बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

टीचर - मराठी कविता

एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच चित्रण करणारी कविता


टीचर

कवयित्री: डॉ. ज्युबेदा  तांबोळी

फोटो साभार: lifestyletodaynews.com


मी लहान होतो तेव्हां

आईचा हात घट्ट धरून,

डोळ्यात दाटलेले अश्रू,

पुसत-पुसत, रडत-रडत,

मी शाळेत पाऊल टाकलं

टीचर, तुम्ही माझा हात 

आईच्या हातातून मायेने

अलगद सोडवून घेतलात

आणि आईच्या मायेने

आम्हाला शिकवलत

दुःख अनावर झालं

तेव्हां वटवृक्षाची छाया

तुम्हीच दिली टीचर!

कसं वागावं, कसं जगावं

तुम्हीच शिकवलत आम्हां

याच शिदोरीवर,

जग जिंकण्याची हिंमत

तुम्हीच दिली टीचर

तुम्ही दिलेला वारसा संस्काराचा

आयुष्यभर जपत राहू

तुमचे व शाळेचे नांव

उज्ज्वल करण्यासाठी

सदैव झटत राहू

कृतज्ञतेची सुगंधी फुले

तुमच्या पायी,

सदैव वहात राहू

..*..*..*..  


1 टिप्पणी: