सोमवार, ८ मार्च, २०२१

लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

 

८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या, चिंतनपर, हृदयस्पर्शी, उद्बोधनात्मक, वैचारिक लेखमालिका खास रसिक वाचक बंधूभगिनींसाठी........


लेखपुष्प तिसरे


लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल

८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साऱ्या जगभर साजरा केला जातो. हा दिवस कुणी सुरू केला व कशा प्रकारे सुरू झाला ते पाहू...


इतिहास:

       सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी इंग्लंड व अमेरिकेत कापडांचे व तयार कपड्यांचे कारखाने व गिरण्या निघाल्या. या गिरण्यांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात काम करू लागल्या पण त्यांना मजुरी मात्र अगदी थोडी मिळत असे. त्यामुळे त्या स्त्रियानी न्यूयॉर्क शहरातील कापड कारखान्यात ८ मार्च १९०८ साली संघर्ष उभारला. कामाचे तास सोळाऐवजी कमी व्हावेत आणि मजुरी वाढवावी यासाठी लढा दिला. अमेरिकन सरकारने त्यांच्यावर लाठीमार केला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्यांसाठी केलेला हा पहिला संघर्ष होता.


       १९९० साली विविध देशातील महिला प्रतिनिधींची परिषद कोपनहेगन येथे झाली. त्या परिषदेत जर्मनीतील कार्य कर्ती क्लारा झेटकी हिने ८ मार्च हा दिवस महिलांनी जगभर साजरा करावा, असे सुचविले व सर्वांनी या सूचनेस मान्यता दिली. अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी संघटित होऊन उठविलेल्या संघर्षाची ही खूण होती.


       ८ मार्च १९१७ ला जर्मनीतील महिलांनी घुसखोरी विरूद्ध आवाज उठविला. शांततेची मागणी केली. मार्च १९१७ ला रशियातील कापड कामगार महिलांनी निदर्शने केली होती.


आजची परिस्थिती:

       स्त्रियामधील शक्तीची जाणीव या महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना करून दिली जाते. हा दिवस स्त्री आंदोलनाच्या प्रेरणेचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आपल्या देशातही गेल्या वीस वर्षांत हा दिवस गावागावापर्यंत पोहचला आहे. स्त्रियांनी लढा देऊन मिळविलेल्या हक्कांची या दिवशी आठवण केली जाते. अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.


       स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत उज्ज्वल यश मिळविले आहे. त्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सुजाण व सबल झाल्या आहेत. महिलांनी आपल्या प्रतिभेच्या अविष्कारातून आम्हीही कांही कमी नाही, हे सिध्द करून पुरुषप्रधान समाजाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. रूढी परंपरेच्या जोखडाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रीने प्राप्त परिस्थिती, नैसर्गिक मर्यादा आणि उपजत कौशल्य व मेहनतीने आज चारी मुलखी आपला लौकिक वाढविला आहे. कोणतेही क्षेत्र स्त्रीने आपल्या प्रतिभेपासून वंचित ठेवलेले नाही.


       एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समानतेच्या कितीही घोषणा ऐकू येत असल्या तरी स्त्रियांची स्थिती शंभर टक्के सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती उभी असली तरी ती अनेक बंधनातून आजही मुक्त झाली नाही. समाजात यशस्वीपणे वावरणाऱ्या महिलांची संख्या वीस टक्के असावी असा अंदाज आहे. बाकीच्या ऐंशी टक्के महिलांची काय अवस्था आहे? या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? याविषयी विचार करताना महिलाच जबाबदार आहेत, हे आपणास नाईलाजाने मान्य करावेच लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. गर्भजल चाचणी करून मुलीचा गर्भ काढून टाकण्याची प्रवृत्ती हे कशाचे निदर्शक आहे? २०११ च्या जनगणनेत स्त्रियांचे दर हजारी प्रमाण घटत चालल्याचे दिसून आले आहे, दिसत आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. शासनाला अशा प्रकारचा गर्भपातविरोधी कायदा करावा लागला, गर्भजल तपासणीवर बंदी  करावी लागली. पण आजही कमी अधिक प्रमाणात असे प्रकार घडतच आहेत, याला कारणीभूत स्त्रीच असते कारण आईला, आजीला, मावशीला, बहिणीला, वहिनीलाच मुलगी नको असते, त्यांना वंशाचा दिवा हवा असतो. या वंशाच्या दिव्याचा प्रकाश कसा पडतो हे माहिती असूनही स्त्री गर्भजल चाचणी करून गर्भपात करण्यास तयार होते. तिने या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला पाहिजे ना? समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या स्त्री डॉक्टरकडून असा गर्भपात होतो ही गोष्ट दुर्दैवीच म्हणावी लागेल.


       हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यायला हवा. मुलगा मुलगी समानता दाखविणारे एक पारंपारिक लोकगीत मला आठवले ते असे.....


ल्येकापरीस लेक कशानं झाली उणी?

एका कशीची रतंनं ही दोनी।

लेकीच्या आईला, कुणी म्हणू नका हलकी।

लेकाच्या आईला, कुणी दिलीया पालकी।


       अशिक्षित, अडाणी समजल्या जाणाऱ्या पारंपरिक स्त्रियांची ही समज आजच्या सुशिक्षित स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल. या लोकगीताचा मतितार्थ जाणून घेऊन आपण सर्व स्त्रियांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की, मी मुलीचा गर्भपात करून घेणार नाही, असा प्रकार लक्षात आला तर त्या स्त्रीला त्यापासून दूर करण्यासाठी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करीन.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा