शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

संत नामदेव महाराज - विशेष लेख


संत नामदेव महाराज यांची ६ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हा विशेष लेख.


संत नामदेव महाराज - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com


       आपल्या देशात संतांचे एक वेगळे योगदान आहे, वेगळे अधिष्ठान आहे.  संतांनी लोकांना दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे आहेत. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत अशी समतेची शिकवण संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली.


अल्पपरिचयः

       संत नामदेव शिंपी समाजातील होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर फिरले. लोकांना गाढ भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. महाराष्ट्रात त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात.


संत नामदेव महाराज यांचे योगदान:

       संत नामदेव महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजांत त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या किर्तनात स्वतः विठूमाऊली डुलत असत, अशी आख्यायिका आहे. आपल्या संतपरंपरेने भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. या संप्रदायाच्या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला म्हणजेच संत नामदेवांना दूर ठेवणं, हा आपले आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान ठरेल. मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. भागवत धर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे, हे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सांगितले. नामदेव महाराजांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर फडकवली. तसेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात खूप मोठं योगदान दिलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माऊलीनंतर पन्नास भक्तीचा महिमा सांगितला.


       संत नामदेव महाराज यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुवादी संत आहेत. 


संत नामदेव यांच्या कार्याचे वेगळेपणः

       त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबामध्ये त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांच्या पुढाकारातून पंजाबमधील घुमानमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केलं होतं. त्यावेळी पंजाबी व मराठी भाषाभगिनी एकत्र आल्या होत्या.

संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या बहिणाबाईंच्या काव्य ओळी आठवतात.

"संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।

नामा तयाचा कंकर। तेणे केला हा विस्तार।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।"

महाराष्ट्र भागवत धर्माची ही इमारत किती भक्कम आहे हे बहिणाबाईनी इतक्या समर्थ शैलीत नोंदविली आहे.


नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात....

अहंकाराचा वारा न लागो राजसा।

माझिया विष्णूदासा भाविकांशी।।

आज हेच तत्त्वज्ञान आपण आचरणात आणणं गरजेचं आहे. जिथं अहंकार आला तिथं उध्वस्त होणं, नष्ट होणं आलं. भलीभली साम्राज्ये येतात जातात. नंतर त्यांच्या अस्तित्व खुणा दिसणंही दुरापास्त होतं. 


संत नामदेव आणि अभंगछंद:

       नामदेव महाराजासारख्या द्रष्ट्या युगपुरूषाचे सुरवातीच्या काळातील नेतृत्व हेच वारकरी संप्रदायाच्या अफाट लोकप्रियतेचे गमक आहे. केवळ वारकरी संप्रदायाच नाही तर कबीरपंथ, दादूपंथ, शिख यासारख्या अनेक धर्म पंथांचं प्रेरणास्थान संत नामदेव आहेत. नामदेवरायांचा आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचा प्रभाव इतकी शतकं टिकून राहिला याचं एक कारण म्हणजे नामदेवरायांनी साहित्य व्यवहारात प्रस्थापित केलेला लोकाभिमुख असा अभंगछंद. त्यांच्या पूर्वीही अभंग असेल पण नामदेवरायांनी अभंग छंदाला लोकप्रिय केलं आणि ईश्वरी पावित्र्यही मिळवू दिलं. अभंग कसा लिहावा याची मांडणीही नामदेवरायांनीच केली. त्यांच्याच प्रेरणेतून अनेक संतांनी अभंगरचना केल्या. अगदी सतराव्या शतकातील तुकोबारायांनांही स्वप्नातून जागे करत अभंग लिहायला नामदेवरायांनी प्रवृत्त केलं.


       मध्ययुगीन मराठी साहित्यात सर्व स्तरातल्या जातीधर्माच्या स्त्री पुरूषांनी ज्या छंदात रचना केली असा अभंग हा एकमेव छंद असावा. त्यामुळेच अभंगसाहित्य हा मध्ययुगीन मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह ठरतो. त्र्यं. व. शेजवलकर म्हणतात, त्याप्रमाणे अभंग हा ओवी वृत्तापेक्षा पाठ करायला सोपा असणारा छंद आहे. त्यामुळे वारकरी संतांचे अभंग सहजपणे सर्वसामान्य लोक पाठ करू शकत. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या प्रसारात अभंग गाथेचाच अधिक वाटा आहे. हे अभंग सर्वसामान्य माणसाच्या तोंडी असल्यानेच पिढ्यानपिढ्या मौखिक रूपात संक्रमित होत राहिले.


       संत नामदेव महाराज ज्ञानेश्वरांनंतर भारतभर फिरले. पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची कांहीं पदे आजही शीख लोकांच्या धर्मग्रंथात पहावयास मिळतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अभग घराघरांतून भक्तीने गायले जातात.

अशा थोर संत महात्म्यास कोटी कोटी नमस्कार.......।