कोण म्हणतय माणूसकी संपलीय?
(महापूरातील माणूसकी)
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
ऑगस्ट २०१९ चा अभूतपूर्व महापूर ही सर्वात मोठी जीवघेणी, संसाराची वाताहात करणारी, गोरगरिबांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी नैसर्गिक आपत्ती आली. एरव्ही संथपणे वाहणाऱ्या पंचगंगा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, वारणा व कृष्णा माईंनी रौद्ररूप धारण केले. महापूर आला. घराघरात पाणी शिरलं, भिंती खचल्या, चुली विझल्या, गॅस थंडावले, अनेक संसार उन्मळून पडले. मुकी जनावरे वाहून गेली. ब्रम्हनाळ ता. पलूस येथे प्राण वाचविणारी बोट पाण्यात बुडाली. बोटीतील २२ जणांचा मृत्यू झाला. नातेवाईक धाय मोकलून रडू लागले. आपल्या डोळ्यासमोर बोटीत चढलेला आपला नातेवाईक क्षणात पाण्यातून वाहून गेला. तो जिवंत आहे का मृत झाला हे सुध्दा समजेना. हे दृश्य पाहून सर्वा सर्वांच्या डोळ्यातही महापूर आले व पुराच्या पाण्यातच सामावून गेले. पूरग्रस्त लोकही आपस्वकीयांच्या काळजीने बेजार झाले. जीव तिळतिळ तुटू लागला. डोळ्यात प्राण आणून टी. व्ही. वरील बातम्या पाहू लागले. फोनद्वारे एकमेकांना आधार देवू लागले. या आपत्तीच्या वेळी खऱ्या माणुसकीचे झरे उफाळून आले. मनाला दिलासा मिळाला. दुःखातही अतीव सुखासमाधानाचे दर्शन झाले ते असे....
एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दल, गोरखा बटालियन आर्मी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटनांचे कार्यकर्ते हे सर्वच जवान सुरक्षारक्षक पूरग्रस्त लोकांसाठी देवदूत बनून आले. देशाचं आणि देशातल्या लोकांचे रक्षण करणं हे आमचं कर्तव्यच आहे असे म्हणणाऱ्या या जवानांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. आपली ड्युटी तर सर्वच बजावतात पण या जवानांनी या ड्युटीत आपला जीव ओतला. स्वत:चा जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या असंख्य जीवांना वाचवले. कोण? कुणाचे? कुठल्या जातीपातीचे? कुठल्या गटातटाचे? पण या बहाद्दरांनी स्वत:च्या नातेवाईकापेक्षा जास्त आपुलकीने आणि जिव्हाळ्याने पूरग्रस्तांना आपल्या हातांवर तोलून बाहेर काढले. छोट्या छोट्या गोंडस बालकांना गोंजारत कुरवाळत, त्यांचे अश्रू पुसत बाहेर काढले. म्हाताऱ्या कोताऱ्यांना धीर देत देत सुरक्षित ठिकाणी हलवले. केवळ माणसांनाच वाचवले असं नव्हे तर कुत्र्यासारख्या मुक्या प्राण्यालाही कडेवर घेतले. त्यांचे अंग पुसले, त्याला मायेची उब दिली. संसारात मन गुंतलेल्या घराबाहेर न पडणाऱ्या लोकांचे मनपरिवर्तन करून बाहेर काढले. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना खुबीने अन्नाची पाकीट, पाण्याच्या बाटल्या, दुधाची पाकिटे पोहोचवली. केवढा मोठा पराक्रम आहे यांचा! स्वत:च्या परिवारापासून दूर येऊन, पावसाची संततधार सुरू असताना पाय किरवंजलेले असतानाही प्रचंड मनोधैर्य राखून लोकांचे प्राण वाचविणाऱ्या या जवानांना कोटी कोटी सॅल्युट. या शूरवीर जवानांना राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्राण वाचविलेल्या या बंधू राजांच्या हातात राखी बांधली. त्यावेळी त्यांच्या मुखावरील आनंद समाधान अवर्णनीय होता. अशा वेळी वाटतं कोण म्हणतय माणुसकी संपलीय?
ब्रम्हनाळमधील बोट दुर्घटना व त्यातून बाहेर काढलेली प्रेतं पाहून हृदय गलबलून गेले. डोळ्यात अश्रू दाटले. बोट बुडताना एका मातेने आपल्या तान्हुल्याला उराशी कवटाळले होते. पुरात वाहून जातानाही तिने तान्ह्याला सोडले नव्हते. एवढा मोठा पूर मातेच्या ममतेला तान्हुल्यापासून दूर करू शकला नाही. पत्नीच्या निधनाने हतबल झालेल्या पतीचा अक्रोश हृदय पिळवटून टाकणारा सर्वांनी पाहिला. महापुरातून वाचलेल्या वयस्क पण धाडशी तीन महिलांचे मनोगत, शेजारच्या गावातील लोकांनी आमचा जीव वाचवला हे बघून वाटते. कोण म्हणतय....
काही ठिकाणी जनावरांना गच्चीवर नेऊन त्यांचा जीव वाचवला. कोल्हापूर जिल्ह्यातील कुण्या भल्या माणसाने स्वत:च्या शेतातील ऊस तोडून दीडशे जनावरांची भूक भागवली. दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व अशा सर्वच कारखानदारांनी, नेत्यांनी, सामाजिक बांधिलकी जपत हजारो लोकांना आसरा दिला. त्यांच्या जेवणाची व औषध पाण्याची व्यवस्था केली. हे बघून वाटते कोण म्हणतय...
एरव्ही हा हिंदू, तो मुस्लिम, हा अमक्या जातीचा तो तमक्या जातीचा म्हणणारे हे लोक पूरग्रस्त छावणीत एकमेकांना साथ देत मदतीचा हात देत गुण्यागोविंदाने राहिले. विशेष म्हणजे कुंजवनात अनेक मुस्लिम परिवार राहिले तर ईदगाह कार्यालयात अनेक हिंदू परिवार राहिले. महापुरात अनेक घरांच्या दगड, माती, विटा यांच्या भिंती कोसळल्या पण सर्वधर्म समभावाच्या, सहिष्णुतेच्या, जातीय सलोख्याच्या, बंधुभावाच्या व माणुसकीच्या भिंती भक्कम झाल्या. माणुसकीचे यापेक्षा सुंदर दर्शन नसेल.
दुष्काळग्रस्त जत, आटपाडी, मंगळवेढा यांच्याकडून मदतीचा ओघ आला. लातूर-सोलापूर कडून अन्न शिजवून देण्यासाठी आचाऱ्यांचं पथक आलं, या आचाऱ्यापैकी मुस्लिम असलेल्या बांधवांनी बकरी ईद असूनही घरांकडे न जाता अन्न शिजवून देण्याचं काम करत राहिले. अनेक मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करून पूरग्रस्तांना मदत केली. हे पाहून वाटतं माणुसकी अजूनही शिल्लक आहे, कोण म्हणतय....
शैलजा जयंत पाटील या आमदार पत्नीनं आष्ट्यात दाखल झालेल्या कोवळ्या बाळंतिनीस, तिच्या आईस व छकुल्यास स्वत:च्या गाडीतून कारखान्यावर आणून तिच्या राहण्याची सोय केली. तिला गरम पाणी देण्याची सोय केली. एवढेच नव्हे तर छकुल्यासाठी नवा पाळणाही आणून दिला. माणुसकीची ही प्रज्वलीत ज्योत माणुसकी निश्चितच जिवंत ठेवेल, मग कोण म्हणतयं...
बाप आणि मुलगी यांच अनोखं नातं महापुरातही दिसलं. माझ्या बाबाना पाण्यातून बाहेर काढल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही असे म्हणून भोकाड पसरलेली सात-आठ वर्षाची चिमुरडी आपणा सर्वांनाच दिसली. माणुसकीचा गहिवर प्रकर्षाने जाणवला.
एरव्ही तावातावानं वस्तुस्थितीचं वर्णन करणारे आपण सर्वांनी बघितलेत पण सांगलीच्या पुराचं वर्णन करताना कंठ दाटून आलेल्या पत्रकार माणुसकीचं अनोखं दर्शन देऊन गेला. अशावेळी वाटलं कोण म्हणतय माणुसकी संपलीय?
या धकाधकीच्या व गतिमान युगात एकमेकांकडे राहायला जाण्यास सवड नसलेले नातेवाईक आपल्या नातेवाईकांकडे तब्बल ८ ते १० दिवस सहकुटूंब सहपरिवार जाऊन राहिले. नातेवाईकांनीही सेवेची संधी समजून उत्कृष्ठ पाहूणचार केला. इथेही घडले माणुसकीचे दर्शन..!
मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार स्वयंस्फुर्तीने पूरग्रस्तांच्या मदतीस हजर झाले. जेनेलिया व रितेश देशमुखांनी २५ लाखांची मदत केली. सकाळ वृत्तपत्र समुहाने कोटीची मदत दिली. शरद पवारांनी अर्ध्या तासात एक कोटींची मदत मिळवून दिली. खा. संभाजीराजे यांनी खासदार निधीतून ५ कोटींची मदत केली. मराठी चित्रपटसृष्टीतील सुबोध भावेंनी पुढाकार घेवून अनेक जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. मदतीचा ओघ सुरू राहिल. पूरग्रस्त बांधव बळ एकवटून आलेल्या संकटाचा सामना करतील. चिखलगाळ काढतील. मोडलेला संसार पुन्हा उभारतील. धरणीमाता तृप्तपणे सर्वांच्या शेतातील मातीतून मोती पिकवून देईल. पर्जन्य राजाचा अनावर झालेला क्रोध शांत होईल. नद्या रौद्र रूप सोडून संथपणे वाहतील व नेहमीप्रमाणे आपल्या लेकरांवर मायेचा वर्षाव करतील, यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. सुख के सब साथी दुख के न कोई असे न म्हणता
दुःख के सब साथी ।
हमने देखी इन्सानियत की ज्योती !
Nice , 👌👌👍💯
उत्तर द्याहटवा