शनिवार, ८ मे, २०२१

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता - विशेष लेख


       ९ मे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या महान शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा   विशेष लेख..

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या केवळ स्मरणानेच आज लाखो सुशिक्षितांच्या तनामनात प्रेरणेचा, कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित होतो. कर्मवीर हे केवळ नांव नव्हते ते एक युग होते.

परिचय:
       महाराष्ट्रातील या महान समाजसेवकांनी त्यांचे शिक्षण संपल्यावर ओगले व किर्लोस्कर या कारखान्यांचे विक्रेते म्हणून काम केले. हे काम फिरतीचे असल्यामुळे या निमित्ताने त्यांचा संपूर्ण भारतभर प्रवास झाला. या भारत भ्रमणात त्यांना एक गोष्ट समजली की विचार, उच्चार व आचार यांचे उगमस्थान म्हणजेच शिक्षण होय. शिक्षण म्हणजे जनजागृती. जनजागृती म्हणजे समाजक्रांती आणि समाजक्रांतीमधूनच नवसमाजनिर्मिती हे सूत्र त्यांनी मनाशी पक्के केले.

शैक्षणिक कार्याचा आरंभ:
       १९११ साली तत्कालीन सातारा आणि सद्याच्या सांगली जिल्ह्यातील दुधगांव या गावी त्यांनी एक शिक्षणसंस्था स्थापून आपल्या शैक्षणिक कार्याचा आरंभ केला. १९१९ मध्ये सातारा येथे त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तिथून पुढे शैक्षणिक प्रचारासाठी त्यांनी व्याख्याने दिली. १९४७ मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सुरु केले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा मोफत देणाऱ्या या महाविद्यालयावर मोठे आर्थिक संकट आले. काही कारणामुळे महाविद्यालयाचे शासकीय अनुदान मिळणेही बंद झाले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेल्या या समाजसेवकांनी पदयात्रा काढली व देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. अगदी गिरणी कामगारांकडून देखील त्यांनी एक-एक रूपया गोळा केला.

भाऊरावांचे बाणेदार उत्तर:
       हे भले गृहस्थ देणगी मिळविण्यासाठी वणवण करत आहेत, ही बातमी खानदेशातील एका धनाढ्य मनुष्याला समजली. त्यांनी भाऊरावांना निरोप पाठविला की, 'असा एक-एक रूपया गोळा करण्यापेक्षा मी स्वतः एकरकमी कांही लाख रूपये देतो. फक्त त्या महाविद्यालयाला माझ्या वडीलांचे नांव द्या'. हा निरोप मिळताच भाऊरावांनी त्वरित उत्तर पाठविले, 'एक वेळ मी माझ्या बापाचे नांव बदलीन, पण पैशाच्या लोभाने छत्रपती शिवरायांचे नांव मुळीच बदलणार नाही'.

कर्मवीरांच्या उतुंग कार्याचा काव्यमय आढावा...
       अक्षय परिश्रम, अपार जिद्द, अतूट सत्यनिष्ठा, अभंग ताठपणा यांनी बनलेलं एक तेजस्वी संयुग होते कर्मवीर आण्णा.

       या तेजस्वीतेच्या उदरी होती एक प्रखरता..... जी अज्ञानाच्या अंधकाराला जाळून पोळून टाकत निघाली होती ज्ञानियाच्या तेजाकडे.

       त्यांच्या ठिकाणी होते घणाघाती प्रहार, जे जाती व धर्मभेदाच्या पाषाणांना भेदून तयार करत होते... समानतेचे, स्वतंत्रतेचे एक सुंदर शिल्प.

       कर्मवीर एक अस्मिता, जिनं माणसाला माणूस म्हणून जगायला  शिकवलं.

       या तेजस्वीतेच्या पोटी होती तेवढीच अथांग माया, मायेनं वत्सलतेला डोळस रुप दिलं, चेतना दिली नि हळूच फुंकला त्यात तेजोमय जीव.

       ही तेजोमय ज्योत तुझ्या माझ्यासाठी देखील आहे. या प्रकाशाने तुझं-माझं, प्रत्येकाचं  जीवन उजळण्याचा हक्क आहे हा दिलासा दिला कर्मवीरांनी.

       तो काळ होता उच्च वर्णियांच्या हक्कदारीचा, रूढीप्रिय समाजव्यवस्थेत प्रत्येकाच्या कार्याच्या चतुःसीमा ठरल्या होत्या. हजारो वर्षाच्या सवयीनं बेड्या, बेड्याही वाटत नव्हत्या. आपल्याचं शरीराचं, मनाचं एक अंग वाटत होत्या. मनं मृतप्राय होतात ती अशानच. पण कर्मवीरांनी ती मनं तळापासून हलवून सोडली, अंतःप्रेरणेनं जिवंत केली.

       श्रमाला विद्येची, विद्येला श्रमाची जोड देवून घडवली नवीन मनं.

       कर्मवीरांनी गीतेतील कर्मयोग कधी वाचला नसेल, पण ते जगले तो कर्मयोगच.

       ही यशोगाथा गायली जातेय आज घराघरातून, ज्यांनी हाती धरलं पुस्तक आणि वाचली देवाची अक्षरं, ही अक्षरे त्यांच्यासाठी घेऊन आली नवं गान, नवा प्राण
पण ठेवायला हवंय  खरंखुरं भान ।

आपण सर्वांनी काय करायला हवं ?
       फक्त पुतळे उभारून, गुणगान करून कर्मवीर आण्णांचे स्मरण न करता त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचे संगोपन, जतन केले पाहिजे. शिक्षणाला श्रमाची जोड द्यायला हवी.

       आजचा शिक्षित श्रमाला कमी लेखू लागला आहे. श्रमदेवतेचं आणि विद्यादेवतेचं सहचर्य किती भाग्याचं असतं हे अनुभवायला हवे.

       श्रमामुळे येणाऱ्या घामाने डबडबलेले शरीर हाच सर्वोच्च अलंकार आहे. निकोप मनाची आणि निरोगी शरीराची माणसेच सामाजिक स्वास्थ्य टिकवू शकतील. श्रमाने बुद्धीला धार चढते. घामाने बुद्धीला तेज येते ही कर्मवीरांची शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे, प्रत्येक नांगरामागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे असे स्वप्न बाळगणाऱ्या या थोर समाजसेवकांस ही भावसुमनांली....।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा