल्ली येथे अलिप्त राष्ट्र परिषद भरविण्यात आली. त्यात इंदिराजींची परिषदेच्या अध्यक्षपदी निवड सर्व देशांच्या प्रतिनिधींनी एकमताने केली. १९८० साली २७ नोव्हेंबर पासून नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल परिषदेचे आयोजन करण्यात इंदिराजीनी पुढाकार घेतला.
ज्याप्रमाणे देशात इंदिराजींना सन्मान मिळाला त्याप्रमाणेच देशाबाहेरही मिळाला.
- १९५३ साली अमेरिकेने त्यांना मातृ पारितोषिक दिले.
- १९६० साली येल विद्यापीठातर्फे हॉलंड मेमोरिअल हे पारितोषिक त्यांना देण्यात आले.
- १९६५ मध्ये रोममध्ये 'इझाबेल डी एस्टे' नावाचे पारितोषिक त्याना मिळाले.
- रोमन अकादमीकडून 'राजधुरंधर महिला' म्हणून इंदिराजींना प्रथम सन्मान मिळाला.
१ मे १९६० ला द्विभाषिक राज्य संपले आणि संयुक्त महाराष्ट्र तयार झाला यामागे मुख्यत्वे इंदिराजींचे प्रयत्न होते.
खलिस्तानवादी अतिरेक्यांनी अमृतसरमधील शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिराचा आश्रय घेऊन दहशतीची कृत्ये सुरू केल्यामुळे नाईलाजाने इंदिराजीना ६ जून १९८४ रोजी सुवर्णमंदिरात लष्कर पाठविण्याचा अप्रिय निर्णय घेतला. दहशवाद्यांचा बिमोड करण्यात लष्कर यशस्वी झाले पण त्या दहशतवाद्यांंपैकी कांही माथेफिरूंंनी उघड उघड त्यांच्यावर सूड उगविण्याची भाषा सुरु केली, पण त्या जराही डगमगल्या नाहीत.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी त्या आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानातून निघून शेजारच्या कार्यालयाच्या इमारतीकडे जात असता एका माथेफिरूने त्यांच्यावर पिस्तुलातून सोळा गोळ्या झाडल्या. लगेच त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथील इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टारांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. भारताच्या लाडक्या इंदिराजींचे प्राण पंचतत्वात विलीन झाले.
अचूक निर्णय घेणाऱ्या, स्पष्ट बोलणाऱ्या, धैर्यशील वृत्तीच्या, कणखर इंदिराजींना कोटी कोटी प्रणाम।
खूप छान लेख
उत्तर द्याहटवा