शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख


साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       नागपंचमीच्या सणादिवशी नागोबाची पूजा केली जाते. इतर अनेक पाळीव प्राण्याप्रमाणेच सापाची आपण मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. पण ही पूजा अंधश्रध्देतून केली जाते. कारण माणसाला सापाची खरी ओळख झालीच नाही. पर्यावरण संतुलनात सापाचं विशेष महत्त्व आहे.


सापांबाबत गैरसमजुती वा अंधश्रद्धा:

       साप हा पूर्णपणे मांसाहारी आहे. तो लाह्या खात नाही. तहानलेल्या सापापुढे दूध ठेवले तर ते पाणी समजून दूध पितो परंतु पाणी नाही हे समजल्यावर आपोआप तोंड बाजूला करतो. दूध पिल्यामुळे त्याला न्यूमोनिया होण्याची दाट शक्यता असते.


       साप पुंगीच्या तालावर नाचतो हाही एक गैरसमज आहे. खरं तर तो पुंगीच्या हालचालीप्रमाणे आपल्या फण्याची हालचाल करतो. आपल्याला वाटते तो डुलत आहे.


       सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. सापाचं गुप्त धनाशी कांही देणंघेणं नसतं. साप डूख धरतात या समजुतीला कांहीही शास्त्रीय आधार नाही. साप विशीष्ट कालावधीनंतर कात टाकतो. सापाची कात नीटपणे निघून गेली नाही तर ती सापाच्या शरीरावर असतांना पांढऱ्या केसांसारखी दिसते.


       नागपंचमीची पूजा ही सापांच्या हालाची पर्वणी असते. गारूडी हाल हाल करून त्यांना पकडून ठेवतात. त्यामुळे त्यांना कित्येक दिवस उपाशी रहावे लागते. त्यांना नाईलाजाने दूध पिल्यामुळे आजारी पडावे लागते. फोटो काढण्यासाठीही सापांचा उपयोग केला जातो. दुसऱ्या दिवशी बिचारे साप मरून पडतात.


सापांविषयी अधिक माहिती:

       स्वतःच्याच धुंदीत तुरूतुरु सरपटणारा हा प्राणी कधी कधी धडकी भरवतो. केवळ स्पर्शज्ञान असलेल्या सापाला कुणाशीही देणंघेणं नसतं. केवळ स्वसंरक्षणासाठी तो चावतो. चुकून त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला स्पर्श झाला तरच तो चावतो. तो निघतो सावज शोधण्यासाठी दुर्दैवाने वस्तीत येतो आणि त्याचं आयुष्य संपून जातं.


       भारतात समुद्रसर्प आणि जमिनीवरील चार साप सोडले तर बाकी साप बिनविषारी आहेत. नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस हे ते चार विषारी साप आहेत. सापाच्या एकूण २३८ जाती आहेत. याचा अर्थ असा की केवळ दोन टक्के साप विषारी आहेत.


साप शेतकऱ्यांचा मित्र कसा ?

       शेतात पिकविल्या जाणाऱ्या अन्नधान्यातील सुमारे १६ टक्के धान्य उंदीर खाऊन फस्त करतात, तर साठवणीतील सुमारे १० टक्के अन्न उंदीर खाऊन टाकतात व सशक्त बनतात आणि पिलावळीचं लटांबर निर्माण करतात. उंदीर हे सापाचं नैसर्गिक खाद्य आहे. धामण नावाचा साप शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र आहे कारण हा साप केवळ उंदीरच खातो. विशेष म्हणजे हा साप बिनविषारी आहे. एक धामण आठवड्याला किमान सहा उंदीर खाते. अशा प्रकारे एक धामण आपल्या संपूर्ण जीवनात सुमारे सत्तर हजार उंदीर खाते. एवढी महत्त्वाची भूमिका धामण साप पार पाडत असताना केवळ अंधश्रद्धेपायी आणि भीतीपोटी दिसला साप की मारून टाकतो. हे बरे नव्हे.


सर्पविष  अनमोल कसे? 

       साप चावल्यानंतर त्याचं विष चढू नये म्हणून खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारी दवाखान्यात विषविरोधी इंजेक्शन घेणं केंव्हाही फायद्याचे आहे. हे इंजेक्शन सर्पविषापासून तयार केलं जातं. त्यामुळे विषारी साप मारून टाकण्याऐवजी ते पकडून हाफकिन संस्थेला पाठवून द्यावेत. सर्पाच्या विषामध्ये कितीतरी प्रकारची वितंचकं (enzymes) असतात. त्यांचा वापर प्रतिविषासारखी औषधे तयार करण्यासाठी होतो. अनेक प्रकारच्या कठीण अशा रासायनिक व जीवरासायनिक प्रक्रियाना गती देण्याचं कार्य करता येतं.


ढोलगरवाडीची शास्त्रीय नागपंचमी:

       कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी या छोट्या गांवी सर्पमित्र बाबूराव टक्केकरव त्यांचे शिष्यगण सर्पप्रदर्शन भरवतात. सर्पांचे चित्तथरारक खेळ सादर करतात. त्याचप्रमाणे सर्पाविषयी शास्त्रीय माहिती देतात. त्यांच्या सर्पालयात तीनशेहून अधिक सर्पांच्या जाती आहेत. विषारी, बिनविषारी वेगवेगळ्या रंगांचे अनेक प्रकारचे सर्प येथे पहावयास मिळतात. ढोलगरवाडीची ही शास्त्रीय नागपंचमी देशाला मार्गदर्शन करणारी आहे.


सारांश:

       पर्यावरण संतुलनात सर्पांचे विशेष महत्त्व आहे. अन्नसाखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. साप जगवणं म्हणजे पर्यावरण संतुलनासाठी सापांची मदत घेणं होय. १९७२ च्या कायद्यान्वये सापांना पूर्ण संरक्षण दिले आहे. या कायद्याप्रमाणे साप पकडणे, बाळगणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे येणारी नागपंचमी सापांचे संवर्धन, संरक्षण करण्यास उपयुक्त ठरावी.


सर्व वाचक बंधू भगिनींना नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ।