विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशेष लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ जुलै, २०२१

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख


२२ जुलै दिवशी बेंदूर म्हणजेच बैलपोळा हा सण साजरा केला जातोय त्यानिमित्त या सणाविषयी थोडेसे....

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. कृषीसंस् कृती म्हटले की शेती, शेतकरी, शेतीची अवजारेही आपसूकच येतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसणाऱ्या बळीराजाच्या आणि बैलांच्या प्रेमाचे प्रतिक असलेला बैलपोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. वर्षभर कामाचे जोखड म्हणजेच जू ओढणाऱ्या बैलांचा सण म्हणून ओळखला जाणारा बेंदूर दक्षिण भारतात 'पोंगल', दक्षिण महाराष्ट्रात 'बैलपोळा', कर्नाटकात 'कार हुजरी' या भिन्न नावांनी ओळखला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला जून महिन्यात कर्नाटकी बेंदूर तर जुलै महिन्यात देशी बेंदूर म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर या नावाने स्थानपरत्वे दोन वेळा साजरा केला जातो.

बेंदूर सणांविषयीची एक आख्यायिका:
       बेंदूर हा सण कसा सुरू झाला याविषयीची एक आख्यायिका आहे. कैलास पर्वतावर एकदा शंकर व पार्वती सारीपाटाचा डाव खेळत होते. पार्वतीने सारीपाटाचा डाव जिंकला. मात्र शंकराने मीच डाव जिंकला असा दुराग्रह धरला. हा वाद कांहीं मिटेना. तेंव्हा  पार्वतीने साक्षीदार असलेल्या नंदीला डाव कोणी जिंकला? असे विचारले. मात्र नंदीने शंकराच्या बाजूने मान हलवताच रागावलेल्या पार्वतीने 'मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तू जन्मभर कष्टच उपसशील' अशी शापवाणी उच्चारली. या शापवाणीने भयभीत झालेल्या नंदीने पार्वती कडे उःशाप मागितला. तेंव्हा पार्वतीने वर्षातील एक दिवस शेतकरी तुझ्या मानेवर जू न ठेवता तुझी पूजा करतील असा उःशाप दिला. तेंव्हापासून बेंदूर हा सण साजरा केला जातो. ही आख्यायिका एका कवीने काव्यबद्ध केली आहे. ही कविता आम्ही पांचवी-सहावीला असताना पाठ्यपुस्तकात होती. ती कविता अशी....

सहज एकदा कैलासावर
बसुनी पार्वती आणिक शंकर
मजेत सारीपाट खेळती
गंमत नंदी हसत बघे ती ।

बेंदूर सण कसा साजरा केला जातो..
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पहाटे गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. नंतर त्याला शेंगतेल, कोंबडीच्या अंड्यातील बलक बैलाना पाजतात. डोक्याला बाशिंग बांधून पाठीवर झुली टाकतात. बैलांच्या शिंगाना छान रंग लावतात. त्यावर सोनेरी, चंदेरी कागद चिकटवून रिबीनी बांधतात. गळ्यात घुंगराची माळ घालतात. या दिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलाना घालतात. बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या सणाचे वर्णन यथार्थपणे एका कवीने या कवितेत केले आहे. ती कविता अशी...

शिंगे रंगविली, बाशिगे बांधली
चढविल्या झूली, ऐनेदार ।
राजा, प्रधान, रतन दिवाण
वजीर पठाण सुस्त मस्त ।

खांदेमळणी:
बैलांच्या वशिंडापासून पुढील भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्याना हळद लावली जाते.

मिरवणूक व कर तोडणे:
या दिवशी संध्याकाळी बैलांना सजवून मिरवणूक काढली जाते. बैलांच्या शिंगाना फुगे, पायात तोडे, गळ्यात घुंगराच्या माळा, अंगावर झूल टाकून गावच्या वेशीत कर तोडण्यास जातात. गावच्या वेशीत सर्व बलुतेदार लोक गवत व पिंजर एकत्र करून त्यामध्ये पिंपळाची पाने टोचून लावतात त्याला कर म्हणतात. ही कर दोन्ही बाजूला ओढून आडवी धरली जाते. बैलाला वाजत गाजत पळवत आणून त्यावर उडी मारण्यास भाग पाडतात. बैलाने उडी मारताच कर तुटते. कर तोडणे म्हणजे सर्व बंधने तोडून नव्याने सुरुवात करणे होय.

       बैलाने वर्षभर केलेल्या काबाडकष्टाच्या जोरावर अन्नधान्य पिकवून शेतकरी सधन व संपन्न होतो त्यामुळे बैल हेच त्यांचे दैवत असते. या सणाच्या वेळी शेतकरी पेरण्या करून रिकामा झालेला असतो. पिकांचे हिरवेगार अंकुर पाहून आनंदी झालेला शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतो.

शेतकरी व बैल यांचे नाते कसे जिवाभावाचे असते हे दाखविणारा एक ह्रदयद्रावक प्रसंग:
       ता. आष्टी, जि. बीड उस्मानाबाद येथील दादासाहेब झानजे या शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. बैलपोळा या सणाच्या दिवशी त्याने बैलाला सजविले. पत्नीने बैलांचे पूजन केले, औक्षण केले. बैलांना नैवेद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांहीं वेळानंतर मंगळसुत्राची शोधाशोध सुरु झाली. एका बैलाने नकळत वैरणीबरोबर ते गिळले असावे अशी शंका आल्यावर शेतकऱ्यांने व्हेटर्नरी डॉक्टराकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले. ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब, मंगळसूत्र पन्नास-साठ हजाराचे असेल ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या या सख्याला त्रास होता कामा नये. माझा मित्र ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले. आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात बैलावरील प्रेम. धन्य तो शेतकरी व धन्य तो त्याचा बैल.

सोमवार, १९ जुलै, २०२१

खरा वारकरी - प्रासंगिक लेख


दिनांक २० जुलै २०२१ आषाढी एकादशीचा दिवस त्यानिमित्ताने विशेष प्रासंगिक लेख.


खरा वारकरी - प्रासंगिक लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       ११ लाख वारकरी हरिनामाचा गजर करत करत पुण्यनगरी पंढरपुरात दाखल होतात. नितांत श्रद्धेने पांडुरंगांच्या चरणी माथा ठेवतात. श्रद्धेने ओलेचिंब झालेले वारकरी देहभान विसरून भक्तीमार्गात रममाण झाल्याचे चित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण दरवर्षी पाहतो. हे सर्व वारकरी भक्तीमार्गातील दीपस्तंभ बनून आपणा सर्वांना प्रेरणा देत असतात. काही वर्षांपूर्वी मी सेवेत असताना आषाढी एकादशीपूर्वी मला एक आगळावेगळा व सच्चा वारकरी भेटला. त्या महान वारकऱ्यांविषयी...


       दुपारचे दोन वाजले होते. एका बावळ्या वेषातील व्यक्तीने शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. त्याच्या पोशाखावरून अनेक मागतकऱ्यांपैकी एक मागतकरी असावा असे आम्हा सर्व शिक्षकांना वाटले. तो आला. त्याने नम्रपणे सर्वांना नमस्कार केला म्हणाला, "मी वारकरी आहे. गेली २५ वर्षे मी एकदाही वारी चुकवली नाही. वर्षभर काबाडकष्ट करून वारीला जातो. यावर्षी माझे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाल्याने पंढरीला जाण्याइतकी रक्कम मी जमवू शकलो नाही व चालतही जाऊ शकत नाही, पण छोटी छोटी कामे करून मी वारीला चाललो आहे. कृपया तुमच्या शाळेतील एखादे काम सांगा". आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, "आम्ही तुम्हाला काम न करता मदत केली तर?" वारकरी पट्कन म्हणाला, "नको मला फुकटचे पैसे नका देऊ. कुठलेही काम सांगा, सांगाल ते काम करीन. द्याल तेवढे पैसे घेईन. फुकटचे पैसे घेऊन वारीला आलेले माझ्या वारकरी पांडुरंगाला आवडणार नाही".


       शेवटी मुख्याध्यापकांनी त्याला बाथरूम व व्हरांडा स्वच्छ करण्यास मांगितले. क्षणाचाही विलंब न लावता तो उठला. त्याने खराटा व बादली घेतली. विठ्ठलनामाचा गजर करत करत त्याने व्हरांडा व बाथरूम चकाचक केले. तो काम करत होता आम्ही सर्व शिक्षक 'त्या वारकऱ्याचे सात्विक भाव, निस्सीम भक्ती, अजोड श्रद्धा व कार्यमग्रता न्याहाळत होतो'. मुख्याध्यापकांनी ५० रुपयांची नोट हातावर ठेवताच. त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. पण जाता जाता आम्हा... सर्वांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवून गेला. 

धन्य तो वारकरी! धन्य त्याचा प्रामाणिकपणा.

                             

रविवार, ११ जुलै, २०२१

लोकसंख्या वाढः एक गंभीर समस्या - विशेष मराठी लेख


११ जुलै हा जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख..

लोकसंख्या वाढः एक गंभीर समस्या - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी 


फोटो साभार: गूगल

       ११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाविया या देशात जन्मलेल्या बालकांनी जगाची लोकसंख्या पाचशे कोटीच्या घरात पोहचवली, म्हणून लोकसंख्या वाढीची जाणीव करून देण्यासाठी ११ जुलै हा लोकसंख्या विस्फोट दिन म्हणून किंवा लोकसंख्या इशारा दिन म्हणून पाळला जातो. १६५० साली जगाची लोकसंख्या पन्नास कोटीच्या घरात पोहोचली. १८५० च्या दरम्यान लोकसंख्या दुपटीने वाढून १०० कोटी झाली. सध्या भारताची लोकसंख्या जगात दोन नंबरची असली तरी पुढील कांही वर्षात भारताची लोकसंख्या चीनच्या बरोबर होईल म्हणून ही वाढ रोखणे आवश्यक आहे. जगाच्या भूक्षेत्रापैकी २:४२ टक्के जमीन असणाऱ्या आपल्या भारत देशाला १५ टक्के लोकांचे पोषण करावे लागते. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती झपाट्याने कमी होऊन पाऊस काळ पूर्ण कमी झाला आहे.

       सध्या भारताची लोकसंख्या ढोबळमानाने १३५ कोटींच्या घरात आहे. सध्या भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा चीनपेक्षा अधिक आहे आणि अशाच पद्धतीने लोकसंख्या वाढत राहिली तर २०२७ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल.

       या आकडेवारीला विशेष महत्त्व देण्याचे कारण हा आराखडा संयुक्त राष्ट्र संघाच्या पाहणीत समोर आला आहे. अशी लोकसंख्या वाढीची स्थिती बघता केंद्र सरकारने योग्य तो कायदा अथवा नियम करावे अथवा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचे निर्देश द्यावेत.

भारताची लोकसंख्या वाढीची स्थिती:
       भारताच्या लोकसंख्या वाढीबाबत सरकारने स्वतः कांही निरीक्षणे केलेली आहेत. सध्याची भारताची लोकसंख्या वाढीची स्थिती या अहवालामधून अधोरेखित होते. त्यातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य निरीक्षणाचा रिपोर्ट भारतातील लोकसंख्या वाढीची स्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या अहवालानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा दर हा एकसमान नाही. सर्वात गरीब लोकांमध्ये हा दर सर्वाधिक आहे, तर सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये हा सर्वात कमी आहे. सर्वात गरीब व्यक्तीमध्ये हा दर ३.२ इतका आहे. म्हणजेच गरीब व्यक्ती मध्ये अपत्य दर तीन किंवा तीनपेक्षा जास्त अपत्य एवढा आहे. हाच दर मध्यमवर्गीय कुटुंबात २.५ एवढा आहे. यानुसार मध्यमवर्गीय कुटूंबात दोन ते तीन अपत्य दर आहे. यानुसार उच्च वर्गात प्रति कुटुंब अपत्य दर एक ते दोन आहे. या अहवालानुसार असे आढळून आले की, ज्या वर्गामध्ये आर्थिक उत्पन्न कमी आहे तेथे हा दर जास्त प्रमाणात दिसून येतो. तर जेथे आर्थिक उत्पन्न जास्त आहे अशा कुटुंबामध्ये हा दर सर्वात कमी आहे. यानुसार वाढणारी लोकसंख्या आणि आर्थिक स्थिती यांचं समीकरणही स्पष्ट होते.

लोकसंख्या वाढीचे परिणाम:
       कुठल्याही देशात लोकसंख्या सर्वात महत्त्वाचा घटक असतो. अर्थातच देशाची धोरणे, उत्पन्न आणि कारभार त्या लोकसंख्येला अनुसरूनच ठरविला जातो. अशावेळी लोकसंख्या मर्यादित नसेल तर उपलब्ध साधनसंपत्तीचे योग्य वितरण होण्यामध्ये बाधा निर्माण होते आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. देशातील गरिबी, भूक आणि कुपोषणाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढतात. लोकसंख्या वाढीचा दुसरा प्रत्यक्ष परिणाम हा त्या देशाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावरही झालेला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पातळीवर मार्गदर्शनपर काही ध्येये घालून दिलेली आहेत प्रत्येक देशाने २०३० पर्यंत शक्य असेल तेवढ्या प्रमाणात या ध्येयाना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले पाहिजे. यामध्ये सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे, भूक शमवून अन्न सुरक्षा प्रदान करणे यासोबतच उत्तम आरोग्य आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे अशा तत्वांचा समावेश होतो. भारताची लोकसंख्या याच प्रमाणात वाढत राहिली तर शाश्वत विकासध्येय गाठणे भारताला शक्य होणार नाही. जागतिक पातळीवर भारतासाठी हा मोठा कलंक असेल. भारतातील रोजगाराची आकडेवारी अजूनच थक्क करणारी आहे. भारतात दरवर्षी अडीच कोटी सुशिक्षित शिक्षण घेऊन रोजगारासाठी तयार असतात परंतु त्या तुलनेत भारताची प्रतिवर्षी रोजगार निर्मिती क्षमता ही फक्त सत्तर लाख एवढी आहे. ही आकडेवारी बेरोजगारीच्या समस्यांचे विश्लेषण करते.

लोकसंख्या वाढ: उपाययोजना
       या गंभीर समस्येकडे हव्या तेवढ्या गंभीरतेने पाहिले जात नाही. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी हुकूमशाहीची काहीच गरज नाही हे केरळने सिद्ध केले आहे. वास्तविक लोकसंख्यावाढ रोखणे हा शासकीय कार्यक्रम न होता तो जनतेचा कार्यक्रम व्हावा. यासाठी एक व्यापक चळवळ उभी करून निर्धार करून लोकसंख्या रोखता येईल. या देशाचे दारिद्रय, बेरोजगारी, आर्थिक विषमता यासाठी जनतेने एक जन आंदोलन उभारले पाहिजे.

       आज जगात संरक्षण साहित्य निर्मिती करण्यात फार मोठी चढाओढ लागली आहे. या प्रचंड खर्चामुळे सामान्य नागरिकाला मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशाने लोकसंख्येला आळा घालून लोकसंख्येचे विकेंद्रीकरण करायला आरंभ करायला हवा. कमी होणाऱ्या साधन संपत्तीचा दर कसा रोखायचा, नवनवे पर्याय कोणते शोधायचे, नियोजन करून साधनसंपत्ती काटकसरीने कशी वापरायची हे ठरवायला हवे. समाजातील प्रत्येकाने कायद्याची वाट न बघता स्वतः जबाबदारीने या प्रश्नाकडे बघणे हाच या प्रश्नावर सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या देशाची लोकसंख्या रोखली पाहिजे. आपण एक मूल एक झाड हे तत्व अंगिकारायला हवे. मुलगा-मुलगी एकसमान मानायला हवे. अन्यथा आजच्या गतीने लोकसंख्या वाढत राहिली तर पुढील कांहीं वर्षांत भारतीयांना रहायला घरचं काय, पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. म्हणून आपण कठोर निर्णय घेऊन व योग्य नियोजन करून वाढणारी लोकसंख्या रोखायला पाहिजे.

भारताची दिलासादायक  गोष्ट:
       सध्याच्या काळात जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतीय आहे. याच गोष्टीचा फायदा भारताला सर्वात जास्त होतो आहे. आज जगातील सर्वाधिक कार्यक्षम वर्ग भारताकडे असणे हे आजचे भारताचे सर्वात महत्त्वाचे भांडवल आहे. याच कारणामुळे लोकसंख्या नियंत्रणासारखे उपाय मागे पडताना दिसत आहेत. तसेच या देशाची लोकसंख्या गरीब असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना गरिबीतून वरती काढणे हा लोकसंख्या नियंत्रण उपायापेक्षा सरस उपाय असल्याचे सरकारचे धोरण आहे.

       बंधू-भगिनींनो लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्नशील राहू या. देशाच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलू या ।

बुधवार, ३० जून, २०२१

मी डॉक्टर बोलतोय - विशेष लेख


१ जुलै हा डॉक्टरर्स डे, त्यानिमित्त डॉक्टरांचे मनोगत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.


मी डॉक्टर बोलतोय - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       प्रथमतः माझ्या सर्व पेशंटना नमस्ते। बंधू-भगिनींनो, माता-पित्यांनो, मित्र-मैत्रिणीनो प्रत्येकाचा एक स्पेशल दिवस असतो. एक जुलै हा माझा अर्थात माझ्या सर्व सहकारी बांंधवांचा स्पेशल दिवस आहे. म्हटलं आज तरी  तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. एरव्ही आमचा दिवस सुरू होतो हॉस्पिटल मध्येच आणि मावळतोही हॉस्पिटल मध्येच. मला दिवसरात्र ऐकाव्या लागतात रूग्णांच्या व्यथा आणि वेदना. बघावे लागतात हवालदिल झालेल्या नातेवाईकांचे उदास, हिरमुसलेले चेहरे. रूग्णांच्या व्यथा वेदनांशी एकरूप होऊन अगदी मनापासून, विचारपूर्वक उपचार करून रुग्णांच्या व्यथा वेदना दूर करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो जराही न थकता, कारण डॉक्टर होण्याचा निर्णय घेतानाच मी मनाची तयारी केलेली असते की रूग्ण हेच माझे भाग्यविधाते आहेत. माझं कार्य, माझ्या जीवनाची यशस्वीता सर्वस्वी रूग्णहो तुमच्यावरच अवलंबून आहे. रुग्ण आपले दुःख कमी करण्यासाठी, वेदना दूर घालविण्यासाठी माझ्याकडे आलेला असतो. त्यांच्या विश्वासावरच आमची प्रॅक्टिस अवलंबून असते कारण माझ्या हातून बरा झालेला रूग्ण माझी आयुष्यभर आठवण तर ठेवतोच शिवाय आणखी दहा- वीस जणांना  माझ्याबद्दल सांगतो आणि अशी ही अनुभवी जाहिरात  माझ्या चांगलीच पथ्यावर पडते.


       माझ्याकडून माझ्या पेशंटना खूप मोठ्या अपेक्षा असतात. माझा नातेवाईक शंभर टक्के बरा झालाच पाहिजे असे प्रत्येक नातेवाईकाला वाटत असते. त्यांचे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टर तुमच्या व्यथा-वेदना दूर करू शकतात पण तुमचे जीवन चिरंजीव करु शकत नाहीत. तो अधिकार अजून तरी ईश्वराने कुणाकडे दिलेला नाही. 


       माझ्या कांही मित्रांच्या नशिबी  आनंदाचे क्षणही येतात. तुम्ही म्हणाल ते कसे काय? तर ते स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दररोज अनेक बालके जन्म घेतात. तुम्हाला मुलगा झाला, धास्तावलेल्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यावेळचे सर्व नातेवाईकांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झालेले असतात आणि असे उजळलेले चेहरे बघणे हा आमच्या दृष्टीने सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. मुलगी झाली हे ऐकून उदास चेहरेही बघावे लागतात. त्यांना समजावून सांगावी लागते मुलींची महती.


       कांही वेळा माझा कांहीएक दोष नसतो, आणि ती माता दगावते नि सगळा दोष माझ्या माथ्यावर देऊन नातेवाईक मोकळे होतात. अशावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी संयमाने वागावे लागेल. माझ्याशी, इतर तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करायची सोडून हॉस्पिटलची तोडफोड करतात. लाखोंचे नुकसान होते, मनःस्ताप होतो, मानहानी होते हे योग्य नव्हे. माझ्यावर थोडा विश्वास ठेवायला शिका. 


       तुम्हाला दिसतात माझे अपटुडेट कपडे, भव्य -सुसज्ज हॉस्पिटल आणि चकचकीत चारचाकी. पण हे सर्व मिळविण्यासाठी मी माझं अर्ध आयुष्य खर्ची घातलेलं असतं, डोळ्यांचे दिवे करून अभ्यास केलेला असतो. माझ्या आईवडिलांनी काबाडकष्ट करून, प्रसंगी घर-शेत विकून पैसा उभा केलेला असतो. डॉक्टर बनल्यावर माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या सर्वांची स्वप्ने मला पूर्ण करायची असतात.


       आमच्या कुटुंबियांच्याही आमच्याकडून कांही अपेक्षा असतात. त्यांना आम्ही पुरेसा वेळ देऊ शकत नाही. नोकरी करणारे बंधू भगिनी घड्याळात पावणेसहा वाजले की घरी परतायला मोकळे होतात. आम्हाला नाही असं करून चालत. चोवीस तास सज्ज रहावं लागतं. पहाटेच्या साखरझोपेतून उठून इमर्जन्सी पेशंटवर उपचार करावे लागतात. कांही वेळा दुपारी तीन  वाजेपर्यंत जेवायलाही वेळ नसतो. रात्री बारा वाजताही निवांतपणे झोपता येत नाही. एखादा सिरियस पेशंट येतो आणि पेशंटसह सर्व नातेवाईकांची इच्छा असते की आमच्या पेशंटवर आज, आत्ता, ताबडतोब उपचार झालेच पाहिजेत. अशावेळी डॉक्टरांचीही एखादी अडचण अडचण असू शकते हे त्यांना लक्षातच येत नाही. याबद्दलचा माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो, तो असा......


       एक सिरियस पेशंट त्याच्या दवाखान्यात आलेला असतो. हॉस्पिटल मधील असिस्टंट डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरु केलेले असतात. पेशंटला धाप लागलेली असते. नातेवाईक घाबरलेले असतात. मुख्य डॉक्टर अजून का आले नाहीत म्हणून नातेवाईकांचा दंगा सुरु असतो. पंधरा मिनिटांत डॉक्टर येतात. त्यांच्या गाडीला गराडा घालून नातेवाईक त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार चालू करतात. त्या सर्वांना बाजूला सारत डॉक्टर आत जातात. पेशंटला तपासून उपचार सुरू करतात. अर्ध्या तासानंतर पेशंटची धाप कमी होते. डॉक्टर बाहेर येऊन नातेवाईकांना सांगतात, तुमच्या पेशंटला आराम पडला आहे.


       मघाशी तुम्ही सगळे फारच रागात होता म्हणून मी कांहीच बोललो नाही. मला यायला पंधरा मिनिटे उशीर झाला कारण माझा एकुलता एक चिरंजीव सहलीला गेला होता, त्यांच्या स्कूल बसचा अक्सिडेंट झाला. त्याच्या पायाला  फार लागलय असा फोन आल्यामुळे मला तिकडे जावे लागले. त्याला त्याच ठिकाणी ताबडतोब उपचार होणे आवश्यक होते. त्याला अँडमिट् करून तुमचा फोन आल्यावर लगेच तेथून निघालो त्यामुळे पंधरा मिनिटे उशीर झाला. आत्ताच त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा फोन येऊन गेला माझ्या मुलाच्या पायाला सतरा टाके पडलेत. हे ऐकून नातेवाईकांना आपल्या कृत्त्याची लाज वाटली. त्यांनी डॉक्टरांची हात जोडून माफी मागितली.


       असे प्रसंग माझ्या जीवनात वारंवार येतात. मलाही माझं खाजगी जीवन आहे. मलाही मुलांबाळासोबत, पत्नीसोबत वेळ घालवायला आवडते पण कित्येक वेळा माझा नाईलाज होतो. मुलांच्या, बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशीच इमर्जन्सी केस येते. घरी गेल्यावर रूसव्यावर ईलाज करावा लागतो.


       आत्ता कोरोनाच्या काळातच बघा ना, सख्खे नातेवाईक बाधितांच्या जवळ यायला तयार नाहीत. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, लाखमोलाचा असतो हे खरे आहे. डॉक्टरानाही त्यांचा जीव प्यारा असतो. त्यानाही त्यांच्या कुटूंबाची काळजी वाटते पण आम्ही भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून, आपण पत्करलेल्या कामाशी एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडतो. आम्ही सर्वांनी आमच्या स्टाफच्या मदतीने लाखो रूग्णांवर उपचार केले. उपचारादरम्यान माझ्या कित्येक मित्रांना बाधित व्हावे लागले पण त्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. परिवाराच्या सुरक्षिततेसाठी कित्येक दिवस आम्ही दूर राहिलो. आमच्या भगिनींनी आपल्या चिमुकल्याना इतरांच्या हवाली करून पेशंटांची सेवा केली. नातेवाईक प्रेत ताब्यात घ्यायला ही तयार नव्हते. अशावेळी आमच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार सुद्धा पार पाडले.


       समाजाने याची जाणीव ठेवायला हवी. डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवायला हवा. सांगितलेली पथ्ये पाळून सहकार्य करायला हवे.

शेवटी एवढेच सांगतो ...


डॉक्टर खुदा नही

डॉक्टर दवा देता है।

दुवा खुदासे मांगो।

जिंदगी  खुशी से जिओ।


काय गप्पा मारत बसलोय, पेशंट वाट पहात बसले असतील. निघतो बाय बाय...


बुधवार, २३ जून, २०२१

वटपौर्णिमा: विज्ञान, अध्यात्म, चिंतन - विशेष लेख

 

वटपौर्णिमा: विज्ञान, अध्यात्म, चिंतन - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       वटपौर्णिमा जवळ आली की आम्हा महिलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. भरजरी, रंगीबेरंगी साड्या नेसून, गळ्यात, कानात, हातात दागिने घालून, केसात सुंदर गजरा माळून वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना स्त्रियांचा आनंद दुथडी भरून वहात असतो. पूजेची थाळी, थाळीत टपोरी फुले, टवटवीत फळे, दोऱ्याची मोठ्ठी गुंडी हातात घेऊन जाताना ती खूपच आनंदून जाते. सर्व स्त्रिया वडाच्या झाडाभोवती गोळा होतात. भक्तिभावाने झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात. झाडाला दोरा गुंडाळून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, पतीला उदंड आयुष्य मिळू दे, स्वतःला सवाष्ण मरण येवू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतात. कांही स्त्रिया सोयीप्रमाणे वडाच्या झाडाची फांदी आणून किंवा पाटीवर, वहीवर वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात.


हा सण का साजरा केला जातो?.....

पौराणिक कथा:

       सावित्री राजर्षि अश्वपति यांची एकुलती एक कन्या होती. सावित्रीने वनवासी राजा द्युमत्सेन यांचे चिरंजीव सत्यवान याची पती म्हणून निवड केली. त्यानंतर नारद ऋषींनी तिला सत्यवान अल्पायुषी असल्याचे सांगितले. हे ऐकूनही सावित्री आपल्या निर्णयापासून जराही विचलित झाली नाही. तिने सर्व राजवैभवाचा त्याग केला. सत्यवान आणि त्याच्या कुटुंबियांची सेवा करत ती जंगलात राहू लागली. ज्या दिवशी सत्यवानाच्या महाप्रयाणाचा दिवस होता, त्या दिवशी लाकडे गोळा करून आणण्यासाठी तो  जंगलात गेला होता. त्या ठिकाणी सत्यवान मूर्च्छित होऊन पडला. त्याचवेळी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. तीन दिवसापासून उपवासात असलेली सावित्री हे सर्व जाणून होती. त्यामुळे व्याकुळ न होता सत्यवानाचे प्राण न घेण्याविषयी तिने यमराजांकडे प्रार्थना केली परंतु यमराजांनी ऐकले नाही. तेंव्हा सावित्री त्यांच्या मागे जाऊ लागली. अनेक वेळा विनंती करूनही सावित्री मागे फिरली नाही. सावित्रीचे हे धाडस आणि त्याग पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सावित्रीला तीन वर मागायला सांगितले. सावित्रीने सत्यवानाच्या नेत्रहीन मातापित्यांसाठी दृष्टी मागितली. दुसऱ्या वराने त्यांचे गेलेले राज्य मागितले आणि तिसऱ्या वराने तिने स्वतःसाठी शंभर पुत्रांचे वरदान मागितले. यमराज तथास्तु म्हणाले. नंतर त्यांच्या लक्षात आले की आता सत्यवानाला आपल्या बरोबर नेणे शक्य नाही. यमराजांनी सावित्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला आणि सत्यवानास तिथेच सोडून तेथून ते अंतर्धान पावले. त्यावेळी सावित्री आपल्या पतीला घेऊन वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून महिला आपल्या पतीसाठी आणि परिवारातील सदस्यांसाठी दीर्घायुष्य मिळावे म्हणून भक्तिभावाने वडाची पूजा करतात.


माझा वैज्ञानिक अंदाज:

       सावित्री जेंव्हा मूर्च्छित झालेल्या सत्यवानाला घेऊन वडाच्या झाडाखाली बसली होती तेंव्हा सत्यवानाला वडाच्या झाडापासून मुबलक प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन मिळाला असावा आणि त्यामुळेच त्याची मूर्च्छा जाऊन त्याच्या जिवात जीव आला असावा.


वडाची पूजा करण्यामागील वैज्ञानिक व सामाजिक दृष्टीकोन:

       पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची संधी मिळत नव्हती. चूल नि मूल हेच तिचे विश्व होते. या सणाच्या निमित्ताने घराबाहेर पडून कांहीं वेळ मोकळ्या हवेत घालविता यावा, वडापासून मुबलक प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन तिला घेता यावा, हा सण आयोजकांचा हेतू असावा. वडपूजेच्या निमित्ताने त्या झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ होतो. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी त्यामुळे मिळते. सणांच्या निमित्ताने उपवास केला जातो त्यामुळे पचनेंद्रियाना विश्रांती मिळते. विविध प्रकारच्या फळांचा आस्वाद घेता येतो हेच सणांचे प्रयोजन असावे. शिवाय सर्व मैत्रिणीना एकत्र येण्याची संधी ही मिळते. गप्पा गोष्टी करता येतात.


वटपौर्णिमेत आधुनिकता:

       सद्याच्या परिस्थितीत वटपौर्णिमा साजरी करताना त्यात थोडी आधुनिकता आणता येईल. पूजा जरुर करावी पण वडाच्या झाडाचे रोप लावून त्याचे संगोपन करून, त्याला मोठं करुन पर्यावरण संतुलनाची सामाजिक जबाबदारीही पार पाडता येईल. पूजा झाल्यावर फक्त भटजींना फळे न देता अनाथाश्रमातील किंवा वृद्धाश्रमातील गरजूंना द्यावीत. झाडाभोवती दोरा गुंडाळून वाया न घालवता गरजूंना देता येईल ज्यामुळे फाटलेली वस्त्रे, दुभंगलेली मने सांधली जातील.


वडाच्या झाडाविषयीची शास्त्रीय माहिती:

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाविषयीची शास्त्रीय माहिती घेणे उचित ठरेल.

  • पूर्ण वाढलेले एक वडाचे झाड एका तासाला साधारण ७१२ किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते.
  • वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो.
  • वडाच्या फांदी, पारंबी व पानामधूही नवीन वटवृक्ष जन्माला येतो म्हणून याला अक्षयवड म्हणतात.
  • वडाच्या झाडाची उंची तीस मीटरपर्यंत असते. हे झाड सदापर्णी आहे. कधीच सुकत नाही.
  • वडाच्या काटक्यांचा उपयोग होम हवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो.


वडाच्या झाडाचे औषधी उपयोग:

  • वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
  • विंचवाचे विष उतरविण्यासाठी आणि पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास वडाचा चीक उपयुक्त ठरतो.
  • लचक भरल्यास किंवा सांधेदुखी झाल्यास वडाची पाने गरम करून लावल्यास उपयोग होतो.
  • पोटात जंत झाल्यास अथवा अतिसार झाल्यास वडाचे कोवळे अंकुर वाटून लावल्यास गुण येतो.
  • चेहरा उजळण्यासाठी वडाची पाने उपयुक्त आहेत.
  • कानाच्या समस्येवर वडाचा चीक व मोहरीचे तेल मिक्स करून कानामध्ये घातल्यास कानातील किटाणू मरतात.
  • वडाच्या पानांची राख केसांच्या समस्येवर उपयुक्त आहे.
  • वडाची मुळे नाकातून येणारे रक्त थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. 
  • वडाच्या सालीची पावडर दातांच्या समस्येवर उपयोगी आहे. 
  • वडाच्या बियांची पावडर मूत्रविकारावर उपयुक्त आहे.
  • वडाच्या झाडाचा उपयोग मळमळ दूर करण्यासाठी, डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी, भाजलेल्या जागी लावण्यासाठी, रक्तस्त्राव थांबविण्यासाठीही होतो.

वडाच्या झाडाचे विविध उपयोग लक्षात घेता त्याला मानवाला ईश्वराकडून मिळालेले अमूल्य वरदान  म्हणता येईल.


माझी एक शंका:

       वडाला प्रदक्षिणा घालून सात जन्मी नव्हे तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते पण नवरोबांना चेंज हवा असेल तर देवबाप्पा कुणाचे ऐकणार? महिला भगिनींच्याकडून देवबाप्पाकडे अखंड सौभाग्याची मागणी केली जाते. ही मागणी पूर्ण करायची म्हणजे महिला प्रथम निधन पावणार मग दुसऱ्या जन्मी नवऱ्यापेक्षा ती मोठी नाही का होणार? मग तिला तोच पती कसा बरे मिळणार ? 

सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


गुरुवार, १७ जून, २०२१

झाशीची राणी लक्ष्मीबाई - विशेष लेख


१८ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या शौर्याची गौरवगाथा....


झाशीची राणी लक्ष्मीबाई -  विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


लक्ष्मीबाई यांंचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.


जन्म व बालपण:

       राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील मैदानीनगर येथे झाला. त्यांचे बालपणीचे नांव मणिकर्णिका असे होते. म्हणून बालपणी त्यांना सर्वजण मनू म्हणायचे. त्यांच्या वडिलांचे नांव मोरोपंत तांबे असे होते. ते दुसऱ्या बाजीरावांच्या पदरी अधिकारी होते. बिथूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक होते, जे मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवत होते. लक्ष्मीबाईंच्या आईचे नांव भागिरथीबाई असे होते. लक्ष्मीबाई चार वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. लहानपणी पेशव्यांच्या नानासाहेब या स्वीकृत मुलाबरोबर ती वाढली. तिला मुलांचे खेळ फार आवडत. घोड्यावर बसणे, पोहणे आणि शस्त्रे चालविणे यात ती प्रविण झाली.


बालपणीचे प्रसंग:

       एकदा तिने स्वतःसाठी हत्ती मागितला. तिच्या वडिलांनी 'हत्ती तुझ्या नशिबात नाही' असे म्हणून तिला चापले. लक्ष्मीबाईंचे डोळे चकाकले. ती ताडकन् म्हणाली, "एकच काय, शेकडो हत्ती आहेत माझ्या नशिबात." ही जणू भविष्यवाणीच होती, जी सत्यात उतरली.


       दुसरा एक शौर्याचा प्रसंग असा, एकदा लक्ष्मीबाई घोड्यावरून जात असताना नानासाहेबांनी त्यांना म्हटले की, 'जर हिम्मत असेल तर माझ्या घोड्यापुढे जाऊन दाखव'. लक्ष्मीबाईनी हे आव्हान हसत हसत स्विकारले. नानासाहेबांचा घोडा वेगाने धावत असतांना लक्ष्मीबाईनी आपल्या घोड्याचा वेग वाढवत त्यांना मागे टाकले. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईना मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले आणि घोड्यावरून पडले. लक्ष्मीबाईंनी आपला घोडा मागे वळवून नानासाहेबांना स्वतःच्या घोड्यावर बसवून घरी आणले. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंची प्रतिभा ओळखली, कौतुक केले.


चरित्र व कार्य:

       लक्ष्मीबाईंचे लग्न गंगाधरराव या झाशीच्या राजाबरोबर झाले. त्यांचा मुलगा तीन महिन्याचा होऊन मरण पावला. निपुत्रिक अवस्थेतच कदाचित मरण येईल असे वाटून आजारी गंगाधररावांनी पाच वर्षाचा एक मुलगा दत्तक घेतला. अठरा वर्षाच्या लक्ष्मीबाईना विधवा करून गंगाधरराव स्वर्गवासी झाले.


       डलहौसीने दामोदरराव हा बेकायदेशीर वारस असल्याचे जाहीर केले. १८५४ मध्ये त्याने झाशीचे राज्य आपल्या राज्याला जोडले. झाशीच्या खजिन्याला सील ठोकले. राणी लक्ष्मीबाईना निवृत्ती वेतन देण्याची तयारी दाखविली. पण राणीने ती ठोकरली.


भारतीय स्वातंत्र्ययुद्ध:

       १८५७ साल सुरु झाल्यावर राणीला प्रतिकार करण्याची संधी मिळाली. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला. राणीच्या सेनापतीनी किल्ला व खजिना जिंकून घेतला. १८५८ मध्ये सर ह्यू रोझ याच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सैन्याने झाशीवर तोफगोळ्यांचा मारा केले राणीने प्रसंगी स्वतः तोफा डागल्या. दत्तक पुत्राला पाठीशी बांधून दुष्मनांचे आक्रमण रोखण्यात ती जवळ जवळ यशस्वी झाली होती. पण लक्ष्मीबाईंच्या सैन्यातला एकजण फितूर झाला आणि त्याने ब्रिटिशांना किल्ल्यात शिरण्याची वाट दाखवली. झाशी पडल्याचे राणीला समजले. तिने पुरूषी वेष धारण केला. दत्तक पुत्राला व अनुयायांना घेऊन यमुना तीरावरच्या काल्पीकडे प्रयाण केले. काल्पीला राणीने तात्या टोपे आणि इतर क्रांतिकारकांना गोळा करून ग्वाल्हेर काबीज केले. ग्वाल्हेरचे राजे जियाजीराव शिंदे यांना राज्यावर बसविण्यासाठी सर ह्यू रोझ यांनी ग्वाल्हेरला कूच केले. तात्या टोपेंचे सैन्य विखरून टाकण्यात ब्रिटिशांना यश मिळाले. त्यावेळी लक्ष्मीबाई मदतीला धावल्या. त्यांनी किल्ल्याचा पूर्व दरवाजा धरला. भयानक आक्रमण करीत शत्रूला मागे रेटले. पण दुसऱ्याच दिवशी ती रणांगणावर एकाकीच पडली. ब्रिटिश तलवारीने राणीला जखमी केले. भळाभळा रक्त वाहात असतानाही राणी आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूवर धावून गेली. राणीने त्याला ठार मारले. अशक्तपणाने पुढे जाणे अशक्य होऊन ती घोड्यावरून पडली. मृत्यूसमयी राणीचे वय फक्त तेवीस वर्षाचे होते.


       राणी लक्ष्मीबाई यांना क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या धाडशी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर स्त्रियांच्या मनात एक धाडशी उर्जा निर्माण केली आहे.

सर ह्यू रोझ यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे।

अशा या पराक्रमी राणी लक्ष्मीबाईना कोटी कोटी प्रणाम।


शुक्रवार, ११ जून, २०२१

साने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख


साने गुरुजीः एक दीपस्तंभ - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

११ जून हा पूज्य सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या उज्ज्वल कार्याचा परिचय.....

       हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे अनेक गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नांवे जगाला माहित नाहीत, समुद्राच्या पोटात असे असंख्य गोलबंद व पाणीदार मोती असतील, की ज्यांची जगास वार्ता नाही. भारतमातेला स्वतंत्र  करण्यासाठी कित्येकांनी आपले आयुष्य वेचले आहे की ज्यांची आपणास फारशी ओळख नाही अशा थोर महामानवापैकी एक म्हणजे पूजनीय साने गुरुजी.


अल्पपरिचय:

       सानेगुरुजींचा जन्म कोकणातील पालगड या गांवी २४ डिसेंबर १८९९ मध्ये झाला. विद्यार्थ्यांशी अतूट नाते जोडणाऱ्या या महामानवाच्या वडिलांचे नांव सदाशिवराव व आईचे नांव यशोदा होते. खडतर हाल अपेष्टा सोसून, माधुकरी मागून, शिळेपाके तुकडे खाऊन, प्रसंगी उपाशी राहून त्यांनी आपले एम्. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


सानेगुरुजींचे शैक्षणिक कार्य:

       अमळनेरच्या शाळेत शिक्षक म्हणून तसेच वसतिगृहाचे प्रमुख म्हणून काम केले. तेथे ते  विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एकरूप झाले. खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाबड्या मुलांचे ते माता पिता झाले. विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा शिकविली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली. त्याना निसर्गप्रेम शिकविले. १९२९ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी 'विद्यार्थी' नावाचे मासिक सुरु केले.


स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग:

       १९२९ मध्ये ३१ डिसेंबरला काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनात पंडीत नेहरूंनी अध्यक्ष म्हणून संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला आणि तो एकमताने पास झाला. त्यावेळी सानेगुरुजींनी पंडीतजींचे भाषण ऐकले आणि त्यांच्या मनात देशभक्तीची प्रचंड लाट उठली. त्यांनी आदेशाप्रमाणे २६ जानेवारीला स्वातंत्र्याची शपथ घेतली व शिक्षकांसमोर भाषण केले. ते भाषण म्हणजे स्वातंत्रदेवतेची जणू भूपाळीच होती.


       त्यानंतर साने गुरुजी सत्याग्रहात गेले. त्यांना १९३० मध्ये धुळे येथील जेलमध्ये ठेवले होते. जेलमध्ये असतांना विनोबा भावे यांची प्रवचने त्यांनी ऐकली व लिहून काढली. तीच 'गीता प्रवचने' म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांनी खानदेशात गावोगावी फिरून स्वातंत्र्याचा संदेश दिला. १९२१ साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली.


       १९३६ साली काँग्रेसने फैजपूर येथे अखिल भारतीय अधिवेशन भरवले होते. तेथे साने गुरुजींच्या भाषणामुळे हजारो तरूण स्वयंसेवक म्हणून समाविष्ट झाले. गुरुजींनी स्वागत कक्ष घेण्याचे नाकारले व स्वच्छतागृहाच्या सफाईचे प्रमुख म्हणून उत्तम प्रकारे काम केले. ते म्हणत, लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचे लालित्य अधिक आवडते.


       गोरगरीबांच्या हाल अपेष्टा त्यांना दुःखी करू लागल्या म्हणून १९३८ मध्ये त्यांनी सारामाफीसाठी शेतकऱ्यांची परिषद भरविली. १९३९ साली किसान मोर्चात खेड्यापाड्यातून घुमलेले

आता उठवू सारे रान

आता पेटवू सारे रान

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी

लावू पणाला प्राण ।

हे गीत आजही तेवढ्याच ताकदीने म्हटले जाते.

त्यांची स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्थाने होती.

बलसागर भारत होवो

विश्वात शोभुनी राहो ।

हे गीत आजही राष्ट्र शभक्तीची ज्योत पेटवते. तर

खरा तो एकची धर्म

जगाला प्रेम अर्पावे।

ही सानेगुरुजींची प्रार्थना मानवतेचा महामंत्र देते.

वारा वदे कानामध्ये

गीत गाईन तुला।

  हे गीत बालकांमध्ये आजही लोकप्रिय आहे.


सानेगुरुजींचे लेखन: श्यामची आई

       सन १९३२ मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात शिक्षा झाल्यानंतर गुरूजींना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेंव्हा रोज रात्री कारागृहातील बराकीचे दरवाजे बंद झाल्यावर गुरूजी तेथील लोकांना आपल्या गतजीवनातील आठवणी सांगत . त्यातून 'श्यामची आई' हे अविस्मरणीय आणि अद्वितीय असे पुस्तक मराठी साहित्याला लाभले. श्यामची आई वाचून अश्रूनी तुडूंब भरलेल्या लाखो मुलांच्या हृदयात मातृभक्तीची कमळे फुलली आहेत, फुलत आहेत व फुलत राहतील.


       गुरुजीनी  रामाचा शेला, ते आपले घर, ही खरी संस्कृती व सावित्री ही नाटके लिहिली. गोड गोष्टी, आस्तिक ही सुंदर अशी पुस्तके लिहिली. गुरूजींनी आपले साहित्य आसवांनी लिहिले आहे. त्यातील अक्षर न् अक्षर त्यांनी गहिवरलेल्या अंतःकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे.


आंतरभारती: एक अपुरे स्वप्न

       गुरूजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारती. प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे वहावेत यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरिती समजून घ्याव्यात यासाठी त्यांनी आंतरभारतीचा प्रयोग करण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी पैसाही गोळा केला होता. पण त्यांचे हे कार्य अपुरेच राहिले.


अस्पृश्यता निवारण:

       पंढरपूरचे देऊळ हरिजनांना खुले करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला. शेवटी १ मे १९४७ ते १० मे १९४७ या कालावधीत आमरण उपोषण केले. पुढे पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येऊ लागले.


       ३० जानेवारी १९४८ ला गांधीजींच्यावर एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या. गुरूजींचा ध्येयसूर्य अस्तंगत झाला. गांधीजींचा खून एका महाराष्ट्रीयनाने केला या पापक्षालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसांचे उपोषण केले. स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र गर्जू  लागले. स्वातंत्र्याचा उषःकाल झाला, तरीही भेदाभेद दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना फार वाईट वाटे. 

       

       १९४८ साली त्यांनी "साधना" हे साप्ताहिक सुरु केले व त्यातून समाजवादी विचार मांडले. ११ जून १९५० साली मुंबई येथे गुरूजींनी जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम...।


रविवार, ६ जून, २०२१

कवयित्री शांता शेळके - विशेष लेख

 

६ जून हा कवयित्री शांता शेळके यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला वाहिलेली ही शब्दफुले....


कवयित्री शांता शेळके - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी




माझ्या आवडत्या कवयित्री .......

       प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ मध्ये झाला व ६ जून २००२ मध्ये त्या कालवश झाल्या. त्यांचे पूर्ण नांव शांता जनार्दन शेळके असे होते. १९४४ साली त्या संस्कृत विषयात एम्. ए. झाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज व मुंबईच्या रुईया आणि महर्षि दयानंद या महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले.


       कविता, गीते, चित्रपट गीते, कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिलं आणि खरं प्रेम  राहिलं ते कवितेवरच. कवितेच्या विविध रुपात त्या रमलेल्या होत्या. शांताबाईंच्या कवितेत संतांच्या काव्यातील सात्त्विकता, पंडीतांच्या काव्यातील विद्वता आणि शाहिरांच्या काव्यातील ललितमधु उन्मादकता आढळते. उदाहरणार्थ


मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ।

माझ्याकडे देव माझा, पाहतो आहे ।


हे गीत ऐकताना सात्विकतेने मन भरून जाते तर....


तोच चंद्रमा नभात

तीच चैत्र यामिनी

एकांती मज समीप

तीच चैत्र यामिनी ।


हे भावमधुर गीत ऐकतांना त्यांच्या विशाल विद्वतेची प्रचिती येते.


शूर आम्ही सरदार आम्हाला

काय कुणाची भिती।


हे गीत ऐकतांना ऐकणाऱ्याला देशप्रेमाने स्फुरण चढते.


       भाव कवितेपासून, नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपट गीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून शांताबाईंची कविता आपल्याला भेटते.


कवयित्री शांता शेळके:

       जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईनी नाट्यगीते लिहिली.

रेशमाच्या रेघांनी ,लाल काळ्या धाग्यानी

कर्नाटकी कशिदा मी काढिला ।

हात नका लावू माझ्या साडीला ।

       

       यासारख्या लावण्या लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. आजही त्यांच्या लावण्या ऐकून अगदी अरसिक व्यक्तीही ठेका धरते. व्यक्तीला ताल चढतो, सूर धरावासा वाटतो.


वादळ वारं सुटलं ग ।

वाऱ्यानं तुफान उठलं ग ।


वल्हव रे नाखवा हो 

वल्हव रे रामा ।


मी डोलकर डोलकर।

डोलकर दर्याचा राजा ।

ही गीते ऐकताना आनंदाने न डुलणारी व्यक्ती सापडणे अशक्य आहे.


       सुरूवातीला शांताबाईंच्या कवितेवर माधव ज्युलियन यांच्या काव्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्या वळणाच्या रक्तबंबाळ कविताच त्यांनी लिहिल्या. परंतु १९७५ साली त्यांचा 'गोंदण' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि त्या वेळेपासून त्यांच्या कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेल्या कविता म्हणून त्यांच्या कवितेला नवीन चेहरा मिळाला. त्यांच्या कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेल्या. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम, वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपणा, मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविश्व गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर आल्या. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली तेवढ्याच सहजतेने त्यांनी चित्रपट गीते, बालगीते सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीतलेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, सलील चौधरी इत्यादि अनेक संगीत दिग्दर्शकासाठी त्यांनी चिलीबरहुकूम गीते लिहिली. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ...

राजा सारंगा, माझ्या सारंगा

हे गीत आजही सर्वांच्या ओठावर विराजमान झाले आहे.


       सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांताबाईंच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी आपल्या सौंदर्यदृष्टीतून, सहजतेने अभिव्यक्त केला आहे.

शेवटी त्यांच्या एका गीताचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही ते गीत....


असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे ।

खरंच शांताताई! तुम्ही तुमच्या सुमधुर गीतांनी अजरामर झालेल्या आहात कारण तुमची कोळ्याची पोर हिरवा शालू नेसून झोकात चालत आहे आणि त्यामुळे चांदणे उन्हात हसत आहे.

अशा या महान कवयित्रीला कोटी कोटी प्रणाम ...


शनिवार, ५ जून, २०२१

पर्यावरणाचं संरक्षण करू या - विशेष लेख

 

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त पर्यावरण संरक्षणाविषयी केलेले चिंतन......


पर्यावरणाचं संरक्षण करू या - विशेष लेख

✍  डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: scotbuzz.org


प्रस्तावना:

       पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पर्यावरण असमतोलाच्या प्रखर व सातत्याने वाढणाऱ्या समस्येला आज संपूर्ण जगातील मानवजात तोंड देत आहे. प्रामुख्याने लोकसंख्या वाढ रोखण्यासाठीचा लढा, दारिद्र्य आणि निरक्षरता या बाबींचा देशाच्या विकासातील संबंध येतो. हे सर्व घटक पर्यावरणाच्या भविष्यातील नुकसानीला परस्परांशी संबधित व जबाबदार आहेत हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. म्हणूनच आपल्याभोवती असलेल्या परिसराची माहिती करून घेणे व त्यांचा मानवांशी असलेला संबंध जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने  महत्त्वाचे आहे. आपले अस्तित्व आपल्याभोवती असलेल्या भौतिक व जीवित पर्यावरणाच्या सुस्थितीवर अवलंबून आहे. आपली प्रत्येक व्यक्तीगत किंवा संघटित कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणावर परिणाम करत असते.


       पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा कल सूचीत करतो की, आज प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबद्ध होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजे नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदूषण, लोकसंख्यावाढ व त्याबरोबर येणाऱ्या सामाजिक आर्थिक व राजकीय तणावाला सामोरे जावे लागेल.


पर्यावरण म्हणजे काय?

       आमच्या सभोवताली जे जे दिसते ते सारे म्हणजे पर्यावरण! यात सजीव व निर्जीव सर्व काही येते. हवा हे निर्जीव तर असंख्य अतिसूक्ष्म जीव, झाडे, प्राणी आणि आपण हे सजीव घटक होत.


पर्यावरण प्रदूषण:

       ज्या वातावरणात, सर्व वनस्पती आणि प्राणी निर्माण होतात, ते पर्यावरण त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं. त्या पर्यावरणाच्या घटकातील कोणताही बदल हा त्यांना त्रासदायक ठरतो. त्यांच्या वाढीवर, जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. पर्यावरणात कोणत्याही प्रकारचा बिघाड किंवा अवनती याला पर्यावरणाचं प्रदूषण म्हणतात. पर्यावरण चांगले राखण्यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांची जोपासना करायला हवी. परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आपली जमीन, पाण्याचे साठे, जंगल आणि वातावरण यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी लोकसंख्या तसेच जनावरांची संख्या आटोक्यात ठेवायला हवी. यामुळे पर्यावरणाचे घटक व साधनसंपत्ती यांचा समतोल साधणे शक्य होईल.


पर्यावरणाचा समतोल कशासाठी?

       वनस्पती या मूलभूत घटकापासून सर्वांना अन्न मिळतं. वनस्पतीवर जगणाऱ्या काही छोट्या प्राण्यांना मोठे प्राणी खातात. ज्या वनस्पती आणि प्राणी इतराचं अन्न असतात ते अन्न साखळीतील एक दुवा बनतात. या प्राण्यांचा व वनस्पतींचा जर नाश झाला तर अन्नसाखळीतील इतरांच्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अन्नसाखळ्यासाठी पुरेशा प्रमाणात वनस्पती आणि प्राणी असणं हे पर्यावरण समृद्ध असल्याचं एक लक्षण आहे.


अन्नसाखळी खंडित कशी होते?

       साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. बेडूक डासांच्या अळ्या आणि इतर कीटक खातात. बेडकांना साप खातात. सापांना मुंगूस आणि गरुड खातात. माणसांनी जर भातशेतातून मोठ्या प्रमाणावर, खाण्यासाठी, बेडूक पकडले तर बेडकांची संख्या घसरेल आणि त्यामुळे डासांची आणि इतर कीटकांची संख्या वाढून पिकांना तर हानी होईलच पण टायफॉईड, डेंग्यू यासारखे रोगही पसरतील. पुरेसे बेडूक नसले तर साप, उंदीर, छोटे पक्षी आणि अंडी खाण्यासाठी शेतातून घराजवळ येतील. जेंव्हा जंगलातून वाघ आणि सिंह कमी होतात तेंव्हा हरणे आणि गवे यांची संख्या वाढते आणि वनस्पतीवर अवलंबून असणारे हे प्राणी जंगलाचा नाश करतात. जेंव्हा हत्तीना जंगलात बांबूचे कोवळे कोंब आणि हिरवा चारा मिळेनासा होतो तेंव्हा ते चरण्यासाठी शेतात येतात. माकडांना जेंव्हा जंगलात पुरेशी फळं आणि पाणी मिळत नाहीत, तेंव्हा ती बागांमध्ये फळं आणि फुलं खाण्यासाठी येतात. कोल्ह्याना आणि लांडग्याना जंगलात जेंव्हा प्राणी मिळेनासे होतात तेंव्हा ती गावात कोंबड्या, कुत्री आणि मांजर खाण्यासाठी येतात.


       लोकसंख्या वाढीमुळे जेंव्हा मर्यादित जमिनीवर अधिकाधिक लोक राहू लागतात तेंव्हा पर्यावरणाचा समतोल ढासळतो. जुन्या काळी अनेक लोक रोगजंतूमुळे होणाऱ्या प्लेग, कॉलरा, देवी, क्षयरोग, विषमज्वर अशा अनेक रोगांमुळे मरत असत. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक रोगप्रतिबंधक लसी निघाल्या, त्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. परिणामी लोकसंख्येची भरमसाठ वाढ झाली आहे. अधिक लोक म्हणजे राहण्यासाठी अधिक जमीन, अधिक अन्न आणि अधिक इंधन! परंतु जमीन ही वाढत नसल्याने आपल्याला आहे तेवढ्याच जमिनीवर अधिक उत्पादन काढावं लागते. साठ वर्षापूर्वी एक चौरस जागेवर एकशे सतरा माणसं रहात होती. तेवढ्याच जागेवर दोनशे सत्तर माणसांना साधारणपणे रहावं लागत आहे. अन्नधान्य पिकविणाऱ्या दीड कोटी हेक्टर जमिनीतून एवढ्या प्रचंड लोकसंख्येला अन्न पुरवावे लागत आहे.


पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी उपाय:

खेडेगावातील लोकांनी करावयाचे उपाय :

  • निर्धूर चुलींचा वापर
  • स्वयंपाकघरातील धूर बाहेर जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था आणि तेथील हवा खेळती ठेवणे
  • गुरंढोरं घराबाहेर बांधणे.
  • चांगल्या जातीची गुरे बाळगणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची धूप थांबविणे.
  • रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांचा काळजीपूर्वक वापर करणे.
  • घराच्या सभोवती आणि सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे.
  • सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, झाडे लावणे.
  • गांवतळी आणि पिण्याच्या पाण्याचे साठे स्वच्छ ठेवणे.
  • मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे. पाळीव कुत्र्यांना लस टोचून घेणे.
  • घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे. 
  • घर तिथे शौचालय हा उपक्रम राबविणे.
  • आपलं पर्यावरण संरक्षण करणाऱ्या वन्य प्राण्यांचे रक्षण करणे.


शहरातील लोकांनी करावयाचे उपाय:

  • शाळेच्या आणि घरांच्या परिसरात झाडे लावणे.
  • रस्त्यावर लावलेल्या झाडांचे संरक्षण आणि संगोपन करणे.
  • स्वयंपाकघरातील आणि घरातील कचरा रस्त्यावर न फेकता घंटा गाडीत टाकणे.
  • सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.
  • ध्वनिप्रदूषण रोखणे.
  • पाणी, वीज, कागद अशा उपयुक्त वस्तूंचा अपव्यय टाळणे.
  • स्वयंचलित वाहनांचा वापर करणे. वाहनांचा वापर आवश्यक तेवढाच करणे.


चला तर आपण लगेच या कामाला आरंभ करु या आणि इतरांनाही सहभागी करून घेऊ या. यातच आपली आणि आपल्या पुढील पिढ्यांची सुरक्षितता आहे.


मंगळवार, २५ मे, २०२१

कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख


कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: Facebook


       जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात, अनेक घटना घडतात, ज्याने मनुष्याचे जीवन बदलून जातं, जगणं बदलून जातं, पण कांही दुर्मिळ प्रसंग असेही असतात जे पूर्ण मानवजातीलाच आतून-बाहेरुन बदलून टाकतात. कोरोना व्हायरसने आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे दुर्मिळ काम केले आहे. प्रत्येक घटनेचे चांगले-वाईट परिणाम होतात. कोरोनाने अनेक दुर्भाग्यपूर्ण गोष्टी केल्या असल्या तरी कांही चांगल्या गोष्टीही कोरोनामुळेच घडून आल्या आहेत. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, आरोग्य, योगा, प्राणायाम किती आवश्यक आहे हे कोरोनामुळे माणसाच्या लक्षात आले. शारीरिक स्वास्थ, मानसिक स्वास्थ या गोष्टीकडे माणूस गंभीरपणे बघू लागला आहे. कोरोनाने पर्यावरण शुध्द केलं. प्राण्यांना या काळात मोकळेपणाने वावरता आले. नद्या शुध्द व स्वच्छ झाल्या. या काळात जणू निसर्गाने स्वतः ला बरंच रिफ्रेश करुन घेतलं. गरिबांना, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या लोकांची माणुसकी समोर आली. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे असंख्य झरे वाहू लागल्याचे आपण पाहिले. त्यातील तीन लोकांच्या माणुसकीच्या झऱ्यांचे दर्शन घडविण्यासाठी हा लेखन प्रपंच.




पोलीस आकाश गायकवाड
फोटो साभार: Twitter

       त्यातील पहिला झरा पोलिसातील परमेश्वराचा, मुंबई पोलीस क्र. १४००५५ आकाश बाबासाहेब गायकवाड, मूळ गांव माळवाडी, ता. मिरज, जि. सांगली यांचा. ते सद्या नेमणूक स. पो. ताडदेव (A कंपनी) मुंबई येथे कार्यरत आहेत. दि. ३ जून २०२० रोजी कोरोनाने भयग्रस्त झालेल्या जनतेला चक्रीवादळाने वेढले. निसर्गाच्या या भयंकर कोपाने लोक सैरभैर झाले. अनेकांची घरे उध्वस्त झाली. लाखो संसार उघड्यावर पडले. त्याच दिवशी हिंदुजा रुग्णालय मुंबई येथे चौदा वर्षाच्या सना फातिमा खान या मुलीला अचानकपणे ओपन हार्ट सर्जरी च्या वेळी A+ रक्त देण्याकरीता तिच्या कुटुंबातील व नातेवाईकातील कोणीही रुग्णालयात येवू शकत नव्हते. अशा गंभीर परिस्थितीत आकाश गायकवाड यांना ही बातमी समजली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी हिंदुजा रुग्णालयात जाण्यासाठी आपली बाईक स्टार्ट केली. चक्रीवादळाने बाईक चालविणे महाकठीण झाले. बाईक कित्येक वेळा आडवी झाली. पण ते अजिबात डगमगले नाहीत. त्यांच्यापुढे एकच ध्येय होते, सना फातिमाचा जीव वाचवायचेच. त्यांनी अतिशय कौशल्याने चक्रीवादळावर मात केली व काही मिनीटातच हिंदुजा रुग्णालय गाठले व डायरेक्ट टेबलावर गेले. रक्तदान केले. सना फातिमाची ओपन हार्ट सर्जरी सक्सेस झाली. तिला जीवनदान देणारा हा योध्दा माझ्या माहेरचा माझ्या भाच्यांचा मित्र आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतो व पवित्र कुरआनमधील एक वचन आठवते "जिसने किसकी जान बचायी, उसने सारा जहाँ बचाया!"





तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुुमाळ
फोटो साभार: Facebook

       दुसरा माणुसकीचा झरा भरुन वाहताना दिसला तो शिरोळ जिल्हा कोल्हापूर च्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या रुपात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा, अधिकारांचा तोरा न मिरवता मातीशी आणि लोकांशी नाळ जोडलेल्या आणि सेवेला सर्वोच्च मानणाऱ्या डॉ. अपर्णा मॅडम यांच्या रुपात. श्री महंमदहनिफ मुबारक मुल्ला, रा. औरवाड यांची बारा वर्षाची पुतणी सना ही कोरोना पॉझिटीव्ह सापडली. त्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली. सनाला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला नेण्यात आलं आणि तिच्या कुटुंबीयांना शिरोळ येथे क्वारंटाईन करण्यात आलं. सना बिचारीला एकटीलाच ५०-६० कि. मी. लांब जावं लागलं. कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी काळजावर दगड ठेवून तिच्याकडे एक मोबाईल दिला व तिच्याशी संवाद साधून तिला धीर देणे सुरु केले. संवाद साधताना कुटुंबीयांना कळलं की, फक्त तेच तिला धीर देत नव्हते तर अजून एक व्यक्ती दररोज तिच्याशी संवाद साधून तिला धीर देत होती, ते नांव होतं तहसीलदार डॉ. सौ. अपर्णा मोरे-धुमाळ. इतकी महाभयंकर स्थिती आजूबाजूला असताना, दररोज वेगवेगळे विषय हाताळावे लागत असताना, नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत असताना यातून वेळ काढून डॉ. अपर्णा मॅडम दररोज सनाशी गप्पा मारत होत्या, तिला धीर देत होत्या. आपल्या मुलीसारखीच लहान लेक कुटुंबापासून दूर राहून कोरोनाशी झुंज देत आहे हे पाहून त्यांच्यातील मातृहृदय जागं झालं. त्या स्वत: तर बोलत होत्याच शिवाय सनाएवढ्याच आपल्या मुलीला तिच्याशी गप्पा मारायला लावायच्या. एकमेकींना कधीही न भेटलेल्या त्या दोघी. आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. अशा संकट काळात आपलं आईपण सांभाळणाऱ्या मातृहृदयी अपर्णा मॅडमना मानाचा मुजरा.


रिक्षाचालक अक्षय कोठावळे

फोटो साभार: गूगल


       तिसरा माणुसकीचा झरा दिसला, तो अक्षय कोठावळे या तीस वर्षाच्या युवकामध्ये, तो रिक्षाचालक आहे. त्याच्या वडिलांचे कांही दिवसापूर्वीच निधन झाले. त्याच्या लग्नासाठी दोन लाख रुपये या कुटुंबाने साठवले होते. ते महात्मा फुले पेठ, पुणे येथे राहतात. अक्षय यांचे मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील मनाच्या अक्षयने रस्त्यावरुन पायी जाणारे कामगार पाहिले, गोर-गरीब लोकांचे जेवणाअभावी होणारे हाल पाहिले. परोपकारी अक्षयने त्यांचे हाल कमी करण्याचा निर्णय घेतला. विवाहासाठी जमविलेल्या रकमेतून शहरात रस्त्यावर दिसणाऱ्या उपाशीपोटी नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला. दररोज सुमारे चारशे परप्रांतीय कामगार तसेच रस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना तो जेवणाचे वाटप स्वतःच्या रिक्षातून करत राहिला. त्याच्या वडिलांचे १८ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तेही ऑटोरिक्षाचालक म्हणून काम करीत होते. मात्र वडिलांच्या निधनाने डोंगराएवढे दुःख उराशी बाळगून अक्षय यांनी दररोज गरिबांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाच काम न थांबवता चारशे लोकांची भूक भागविली. केवढे हे महान कार्य! अक्षयच्या या कार्यास मानाचा मुजराही कमी पडेल. देश अडचणीत असताना मदत करणाऱ्या रतन टाटा, अक्षयकुमार, सोनू सूद अशा अनेकांची उदात्त भावना देशासमोर आली. स्वच्छता, सावधानता, सहकार्य, सहनशीलता, सहवेदना यांचे महत्व लोकांच्या लक्षात आले.


       आकाराने अतिशय लहान असलेला एक विषाणू विज्ञान, धर्म, वैद्यकीय सुविधा या सर्व क्षेत्रांच्या मर्यादा अधोरेखित करुन गेला. वाईटातून वाईट घडतेच, पण वाईटातून काही चांगले घडते हे सर्व जगाने पाहिले. आपण वाईटातून जे चांगलं घडलं, जे चांगलं शिकायला मिळालं त्यातून एक नवा चांगला माणूस आणि एक नवा देश नक्कीच उभा करु शकतो. यासाठी कोरोनातून मिळालेल्या या निर्मळ झऱ्यांचे पाणी आपण निश्चित प्राशन करु शकतो. अशा या खळखळ वाहणाऱ्या माणुसकीच्या झऱ्यांना - आकाश, डॉ. अपर्णा व अक्षय यांना त्रिवार वंदन !


गुरुवार, १३ मे, २०२१

अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख


अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       अक्षयतृतीया या सणाला ग्रामीण भाषेत आकिती असे म्हणतात. पूर्वीच्या आजीबाई म्हणायच्या आकिती दिवशी परसात फळभाज्यांच्या बिया पेरा. आकितीचं आळं आणि बेंदराला फळं. बेंदूर या सणापर्यंत फळं हवी असतील तर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बियांची पेरणी करा. किती छान मंत्र दिलाय पूर्वजांनी आपल्यासाठी !


या सणाची नैसर्गिक पार्श्वभूमी:

       चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच आहेत. या महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला आपल्या पूर्वजांनी वैशाख असे नांव दिले. वैशाख महिना अगदीच वेगळा. या महिन्यात सर्वत्र कडक असा रखरखीत उन्हाळा असतो. सगळे वातावरण तापून गेलेले असते. उष्म्याने जीव अगदी नकोसा झालेला असतो. दिवस रात्रीपेक्षा मोठा झालेला असतो.


       वसंताच्या कडक उन्हातच निसर्ग देवतेचा एक हिरवा चमत्कार दिसतो. झाडावेलीना सर्वत्र हिरवीकंच कोवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते. वातावरणात रानफुलांचा एक मधुर सुगंध दरवळत असतो. हिरव्या गर्द  पानाआड बसून शेपटी खालीवर करत कोकिळा आनंदाने गात असते.


या सणामागील पौराणिक कथा:

       भगवान श्री परशुराम महापराक्रमी होते. त्यांनी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामांचा जन्म याच तिथीला अक्षयतृतीयेला झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामांची जयंती साजरी केली जाते. कोकणात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते.


       दुसरी एक फार फार वर्षापूर्वी ची गोष्ट सांगितली जाते. कुशावती नावाचे एक शहर होते. तेथील राजा सदा चैनीत, ऐष आरामात रहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. प्रजेची त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. त्या राजाने या अन्यायाची कधीच दखल घेतली नाही. अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करणार कोण? सर्वजण धास्तावले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी रहात होते. राजाला या तपस्व्याबद्दल नितांत आदर वाटत होता. लोकांना युक्ती सुचली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख तपस्वी ऋषीना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषींचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे वचन दिले. ऋषींनी राजाला कल्पना दिली की की, "हे राजा, तू पूर्वी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पुर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील!" ऋषींच्या या खड्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर राजाने अन्नदान केले. जलकुंभ दान केले. लोक संतुष्ट झाले. प्रजा सुखी झाली. तेंव्हापासून लोक भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी गार पाण्याचे माठ, रांजण भरून ठेवतात. कडक उन्हात वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या वाठसरूचा जीव कासावीस होतो. अशावेळी हे व्याकुळ जीव थंडगार पाण्याने शांत होतात. आजही ठिकठिकाणी यादिवशी अनेकजण अन्नदान करतात. पाणपोई सुरु करतात.


सण कसा साजरा करतात:

       या दिवशी अनेक लोक ज्ञानी, शास्त्री पंडीतांना घरी बोलावून गोडधोड, उत्तम भोजन देतात. दानधर्म करतात. अशा ज्ञानी लोकांमुळेच समाजाचे पाऊल पुढे पडते. आपण जे शक्य असेल ते दान द्यायचे. पाण्याने भरलेला कुंभ द्यायचा. अशा या दानाची अक्षय म्हणजेच अखंड आठवण रहाते असे मानले जाते. दान करणाऱ्यास सुखसमृद्धी लाभते अशी आपली परंपरा आहे.


       अक्षयतृतीयेला वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपणास जे शक्य आहे असे एखादे पुण्यकर्म करावे. समाजातील गोरगरीब, पददलित, उपेक्षित यांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. त्यामुळे समता निर्माण होऊन बंधुभाव आणि ऐक्य वाढण्यास मदत होते.


       अक्षयतृतीयेच्या दिवशी अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान केले जाते. सुवासिनी इष्ट मैत्रिणींना बोलावून, हळदीकुंकू व सौभाग्य अलंकाराची देवाण-घेवाण करतात. सौभाग्य दान म्हणून चूडे बांगड्या देतात. त्याबरोबर थंडपेये देऊन संतुष्ट करतात अक्षयतृतीयेला केलेले दान, सत्कृत्य अखंड टिकणारे असते म्हणून दान द्या. सत्कार्य करा. 


सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..।