शनिवार, १८ जुलै, २०२०

उसवलेली नाती - मराठी कथा


उसवलेली नाती 

लेखिका  - डॉ. ज्युबेदा तांबोळी



       गेला महिनाभर आजारी असलेल्या शांताबाईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. आधीच क्रुश असलेल्या शांताबाईंच्या क्रुश देहाकडे पहावत नव्हते. लकवा मारल्यामुळे तिच्या शरीराची एक बाजू हलत नव्हती. तिला बोलताही येत नव्हते. पण तिचे डोळे मात्र कमालीचे बोलके वाटत होते. प्रकषार्ने जाणवत होते की तिचे डोळे नेहमी दरवाजातून येणाऱ्याकडे लागलेले होते. व्यक्ती पुढे आली की काहीशी नाराज दिसायची. त्याचं आनंदाने स्वागत करायची ती मूकपणे, पुन्हा दरवाजातून कुणी येण्याची चाहूल लागताच हरखून जायची, पुन्हा निराश व्हायची असा सिलसिला दिवसभर चालू असायचा तिच्या छोट्याशा वाडीतील सर्व बाया बापडी, मुली-बाळी, म्हातारी, कोतारी तिला भेटून गेली होती. 

        शांताबाई कुणाची तरी डोळ्यात जीव आणून वाट पहात होत्या हे नक्की. कुणाची बरं  वाट पहात होत्या त्या? वाट पहात होत्या त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीची. अरूणाची, जिला या दोघांनी म्हणजे शांताबाई, सखारामानी तळहातावरील फोडाप्रमाणे वाढवली होती. धुमधडाक्यात लग्न करून दिले होते. लग्नासाठी जमिनीचा एक तुकडाही विकला होता त्यांनी. स्वतः सरकारने बेघरासाठी बांधून दिलेल्या एका छोट्या खोलीत रहात होते. अरूणा त्यांच्या गावापासून तीनशे कि.मी. अंतरावर असलेल्या शहरात रहात होती. लग्न झाल्यावर कांही वर्षे ती इकडे यायची सुट्टीला,आईच्या हातून सेवा करून घ्यायची. काबाडकष्ट करून साठवलेल्या पैशातून मानपान, चालरीत हौसमौज करून घेऊन निघायची.

        वर्षामागून वर्षे, दिवसामागून दिवस जात होते. शांताबाई सखाराम दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायचे. जमेल तशी इतरांना मदत करायचे. कुणाच्या अध्यात मध्यात नसायचे. आपल काम भलं की आपण भले अशी त्यांची वर्ती त्यामुळे सगळ्या वाडीतील लोक या दोघांना मानायचे, त्यांच्याकड आदराने बघायचे. एकेदिवशी शेतात काम करत असतानाच शांताबाईना चक्कर आली. सोबत्यानी गाडी करून तिला शहरातील दवाखान्यात नेलं. ताबडतोब उपचार झाले. लकवा मारल्याने शांताबाईची एक बाजू निकामी झाली. योगायोगाने त्यांच्या वाडीच्या सरपंचाच्या सांगण्यावरून डॉक्टरानी बील तर घेतले नव्हतेच शिवाय आठवड्याला घरी येऊन ईलाज करण्याची हमी दिली होती. आंधळ्याच्या  गायी देव राखतो म्हणतात ते अगदी खरे आहे. शेतातून दवाखान्यात नेल्याबरोबरच शेजारच्या अशोकने तिच्या लेकीला फोन केला, तर लेक म्हणाली आम्ही उद्या फाँरेनटूरला निघालो आहोत. सहा महिन्यापूर्वीच आम्ही दोघांचे चार लाख भरून बुकिंग केले आहे. बुकिंग कँन्सल करता येणार नाही. आईला नेल ना दवाखान्यात, उपचार तर डाँक्टर करणार आहेत, फार तर मी बाबांच्या खात्यावर दोन हजार जमा करते. एक महिन्यानंतर आल्यावर आईला भेटून जाईन, बाबाना तिची काळजी घ्यायला सांगा. फोन बंद केला अशोकनेच.

          सखाराम अगदी मनापासून तिची सेवा करत होता. सकाळ संध्याकाळ अंथरूण पांघरूण बदलायचा, केस विंचरायचा,आंघोळ घालायचा, गरम खिचडी करून भरवायचा हे काम तो इतक्या सहजतेने करायचा की बस्स।पतीकडून सेवा करून घेताना शांताबाई त्याच्याकडे डोळे किलकिले करून पहायच्या. सेवा कळतानाचा सखारामचा कुर्तार्थ हसरा चेहरा पाहून शांताबाईंचा चेहराही  प्रसन्न दिसायचा. त्यांच्या चेहऱ्यावर भाव उमटायचे, किती भाग्यवान आहे मी. पण डोळे दरवाजातून येणाऱ्याकडे खिळलेले असायचे.

         बघता बघता महिना संपला. लेक आज येईल उद्या येईल अशी सखारामलाही  आशा होती. त्याने अशोकला लेकी ला फोन करण्याची विनंती केली. ती फोनवर म्हणाली बाबा, टूरवरून येऊन दोनच दिवस झालेत .आता मला शाळेत हजर व्हायला हवं. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. रजा वाढवून मिळणार नाही. शिवाय माझ्या लेकाची अमितची बारावीची परीक्षा पुढच्या आठवड्यात सुरु होतेय. फार महत्वाची परीक्षा आहे ही. या परीक्षेवरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे. बाबा कशी येऊ मी तिकडे? तुम्ही घेताय ना काळजी तिची, डॉक्टर येऊन तपासतात ना आठवड्याला, मग मी अमितची परीक्षा झाल्यावरच येऊन जाईन. हुंदका गिळत बाबानी फोन बंद केला.

         शेवटी तो दिवस उगवलाच. सकाळी चहा ठेवून तोंड धुवायला पाणी घेऊन सखाराम तिला उठवायला गेला पण शांताबाईनी झोपेत च जगाचा निरोप घेतला होता. सखारामने जिवाच्या आकांताने टाहो फोडला. हातातले काम सोडून शेजारी पाजारी जमा झाले. लेकीला फोन केला. थोड्या वेळाने अशोकला तिचा फोन आला. अशोक जे व्हायला नको ते झालय मला फार वाईट वाटत आहे पण माझा नाईलाज आहे. मी येईपर्यंत प्रेताची हेळसांड  नको. तुम्हा सगळ्यांचा वेळही वाया जायला नको. तुम्ही क्रियाकर्म आवरून घ्या. मी आले असते पण माझ्या लेकाची महत्त्वाची बारावीची परीक्षा सुरु आहे. क्रियाकर्मचा व्हिडीओ करून माझ्या मोबाईलवर पाठव. शांताबाईला मरण आले होते तेही शुक्रवारी. बायकांनी नवं कोरं हिरवं लुगडं आणल. तिला नेसवून कपाळाभर कुंकू लावलं. डोळ्याला लावायला सोन्याचा मणी आणला. तिच्या मंगळसूत्रातील काळे मणी वाटून घेतले. किती सुंदर दिसत होती शांताबाई. अशोकने शिंकाळे धरले. क्रियाकर्म यथासांग पार पडले. व्हिडीओ करून पाठवला. लेक थँक्स म्हणाली. आईच्या अस्थी कुरीअरने पाठवा म्हणाली. शेजार्यानी या गोष्टीला ठाम नकार दिला.

         अमितने जो अरुणाचा मुलगा होता त्याने आईला एक मेसेज पाठवला, आई तुझ्याविषयी मला नितांत आदर आहे. तुझे माझ्यावर अमाप प्रेम आहे. माझ्या भवितव्याची तुला खूप काळजी वाटते हे मी जाणतो. बारावीपर्यंत माझी आई या विषयावरील निबंधास मला पैकीच्या पैकी मार्कस् मिळाले आहेत. वक्तृत्व स्पर्धेतही या विषयावरील स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आलाय हे तुला माहित आहेच. पण गेल्या काही दिवसात माझ्या आईचे वेगळेच रूप मी पाहतोय. जन्मदात्या आईला तू भेटायला गेली नाहीस, क्रियाकार्मालाही गेली नाहीस त्यामुळे आता माझ्या कडून तुझ्या शेवटच्या क्षणी या अपेक्षा ठेवू नकोस, कारण त्यावेळी मी  फोरेनमध्येच असेन ना आई?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा