गुरुवार, १३ मे, २०२१

त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान' - मराठी लेख


त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान'

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       'इस्लाम' या शब्दाचा अर्थ अल्लाहवर (परमेश्वरावर) नितांत श्रद्धा. अल्लाहप्रती संपूर्ण शरणागती म्हणजेच इस्लाम आणि तोच अल्लाहचा खरा धर्म (कुराण ३ - १७) असे मानले जाते. 'रमजान' महिन्याला इस्लाममध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यामध्ये अल्लाहने 'पवित्र कुराण' या धर्म ग्रंथाचे पृथ्वीवर अवतरण केले. इस्लाम धर्माच्या आध्यात्मिक स्त्रोताची माहिती इबादत (भक्ती) व जकात या माध्यमातून आपल्या संपत्तीचे रक्षण व शुद्धिकरण एवढेच नव्हे तर पवित्र रोजाच्या माध्यमातून अल्लाहवरील अगाढ श्रद्धा व प्रेम तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कोणताही त्याग करण्याची शिकवण 'रमजान' आपल्याला देत असतो.


       हजरत ईस्माइल यांच्या वंशात इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म पवित्र मक्का भूमीत झाला. त्यांनी पाच आचारनियमांचे पालन करण्याची आज्ञा इस्लाममध्ये केली आहे. या पाच नियमांना 'अरकाने दीन' म्हणतात. १) इमान २) नमाज ३) रोजा ४) जकात ५) हज. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर (रोजे) उपवास केले जातात. या महिन्यात पवित्र वातावरणाने संपूर्ण मोहल्ला सुगंधित, उल्हसित व्हावा अशी इस्लाम धर्माची अपेक्षा आहे.


       रोजा करणे म्हणजे पहाटे सहेरी (नाष्टा) करून दिवसभर अन्न-पाण्यावाचून अल्लाहच्या नावावर उपाशी राहणे नव्हे. अशी मर्यादित अपेक्षा रोजाकडून नाही तर संपूर्ण शरीर व मन रोजामय व्हावे अशी आहे. शरीराच्या एकेका अवयवाचा रोजा असण्याची व्यापक अपेक्षा आहे. रमजानमध्ये हाताने कोणतेही दुष्कृत्य होऊ नये, डोळ्यांनी कोणत्याही अमंगल गोष्टी पाहू नये, कानांनी वाईट ऐकू नये, तोंडाने वाईट बोलू नये, हातांनी आपल्या घासातील घास गरजूंना द्यावा, अशी संपूर्ण इबादत (उपासना) म्हणजे 'रोजा' होय. भक्तीने भारलेल्या व भरलेल्या या रमजानमध्ये जे या आचारांचे पालन करतील त्यांना अल्लाह खुशी प्राप्त करून देतो. त्यांना इच्छिलेले फळ देतो, अशी दृढ श्रद्धा मनामनांत दिसून येते.


       रमजानमध्ये अगदी लहान लहान बालकेसुद्धा रोजा करतात. रोजामुळे अगदी लहान वयातच बालकांना संयमाचा आदर्श पाठ गिरविण्याची संधी मिळते. आपल्या अपत्याने प्रथमच रोजा केल्यावर आई-वडिलांना व सर्वच कुटुंबीयांना अतिशय आनंद होतो. त्या बालकाला  रोजाच्या दिवशी नवा ड्रेस आणतात, हार-तुरे घालून, छानशी भेटवस्तू देऊन त्याचे मनापासून कौतुक करतात. आपल्या मुलाबाळांसाठी, वृद्ध कुटुंबीयांसाठी भल्या पहाटे स्त्रिया उठून ताजा स्वयंपाक करून सेहरीसाठी वाढण्यात त्याचप्रमाणे रोजा सोडण्यासाठी लगबगीने स्वयंपाक करण्यात महिलावर्ग धन्यता मानतो. हीच त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम उपासना असते.  


       रमजान महिन्यातील रोजे सर्व धर्मातील लोक भक्ती भावाने करतात. आमच्या परिचयाचे कुलकर्णीकाका, शेजारचा सुरेश पाटील, गल्लीतील पवार दाम्पत्य, ओळखीच्या सुशीलाकाकूं हे सर्वजण रोजे करतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रमजानमध्ये सर्वत्र दिसते. रोजा इफ्तारसाठी (रोजा सोडण्यासाठी) सर्व लहान थोर मंडळी मशिदीमध्ये जमा होतात. रोजा सोडण्यासाठी आपापल्या घरात तयार केलेला पदार्थ डब्यात घेऊन येतात. कोणी खजूर आणतो, केळी, सफरचंद, डाळिंब आदी फळे आणतो, तर कोणी शिरा, पुलाव, गुलगुले आणतो. सर्वांचे डबे एकत्र करून हा 'मिक्स मेवा' मोठ्या आवडीने खाऊन रोजा सोडतात व मगरीबची (सायंकाळची) नमाज पठण करतात. रात्री साडेआठनंतर पुन्हा ईशाच्या (रात्रीच्या) नमाजसाठी सर्वजण एकत्र येतात. या महिन्यात 'तरावीह' म्हणजेच (२० रकाअत) खास नमाज पठण केले जाते. रमजानमध्ये कुवतीनुसार गोरगरीब, अनाथ व विधवा स्त्रियांना दान दिले जाते. यामध्ये विशेषकरून रोख रक्कम, कपडे, गहू, आदींचा समावेश असतो. बंधुभाव, संयम, त्याग शिकविणारा रमजान संपूर्ण मानव जातीला मुबारक व्हावा हीच अल्लाहचरणी प्रार्थना !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा