भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी फाशी दिली. आज त्यांचा शहीद दिन त्यानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.....
महान क्रांतिकारक भगतसिंग - विशेष लेख
शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी प. पंजाबमधील म्हणजेच विद्यमान पाकिस्तान मधील बंग जिल्हा ल्यालपूर या गांवी एका शेतकरी देशभक्त शीख कुटूंबात झाला. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतिकारी वाग्मयाचा प्रसार केल्याबद्दल दहा महिन्याची शिक्षा झाली होती. १९०९ साली प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी. ए. झाले. विद्यार्थीदशेत जयचंद्र विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरबा यांना दिलेली फाशी (१९१५), रौलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यासारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगांनी आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित करून १९२३ मध्ये हिंदूस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढाईत त्यावेळी दोन मार्ग होते. एक होता जहाल गट व दुसरा होता मवाळ गट. त्यापैकी भगतसिंग हे जहाल गटातील होते. वास्तविक प्रथमतः भगतसिंग हे महात्मा गांधीजींच्या विचाराने भारावून शिक्षण सोडून महात्मा गांधींच्या असहकार अंदोलनात सामील झाले होते, परंतु १९२२ मध्ये चौरीचौरा या ठिकाणी पोलिसांवर जनतेकडून झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. भगतसिंग नॅशनल कॉलेजमध्ये असताना भगतसिंग, सुखदेव, भगवतीचरण, यशपाल, रामचंद्र कपूर यांनी 'नौजवान भारत सभेची' स्थापना केली. या सभेचे भगतसिंग जनरल सेक्रेटरी व भगवती चरण प्रचार सेक्रेटरी होते. नौजवान भारत सभेचे उद्दिष्ट तडजोडवादी दृष्टीकोनाशी वैचारिक संघर्ष करून जनतेला क्रांतिकारक अंदोलनात सहभागी करणे हे होते. त्याचबरोबर जातिधर्माचे भेद नष्ट करून जनतेची एकजूट उभी करणे हासुद्धा उद्देश होता त्यासाठी नौजवान भारत सभेतर्फे लाहोर कोर्टात फाशी गेलेल्या कर्तारसिंगांचा गौरव करणारी जाहीर सभा लाहोरच्या बरसीबाँडला हॉलमध्ये घेऊन क्रांतीचा पुरस्कार करण्यात आला. नौजवान भारत सभेचे आणखी एक उद्दिष्ट होते ते म्हणजे कामगार शेतकऱ्यांचे गणराज्य स्थापन करून माणसाने माणसाची चालविलेली पिळवणूक नष्ट करणे. इन्कलाब झिंदाबाद व हिंदूस्थान झिंदाबाद या त्यांच्या प्रमुख घोषणा होत्या.
मध्यंतरी भगतसिंग यांनी लाहोर व्यतिरिक्त दिल्ली, कानपूर, बंगाल आदी ठिकाणी असलेल्या क्रांतिकारकांशी संपर्क साधण्यासाठी लाहोर सोडले होते. त्यांचे वडील त्यांना लग्नासाठी सतत विचारत होते. हेसुध्दा लाहोर सोडण्याचे दुसरे कारण होते. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असा त्यांनी निश्चयच केला होता.
भगतसिंग आणि त्याचा मित्र बाबूसिंग यांना लाहोरमध्ये घडलेल्या एका बाँबस्फोटामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली, परंतु भगतसिंग यांच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. भगतसिंगांना लालूच दाखवून खोटी साक्ष देण्यासाठी फोडण्याचे प्रयत्न देखील सरकारने केले पण भगतसिंगांनी त्यांना साथ दिली नाही. त्यांना चाळीस हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. पण ते पैसे भरु शकत नसल्यामुळे अखेर पंजाब असेंब्लीमध्ये याबाबत चा प्रश्न एका सदस्याने उपस्थित केल्यानंतर भगतसिंग यांच्यावरील जामिनीची अट रद्द करून त्यांची सुटका झाली.
भगतसिंग यांनी भूमिगत राहून कार्य करण्यास सुरूवात केली. भारताला कोणत्या राजकीय सुधारणा द्याव्यात याच्या शिफारशी करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या सायमन कमिशनवर एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे त्याविरोधात भारतात प्रचंड जनक्षोभ उसळला. या कमिशन विरोधात नौजवान भारत सभेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. त्यावर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केला. त्यात लाला लजपतराय यांचे निधन झाले. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी लालाजींच्या हत्येबद्दल ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सोंडर्स याचा वध केला व वधाच्या समर्थनार्थ तशी पत्रके वाटली.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. शिवा वर्मा, किशोरीलाल, गयाप्रसाद, जयदेव कपूर, विजयकुमार सिन्हा, महावीरसिंह आणि कमलापती तिवारी यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. इतरांना ही दीर्घ मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. या खटल्याचा निकाल ऐकताच देशभर त्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उसळल्या. ठिकठिकाणी निदर्शने झाली. कामगारांनी संप केले. शहरात हरताळ झाले. त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी मुंबईतील 'प्रगती' च्या १६ ऑक्टोबर १९३० च्या अंकात म्हटले आहे, "महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा प्रसार सर्वात जास्त ज्या ठिकाणी झाला आहे, त्या मुंबईतील लोकांनी शिक्षेची वार्ता ऐकून अगदी कडकडीत हरताळ पाळला. आजपर्यंत गेल्या सहा महिन्यांच्या चळवळीत सुद्धा जेवढी गर्दी जमली नव्हती तेवढी सुमारे एक लाख लोकांची गर्दी येथील मैदानातील सभेस जमली होती. यावरून अखिल जनतेस या फाशीबद्दल काय वाटत आहे, याची कल्पना सरकारला येण्यासारखी आहे."
त्यामुळेच भगतसिंग नावाच्या वादळासमोर ब्रिटीशांचा जुलमाचा वटवृक्ष उन्मळून पडला व लोकक्षोभ व भगतसिंगांच्या करारीपणाला घाबरून सर्व नियम व कायदे डावलून ब्रिटिशांनी भगतसिंगाना २४ मार्च ऐवजी २३ मार्च रोजीच फाशी दिली.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळवला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यावेळी भगतसिंगांच्या वृद्धमाता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
धन्य ती वीरमाता ! आणि धन्य तो तिचा क्रांतिकारी पुत्र !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा