कोरोनानं मरण स्वस्त केलं
कोरोनाचा कहर सारं जग अनुभवत आहे. प्रसारमाध्यमातून कोरोनाग्रस्तांचा वाढतच चाललेला आकडा पाहून छातीत धस्स होत आहे. बरे झालेल्यांचा आकडा पाहून थोडेसे हायसे वाटत असतानाच शेवटचा मरण पावलेल्यांचा आकडा पाहून डोके सुन्न होत आहे. कोरोनानं मांडलेलं मृत्यचं थैमान पाहून वाटतं कोरोनानं मरण स्वस्त केलय, बाकी सर्व महाग केलयं. दररोज शेकडो, हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अंत्यविधीसाठी चार लोकही मिळेनात. मृत्यूमुखी पडलेल्याचे नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन केलेले असतात. तो एकटाच असतो शेवटी मृत्यूला सामोरा गेलेला. हे पाहून "पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" असंच म्हणायची वेळ आली आहे . "येशी एकटा जाशी एकटा, जगण्यासाठी करिशी नाटक तीन परवेशांचे हेच खरे."
मरण कुणालाही चुकलेलं
नाही. देवादिकाना, साधुसंताना, थोर महात्म्यांना चुकले नाही तिथे तुमच्या आमच्या सारख्या पामरांची काय कथा.
मरण अटळ आहे हे मान्य करूनही वाटत राहते, यापूर्वीचे मरण कसे होते? मरणासन्न
अवस्थेत सर्व नातेवाईक आजूबाजूला बसलेले असायचे. हवं नको बघायचे, तोंडात एखादा घास भरवायचा प्रयत्न करायचे, चमच्याने घोटभर पाणी पाजायचे.आयुष्यभर
ज्यांच्यासाठी झटलो, जिवाचे रान केले ती मुलंबाळं डोळे भरून पाहता
यायची, हाडांची काडं करून उभारलेल्या संसारावर तृप्तीची नजर टाकता येत होती. शेवटची इच्छा बोलून किंवा खुणेने का होईना सांगता
येत होती, ज्यांनी आपली सेवा केली त्यांचा हात हातात घेता येत होता. सद्या मरण
पावणारे या सर्व गोष्टीला मुकत आहेत. कर्मचारी, आरोग्यसेवक असतात आजूबाजूला पण जिवा भावाच्या माणसांची जागा ते घेऊ शकतात का? ते यंत्रवतपणे आपली कामे करत असतात. त्यांचा तरी
काय दोष म्हणा, ते आपला जीव धोक्यात घालून दिवसभरात अनेक लोकांचे अंत्यविधी पार
पाडत असतात. जेसीबीने काढलेल्या एकेका खड्यात चार चार शव एकावर एक रचून खड्डे
मुजवले जात आहेत, एकेका चितेत दोन तीन शव घालून दहन केले जात आहेत. पत्नी कोरोनाने
मरण पावल्यावर पतीला अटॅक येत आहे. पतीला कोरोनाबाधा झाल्याचे ऐकूनच
पत्नी प्राणाला मुकत आहे. तरुण अपत्य बाधित झाल्याचे ऐकून आईवडील घाबरूनच देवाघरी
जात आहेत. कोणी कुणाला समजवायचे, कुणी कुणाला आवरायचे तेच समजेनासे झाले आहे, कारण सोशल डिस्टनिंग.
काय दिवस आलेत बघा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मनुष्य आयुष्यभर झटतो.
त्याचा शेवट असा होतो आहे. तुम्ही म्हणाल, काय हा हळवेपणा! माणसाचं शरीर एक यंत्र
आहे, ते बंद पडलं की द्यायच फेकून. तसं तात्विक
दृष्ट्या बरोबर आहे तुमचं म्हणणं पण मन आणि मशीन यात फरक
आहे. मनात भावना असतात. भावनाशून्य अवस्थेत मशीनवत् विधी नशिबी येत आहेत.
आईवडील गेल्याचे ऐकून मुलीने फोडलेला पूर्वीचा हंबरडा कुठे गेला? स्वतःचं
अपत्य गेल्याचे बघून आईची आर्त किंकाळी कुठे गेली?आज वडिलांच्या अंत्यविधीसाठी
आलेला मुलगा लॉजवर राहून शेजाऱ्यांना फोन करतो अंत्यविधीचा खर्च पाठवून
देतो. तुम्हीच घ्या उरकून सगळं. शेजारची माणुसकी ला जागणारी माणसं जातपात विसरून
अंत्यविधी करत आहेत. ज्यानं लाखो जणांना औषध देऊन बर केलं त्याच्या दफनविधीला
नातलग तर सोडाच, चार माणसंही मिळू शकली नाहीत, दोघांवरच दफनविधी
उरकावा लागला. कांही ठिकाणी कोरोनाने मरण पावलेल्यांच प्रेत नातलगांनी ताब्यात
घेतला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनीच अंत्यविधी पार पाडला. ही सगळी परिस्थिती पाहून
संवेदनशील माणसाच्या ह्रदयाच्या चिंधड्या होत आहेत.
अशाच चिंधड्या झाल्या एक मरण पाहून. उच्चपदस्थ अधिकारी, लेखिका, कवयत्री, समाजसुधारक आदरणीय 'नीला सत्यनारायण' यांच्या मृत्यूने. जेंव्हा त्या जिवंत होत्या तेंव्हा त्यांना सतत मोठमोठ्या राजकीय
नेत्याकडून फोन यायचे. त्या एवढ्या व्ही आय् पी होत्या की त्यांना चोवीस तास पोलिस
संरक्षण होते. त्या जेंव्हा घराच्या बाहेर पडत तेंव्हा एकामागून एक पाच गाड्या जात
होत्या आणि सोबत असायचा पन्नास साठ लोकांचा ताफा. कांही दिवसांपूर्वी त्यांच्यावर
ओशिवरा येथे अंत्यसंस्कार झाले मृत्यूनंतर त्यांना हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत एकट्यानेच जावे लागले, त्यांची मुलगी अनुराधा प्रभूदेसाई ही दादर
येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात होती. त्यांचा मुलगाही कोरोनामुळे
त्याच हॉस्पिटलमध्ये होता तर त्यांचे पती अतिदक्षता विभागात ऍडमिट होते. मंत्रालयातील एकही कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हता. एकही नातेवाईक हजर
नव्हता. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ पन्नास सरकारी उच्च पदे भूषविली होती. सोबत
होते कांही कर्मचारी पीपीई किट घातलेले. त्यांनी अंत्यविधीचा व्हिडीओ करून ठेवला
नातेवाईकांना दाखविण्यासाठी. त्यांच्या अंत्यविधीचे हे चित्र पाहून ह्रदयात
वेदनेची कळ आल्याशिवाय राहिली नाही म्हणावेसे वाटले, कोण होतीस तू, काय झालीस तू ,अग वेडे कशी कोरोनाबाधित
झालीस तू.
कोरोनाच्या या करूण कहाण्या जीवनाचे एक विदारक सत्य सांगून जातात, "तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा