शनिवार, १ मे, २०२१

महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख


       आज १ मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांची छाती अभिमानाने भरून येण्याचा दिवस. महाराष्ट्र दिनानिमित्त हा विशेष लेख.


महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com

माझा महाराष्ट्र, माझी मराठी ।

महाराष्ट्रा तुला वंदितो ।

भवानीला आम्ही मानितो ।

दऱ्याखोऱ्यांचा तू ,

उंचसखल तू ।

कीर्ति  तुझी आम्ही गातो ।


       महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेच राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनता जनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावार प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधीजी पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्चनेचे महत्त्व  महात्मा गांधींच्या पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषातून महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले.


नकाशा पुढे पाहता भारताचा।

महाराष्ट्र आधी भरे लोचनी ।

अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतानी लिहिली आहे.


महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ।

मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।

अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापट यांनी दिली आहे.


       या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य टिळक या भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले, आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतु हिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरूपाची ठरली, ते पलूसकर, भातखंडे इथलेच. बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके, मराठी चित्रपटातील पहिले राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे हे मराठी मातीत जन्मलेले मराठी मातीचेच सुपुत्र.


       महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले. महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. रयत त्रासलेली होती. अंधाधुंदी माजली होती. शिवरायांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज देऊन जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजही शिवरायांचे नाव घेतले की सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते.


       महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्या सारखे अनेक थोर संतमहात्मे या भूमीत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभावाची शिकवण दिली. या शिकवणीने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे.


       महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे, समाजपरिवर्तनाचे व समाजजागृतीचे कार्य अनेक समाजसुधारकांनी केले आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, आचार्य विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आण्णा भाऊ साठे, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, बाबा आमटे, हमीद दलवाई इत्यादि महान विभूतींची नावे घेता येतील. या सर्वांनी महाराष्ट्राचे  नांव उज्ज्वल केले आहे.


       क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर महाराष्ट्रात जन्मला व जगात चमकला. गानकोकिळा लता  मंगेशकर यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि जगाचे कान तृप्त केले.


       देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधूसारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नांवे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्य हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठी तच नव्हे तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.


     अशा या थोर परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना या काव्य पंक्ती म्हणाव्याशा वाटतात....

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।


आदरणीय शाहिर कुंतीनाथ कर्के महाराष्ट्राची थोरवी गाताना म्हणतात...

या भारतात भाग्यवंत देश कोणता ।

देश महाराष्ट्र पुण्यशील भारता ।


या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा