रविवार, २ मे, २०२१

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा - विशेष मराठी लेख

 

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       माळवाडी ता. मिरज जि. सांगली माझं माहेर. या छोट्याशा गावात रमजान महिन्यात रोजा इफ्तारच्या सामुदायिक भोजनाचा एक वेगळा आनंददायी सोहळा अनुभवायला मिळतो.


       या गावामध्ये मुस्लिम समाजाची २० कुटूंबे राहतात. रमजान सुरु झाला की प्रत्येक दिवशी यापैकी एका कुटूंबाच्या घरी रोजा इफ्तारसाठी सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम असतो. साधारणपणे १०० लोकांचा स्वयंपाक करायचा असतो पण हा स्वयंपाक करण्यासाठी कुणी आचारी वगैरे नसतो. मोहल्ल्यातील सर्व महिला दुपारपासून एकत्र येऊन स्वयंपाकाची तयारी करतात. बोलत-बोलत, हसत-खेळत स्वयंपाक करतात. कोण भाजी निवडते, कोण कांदा-टोमॅटो चिरते तर कोण मसाला बारीक करते. इकडे एक ग्रुप धान्य निवडत असतो, तर कोण चूल पेटवून फोडणी देण्याचे काम करत असतात. सर्वजणी सहभागी झाल्यामुळे कुणालाच जादा कामाचा ताण नसतो.


       मगरीबची नमाज झाल्यानंतर पहिल्यांदा बच्चे कंपनीची पंगत बसते, त्यानंतर रोजा असलेल्या सर्व महिला व पुरुषांची पंगत बसते. शेवटी उर्वरित सर्वांची पंगत बसते. मोहल्ल्यातील वृद्ध मंडळीना त्यांच्या जागेवर ताट पोहोचविले जाते. स्वयंपाक सुरु असतानाच महिला पुढच्या भोजनाचा बेत कुणाच्या घरी करायचा, मेनू कोणता ठेवायचा याविषयी चर्चा करून ठरवतात. भोजन करताना कुणी बनवलेला पदार्थ आज छान झालाय याची चर्चा होते, सुगरणींचे कौतुक होते. सध्याच्या धावपळीच्या, धक्काधक्कीच्या जमान्यात लोप पावत चाललेला बंधुभाव जतन करण्याचे कार्य करणारा हा सोहळा निश्चितच अनुकरणीय आहे.

 

असे सोहळे गावागावात, मोहल्ल्यात सुरु असतात. प्रातिनिधिक स्वरुपात माझ्या माहेरच्या सोहळ्याबद्दल लिहिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा