पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नांव- हवेचे घटक ( विज्ञान कुमार काव्यसंग्रह)
लेखक - प्रा.देवबा शिवाजी पाटील ( एम्.एस्सी.एम्. फिल्.( फिजीक्स)
प्रकाशक - यशश्री पब्लिकेशन्स , पुणे.
पृष्ठे- ४०
मूल्य-७० रूपये
प्रथमावृत्ती-१५ आँगस्ट २०२५व
ISBN-978-81-985159-2-6
विज्ञानाचे नामवंत प्राध्यापक व प्रसिद्ध लेखक आदरणीय देवबा शिवाजी पाटील यांचे हवेचे घटक हे छोटेखानी पुस्तक वाचनात आले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व बोलके आहे. या काव्यसंग्रहाचा विषय सहजपणे समजावून देणारे आहे. हवेचे घटक निसर्गसौंदर्याच्या कोंदणात साकार झाले आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन , कार्बनडायाक्साईड ,अरगाँन, इतर वायू व घटक यांचे हवेतील प्रमाण पाहताक्षणीच लक्षात येते.
पुस्तकाचे शीर्षक वाचूनच मनात कुतूहल निर्माण झाले कारण विज्ञान हे नैसर्गिक रचनांची पायाभूत पुराव्यासहित मांडणी करणारे शास्त्र. विज्ञान हा केवळ विषय नाही तर जगण्याची ओळख आहे. विज्ञान अंध, मंद, व दैव झुगारून देते. विज्ञान सत्यावर आधारित स्वयंशिस्तीचे प्रतिबिंब दाखविते. आज विज्ञानामुळेच जग प्रगतीपथावर आहे. विज्ञान मिश्रणे-संयुगे , प्रयोग, रासायनिक घटक ,संज्ञा इत्यादी नी भरलेला थोडासा क्लिष्ट विषय. अशा विषयात काव्यनिर्मिती करणे खरं तर फार कठीण गोष्ट पण लेखकांनी परिश्रमपूर्वक विज्ञानात काव्य निर्माण केले आहे. विज्ञानाचे प्राध्यापक व साहित्यिक या दोन वेगवेगळ्या भूमिका सरांनी उत्तम प्रकारे बजावल्या आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञान काव्यरूपात शिकविल्याने पटकन् समजते. या विषयाबद्दल अभिरूची निर्माण होते. हे जाणून लेखकांनी वैज्ञानिक तत्वांना धक्का न लावता बालकुमारांना हसत खेळत विज्ञान अध्यापन करण्याचा वसा घेतला आहे. सहज सोप्या भाषेत , समर्पक यमकरचना करून नादमयता साधली आहे.
लेखक देवबा पाटील यांच्या मध्ये कवी मनाचा एक प्राथमिक शिक्षक लपून बसला आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जानवते. ते आपल्या मनोगतात हवेचे महत्त्व सांगताना म्हणतात.
हवेवर नाही , कुणाची मालकी ।
सगळ्यांसाठी ती ,आहे सारखी।
हवेजवळ नाही ,मुळीच भेदभाव
साऱ्यांना देते, ती सारखा वाव।
हवेचा श्वास ,जीवनाची आस ।
हवेविना होईल, जीवन खलास।
ठेवता हवा, सदैव शुद्ध ।
निकोप आरोग्य।जीवन समृद्ध।
या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता विद्यार्थ्यांना समजण्यास सोपी व आशयपूर्ण आहे. हवेचे गाणे या कवितेत कवी म्हणतात
तेरा , चौदा , पंधरा , सोळा
शुद्ध हवेत श्वास मोकळा
सतरा, अठरा ,एकोणीस, वीस
हवेविना जीव होई कासावीस
प्राणवायू या कवितेत कवीनी तुळस या वनस्पतीचे महत्त्व जाता जाता सांगितले आहे
तुळस सोडते , प्राणवायू जास्त
म्हणुनी लावती , तुळस अंगणात
' पाणी ' या कवितेत कवीनी पाण्याचे महत्त्व विषद केले आहे. कवी म्हणतात
पाण्याने वनस्पती छान बहरतात
पाण्याअभावी वनस्पती सुकतात
सध्या हवेच्या प्रदूषणाविषयी जाणीवजागृती निर्माण करण्याची नितांत गरज आहे. हे जाणून कवी ' हवेचे प्रदूषण 'या कवितेत म्हणतात
प्रदूषणाने वाढले, अनेक आजार
मानवी जीवन, झाले बेजार
अशा प्रकारे या काव्यसंग्रहातील सत्तावीस कवितामधून कवीनी हवेचे घटक मनोरंजक पद्धतीने समजावून दिले आहेत. सर्वच कविता सोप्या ,नादमय , सहज गुनगुनाव्यात अशा आहेत. विद्यार्थ्यांना विषय कवितांच्या माध्यमातून अध्यापन करण्याचा कवींचा प्रामाणिक प्रयत्न अनुकरणीय व स्तुत्य आहे. कवी बालकुमारांसाठी दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे द्रष्टे साहित्यिक आहेत.
हे पुस्तक शिक्षकांना अध्यापनासाठी व विद्यार्थ्यांना अध्यनांसाठी उपयुक्त आहे.
कवींना पुढील लेखनकार्यास हार्दिक शुभेच्छा ।
