कामात राम व भजनात रहीम
कामात राम व भजनात रहीम पाहणारे माझे वडील त्यांना आम्ही बापूजी म्हणायचो. ते शांत स्वभावाचे, सुशिक्षित व कष्टाळू शेतकरी होते. आमच्या बापूजीना गावातील लोक युसूफ सावकार म्हणायचे. मला लहानपणी कोडे पडायचे की त्यांच्याजवळ पैसे कधीच नसायचे. वर्षातून एकदा-दोनदा शेंगा किंवा तंबाखूची विक्री झाली तरच असायचे त्यांच्याजवळ थोडेफार पण एरवी आर्थिक व्यवहार आईच बघायची. पैसे जवळ नसताना त्यांना सावकार का म्हणतात हे मला मोठी झाल्यावर कळाले. कारण त्यांच्याजवळ सद्विचार, सदाचरण व श्रमप्रतिष्ठेचे मोठे भांडार होते. ते सहा फूट उंच होते पण त्यांची वैचारिक उंची त्यापेक्षा खूप उंच होती. बुध्दीची झेप मोठी होती.
बापूजी दहा-अकरा वर्षाचे असतानाच माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या पाठीवर एक भाऊ व दोन लहान बहिणी होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर ते अकाली प्रौढ झाले. पाठच्या भावाला म्हणजेच माझ्या आदरणीय काकांना शिकता यावे म्हणून स्वतः शाळा सोडून वाटेकऱ्यांसोबत शेतात राबू लागले. आजीला संसाराचा गाडा ओढण्यासाठी मदत करू लागले. आयुष्याच्या अंतापर्यंत काळ्या आईची सेवा त्यांनी इमाने इतबारे केली.
बापूजीना भक्तिगीते ऐकण्याची व संगीताची फार आवड होती. या आवडीमुळेच ते गावात असलेल्या लक्ष्मी मंदिरात भजन ऐकण्यास जाऊ लागले. त्यांनी हार्मोनियम शिकण्यासाठी 'संगीत कला विहार' नावाचे एक पुस्तक सांगलीहून आणले व शेतातून घरी आल्यावर हार्मोनियम वाजवण्याचा सराव करू लागले नि बघता बघता भजनी मंडळातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक बनले. लोक त्यांना भजनासाठी बोलवायला यायचे. आमच्या आईला मात्र या भजनाचा खूप राग यायचा. दिवसभर कष्ट करून आल्यावर शांत झोप घ्यावी असे तिला वाटायचे. पन्नासीनंतर त्यांच्या तबेत्तीच्या किरकोळ तक्रारी सुरू झाल्या.
भजनाला गेले तर आई त्यांच्यावर फार चिडायची. भजनाहून आल्यावर लवकर दार उघडायची नाही. बापूजीनी एक युक्ती केली. मला मागच्या खोलीत झोपायला सांगायचे. माझी झोप खूप सावध आहे हे त्यांना माहित होते. एकाच हाकेत मी उठायची व हळूच दार उघडायची. आईला कळायचे पण नाही. याबाबतीत माझी व बापूजींची अशी गट्टी होती. मला हार्मोनियम वाजवायला शिकवायची त्यांची खूप इच्छा होती पण आई-आजीनी त्याला सक्त विरोध केला. तो काळच तसा होता. मुलीला मोकळेपणाने स्टेजवर वावरायला मिळत नव्हते. 'तुम्हाला नाद आहे तेवढा पुरे मुलांना असलं कांही शिकवू नका', असे आईचे म्हणणे होते. बापूजी गवळण फार छान सुरेल आवाजात म्हणायचे. मला आजही आठवते एक गवळण, 'वाकून घाल सडा राधिके, वाकून घाल सडा, केस तुझे हे भुरभुर उडती, आवळून बांध बुचडा राधिके वाकून घाल सडा'. माझे वडील हार्मोनियम वाजवून गवळण गातात याचा मला सार्थ अभिमान वाटायचा. भजनाबरोबरच मुस्लिम धर्मातील नमाजपठण, कुराण वाचन ही श्रध्दापुर्वक करायचे. मोहरममध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे. त्यामुळे आम्हा भावंडाना घरातूनच सर्वधर्मसमभावाची शिकवण मिळाली. धार्मिक सहिष्णुता, बंधुता आमच्यामध्ये निर्माण झाली.
कष्टाळू शेतकरी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे बापूजी. आपले आरोग्य उत्तम कसे राखावे याचा वस्तुपाठ ते आपल्या कृतीतून दाखवायचे. सकाळी शेतावर जाण्यापूर्वी ते नुसता चहा कधीच प्यायचे नाहीत, चहा पिण्यापूर्वी ते न्याहरी करायचे. आजच्याप्रमाणे पोहे, उप्पीट, शिरा इ. पदार्थ कधीच नसायचे त्याकाळी. शिळी भाकरी, दही खर्डा किंवा दही चटणी खायचे. सूर्य डोक्यावर येईपर्यंत शेतात कष्ट करायचे. क्वचितच गडी-मजूर लावण्याचा प्रसंग यायचा. एरव्ही चार एकर जिराईत शेतीची भांगलण, कोळपण इ. अनेक कामे स्वतः करायचे. दुपारी घरी येऊन जेवण करायचे. थोडीशी विश्रांती घेतली की परत सूर्य मावळेपर्यंत शेतात राबायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता. मुसळधार पावसाचे ८-१० दिवस वगळता ते नेहमीच शेतात राबायचे. आपल्या मुलांनी खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. भैया शाळेत जाण्यासाठी सुरवातीला तयार नव्हता तर त्याच्यामागे ओली काठी घेऊन मार देत शाळेपर्यंत गेले होते. एरव्ही जराही न रागावणारे बापूजी शिक्षणाच्या बाबतीत कठोर व्हायचे. आम्ही काय बोलतो, अभ्यास कसा करतो याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे.
कमी उत्पन्नात संसार चालवताना आईला खूप त्रास व्हायचा. ती आमच्यावर, बापूजींवर खूप चिडायची पण ते शांत असायचे. संयम कसा ठेवावा, सहनशीलतेने क्रोधाला कसे जिंकावे हे शिकावे तर आमच्या बापूजी कडूनच. ते हसत आईला म्हणायचे, 'चिडून, बडबडून तुला आनंद मिळत असेल तर खुषाल चिडून घे, सारखी बडबड केल्यामुळे आयुष्य कमी होते हे ही लक्षात ठेव. समोर आलेल्या अन्नाला बापूजीनी नांवे ठेवलीत असे कधीच झाले नाही. समोर वाढलेल्या अन्नाला नावे न ठेवता समाधानाने जेवण करण्याची शिकवण बापूजीनी दिली.
मला व भैय्याला नोकरी लागल्यावर लक्ष्मीच्या यात्रेपूर्वी त्यांनी सांगितले की ज्युबेदा तू ज्ञानेश्वराचा व शौकत तू संत तुकारामांचा फोटो घेवून या यात्रेला येताना. बापूजींची इच्छापूर्ती आम्ही केली. त्यावेळी बापूजींच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्ही माहेरी गेलो की नातवंडाना तारेची गाडी, चक्र, विटी-दांडू बनवून द्यायचे. एवढ्या गोंधळातही रेडिओवर भजन-किर्तन लागले तर रेडिओ घेऊन गोठ्यात जाऊन ऐकून यायचे. असे होते आमचे बापूजी ! अहोरात्र कष्ट करणारे, सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे, संयम व सहनशीलतेचा वस्तुपाठ देणारे, भाजी-भाकरीत समाधान मानणारे, संतासम जीवन व्यतित करणारे आमचे बापूजी मार्च १९९९ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी आमच्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगरच कोसळला आमच्यावर. अशावेळी त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरीच आमच्या कामी आली. बापूजी ही शब्द सुमनांजली तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण ते असताना 'माझं माहेर' हा लेख प्रकाशित झाला होता. तो लेख त्यांनी अख्ख्या गावाला दाखविला होता.
