माँ बाप राजी, तो खुदा राजी
मनुष्यावर सर्वापेक्षा ज्यादा हक्क त्या एकमेव ईश्वराचा आहे. अल्लाहवर दृढ विश्वास ठेवून त्याची भक्तिभावाने प्रार्थना करणे हे प्रत्येक मनुष्यमात्राचे कर्तव्यकर्म आहे. अल्लाहनंतर मनुष्यावर सर्वापेक्षा जादा हक्क आई-वडिलांचा आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या हक्काबरोबर ठिकठिकाणी आई-वडिलांच्या हक्काचेही विवेचन करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे अल्लाहच्या स्तुतीबरोबर त्याची उपासना करण्याची ताकीद देणेत आली आहे. त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांच्या सेवेबरोबर त्यांना सतत खूश ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याची ताकीद आपणा सर्वांना देण्यात आली आहे. यावरून आई-वडिलांचा दर्जा किती मोठा आहे, याची कल्पना येते.
पवित्र कुरआनच्या 'बनी इस्त्राईल' या अध्यायामध्ये म्हटले आहे की, तुम्ही सर्वांनी एक अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना मुळीच करू नका, आपल्या आई-वडिलांशी चांगली वागणूक ठेवून त्यांच्यापैकी एक अगर दोन्ही वयोवृध्द झाले असतील तर त्यांना रागाने उत्तर न देणे, त्यांच्याशी आदरपूर्वक विनयाने व सौजन्याने बोलणे, मोठ्या रागीट आवाजाचा त्यांना यत्किंचितही त्रास होऊ न देणे, मानसिक त्रास अगर दुःख होऊ न देता अल्लाहच्या नामस्मरणात त्यांना सुखासमाधानात ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आई-वडिलांची सेवा एक सर्वोत्तम उपासना आहे.
हजरत उमर बिन अम्र रजिल्लाहु यांनी निवेदन केले आहे की, एकदा पैगंबर साहेबांनी आपल्या उपदेशात लोकांना सांगितले की, अल्लाहची मर्जी आई-वडिलांच्या इच्छा-आकांक्षामध्ये आहे. अल्लाहची नाराजी आई वडिलांच्या नाराजीमध्ये आहे. आई-वडिलांच्या हक्काकडे सरळ कानाडोळा करून आपण ईश्वराला केव्हाही प्रसन्न करू शकणार नाही. जो सतत अल्लाहला खूश ठेवतो तोच त्याला प्रसन्न करू शकतो. जे आई-वडिलांची उपेक्षा करतील, त्यांना नाराज करतील अल्लाहही त्यांच्यावर नाराज नि अप्रसन्न होईल. जो आपले कर्तव्यकर्म समजून नियमितपणे आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असतो त्याला जे सात्विक सुख-समाधान नि आनंद मिळतो तो इतर कोणालाही मिळणे शक्य नाही. उपकार कर्त्याबद्दल कृतज्ञता आणि सौजन्यता ठेवणे हा भलेपणाचा एक उत्कृष्ट नमुनाच नव्हे काय? म्हणून आई-वडिलांची सेवा करून आपणही सात्विक सुखाचे धनी होवू या. कारण माँ बाप राजी तो खुदा राजी' असे सत्यवचन आहे.
हजरत अब्दुल्लाह रजिअल्लाह निवेदन करतात की, एका पैगंबर साहेबांच्या सेवेत उपस्थित होऊन सांगितले की माझी धर्मयुध्दावर येण्याची व हिजरत करण्याची प्रबळ इच्छा आहे. याकरिता मी आनंदाने आपल्या हातावर हात देवून आपले अनुयायित्व स्विकारत आहे. तेव्हा पैगंबर साहेबांनी त्याला विचारले, 'तुझ्या आई-वडिलांपैकी कोणी जिवंत आहे का?" त्याने म्हटले, 'होय आई-वडिल दोघेही अद्याप जिवंत आहेत. त्याबद्दल मी अल्लाहचा शतशः आभारी आहे. 'यावर पैगंबर साहेबांनी म्हटले, 'काय तू खरोखरच आपल्या धर्मयुध्दाबद्दल व हिजरत बद्दल अल्लाहकडून मोबदला मिळविण्याची अपेक्षा करतोस?' त्याने म्हटले, 'होय माझ्या या कामगिरीबद्दल अल्लाहकडून मला मोबदला मिळावा, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. तेव्हा पैगंबर साहेबांनी म्हटले, 'याबाबतीत मी तुला सोपा पण योग्य सल्ला देत आहे. प्रथम तू घरी जाऊन नियमितपणे आपल्या आई-वडिलांची सेवा करीत रहा. या तुझ्या सेवेने प्रसन्न होऊन अल्लाह तुझ्या ज्या काही इच्छा-आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण करील म्हणून सतत आपल्या आई-वडिलांशी नम्रतेची व सौजन्याची वागणूक ठेवून त्यांना दुःख होईल असे कोणतेही काम करू नकोस. जा आजपासून सेवेला सुरूवात कर.'
या उदाहरणावरून असे दिसून येते की, आई वडिलांच्या सेवेकडे कानाडोळा करून आपण अल्लाहला केव्हाही प्रसन्न करू शकणार नाही. जो अल्लाहला खूश ठेवतो तोच त्याला प्रसन्न करू शकतो. जे आई वडिलांची उपेक्षा करतील त्यांना नाराज करतील अल्लाहही त्यांच्यावर नाराज नी अप्रसन्न होईल. आई वडिलच तुमच्याकरिता स्वर्ग आहेत आणि तेच तुमच्याकरिता नरकाचा दरवाजा उघडू शकतात.
आणखी एक 'हदिस पाक' चिंतन मनन करण्यासारखी आहे. हजरत इब्ने अब्बास रजिअल्लाह यांनी कथन केले आहे की, एकदा हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैहिवस्सलमनी आपल्या सर्व अनुयायांना उद्देशून सांगितले आहे जो प्रामाणिक व आज्ञाधारक मनुष्य आपल्या आई वडिलांच्यावर सात्विकपणे, प्रितीयुक्त असा प्रेमपूर्वक दृष्टीक्षेप टाकेल तर त्याला अल्लाहने कबूल केलेल्या एका हज्ज यात्रेच्या पुण्याईइतके पुण्य मिळेल. म्हणून बंधू भगिनींनो या पवित्र रमजान महिन्यापासून आईवडिलांची सेवा सुरू करा. सेवा सुरू असेल तर त्यात वाढ करा व पुण्याचे धनी व्हा !
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा