शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी - विशेष लेख


राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी

१४ सप्टेंबर 'हिंदी दिन' यानिमित्त विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


       लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत हा जगाच्या पाठीवर सर्वात मोठा लोकतांत्रिक, बहुभाषी देश आहे. भारतात अनेकविध भाषांची रेलचेल आहे. भारताची भाषिक विविधता ही या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळापासून बहुभाषकता हे भारतीय समाजाचे मर्मस्थान आहे.


       १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला.  त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या १७ व्या भागात परिच्छेद ३४३ पासून ३५१ पर्यंत जी कलमे नमूद आहेत, त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून, तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.


       भारताची राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याच्या दृष्टीने हिंदी भाषा एका शतकापासून मोलाचं कार्य करून महत्वाची भूमिका बजावत आहे. हिंदी भाषेला संस्कृत भाषेचा वारसा लाभलेला आहे. संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचं कार्य हिंदी भाषा करत आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट यांच्याद्वारे हिंदी भाषेची संरचना, गती, प्रगती भारतीय नागरिक समजू लागले आहेत. देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असलेला एक महत्वाचा घटक म्हणून हिंदी भाषेला पुढे आणण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी अग्रणी भूमिका स्वीकारली आहे. यात हिंदी चित्रपटांचं योगदान मोठे आहे. गेल्या दशकात हिंदीच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे हिंदी इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान या आधुनिक साधनांमार्फत सर्वदूर पसरत आहे.


       आज भारतीय भाषांच्या समान विकासाची गरज भासू लागली आहे. त्यासाठी भाषांमध्ये परस्पर समन्वय स्थापित होणे आवश्यक आहे. हिंदी भाषा सर्वच भारतीय भाषांमध्ये समन्वय घडवून आणू शकते कारण हिंदी ही आज भारताची राष्ट्रभाषा, राजभाषा आणि संपर्कभाषा आहे. महान, उदार आणि सहिष्णुतेची भाषा म्हणून हिंदीकडे पाहिले जाते कारण सर्व भारतीय भाषांना आत्मसात करण्याची अदभूत क्षमता हिंदी भाषेत आहे. बाराव्या शतकापासून हिंदी भाषा सतत विकसित होत राहिली आहे. हिंदी भाषा ही स्वातंत्र्य संग्रामातून पुढे आली आहे. लोकशाही प्रणाली अधिकाधिक मजबूत करण्यासाठी हिंदी भाषेची मदत घेणं आवश्यक आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हिंदी भाषा राष्ट्रभाषा, महामंत्र, महाधार व मानबिंदू आहे.


       केंद्र सरकारने भाषाविषयक कायदे वेळोवेळी केले आहेत. या सर्व कायद्यांचा हेतू हिंदीला आणि प्रांतीय भाषांना संरक्षण मिळावे आणि त्यांची प्रगती व्हावी हा आहे. हिंदी दिवस हा फक्त हिंदी भाषेच्या विकासाची आठवण करून देणारा दिवस साजरा करण्याऐवजी सर्वच भारतीय भाषांचे संरक्षण करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. आज भारतातील बहुसंख्य जनता हिंदी भाषा बोलणारी व समजणारी आहे. अनुवादाच्या माध्यमातून हिंदी आणि इतर भाषा भगिनी एकमेकींच्या जवळ याव्यात, त्यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदान, सामंजस्य आणि प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा हीच सर्व भारतीयांची अपेक्षा आहे.


हिंदीमुळे ज्ञान-विज्ञान, मानवता व संस्कार गतिमान होवून विश्वाचे कल्याण होवो हीच प्रार्थना!


1 टिप्पणी: