होळी पौर्णिमा - विशेष लेख
वसंत ऋतूच्या च्या आगमनाची सूचना देणारा होळी हा सण फाल्गुन शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या सणास होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, किंवा वसंतोत्सव असे म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जातो, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. यावेळी जत्रा-यात्रा उत्साहात सुरू असतात. कुस्त्यांचे फड, बैलांच्या शर्यती गाजत असतात. धरणीमाता हिरव्या पानाफुलांनी बहरलेली असते. शेतकऱ्यांची घरे धान्यांनी भरलेली असतात. त्यामुळे सर्वांची मनेही नवतेजाने बहरलेली असतात. हिवाळ्याची बोचरी थंडी दूर पळालेली असते. हा सर्व आनंद द्विगुणीत करण्यासाठी होळीचा सण येतो. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते.
होळी हा सण का साजरा करतात याविषयीच्या पौराणिक कथा....
हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. या भक्तीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला. त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही प्रल्हादावर त्याचा कांहीही परिणाम झाला नाही. तो जसाच्या तसा राहिला. शेवटी दैत्यराज हिरण्यकश्यपूची बहीण होलिका उर्फ ढुंढा म्हणाली, "मला वर लाभल्यामुळे आगीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन आगीत बसते. प्रल्हाद जळून जाईल, मला कांहीच होणार नाही." ठरल्याप्रमाणे भक्त प्रल्हादास जिवंत जाळण्याच्या उद्देशाने होलिका प्रल्हाद यास मांडीवर घेऊन धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. सभोवताली गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य वर मिळविलेली होलिका आगीत जळून भस्म झाली. प्रल्हाद मात्र आगीतून नारायण नारायण म्हणत सुखरूप बाहेर पडला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तावून सुलाखून शुद्ध बनले. भक्त प्रल्हादाने जणू अग्नी परीक्षाच दिली. या आनंदाप्रीत्यर्थ होळी हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.
श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी कंसमामाने पुतना या राक्षसीला गोकुळात पाठविले. तिने एका तरुण सुंदर स्त्रीचे रुप घेतले होते. तिने श्रीकृष्णाला जवळ बोलविले. श्रीकृष्णाने तिचा कावा ओळखला व तिला ठार केले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा. नंतर गोकुळातील गवळ्यांनी मयत झालेल्या पुतनाच्या देहाला गोवऱ्या रचून, होळी करून अग्नी दिला. अमंगलाचा नाश झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद पसरला. तो दिवस गोकुळवासियांनी आनंदाने साजरा केला, त्या दिवसाची आठवण म्हणून होळी साजरी करतात.
होळी संदर्भात आणखी एक कथा पुराणात प्रसिद्ध आहे. ती क्रुतयुगातील रघु नावाच्या राजाची. रघु राजाच्या राज्यात 'ढौढा' नावाच्या राक्षसीने हैदोस माजविला होता. सर्व प्रजाजन राजाकडे संरक्षण मागण्यास आले. चिंताग्रस्त रघुराजाने वशिष्ठ मुनींना तिच्या नाशासंबधी उपाय शोधण्याची विनंती केली. ढौढा राक्षसीने कठोर तपश्चर्या करून शंकरास प्रसन्न करून घेतले होते, व त्यांच्याकडून देव, दानव व मानव यापासून तिन्ही ऋतूत कोणत्याही शस्त्रापासून मला मरण येणार नाही असा वर मागितला होता. वर देतांना शंकरानेही एक अट घातली होती, की हिवाळ्याच्या अखेरीस व उन्हाळ्याच्या सुरवातीस अग्नी पेटवून तिला शिव्या देऊन हुसकावून लावले तर ती पळून जाईल. हीच ती आपली होळी दुष्टांना पळवून लावणारी.
या सर्व कथामधून एक गोष्ट आपणास दिसून येते की या कथात राक्षसी इतरांना त्रास देत होत्या, त्यावर उपाय म्हणून त्यांना ठार करून दहन केले गेले. पुराणकाळात ते ठीक होते. पण आजच्या काळात होळी अशी साजरी करावी...
आधुनिक होळी:
सद्या दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीचे दहन करून होळी साजरी करावी. हवेतील प्रदूषण वाढवून, लाकूडतोड करून सण साजरा करणे योग्य नव्हे. गांवातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकाच पटांगणात गावातील कचरा जाळून होळी करावी. वेगवेगळ्या रसायनांनी युक्त रंग एकमेकांच्या शरीरावर फासून रंगपंचमी साजरी न करता अतिशय सौम्य रंग वापरून आनंदाने हा सण साजरा करावा. होळीसाठी झाडे न तोडता टाकाऊ पालापाचोळा, कचरा जाळावा. दुसऱ्याला हानी किंवा इजा होणार नाही याची खबरदारी घेऊनच होळी व रंगपंचमी साजरी करावी. झाडे तोडण्यापेक्षा प्रत्येकाने एक झाड लावून नवा उपक्रम सुरु करावा. संस्कृती व प्रगती यांना हाताशी धरुनच सण साजरे करावेत.
होळी भोवती पाणी शिंपडून रांगोळी घालून मंगल वाद्यांच्या गजरात होळीची पूजा केली जाते. पेटलेल्या होळीत अनेकजण पोळी, नारळ, पैसे, सुपाऱ्या टाकतात. हे सर्व न करता या वस्तू गरजूना दान कराव्यात. होळी लहान करा व पोळी दान करा हा मंत्र सर्वांनी आचरणात आणावा त्यामुळे गरीबांना दोन घास गोडधोड मिळतील. देणाऱ्याला समाधान मिळेल.
होळीभोवती फिरताना बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीभोवती पुराणकथा सांगतात, पोवाडे, कीर्तने यातून पूर्वजांचा पराक्रम सांगितला जातो. खेडेगावात लोकगीतांना ऊत येतो. ही गीते स्वयंस्फूर्त व स्वरचित असतात. त्यात निर्मळ विनोद व खट्याळ टीकाही असते. आज या गोष्टीतून लोकांचे प्रबोधन व्हावे.
गावाच्या मध्यभागी किंवा चव्हाट्यावर एरंड, आंबा, माड, पोकळ इत्यादी झाडांची फांदी जमिनीत खोल खड्डा करून त्यात उभारली जाते. म्हणून या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असेही म्हणतात. होळी पूर्ण झाल्यानंतर ती दूध, तूप घालून शांत केली जाते. जमलेल्या लोकांना खोबरं गूळ, पपनस, केळी ही फळे वाटली जातात. दुसऱ्या दिवशी होळीची रक्षा विसर्जित करतात. कांही ठिकाणी ही रक्षा चिखल शेण दुसऱ्याच्या अंगावर मारतात वाट अडवून पैसे मागतात ही प्रथा बंद व्हावी. कांही ठिकाणी ही रक्षा अंगाला लावून डान्स करण्याची पद्धत आहे. म्हणून म्हटले आहे...।
होळी रे होळी, पुरणाची पोळी।
धुलवडीचा रंग खेळी, सोंगट्यांची टोळी।
होळीचा संदेश:
पूर्ण चंद्राच्या साक्षीने साजरा होणारा हा सण आकाशातील चंद्र आणि चांदण्याचे सौंदर्य टिपून, मन प्रसन्न करणारा सण आहे. गोडधोड करून खाण्याचा, नृत्य गायनाचा, मनसोक्त रंग उधळण करण्याचा आणि नववर्षाच्या आगमनाचे स्वागत करणारा हा सण होय. मनातील दुष्ट भावना, क्लेश, वाईट वृत्तींचे दहन होळीत करून वसंत ऋतूच्या आगमनाने जशी सृष्टी हिरवीगार शाल पांघरून जीवनसृष्टीला आनंदित करते त्याप्रमाणे आपणही तन, मन आनंदित, प्रसन्न ठेवून जीवनात आनंदी वृत्ती जोपासावी हा संदेश देणारा हा सण पर्यावरणाचे रक्षण करत नवविचारांनी प्रेरित होवून साजरा करू या।म्हणू या....
आला आला होळीचा सण।
आनंदून गेले तन आणि मन।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा