शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

भावनात्मक एकता व सामाजिक पावित्र्याचा सण रक्षाबंधन - विशेष मराठी लेख


भावनात्मक एकता व सामाजिक पावित्र्याचा सण रक्षाबंधन

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल

     श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. या महिन्यात पावसामुळे सगळीकडे हिरवळीचे साम्राज्य पसरलेले असते. हिरवागार शालू नेसून नटलेली धरती पाहून सगळीकडे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. सर्वांच्या उत्साहाला उधाण येते ते सणांच्या आगमनाने.

    श्रावण शुद्ध पौर्णिमेस नारळी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेस पावसाचा जोर हळूहळू कमी होतो. पावसामुळे थांबलेली जहाजे व नौकाविहार पुन्हा सुरू व्हावेत, वरूण देवतेचा कोप न व्हावा म्हणून कोळी बांधव या पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करतात त्यामुळे या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते म्हणून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणतात. भावाला राखी बांधल्यामुळे बहीण भावाचे प्रेम वृद्धिंगत होते. भावाला आपल्या बहिणीचे रक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीव होते. त्याचप्रमाणे सर्व अशुभ गोष्टींचा नाश होवून सुखसमाधान, धन, आरोग्य इत्यादींची प्राप्ती होते अशी लोकांची धारणा आहे.

राखी पौर्णिमेच्या काही उत्पतीकथा आहेत त्या अशा.

     चितौडची राणी कर्मवती हिने मुघल बादशहा हुमायूनला भाऊ मानून त्याला राखी पाठवली होती. जातपात अथवा धर्म असा कुठलाही भेदभाव न ठेवता राणीने भाऊ मानल्यावर हुमायूनने बंधू कर्तव्याच्या भावनेने तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून चितौडचे रक्षण केले.

     राजा सिकंदराने पुरू राजावर स्वारी करण्याचा मनसुबा केला तेंव्हा सिकंदराला सांगण्यात आले की, पुरूशी युद्ध करून जिंकणे असंभव असून तुझ्यावरच गंडांतर येईल, तेंव्हा सिकंदराच्या राणीने भारतीय संस्कृतीनुसार पुरु राजाला राखी  पाठवली व सांगितले की तुम्ही माझ्या पतीशी युद्ध करण्यास हरकत नाही परंतु तिच्या पतीचे रक्षण करावे. पुरुने ते मान्य केले. त्यानंतर पुढे युद्धप्रसंगी सिकंदरावर तलवारीची अंतिम आघात करण्याची संधी पुरूला आली. पण त्याच क्षणी त्याला बहिणीचे शब्द आठवले व त्याने आपल्या बहिणीच्या सौभाग्याचे रक्षण केले. त्यामुळे पुरू राजा सिकंदराच्या ताब्यात आला, बंदिस्त झाला. सिकंदराच्या राणीने सिकंदराला सर्व हकीगत सांगून पुरुच्या जीविताला धक्का लागू न देण्याची विनंती केली. पुरू राजाला सिकंदराने जेंव्हा विचारले की त्याला कशी वागणूक द्यावी तेंव्हा पुरूने उत्तर दिले की एक राजा दुसऱ्या राजाला वागणूक देईल, तशीच. त्याचे हे स्वाभिमानी उत्तर ऐकून सिकंदराने त्यास बंधमुक्त केले व त्याचे राज्यही त्याला परत केले.

     तिसरी कथा अशी, दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत  नदीत टाकून दिले. एका स्त्रिने ते पाहिले. प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शहाआलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले. तिला आपली  बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शहाआलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादूरशहा यांनीही चालू ठेवली. इतिहासात याचा उल्लेख आहे. मुघल बादशहानी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे.

       असुरांकडून एकदा इंद्राची दुर्दशा झाली. इंद्राणीने इंद्राच्या हातावर राखी बांधली व त्याला प्रेरीत केले. त्या राखीच्या प्रभावामुळे इंद्राने असुरांची दाणादाण उडवली. शुक्राचार्यानी असुरांना सांगितले की त्या राखीच्या प्रभावामुळे इंद्राला बळ प्राप्त झाले आहे. तोपर्यंत तुम्ही शांत राहून वाट पहा.असुर शांत झाले.

     अशा प्रकारे रक्षाबंधन हे राखी बांधण्यामुळे रक्षण तर करतेच. त्याचप्रमाणे ज्यांना राखी  बांधतात त्यांचेही रक्षण करते, त्यांना बलवान करते. रक्षाबंधनाचा सण प्रेम आणि बंधुत्व यांचे प्रतीक आहे म्हणून आपण  सर्वानीच या दिवशी प्रेम आणि बंधुत्व जपू या...

३ टिप्पण्या: