मी बालिका बोलतेय......
खरं सांगू, माझ्या जन्मापासूनच नकारघंटा वाजायला सुरूवात झाली कारण, माझ्या आई-वडिलांना माझा जन्म होण्यापूर्वी एक धनाची पेटी व एक वंशाचा दिवा होता. 'पहिली बेटी धनाची पेटी' हे वाक्य ज्यानं कोणी पहिल्यांदा उच्चारलं त्या व्यक्तीला हार्दिक सलाम. कारण त्यामुळेच पहिल्याच मुलीचं स्वागत चांगलं होतं. तिच्या जन्माने धनाची पेटी घरात आली आहे, असे वाटते. त्याचवेळी कुणाला पहिला मुलगा झाला तर तोंड सुपाएवढं होतं. त्या मुलाच्या आईला सहजपणे म्हटलं जाते, 'नंबर मारलीस बाई, आता दुसऱ्यांदा काही का होईना'.
तर मी सांगत होते माझ्या बद्दल,
४० वर्षापूर्वी चा तो काळ,
मी आईच्या कुशीत असताना आमची आजी उठता बसता म्हणायची, 'एवढा मुलगा झाला की फार बरं होईल भावाला भाऊ असावा, पाठबळ होईल. मुलगी झाली तर दोघींच्या लग्नाचा भार माझ्या लेकावर पडेल.' आई-वडीलानाही आजीच म्हणणं पटायच, आई मनातल्या मनात देवाला नवस बोलायची की, 'एवढा मुलगा होवू दे म्हणून'. या पार्श्वभूमीवर माझा जन्म झाला. माझ्या जन्माने कुणालाच आनंद झाला नाही. अनिच्छेनेच माझा स्विकार झाला. केवळ नाईलाज म्हणून, टाकता येत नाही म्हणून त्या दोन भावंडाबरोबर माझे संगोपन सुरू झाले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात ना तसं! माझी दीदी धनाची पेटी असल्याने सर्वांची लाडकी होती. शिवाय ती दिसायला चांगली, गुटगुटीत व वृत्तीने शांत होती. त्यामुळे तिने सर्वांच्या हृदयात अढळपद प्राप्त केलेले होते. माझ्या दादाचे लाड इतके व्हायचे की, विचारूच नका. त्याला जबरदस्तीने दुधाचा ग्लास दिला जायचा. मला मात्र, मागून घ्यावा लागायचा. नशीब माझं मागितल्यावर तरी मिळत होतं. माझ्या काही मैत्रिणींना मागूनही दूध मिळायचं नाही. तिला मिळायच्या ताक कण्या. वर ऐकावं लागायचं की, 'हिला दुध देवून काय पैलवान करायच आहे काय?' उलट तब्बेत जाम झाली तर कोण पसंत करणार नाही, लग्न लवकर करावे लागेल, खपली नाही लवकर तर हुंडा जास्त द्यावा लागेल. खर्च जास्त करावा लागेल. माझा दादा अती लाडामुळे हट्टी बनला होता. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला जायचा न रागावता. मी एखादा हट्ट केला, की मला कळायला लागल्यापासून ऐकत होते, की मुलीच्या जातीनं असले हट्ट-बीट्ट काही करू नयेत. मुलीला परक्या घरी नांदायला जायचं आहे. तिथं असा हट्ट अजिबात चालायचा नाही. नांदण्याचं चांदण होईल. मुलीनं देईल ते घ्यावं आणि मिळेल ते खावं. मी रडायला सुरूवात केली तरी कुणी फारसं लक्ष द्यायचं नाही. पण, दादा रडायला लागला, की म्हटलं जायचं, 'बायकासारखा मुळमुळू रडतोस कशाला?' ते ऐकून दादाला वाटायचं मी कुणीतरी स्पेशल आहे. मी रडायच नसतं. जमलं तर दुसऱ्याला रडवायचं असतं. मला आठवतंय, की अगदी लहान असताना दादानं दीदीची एक बांगडी घेवून हातात घातली तर लगेच आजोबा त्याला म्हणाले, 'अरे मर्दा बांगड्या घालायला काय मुलगी आहेस काय?' त्या वेळीच दादाच्या मनात पक्क रूजलं, की मी मर्द आहे आणि बांगड्या घालणं हे बायकांचे काम आहे.
दादा सुट्टीच्या दिवशी दिवसभर मित्राबरोबर खेळायला जायचा. रात्री उशिरा आला तरी घरातले लोक त्याला काही म्हणायचे नाहीत. मला व दीदीला मात्र सक्त ताकीद दिली जायची, की पाचच्या आत घरात यायला पाहिजे. एवढ्या लहान वयातही आम्हाला वाटायचं, की दादाचं आपलं बरं आहे. आपणही मुलगा असतो तर बरं झालं असतं! घरात दररोज दादाच्या आवडीचेच पदार्थ असायचे. भाज्या त्याच्या आवडीच्याच केल्या जायच्या. दादाची आवड आमची आवड सक्तीने बनली होती. नशीब त्याच्या आवडीची का असेना भाजी आम्हा दोघींना पोटभर अन्न मिळायचे. माझ्या काही मैत्रीणींना ही भाजीही मिळत नव्हती. ताक-कण्या, आमटी-भाकरीवरच भागवावे लागायचे. धुणं, भांडी, स्वयंपाक इतरांप्रमाणे माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. त्या कामात सफाईदारपणा, निटनेटकेपणा येण्यासाठी आजी, आई, काकी म्हणायच्या की, "मुलीच्या जातीला हे काम सुटलेलं नाही. कितीही शाळा शिकलीस ना तरी तुला भांडी घासावीच लागतील, धुणं धुवावचं लागेल, स्वयंपाक करून वाढणं तरी तुझं आद्य कर्तव्य आहे. स्वयंपाक करणं हा तुझा जन्मसिध्द हक्क आहे. तो हक्क हक्काने स्विकारण्यातच तुझं भलं आहे." आई वारंवार आठवण करून द्यायची, की स्वयंपाक नीट कर, भाकरी नीट भाज. उद्या तुझ्या सासरी माझे नाव निघेल, तुझी सासू म्हणेल, की हेच शिकवलयं का तुझ्या आईन?
दादा मस्तपैकी खेळून यायचा. आवडीच्या पदार्थांनी भरलेले ताट त्याच्या समोर ठेवलं जायचं. त्याचवेळी मला ऐकाव लागायचं, की हे पातेलं नीट घासलं नाहीस, दादाचा शर्ट नीट धुतला नाहीस, कॉलरला साबण लावला नाहीस, आज भाकऱ्या फुगल्याच नाहीत, काठ जाड झालेत इ. सूचनांचे डोस मिळायचे. कपडे खरेदी करतानाही माझ्या वाट्याला नवे कपडे कमीच मिळायचे कारण दीदी-दादांचे न बसणारे कपडे मला मिळायचे. घरकाम करत मी शिकत होते. दादा मॅट्रीकला गेल्यावर त्याला नवी सायकल मिळाली. त्याला ज्यादा तासाला जाता यावे म्हणून, पण मी जेंव्हा मॅट्रीकला गेले तेव्हा ज्यादा तासाला पायी जाणेही अशक्य होते कारण एवढ्या लवकर ज्यादा तासाला गेले तर धुण-भांडी, पाणी कोण भरणार?, आईला स्वयंपाकात मदत कोण करणार? तिला बिचारीला घरातील कामे आवरून शेतात जावे लागायचे. तरीही मी शिकत होते. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात मन लावून अभ्यास करत होते. त्यावेळी वारंवार ऐकावं लागायचं, की हिला शिकवून काय उपयोग? हे तर परक्याचं धन. शिकून नोकरी लागली तरी पगार तिच्या नवऱ्यालाच मिळणार, दादाला पन्नास टक्के मार्क्स मिळाले तरी कौतुक व्हायचे. त्याला शिकवण्यासाठी, डॉक्टर इंजिनिअर बनवण्यासाठी कर्ज काढायचीही तयारी असायची आई-बाबांची. पण मला फर्स्ट क्लास मिळाला तरी विशेष कौतुक वाटायचं नाही कारण आई-वडीलापुढे प्रश्न होता, हिला जास्त शिकवलं तर जास्त शिकलेलं स्थळ शोधावं लागेल. जास्त खर्च करावा लागेल. बरोबरच होतं माझ्या आई-बाबांचे!
Nice thought
उत्तर द्याहटवा