शनिवार, १० जानेवारी, २०२६

लघकथा संग्रह क्र.१४ थीम - लग्न जमता जमेना मुलाचं

 लघकथा संग्रह क्र.१४
थीम - लग्न जमता जमेना मुलाचं




                         फोटो:साभार गूगल 


(१) हरीभाऊना दोन मुले. मोठा मुलगा ग्रज्युएट झाला. नोकरीवाल्या मुलाला मागणी जास्त आहे म्हणून घरच्या शेतीचं काम करायला लावायचं सोडून त्याला नोकरीला लावलं. पण नोकरी खाजगी आहे, कमी पगाराची आहे म्हणून नकार येऊ लागले. कुणाला शेत जास्त पाहिजे होते, कुणाला घर स्लपचं पाहिजे होतं. अशीच तीन वर्षे लोटली.  धाकट्या मुलाच लग्नाचं वय झालं. तो आईवडिलांना म्हणाला," दादानं ट्राफिक जाम करून टाकलय पण मी काही थांबणार नाही. माझ्या लग्नाचं बघा नाहीतर मला दुचाकी घेऊन मार्ग काढत पुढं जाव लागेल. "आता काय करावं हरीभाऊनी !

 शीर्षक- ट्राफिक जाम


(२) निदान पोहेतरी......

दोन मित्र वधूशोध मोहिमेत सहभागी होते. पहिला म्हणाला, "दोन वर्षे झाली मुली बघतोय. पंचवीस मुली बघून झाल्या अजून एकीन पण होकार दिला नाही. " यावर दुसरा म्हणाला," तुझं अजून बरं चाललय बाबा, बायोडाटा बघून मुलगी बघायला या म्हणतात. तू अजून मुलगी बघून, पोहे तरी खाऊन येतोस मर्दा ! माझं बघ मी मुली बघायला सुरुवात करून पाच वर्षे झाली. मुलगी बघायला या असा फोन येणं ही बंद झालय! काय करू सांग?



(3)मोठेपणा नडला

नारायणरावानी आपला रूबाब दाखविण्यासाठी आपल्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या मेहुण्याचा व पुतण्याचा बायोडाटा मध्ये उल्लेख केला होता. एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची मुलगी नारायणरावांच्या मुलाने पसंत केली. त्याना हुंडा, मानपान कांहीच नको होते. त्यांनी मुलीच्या वडिलांना मुलगी पसंत असल्याचे कळविले पण मुलीकडून स्पष्ट नकार आला का तर मुलगी म्हणाली, "आत्तापासूनच तुम्ही मेहुण्या पाहुण्यांचा उल्लेख करून रूबाब दाखवत आहात. आमच्या सारख्या गरीबांना हा रूबाब पेलणार नाही. " परोपरीने समजाऊन सांगितले तरी मुलगी लग्नास तयार झाली नाही.


(४)मुलाचं लग्न महत्त्वाचं की दौलत?

शामराव एक सामान्य शेतकरी होते. शेतीत कष्ट करून कुटूंबाचा उदर्निवाह चालवित होते. त्यांचा मुलगा खाजगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता. त्याला पगार कमी होता. पण या एकुलत्या एक असलेल्या सुनिलचं लग्न  कांही केल्या ठरेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या राज्यातील एक मुलगी एजंटमार्फत पसंत केली. त्या पाहुण्यांनी दोन लाखाची मागणी केली. ही रक्कम लग्नापूर्वीच द्यावी लागणार होती. शामरावांना ही रक्कम भरणे अवघड झाल्याने ते गप्पच बसले. सुनील ने एजंटला फोन केल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. सुनील वडिलांना म्हणाला, " तुम्हाला दोन लाख महत्त्वाचे की मुलाचे लग्न? शेत गहाण टाका आणि माझ्या लग्नाचं बघा" हे ऐकून शामरावांना चक्करच आली.


(५) लग्न झालं एकदाचं पण....

रामभाऊना मुलाच्या लग्नाची फार चिंता लागली होती. पाच सहा वर्षे अशीच टेंशनमध्ये निघून गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती म्हणून त्यांनी चार लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घालण्याची पाहुण्यांनी अट घातली. त्यांची अट मान्य केल्यानंतर विवाह सोहळा पार पडला. पूजाअर्चा झाली. त्या दोघांना त्यांनी  हनीमूनला पाठवले. आणि घडलं भलतंच! नवरदेवाला रेल्वे स्टेशनवर बसवून मी स्वच्छतागृहाला जावून येते असं सांगून नवरीबाई गेली पळून! नवरदेव एकटेच घरी परतले. सांगा काय करायचं?

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

मायेचा पाझर

                          मायेचा पाझर

                          छोटी यास्मिन मम्मीसह


        स्वतःचे घरदार, गांव सोडून जयसिंगपूरमध्ये नोकरीसाठी आलेले आम्ही सर्व शिक्षक एका आदर्श कुटूंबाप्रमाणे राहतो. यापुढेही राहू. आमच्यापैकी कुणाच्याही घरी आनंदाचा कार्यक्रम असला तर आम्ही सर्वजण आवर्जून हजर राहतोच पण दुःखाच्या प्रसंगीही हजर होतो. मग कुणाचे गांव कितीही लांब असो. आमचा हा गोतावळा भेटून गेली की दुःखाचा भार क्षणात हलका होऊन जातो. आनंदाच्या क्षणी ही सर्व मंडळी हजर झाली की आनंद द्विगुणित होतो.


         १९८८ साली आमच्या ग्रुपमधील बरेच जण स्थिरस्थावर झाले होते. थोडीशी आर्थिक सुबत्ता आली होती. शिक्षक बँकेचे गृहकर्ज मिळत होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी प्लॉट खरेदी करून घरे बांधण्याचा सपाटाच लावला होता. रिमझिम पावसाचा श्रावण महिना सुरू होता. आमच्या शाळेतील शिक्षक डिग्रजे सरांच्या घराची वास्तुःशांती होती आणि तो वर्किंग डे होता. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण होतं. शाळा नं. १ मध्ये आम्ही तेवीस शिक्षक कार्यरत होतो. त्यापैकी ९ शिक्षिका होत्या. सर्वानुमते ठरले की लेडिजनी मधल्या सुट्टीत भोजनासाठी जायचे व आम्ही परत आल्यावर सर्व जेन्ट्स नी जायचे. त्या मुदतीत आम्ही शाळा सांभाळायची. त्यावेळी माझी कन्या यास्मीन चार महिन्याची  होती. मधल्या सुट्टीत मी तिला दुग्धपान देण्यासाठी रामनगरमध्ये घरी जात होते. ४० मिनिटांची सुट्टी असायची. त्यातील २०-२५ मिनिटे येण्याजाण्यात खर्च व्हायची. १५ मिनिटातच तिचे पिणे व माझे खाणे आवरावे लागायचे. त्यादिवशी सगळ्याजणी वास्तु शांतीसाठी निघाल्यावर मी त्यांना म्हणाले, 'तुम्ही जावून या सगळ्या मी संध्याकाळी जाईन'. माझी मैत्रिण लता हंकारे म्हणाल्या, 'चला आमच्याबरोबर नंतर कुठं जाता एकट्या परत येताना तुम्ही १० मिनिटे थांबून या हवं तर आम्ही सर्वजण पुढे येतो'. मी त्यांच्याबरोबर भोजनासाठी गेले. आम्ही तिथे पोहचण्यापूर्वीच नुकतीच पंगत बसली होती. त्यामुळे आम्हाला पंगत उठेपर्यंत थांबावे लागले. आमचं भोजन सुरू असतानाच शाळेकडून निरोप आला की, शाळेत आकस्मित तपासणी पथकाचे प्रमुख अधिकारी पाटणकरसाहेब शाळेत आलेले आहेत तुम्ही ताबडतोब शाळेत या.


        त्यावेळी आकस्मित तपासणी पथकाला जागेवर सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले होते. नावाप्रमाणेच हे पथक आकस्मितपणे शाळेत यायचे. पाटणकर साहेब खूप कडक  असल्याचे ऐकिवात होते. या पथकाने शिक्षकांवर कारवाई केल्याचेही ऐकले होते. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी खूप घाबरलो. आमच्या लीडर मुरगुंडे मॅडम यांनी एक टेम्पो थांबवला व आम्ही ताबडतोब शाळेत गेलो. इकडे माझी छकुली माझी वाट पाहून थकली होती. तिने जोर जोरात रडायला सुरूवात केली होती. त्यावेळी फोनचीही सोय नव्हती. माझ्या सासूबाई तिला वरचे दूध पाजण्याचा प्रयत्न करत होत्या पण ती एक घोटही घ्यायला तयार नव्हती. आमच्या शेजारी रहाणाऱ्या काकू आज कामाला गेल्या नव्हत्या. बाळाचं रडणं ऐकून त्या बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, 'आजी का रडतय बाळ एवढं' सासूबाई म्हणाल्या, 'बाळाची आई आज का आली नाही कुणास ठाऊक'. काकू म्हणाल्या, 'मॅडमचं काहीतरी काम निघालं असेल मी घेऊन जाते बाळाला शाळेकडे'.


        ऑफिसच्या शेजारीच माझा पाचवीचा वर्ग होता. मराठीचा तास होता. टाचण वही उघडून पाहिलं तर त्यात दया पवार या लेखकांचा मायेचा पाझर या धड्यावरील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून घेणे हा घटक मी नोंद केलेला होता. धडा यापुर्वी शिकवून झाला होता. वाक्यप्रचार फळ्यावर लिहिले. मायेचा पाझर फुटणे, डोळे भरून येणे, कालवाकालव होणे, भांबावून जाणे, कीव येणे इ. धडा शिकवत असताना वाक्यप्रचारांचा अर्थ सांगितलेला होता. त्यामुळे आता फक्त वाक्यात उपयोग करून घ्यायचा होता. साहेब सर्वप्रथम माझ्याच वर्गात आले. मी विद्यार्थ्यांना विचारले, मायेचा पाझर फुटणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून कोण सांगेल ?

 

         इकडे माझी यास्मीन जोरजोरात रडत होती. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकून तिने टाहो फोडला होता. त्या काकी माझ्या आवाजाच्या दिशेने खिडकीजवळ आल्या. त्यांना मी खुणेनेच लांब जायला सांगितले. तेवढ्यात बाळाची नजर माझ्याकडे गेली असावी ती दुप्पट मोठ्याने रडत होती. एका विद्यार्थ्यांने वाक्य सांगितले, ' मला पाहून माझ्या आईला खूप माया येते'. आणि खरं सांगू वाचकहो बाळाचे रडणे ऐकून मला ' खराखुरा मायेचा पाझर फुटला होता व तो आवरणे कठीण झाले होते. दुधाचे थेंब खाली पडत होते. विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केलाय हे माझ्या लक्षातही आले नाही. पुरती गोंधळुन गेले होते मी. साहेब मोठ्यानं मला म्हणाले, 'मॅडम विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केला. त्याला वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा अशी सुचना न देता त्याचं उत्तर स्विकारलं हे बरोबर नाही असे म्हणत अध्यापन कसं परफेक्ट असावं या विषयी त्यांनी लेक्चर द्यायला सुरूवात केली. मी त्याचं बोलणं ऐकत असल्याचं त्यांना भासवत होते पण माझं लक्ष होतं माझ्या रडणाऱ्या बाळाकडं, साहेब कधी एकदा दुसऱ्या वर्गात जातात असं वाटत होतं. पण साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासायला सुरूवात केली. गृहपाठ तपासून चुका दाखविल्या होत्या, चुकीचे शब्द ५-५ वेळा लिहूनही घेतले होते. पण त्या शब्दाखाली सही केली नव्हती. त्याविषयी सूचना देऊन, अधिक लक्षपूर्वक अध्यापन करण्याचा सल्ला देवून साहेब दुसऱ्या वर्गात गेले एकदाचे !


        वयाच्या मानाने अधिक पोक्तपणा व समज आलेली सुनिता घाळी नावाची विद्यार्थीनी मला म्हणाली, 'मॅडम बाळ किती रडलं घ्यायचं नाही होय त्याला. 'व ती काकूना बोलवण्यास बाहेर गेली. विद्यार्थ्यांनाही माझी ही अवस्था समजली असावी. ते शांतपणे फळ्यावरील वाक्यप्रचार लिहून घेवून वाक्यात उपयोग करून लिहू लागले. साहेबांना परत येताना दिसणार नाही अशा कोपऱ्यात बसून बाळाला शांत केले. बाळ शांत होऊन खुदकन् हसले. आज इतक्या वर्षानंतरही तो प्रसंग आठवला की डोळ्यात अश्रूची गर्दी होते. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे मान्य असूनही कर्तव्य पार पाडताना कशी अवस्था होते याची प्रचिती मला आली.


        मिळवत्या स्त्रीकडे पाहताना सर्वांना तिचा पगार दिसतो, तिचं ठीकठाक राहणीमान दिसतं, आर्थिक संपन्नताही नजरेत भरते पण आपल्या काळजाच्या तुकड्याला घरी सोडून ड्युटीवर जाताना तिला किती यातना होतात हे सहसा कुणालाच दिसत नाही. 'घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी' अशी तिची अवस्था होते. पाण्यात अश्रू ढाळणाऱ्या माशाप्रमाणे तिचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. अश्रू पुसणारे कुणीच नसते. त्यामुळे रडण्यातही मजा नसते. म्हणून येणारा प्रत्येक दिवस ती पार पाडत असते.

            हीच यास्मिन माझ्या आजारपणात माझी आई बनली.

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

माझे ग्रेट बाबा

 आदरणीय बाबांना,.



                         ज.गुलाब नबी तांबोळी


        बाबा, आता मी ५८ वर्षाची झाले. गेल्या ५८ वर्षातील ३८ वर्षे ४ महिने शिक्षिका पदावर कार्य करून सेवानिवृत्तही झाले. गेल्या ५८ वर्षात मला थोडफार समजायला लागल्यापासून विविध विषयावर तुमच्याशी खूप बोलले. तुमच्याशी बोलता बोलता खूप शिकले. पण मला अगदी अंत:करणापासून जे बोलायचं होत ते राहूनच गेलं. म्हणून या लेखातून तुमच्याशी बोलते आहे.


        बाबा, मला आठवतोय तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस. तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन आलात. मुख्याध्यापकांशी माझी ओळख करून दिलीत, त्यावेळी तुम्ही ही मुख्याध्यापक पदावर कवठेपिरान येथे कार्यरत होता. मी अगदी निश्चितपणे नोकरीत रूजू झाले, कारण मला आधार होता तो तुम्ही दिलेल्या शिकवणुकीचा व उत्तम संस्काराचा. तुम्ही नजरेनेच मला सांगितलत, 'तुला डी.एड्.पर्यंतच शिक्षण देवून इथपर्यंत आणून सोडलय. तुझी नोकरी तू व्यवस्थित सांभाळ, काहीतरी वेगळं करून दाखव जेणेकरून तुझं पर्यायाने आपल्या कुटूंबाचं नाव उज्ज्वल होईल'. आणि बाबा खरं सांगू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच अगदी मनापासून, कर्तव्यात कसूर न करता अध्यापनकार्य करत राहिले. आदर्श शिक्षिका म्हणून दहा पुरस्कार प्राप्त केले. पी.एच.डी. सारखी पदवीही मिळवू शकले. कुटूंबाला अभिमान वाटावा असे कार्य करू शकले.


         माझ्या नोकरीच्या सुरूवातीच्या काळात वारंवार ब्रेक मिळत होता. ३ ते ४ महिने विनावेतन रहावे लागायचे. त्यामुळे खूपच ओढाताण व्हायची. आजीचा व माझा घरखर्च चालविणेही अवघड होते. त्यात आजी खूप आजारी पडली, तिच्या उपचारादरम्यान मला बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे मीही खूप आजारी पडले. मला खूप ताप भरला, दोन-तीन दिवस तो अंगावरच काढला. कारण बाबा, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि तुम्हाला त्यावेळी त्रास द्यायची माझी इच्छा नव्हती. तापामुळे माझं मानसिक संतुलनही बिघडल. मी गांवी आले त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी सांगलीला न्यायचा सल्ला दिला. त्याचवेळी तुमचा आष्टा येथे सेवांतर्गत कोर्स चालू होता, अधिकारी तुम्हाला रजा द्यायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना म्हणाला, 'साहेब, माझी मुलगी आजारी आहे. तिला औषधोपचारासाठी सांगलीला नेणे जरूरीचे आहे. आज माझा राजीनामा घ्या, वाट्टेल ती कारवाई करा पण आज मी जाणारच'.  तुम्ही माझ्यावर औषधोपचार तर केलात पण माझ्यासाठी एवढा मोठ्ठा त्याग करणारे बाबा आहेत हे पाहून त्या भयंकर दुखण्यातून मी ताबडतोब बरी झाले.


        बाबा, आठवतय तुम्हाला दहावी इयत्तेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचं मार्कलिस्ट तुम्हाला दाखवताच डोळ्यात पाणी भरून म्हणालात, 'ज्युबेदा, तू आमच्यासारख्या गरिबाच्या घरात कशाला जन्माला आलीस, तुझ्या बुध्दीच्या मानाने उच्च शिक्षण आम्ही देवू शकत नाही'. माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही थोडं अतिशयोक्तीनं बोललात हे खरं पण त्या बोलण्याने माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.


       नोकरीतील बारीक-सारीक कटकटी, अडचणी मी तुम्हाला सांगायची, त्यावेळी तुम्ही मला सांगितलत. 'बेटा, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमळ वागण्यानं सर्वांची मने जिंकून घे; आणि लक्षात ठेव आपलं उत्कृष्ठ काम हाच आपला वशिला आहे. तुला भरपूर मित्र-मैत्रिणी जोडता आल्या नाहीत तरी चालेल पण तुझ्या वागण्याने शत्रू निर्माण करू नकोस" बाबा हे तुमचे तत्वज्ञान मला कुठल्याही पुस्तकी तत्वज्ञानापेक्षा मोलाचे वाटतात.


       बाबा मला चांगलं आठवतय एक नातेवाईक माझ्या बाबतीत तुम्हाला म्हणाला, 'गुरूजी तुमच्या मुलीच्या लग्नाचं बघा, स्त्री हे काचेचं भांड असतं' तुम्ही ठामपणे उत्तर दिलंत, 'माझं भांडं काचेचं नाही शिशाचं आहे तुम्ही नका काळजी करू'. एकदा कारखान्यात काम करणाऱ्या, कमी शिकलेल्या श्रीमंत मुलाचं माझ्या साठी स्थळ आल्यावर म्हणालात, 'नको हे स्थळ, माझ्या मुलीची भाषासुध्दा त्याला कळणार नाही'. तुम्ही सहजपणे बोललेल्या शब्दांनी माझा आत्मविश्वास शतपटीने, वाढत गेला. एकदा पत्रातून तुम्ही याबाबतीत माझा निर्णय विचारलात. त्यावेळी मी तुम्हाला लिहीलं होतं, 'बाबा ! प्रत्यक्ष ईश्वरानेही माझं कांही वाईट करण्याचा विचार केला तर माझे बाबा ईश्वराला प्रार्थना करून वाईट करण्यापासून परावृत्त करतील. तुम्ही घेतलेला निर्णय मी स्विकारेन'. तसंच केलत बाबा तुम्ही, माझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार निवडलात, माझ्या आयुष्याचं सोनं झालं.


        आम्हां भावंडासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. शिक्षकाच्या नोकरीबरोबरच शिकवण्या घेतलात. शिलाईकाम केलतं. आपल्या गरजा कमी करून, काटकसरीने राहून आमच्यासाठी वह्या-पुस्तके पुरवलीत. शाळेचा गणवेशही माप न घेता अगदी बरोबर शिवून पाठवत होतात. बाबा, हे तुमचे उपकार या जन्मी तरी फिटणार नाहीत. तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली रहाणे मला जास्त आवडेल.  माझा संसार सुरू झाला. तुमची आई म्हणजे माझी लाडकी दादी माझ्याजवळच रहात होती. त्यामुळे तुमचं येणं जाणं असायचं, प्रत्येक वेळी आम्ही घेतलेली एखादी वस्तू किंवा भांडं मी तुम्हाला दाखवायची. त्यावेळी एक अनमोल शिकवण तुम्ही मला दिली. 'वस्तू-भांडं असं घ्यायचं की आपल्या आयुष्यात ते पुन्हा पुन्हा बदलायला लागू नये.' तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खरेदी होत गेली. तुमचे बोलणे म्हणजे एक जीवनसिद्धांत होता. आम्ही रामनगरमध्ये छोटेसे घर बांधल्यावर मला म्हणालात, 'ज्युबेदा कोल्हापूर रोडवरून तुझ्या घराकडे येताना खूप मोठे बंगले दिसतात. त्यानंतर वडर समाजातील बांधवानी दगडाने रचलेल्या भक्कम झोपड्याही आहेत. बंगल्याकडे जरूर बघ पण त्यानंतर झोपड्यांकडे बारकाईने बघूनच आपल्या घराकडे बघ तुझं घर फार सुंदर वाटेल तुला'. जगातील कोणत्याही तत्वज्ञाने इतका महान संदेश आपल्या लेकीसाठी दिला नसेल.'


       खरंच बाबा मी माझ्या मानाने खूप शिकले, शिकवलेही पण जीवनाची पाठशाळा मात्र मी तुमच्याकडूनच शिकले, कळत-नकळत तुम्हीच ठरला माझ्या जीवनाचे शिल्पकार! तुमच्यामुळेच मी शिकत गेले. हे सुंदर जीवन घडवू शकले. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. 'माझ्या बाबांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य दे'.


तुमची लेक - ज्युबेदा


       माझे ग्रेट बाबा अर्थात माझे काका हा लेख युवकांचा नवा महाराष्ट्र या दैनिकामध्ये प्रकाशित झाला. त्यावेळी बाबा हयात होते , वाचून बेहद खूष झाले होते. बारा १२नोव्हेंबर २०१८ ला ते पैगंबरवासी झाले. त्यांना आमच्यातून जाऊन सात वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या आठवणी आम्हा सर्वांच्या ह्रदयात कोरलेल्या आहेत. त्यांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्ताने हे मनोगत मनापासून........


मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

जग फुलांचं

जग फुलांचं 




 फुलं रोज उमलतात । 

सर्वांना आनंदी करतात । 

 पाणी देणारे हात गंधाळतात । 

मना हर्षाची देणगी देतात । 
 
फुले अंधारात फुलतात । 

अन् पहाटवाऱ्यात झुलतात । 
 
फुलं आभाळगाण्यात रंगतात ।

हरितपर्णानां हर्षटाळी देतात । 

 फुलं आपल्याच गंधात रमतात । 

आपल्याच छंदात झंकारतात । 

 फुलं वाऱ्याचे श्वास मंतरतात । 

प्रेमिकांना पाहून पानात दडतात। 

 फुलं स्वतः प्रसन्न हसतात ।

 बघणाऱ्यालाही प्रसन्न करतात । 

 फुलं केसांना सौंदर्यदान देतात ।

फुलं मातीशी इमान राखतात । 
 
फुलं स्वप्नांची आशा टिकवतात। 

आयुष्य कसं जगावं शिकवतात।


शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।

    दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।
      



                            फोटो साभार:गुगल
  


      दसरा सण नुकताच संपला होता 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीप्रमाणे सर्वांवर आनंदाचा वर्षाव करून गेला होता. थंडीची चाहूल लागली होती. सणांचा राजा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला होता. त्याचवेळी माझ्या काकांना श्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, तेही अतिदक्षता विभागात. प्रसंग गंभीर होता. इथेच मला स्वच्छंदी दिनू भेटला. दिनू पस्तीशीच्या आसपास वय असलेला दवाखान्यातील सफाई कर्मचारी. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा, सदा आनंदी दिसणारा, बोलका, परोपकारी, कार्यतत्पर दिनू दवाखान्यात आला की अतीव यातना भोगणाऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटायची. दिनू कचरा गोळा करत करत सर्वांशी बोलत बोलत गाडी पुढे ढकलतो. काय काका बरं हाय का? मावशी तुमची तब्बेत काय म्हणते ? पलीकडच्या माई, तुम्ही आज गप्प का दिसता ? आज हे दादा एकदम फ्रेश दिसतात अशी सर्वांची विचारपूस करतो. प्रसंगी कपडे बदलायला, कूस बदलायला, उठवून बसवायला मदत करतो. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या ताई-माईंना प्रेमळ सूचनाही देतो. असा हा दिनू सर्वांचा लाडका दिनू बनला आहे.


        डॉक्टरना, कर्मचाऱ्यांना, पेशंटना, पेशंटच्या नातेवाईकांना दिवाळीचे वेध लागले होते. दिवाळीला काय खरेदी करायचे याचे मनसुबे सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांच्या ड्रेस, साडी खरेदीच्या गप्पा दवाखान्याच्या बाजूला हळू आवाजात रंगात येऊ लागल्या होत्या. दिवाळी पाच दिवसावर आलेली असतानाच केर गोळा करणारे दिनूचे हात चमचम चमकू लागले होते. निरखून पहाते तर काय दिनूच्या हातात चांदीचे सुंदर ब्रेसलेट व चांदीच्या दोन अंगठ्या विराजमान झाल्या होत्या. आज केर गोळा करणारे त्याचे हात अधिकच सुंदर दिसत होते. हातातल्या रूपेरी दागिन्यामुळे नेहमी प्रसन्न दिसणारा त्याचा चेहरा आज वेगळ्याच तेजाने उजळून निघालेला दिसत होता. त्याचा हात आज दररोजच्या गतीपेक्षा अधिक गतीने कचऱ्याची विभागणी करून कचरा गोळा करण्यात गुंतला होता. नेहमीप्रमाणे सर्वांची विचारपूस करून मदत करत होता. एका पेशंटने हाताकडे पाहून हसत विचारलेच 'दिनूची दिवाळी नटली जणू' तसा दिनू हसत म्हणाला, परवाच सरांनी दोन हजार बोनस दिला. फार फार दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सरळ गेलो सराफ कट्ट्याकडे. एक हजाराचे ब्रेसलेट घेतले. व एक हजाराच्या या दोन अंगठ्या घेतल्या चांदीच्या. हात पुढे करून सर्वांना ब्रेसलेट व अंगठ्या दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद खरंच अवर्णनीय होता. एका सहकाऱ्याने शंका विचारलीच स्वतःसाठीच सगळा बोनस खर्च केलास ? बायको, मुलांना, आईला काय घेतलास की नाही ? दिनू हसत हसत म्हणाला, सिव्हीलचा पगार झाल्याबरोबर बायकोला दोन हजार साडीसाठी दिलं. पाहीजे तशी घे म्हटलं. असलीच आणली, तसलीच आणली नको पुन्हा. दोन्ही मुलांच्या कपड्यांसाठी दोन हजार आणि फराळाच्या बाजारासाठी दोन हजार दिलं. खूष झाली बायको व म्हणाली, तुमच्या आईसाठी लुगडं तुम्हीच आणा मला नाही त्या लुगड्यातलं कळत. "मी स्वतः जाऊन आईसाठी हजाराचं लुगडं चोळी आणली. आई जाम खूष झाली. पाचशे रूपये आधीच बाजूला ठेवलेत. फटाके, मेणबत्या, पणत्या, साबण, वाशेल तेल इ. या वस्तू आणण्यासाठी असा खुलासा करून दिनू गडबडीने बाहेर पडला कारण त्याला ही ड्युटी करून सिव्हीलची परमंनंट ड्युटी करायची होती. डबल ड्युटी आनंदाने पार पाडणाऱ्या दिनूने नऊ-दहा हजारात दणक्यात दिवाळी करण्याचा हिशोब कसा चुटकीसरशी मांडला बघा! दिनू निघून गेला पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.  

 

       उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या तुमच्या-आमच्या आसपास वावरणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या घरातील दिवाळी कशी साजरी झाली? किती आनंद देऊन गेली? किती निराशा पदरी पडल्या? किती समाधानाचे दीप मनामनात उजळून गेले? याबाबतीतील उदाहरणे पाहण्यात, ऐकण्यात आली ती सर्व उदाहरणे वाचल्यावर तुम्हीच सांगा 'दिनूची दिवाळी दणक्यात की या सर्वांची दिवाळी दणक्यात ?


* आयटी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या रोहितला ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रमोशन मिळाले. पगारात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली. रोहित - रीना आनंदून गेले. गावाकडचे कुटुंबीय, नातेवाईक खूश झाले. दिवाळीच्या आधी (चार दिवस) त्याला ऑफिसमध्ये एकाएकी चक्कर आली. उपचारादरम्यान समजले की रोहितची शुगर कमी झालीय व बी. पी. वाढलाय. आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. शिवाय बी. पी. ची गोळी कायमची सुरू झाली. शुगर कमी होऊ नये याची दक्षता घेण्याचा सल्ला मिळाला. त्यामुळे रोहित रीना यांची यावर्षीची दिवाळी फुल्ल काळजीत गेली.


* निखिलरावांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ऐंशी लाखाचा फ्लॅट बुक केला. फ्लॅट सोळाव्या मजल्यावर होता. रम्य परिसर होता. सुशिक्षित अपार्टमेंट होते. तरीही त्यांची पत्नी नीरजा नाराज होती. याचे कारण असे होते मोठा फ्लॅट घेतल्यावर निखिलराव आईवडिलांना.  गावाकडून इकडे कायमचे राहण्यासाठी आणणार होते. त्यामुळे नीरजा तूर्त मोठा फ्लॅट नकोच म्हणत होती. कारण तिला आपल्या संसारात सासू-सासऱ्यांची लुडबूड नको होती. तिला येथे फक्त राजाराणीचा संसार हवा होता. सासू-सासरे कायमचे इकडे आले तर आपल्या मुक्त राहणीमानावर गदा येईल या भितीने ती ऐंशीलाखाच्या फ्लॅट बुकिंगमुळेही दिवाळीचा आनंद उपभोगू शकली नाही.


* सुषमा-सागरची दिवाळी यंदा दणक्यात होणार नव्हतीच कारण त्यांचा एकुलता एक श्रीराज यंदा बारावीला होता. श्रीराज हुशार होता. अभ्यास ही मन लावून करत होता. पण त्याच्या आई-वडिलांना फारच टेन्शन आलं होतं. कारण आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष होते. सुषमा सागरला अॅट ऍनी कॉस्ट श्रीराजला एम्. बी. बी. एस्. डॉक्टर बनवायचं होतं. चार-दोन मार्कासाठी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याची संधी त्यांना घालवायची नव्हती. त्यांनी वर्षभर श्रीराजच्या मागे टुमणे लावले होते. एन्जॉय काय नंतर करता येईल यावर्षी अभ्यास महत्वाचा.. त्यात कालच अॅकॅडमीतून सरांचा फोन आला होता की श्रीराजला या युनिट टेस्टमध्ये ९६% च मार्कस् पडलेत. तो इतरांपेक्षा दोन टक्क्यांनी मागे पडलाय. मग काय विचारता दोन मार्कस् गेले कुठे? या विचारात श्रीबाळा अभ्यास कर म्हणण्यात दिवाळी निघून गेली. फराळाचं काहीच नाही केलं विकतच आणलं थोडं सुषमा-सागर यांची दिवाळी फुल्ल टेन्शन मध्येच गेली.


* सुशिलाताईना ही दिवाळी फारच दुःखदायक वाटली. त्यांच्यात कसलाही उत्साह, हुरूप राहिला नाही कारण त्यांच्या एकुलत्या एका लेकाला सुरेशला दुसरी मुलगी झाली लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ऐन दिवाळीत लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पोटी दीपाली आली म्हणून सुनिल-सुवर्णा खूश झाली. पण वंशाला दिवा नाही झाला म्हणून सुशिलाताईंनी अंथरूण घातलं. तिसरा चान्स घ्यायलाच पाहिजे असा त्यांच्याकडे हट्ट धरला पण ते दोघे आपल्या मतावर ठाम होते. दोन्ही मुलीना चांगल वाढवायचं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. हे पाहून सुशीलाताई खचून गेल्या आपल्या जावेला परिस्थिती गरीबीची असूनही देवाने दोन नातू दिले आणि मला दोन नाती. कष्टान मिळविलेल्या इस्टेटीचे मालक जावई होणार या कल्पनेने त्यांनी हाय खाल्ली होती. त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ गोड वाटला नाही.


* स्मिताची दिवाळी काही वेगळीच म्हणा ना! स्मिताने पतीकडून सुभाषकडून हट्टाने चार तोळ्यांचा राणीहार करून घेतला होता. परवाच्या कार्यक्रमात रोहिणीने घातलेला हार तिला भारीच आवडला होता. तीन पदरी राणीहार शालूवर खुलून दिसत होता. अगदी अगदी तस्साच हार तिनं बनवून घेतला होता. भावाला ओवाळणी म्हणून शालू ची मागणी तिनं आधीच केली होती. शालूवर राणीहार घालून कॉलनीभर मिरवण्याचा घाट तिनं घातला होता. रोहिणीच्या राणीहारापेक्षा आपला हार वजनाने जास्त व सुंदर नाजूक डिझाइनचा आहे असे समजून ती खूप आनंदात होती. पण तिच्या आनंदावर विरजण पडलं मैत्रिणीसमवेत दुचाकीवरून तिन्हीसांजेला घरी परत येत असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठन हिसकावून नेले. ऐन दिवाळीत आलेला हा प्रसंग स्मिताला असह्य झाला. दिवाळी अशी तशीच गेली.


* मेघाला तिच्या पतीने मयूरने पाच हजाराची साडी आणली. आता तरी मेघा माझ्या पसंतीवर खूश होईल या कल्पनेने मयूर आनंदात घरी आला. त्याने साडी मेघाच्या हातात दिली. मेघाने साडी पाहिली नाक मुरडत म्हणाली, " मला हा कलर नको होता. या कलरच्या चार-पाच साड्या आहेत माझ्याकडे, शिवाय या डिझाइनच्या साड्या जांभळ्या रंगात जास्त खुलून दिसतात." काय बोलणार बिचारा मयूर? संयम राखत म्हणाला, 'उद्या तू माझ्याबरोबर दुकानात चल तुला पाहिजे तो कलर घे. बदलून देण्याच्या अटीवरच मी साडी आणली आहे.' दुसऱ्या दिवशी मेघा दुकानात गेली. पाहिजे तो कलर मिळविण्यासाठी दुकान पालथे घातले तरी तिला पाहिजे तसा कलर मिळाला नाही थोडा फेंटच वाटतो म्हणाली. ती साडी नेसल्यावर कॉलनीतल्या एकीनेही साडी छान आहे असे म्हटले नाही म्हणून मेघा लक्ष्मीपूजेच्या दिवसापासून नाराज झाली. मयुरने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाईसाहेबांचा मूड काही ठिकाणावर आला नाही. पाच हजार पाण्यात गेल्याच्या दुःखात मयूरही दिवाळीत डिस्मूड झाला. 


       पाहिलीत श्रीमंत लोकांची असंतुष्ट दिवाळी? कुणाचा टॉमी दिवाळीत आजारी होता. कुणाच्या मुलाने पसंत केलेल्या मुलीने लग्नासाठी नकार दिला होता. लाखो कारणे आहेत दिवाळीत दुःखी होण्याची पण या छोट्या दुःखावर मात करून दिनूप्रमाणे थोडक्यात सुख मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होते. दहा हजारात दणक्यात दिवाळी साजरी करणारा दिनू आणि त्याचं कुटुंब पाहिलं की, वाटतं सुख शेवटी मानण्यावर असतं. ते व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. फार दिवसांनी चांदीचं ब्रेसलेट व चांदीच्या अंगठ्या घालण्याचं स्वप्न साकार झाल्यावर आनंदसागरात पोहणारा दिनू, सकारात्मक वृत्ती ठेवून समाधानाने - आनंदाने जीवन व्यतीत करणारा दिनू मला आदर्शवत वाटला. तुम्हालाही वाटला ना ?


       नाहीतर एवढ्या तेवढ्या कारणावरून दुःखी होणारे बाकीचे लोक भौतिक सुविधा हात जोडून उभ्या असतानाही सुखी होऊ शकत नाही. आणखी हवं, वेगळं हवं, सर्वांत भारी हवं, आत्ताच हवं, या सगळ्या 'हवं' मुळे माणूस नेहमी असमाधानाच्या भोवऱ्यात अडकतो. त्या भोवऱ्यातून सुटका करून घेण्याची क्षमता तो 'हवं' मुळे आधीच गमावून बसलेला असतो. त्यामुळे आज परिस्थितीने समृद्ध असलेले लोकही असमाधानी राहतात. त्यांना सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही. सगळं माझ्या मनासारखं व्हावं. अशी अपेक्षा करणारे आपण कधीच सुखी होणार नाही का? त्यापेक्षा जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगलं होत आहे व जे होणार आहे तेही चांगलच होईल अशी वृत्ती ठेवून जीवन व्यतीत करायचे ठरविले तर आपल्यासारखे सुखी आपणच होऊ. व दिनूप्रमाणे आलेली येणारी प्रत्येक दिवाळी दणक्यात साजरी करू. करणार ना अल्पसंतुष्ट, सुखी-समाधानी दिनूचे अनुकरण ?



शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

पुस्तक परीक्षण साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

 


पुस्तक परीक्षण

साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

मूळ लेखक ( मराठी ) - श्री. विजय दादा आवटी ( राष्ट्रपती                                                पुरस्कार विजेते मुख्याध्यापक )

हिंदी अनुवाद - डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

प्रकाशक- स्वरूप प्रकाशन ,जयसिंगपूर

प्रथम आवृत्ती- २ आक्टोबर २०२५

मूल्य-१५० रूपये

पृष्ठे -१४०


'सवंगडी हे आनंदाचे' हे व्याख्यान केसरी विजय दादा आवटी यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकाचा डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी केलेला हिंदी अनुवाद 'साथी आनंद के' हे पुस्तक वाचनात आले.


         सुंदर, बोलके मुखपृष्ठ असलेले, मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले हे पुस्तक मनोरंजनाचा खजिना आहे असे वाटले. या पुस्तकात १६३ विनोदी चुटकुले, घटना, सहज घडलेले प्रसंग समाविष्ट आहेत. प्रत्येक विनोदाला साजेशी बोलकी चित्रे आहेत त्यामुळे हे पुस्तक वाचताना खूपच मजा येते. हसू गालात लपून राहीना अशी अवस्था होते.


         या पुस्तकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना सतरा पानांची आहे. प्रस्तावनेमध्ये लेखकांनी सद्याच्या धावपळीच्या व तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांना मनोरंजनाची व हसण्याची किती आवश्यकता आहे हे समजावून सांगितले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हसण्याची गरज आहे आणि ही गरज या पुस्तकाच्या वाचनातून बऱ्याच अंशी पूर्ण होते असे मला वाटते. तणाव कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात, त्यावरील उपाय कोणते?  आपण आनंद यात्री बनावे, गीत गुणगुणत जगावे, नेहमी आशावादी असावे, समाधानी व शांत रहावे, हसण्याचे फायदे, विचारविनिमय करावा, हसणे व हसविण्याचे तंत्र, विनोद कसे असावेत व कसे नसावेत या सर्व मुद्द्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. वैद्यकीय ग्रंथातून संकलित केलेली हसण्याचे महत्त्व विषद करणारी माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. ज्ञानातून मनोरंजन व मनोरंजनातून माणसाने मनापासून हसले पाहिजे हा संदेश लेखकांनी दिला आहे.


     हसण्यामुळे बऱ्याच व्याधी दूर होतात हे सांगताना अनुवादित पुस्तकात म्हटले आहे.

"ही दवाएँ, नही गोलियाँ ।

हँसते हँसते बजाएंगे तालिया ।।

सब रोगों की एक दवाई ।

हँसना सीखो मेरे भाई ।।"


१६३ विनोदी घटनाओं मे बहुतही हसीन किस्से आएं हैं जैसे की- कॉलेज बस स्टाॅप पर ग्यारहवी की अपेक्षा बारहवी कक्षा में पढनेवाले छात्र बहुत होशियार। 

बारहवी कक्षा में पढनेवाला एक लडका खडा था। सामने से एक खूबसूरत लडकी जा रही थी। उसे देखकर लडके ने कहा

" रूप तेरा , सूर मेरा

गाना एक कहूँ क्या ? "

लडकी खूबसूरती के साथ होशियार भी थी। उसने कहा....

"गाल तेरे, हाथ मेरे

कान के नीचे एक दे दूँ क्या ?" 

 

विनोदी घटनांचा समावेश लेखकांनी खुबीने केला आहे. 

उदा. दुनिया गोल है।

अध्यापक ने एक लडके से पूछा ।

" बेटा, दुनिया गोल है, य  तू कैसे साबित करके दिखायेगा ?"

लडका कहता है,"झिंगुर चूहे से डरता है। चूहा बिल्ली से डरता है। बिल्ली कुत्ते से डरती है। कुत्ता पप्पा से डरता है । पप्पा मम्मी से डरते हैं  और मम्मी झिंगुर से डरती है।

झिंगुर से  झिंगुर तक, दुनिया गोल है ।"


या पुस्तकात लेखकांनी विनोदी घटना व चुटकुल्यांची विभागवार मांडणी केली आहे. शाळा व अभ्यासाच्या बाबतीततले विनोद, कुटुंबातघडलेले विनोद, प्रवासातील विनोद, व्यवहारात घडणारे विनोद, वक्त्यांच्या बाबतीततले विनोद, थोर व्यक्तींच्या जीवनातील विनोद, जनावरे व पक्षी यांच्या बाबतीततले विनोद, वाईट सवयीमुळे घडलेले विनोद व इतर हास्यविनोद. या विभागणीमुळे वाचकांना विनोद वाचणे सहज व सुलभ झाले आहे.


साथी आनंद के या पुस्तकाच्या मलपृष्ठावर विनोदामुळे हसण्याचे फायदे सारांश रुपात मांडले आहेत. त्यामुळे आपले जीवन आनंदी होण्यास निश्चितच मदत होईल अशी मी ग्वाही देते.

मुस्कराता हुआ चेहरा सफलता की कुंजी है ।

हँसने से बीमारी दूर हो जाती है, लोग करीब आ जाते हैं ।

हँसमुख लोग दीर्घायु होते हैं ।

हँसी के लिए कुछ भी नही लगता, यह मुफ्त दवा है ।

हमारे जीवन का उद्देश खुश रहना है...आनंदी रहना है ।

विनोद से हम हँसते हैं ,दुसरों को भी हँसाते हैं।

हँसने के लिए यह किताब अवश्य  पढो.....

' साथी आनंद के '

परीक्षण कर्त्या - हिना चौधरी.

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

लघुकथा संग्रह क्र.१३ दिसतं एक असतं दुसरंच .

  लघुकथा संग्रह क्र.१३
 दिसतं एक असतं दुसरंच .


                                फोटो साभार: गुगल


(१) आनंदी आव

प्रतिभाताई शिक्षिका नुकत्याच रिटायर झालेल्या. हुशार, चुणचुणीत व सदैव हसतमुख. आवाज सुंदर, वक्तव्य छान. व्यक्तिमत्त्व एकदम रूबाबदार. सर्वांना हेवा वाटावा असे तिचे चालणे बोलणे. दोन मैत्रिणीमध्ये एकदा तिचा विषय निघाला. त्या दोघींपैकी एक तिच्या शेजारी राहणारी, तिला पूर्णपणे ओळखणारी. दुसरीने तिच्या या आनंदाचे रहस्य विचारले असता पहिली म्हणाली," तिचा एकुलता एक मुलगा डिप्रेशन मध्ये गेलाय. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. तिची एकुलती एक कन्या इंजिनिअर आहे. लठ्ठ पगाराची नोकरी आहे तिला पण ती नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हे दुःख लपविण्यासाठी प्रतिभाताई आनंदी असल्याचा आव आणते झालं".


(२ ) पडद्यामागची सेवा

सुनील व अनिल दोन भाऊ. धाकटा अनिल अल्पशा आजाराने मरण पावला. आईवडील आनिलकडेच रहायचे. जेमतेम उत्पन्न असलेल्या पुतण्यावर भार नको म्हणून सुनीलने त्यांच्याकडे रहायला येण्याचा आग्रह केला पण ते मूळ घर सोडायला तयार झाले नाहीत. उतारवयातील आईच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. धाकटी सून सेवा करते म्हणून येणारे जाणारे नातेवाईक तिचं तोंड भरून कौतुक करीत अर्थात मोठ्या सुनीलला नावे ठेवत. पण त्यांना हे माहित नव्हते की अनिल मयत झाल्यापासून सुनील सकाळ संध्याकाळ आईवडिलांना जेवणाचा डबा आणून देतो. शिवाय आईच्या सेवेसाठी त्याने दरमहा आठ हजार देऊन नर्स ठेवली आहे. असतं एक आणि दिसतं एक हेचं खरं.

 

(३) उत्कृष्ट सेवेचं रहस्य

आनंदीबाईंना तीन मुलं. तिघेही वेगळे  राहतात. आनंदीबाई मात्र धाकट्या मुलांकडेच रहायच्या. दोन्ही मुलंसुना त्यांच्याकडे रहायला बोलवायच्या पण आई त्यांच्याकडे निमित्तमात्र जायच्या. धाकटी सून त्यांची फार लाडकी. ती सासूबाईना वेळेवर जेवण द्यायची. त्यांच्याशी प्रेमळपणे वागायची. औषधपाण्याला हयगय करायची नाही. मग काय सर्वजण धाकट्या सुनेला शाबासकीची थाप देत असत. एक दिवस मोठ्या सुनेनं धाकटीचं कौतुक ऐकलं व म्हणाली,"तिचं काय बिघडतय सेवा करायला महिन्याला वीस हजार सासूबाईना मिळणारी मामंजीची पेन्शन घेते शिवाय गोड बोलून भाजी निवडणे. धान्य निवडणे इत्यादी सर्व घरकामे त्यांच्याकडून करून घेते". आहे की नाही गम्मत दिसतं तसं नसतं!


(४) फुकट्या मदनभाऊ

मदनभाऊ एकदम स्टायलीश माणूस. टिपटाँप, आधुनिक फॅशनेबल कपडे वापरायचे. इस्त्री ताठ असायची. अभिनेत्यासारखी हेअर स्टाईल असियची. अशा रूबाबात राहणाऱ्या मदनभाऊना पर्यटनाची फार आवड होती. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ग्रुपमधून पर्यटन करायचे. प्रत्येकाला वाटायचं एवढा रूबाबदार माणूस आपल्या ग्रुपमध्ये आला तर बरे होईल कारण रुबाबात राहणारा मदनभाऊ जाणकार असेलच अशी सर्वांची मनोभावना होती. एके दिवशी त्यांचे दोन मित्र चर्चा करत होते. प्रत्यक्ष अनुभव सांगू लागले मदनभाऊचे हे दिखाऊ रूप आहे. त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आमच्याबरोबर महिनाभर ट्रीपला होता. आम्ही राईसप्लेट मागवू या म्हटलं की हा म्हणायचा," अरे राईसप्लेट काय खाता मित्रांनो, पंजाबी मागवा. भरपूर ऑर्डर द्यायचा, भरपेट जेवायचा व सर्वांच्या आधी बाहेर पडायचा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून."दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.


(५ ) नाटकी सून

शब्बीरभाईना पॅरालिसीस झाला. अचानक ओढवलेल्या या आजारपणामुळे पाहुण्यांची आणि स्नेह्यांची रीघ लागली होती. शब्बीरभाईना दोन सुना. मोठी सून उच्चशिक्षित व शांत स्वभावाची आहे. ती अभ्यासात हुशार होतीच शिवाय स्वयंपाकात व घरकामात तरबेज आहे. तिला लवकर उठायची सवय आहे याउलट धाकटी सून जेमतेम दहावी शिकलेली आहे. ति उशीरा उठायची. कामात चुकारपणा करायची पण मुलखाची नाटकी. मोठी सून लवकर उठून स्वयंपाकाला लागायची, धाकटी तिने केलेली गरम गरम चपाती घेऊन सासऱ्याना आग्रहाने वाढायची. पाहुण्यांना पोहे तयार करायची मोठी सून, ट्रे घेऊन बाहेर यायची धाकटी. सर्वांशी छान गप्पा मारायची गोड गोड बोलायची. पाहुण्यांसमोर तेलाची वाटी घेऊन सासऱ्यांचे पाय दाबायची. एक पाहुणी म्हणाली, "तुमची धाकटी सून गुणाची आहे हो" सासूबाई म्हणाल्या," माझी मोठी सून कामाची व गुणाची धाकटीला सवय नाटकं करण्याची ."

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

आई

           माझी पहिली अभंगरचना  मातेला समर्पित......

        

 आई


                                फोटो साभार: गुगल


आई थोर जगी । आई ईशरूप ।

राबते ती खूप । बाळांसाठी ।


मायेचा हा झरा।अखंडित वाही।

तहान भागवी। सकलांची ।


आई थोर गुरू। बाळा वाढवते।

सक्षम करिते। जीवनात ।


आईच्या पायाशी। स्वर्ग सामावला

भक्त विसावला। आईपाशी ।


आईची महती। तुम्हा सांगू किती।

अल्प माझी मती। लिखाणात।


आईच्या चरणी। सदा लीन व्हावे।

मनाला जपावे। मातेचिया ।

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

लघुकथा संग्रह क्र. १२ ( विधायक अलक ) जावई आमचे भले !

 लघुकथा  संग्रह १२ ( विधायक अलक )
    जावई आमचे भले !


    
                       फोटो साभार: गुगल 


           जावयांबद्दल एक गोड गैरसमज आहे. जावयांबद्दल बोलताना लोक म्हणतात तो सासुरवाडीत ताठपणाने वागतो,  वेगवेगळ्या मागण्या करतो, हट्ट करतो, मानपान हवा असतो. हे सर्व बोलताना आपणही कुणाचेतरी जावई आहोत हे सोईस्करणे विसरतात. बदललेल्या जमान्यात जावयीबुवासुद्धा बदललेत. प्रसंगी ते सासुरवाडीच्या नातेवाईकांवर कसे प्रेम करतात ते वाचा या लघुकथांमधून.........।


(१ ) सलून बंद

विमलताई व केशवराव स्काटलँड या देशात मुलगी व जावयी यांच्या आग्रहास्तव एका महिन्याकरीता गेले. लेकजावयी दोघे इंजिनिअर, त्याठिकाणी जॉब करतात. त्यांनी या दोघांचे यथोचित स्वागत केले. त्यांना प्रेक्षणीय स्थळे दाखविली. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद दिला. तृप्त मनाने आईवडील परतणार होते एवढ्यात कोरोनाने सर्व जगभर थैमान मांडले व त्यांना दोन महिने तेथेच राहणे भाग पडले. सलून बंद असल्याने केशवरावांचे केस कापण्याची पंचायत झाली. सट्टीच्या दिवशी जावयी म्हणाले, "बाबा बसा या खुर्चीवर मी तुमचे केस व्यवस्थित कापून देतो". जावयांनी टकाटक केस कापल्यावर सासरेबुवा खूश होऊन म्हणाले, "जावयी आमचे भले."


(२ ) मोठेपणा जावयाचा

रामरावांना चार मुली. चारही मुलींचे त्यांनी थाटामाटात विवाह करून दिले. चौघीही आपापल्या  संसारात रमल्या होत्या. रामरावांना मुलगा नव्हता. दुर्दैवाने रामरावांचे ह्रदयविकाराने आकस्मित निधन झाले. आत्ता प्रश्न आला वाटणीचा. मुलींनी समंजसपणे बँक बॅलन्सच्या पाच वाटण्या केल्या. त्यांचे घर होते आठ खोल्यांचे. चौघीनी दोन दोन खोल्या वाटून घेतल्या. प्रत्येकीने खोल्या भाड्याने देऊन महिन्याला भाडे मिळविण्याचा प्लॅन केला व आई चौघींकडे तीन तीन महिने राहील असे चौघीनी ठरविले पण आई मी कुणाच्याही घरी जाणार नाही असे म्हणाली. आता आई मग राहणार कोठे? चौघी एकमेकीकडे पाहू लागल्या. मनाचा मोठेपणा एकीनेही दाखविला नाही शेवटी छोटे जावयी म्हणाले, "आमच्या वाटणीला आलेल्या खोल्यांमध्ये आई तहयात राहतील".सासूबाई मनात  म्हणाल्या 'जावयी माझे भले '


(३ ) बेस्ट सेवा जावयाची

सलीमभाईना पॅरालिसीसचा अटॅक आला. औषधोपचार झाले पण त्यांच्या उजव्या बाजूची हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी फिजिओथेरपी सुरु करण्यास सांगितले. दर दिवशी सकाळ संध्याकाळ एका फिजिओथेरपिस्ट घरी येऊन मालिश करू लागला. त्याची फी दर दिवशी सातशे रूपये होती. सुदैवाने त्यांचे जावयी त्याच गावात रहात होते. ते ऑफिसला जाता येता  सासऱ्याना भेटायला यायचे. जावयांनी मालिश चालू असताना सूक्ष्म निरिक्षण केले. महिना झाल्यावर ते सासऱ्याना म्हणाले," उद्यापासून मालिशवाला बंद. मी करत जाईन मालिश सकाळ संध्याकाळ'. जावयांनी ही सेवा पुढे सहा महिने सुरु ठेवली. सलीमभाई काठी घेऊन चालू लागले. सर्वांना सांगू लागले. 'जावयी माझा भला'.


(४ ) माझी आई तुझी आई

श्रीधर सुजाताला सकाळी सकाळी म्हणाले, "आईची तबेत्त बिघडलीय मी निघतो आणि तिला आपल्याकडे घेऊनच येतो".  श्रीधरचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सुजाताच्या तोंडाचा पट्टा चालू झाला'. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणायला तुमचं काय बिघडतय, सेवा मलाच करावी लागते. प्रत्येक वेळा तुम्ही च का बघता तुमचे मोठे भाऊ नाहीत का बघायला?' तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून श्रीधर गाडी काढून निघून जातात. सायंकाळी पाच वाजता श्रीधर गाडीतून उतरले व मागे झोपलेल्या सासूबाईंना धरून येऊ लागले.सुजाताची बोलतीच बंद झाली. सासूबाई म्हणाल्या, 'जावयी माझे भले'.


(५ ) एक्स्प्रेस सेवा

जानकी शिक्षिका पदावर जयसिंगपूर येथे कार्यरत होत्या. एका ट्रेनिंगसाठी त्या कोल्हापूरला गेल्या होत्या. त्यांच्या लाडक्या मोठ्या भावाची तबेत्त अचानक बिघडल्याने त्यांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अत्यवस्थ असल्याने वारंवार लवकर येण्यासाठी फोन येत होते. सुदैवाने त्यांचे लेकजावयी कोल्हापूरात रहात होते. सैरभैर अवस्थेत त्यांनी लेकीला फोन केला की मला बस स्टॅंडवर पोहचवायला जावयी येतील का?

 पाच मिनिटांत जावयी दुचाकीसह हजर झाले. गाडी स्टँडवर न नेता मिरजेच्या दिशेने वेगात निघाली. थंडीचे दिवस, सायंकाळची वेळ हवेत गारठा होता. जावयांनी गाडी थांबवून आपले जर्किन सासूबाईंना घालायला दिले व पाऊण तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचविले व अत्यवस्थ भावाची भेट घडवली. भाऊ बरे झाले. बहीण आनंदाने म्हणाली 'जावयी माझे भले'

      

       म्हणून सांगते वाचक बंधूभगिनीनो मुलीचा जन्म टाळू नका.जावयीबुवासुद्धा मुलाची भूमिका बजाऊ शकतात.होय ना?......


शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

आनंदाने जगावे असे !

                आनंदाने जगावे असे!


     
                          
                           फोटो साभार: गूगल
                       

        कुणाचा साखरपुडा असो वा लग्न, डोहाळेजेवण असो वा बारसे, वाढदिवस असो वा कार्यक्रम जयाचा उत्साह अगदी दुथडी भरून वहात असतो. तो कार्यक्रम थोडा हटके, अविस्मरणीय, मनोरंजक व थाटामाटात कसा होईल इकडं जयाचं जातीनं लक्ष असतं. साखरपुडा, डोहाळेजेवण, वाढदिवसाला तिच्याकडे खास फनीगेम्सचं नेटकं नियोजन असतं. फुगे फुगविण्यापासून साड्यांच्या घड्या घालण्यापर्यंतच्या ॲक्टीव्हिटीज त्यामध्ये असतात. शिवाय बुगडी घातलेल्या स्त्रीला व पत्नीचा फोटो जवळ बाळगणाऱ्या पुरुषाला अनायसे छोटेसे गिफ्ट जया खुबीनं देते. त्यामुळे जमलेल्या सर्वांचेच छान मनोरंजन होते. नातेवाईकातील कुणाचेही लग्न असो रूखवतावर शायऱ्या झळकतात, जयानं स्वतः तयार केलेल्या. त्यामुळे वधुवरांना रूखवतासोबत छान संदेशही मिळतो. लग्नसमारंभातील संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या प्रसंगात गीत गायनात जया अग्रेसर असतेच. बारशाच्या वेळी जया स्वतः पाळण्याची रचना करते व सर्वांच्या मदतीने पाळणे म्हणते. त्यामुळे बाळाच्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे, मामा-मामींचे, काका-काकूंचे चेहरे असे खुलतात की विचारूच नका. जया खरोखरच जगावेगळी आहे. घरच्या कार्यक्रमात ब्लाऊज पीस ऐवजी कापडी पिशव्या देते तर साडी ऐवजी छान संसारपयोगी वस्तू देते. कार्यक्रम आनंदमय करत असतानाच सामाजिक भानही ठेवते. समाजासाठी एक पाऊलवाट तयार करते.

  

         तर अशी ही जया! तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की ही जया असेल २५-३० वर्षाची तरूणी! पण नाही. जयानं नुकतीच साठी ओलांडली आहे. हा उत्साह, ही उर्जा, ही आपुलकी त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यात कुठून येते देव जाणे! या सगळ्या सकारात्मक वृत्तीचं जया म्हणजे एक भांडारच आहेत. आजुबाजुच्या जवळच्या कोणीही यावे आणि या उत्साहाचा, उर्जेचा, औदार्याचा, मनमोकळेपणाचा, गोड बोलण्याचा शिडकावा अनुभवावा; कारण त्यांचे घर सर्वांसाठी मुक्तद्वार वाटते. घरी येणाऱ्या - एका वर्षापासून ८५ वर्षाच्या व्यक्तीशीही जयाताईंचे छान - जमते. जयाताई इतक्या छान गप्पा मारतात की येणाऱ्याचा सहजपणे, बेमालूमपणे ब्रेन वाब्रेनवॉश होतो व तासाभरासाठी आलेली व्यक्ती २/३ तास छान रमते व मोकळी-ढाकळी होऊन समाधानाने परत जाते. त्यांच्या या मनमोकळ्या सहज स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या संबंधामुळेच त्यांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. दुःखी निराश व्हायला वेळच मिळत नाही. आपल्या पतीकडे, मुलांकडे, नातवांकडे येणाऱ्या प्रत्येकाशी  जयाताईंचा एक वेगळा मर्म बंध, ऋणानुबंध निर्माण होतो.  जयाताईंच्या स्वभावात फक्त सेलीब्रेशनच आहे. घरातील त्यांचा वावर, कामातील व्यग्रता, साधेपणातही नीटनेटके  राहण्याचा त्यांचा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येकाला अचंबित करून सोडतो. येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत असताना कुणाला काय हवं, नको हे बघण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते. कुणी कसलीही समस्या सांगो ती सोडविण्यासाठी लागणारे धीराचे शब्द जयाताईंच्या तोंडून इतक्या आत्मियतेने, अंत:करणापासून बाहेर पडतात की समस्याग्रस्ताला समस्या दूर करण्यासाठी हजार हत्तींचे बळ येते. जयाताईंचा हा सारा व्यवहार ठरवून चाललेला नाही तर तो एक नैसर्गिक, सहजसुंदर आणि स्वभावतः स्त्रवणारा साठ वर्षे वयाचा स्वच्छ निखळ वाहता झरा आहे हे कोणाच्याही  लक्षात सहज येवून जाते. जयाताईंचे हे असे दर्शन ज्या ही क्षणी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस होते, त्या क्षणापासून ती व्यक्ती त्यांची चाहती बनून जाते.


         जयाताईंचा जन्म छोट्याशा खेडेगावात, एका कष्टाळू, गरीब व सुसंस्कारीत शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच गरीबीवर मात करत जीवन आनंदाने कसं जगावं याच बाळकडू त्यांना मिळालं. लग्न होऊन सासरी आल्यावरही सर्वांना त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलेसे केले. सासर-माहेर यात भेदभाव न करता त्यांनी या दोन घरातील नात्यांची वीण इतकी घट्ट केलीय की त्यांच्या घरगुती कार्यक्रमात दीर कोणता? भाऊ कोणता? सासू-आई कोणती हे येणाऱ्याला विचारल्यावरच कळते. काटकसरीने संसार कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावे. पतीच्या नोकरीतील ताणतणाव, अपत्यांचे यश-अपयश, नातेवाईंकांची आजारपणे, स्वतःची नाजूक तब्येत त्यांनी इतक्या खंबीरपणे पचवली आहे की एकदा आलेल्या संकटाने त्यांच्या जीवनात पुन्हा येण्याचे धाडस नाही केले.


       येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती त्या धीराने, आनंदाने स्विकारत असतात. केवळ रडत, कुठत बसणे, थांबणे, आराम करणे, त्यांच्या स्वभावात नाही. सतत काहीतरी करत राहणे हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनात येणारे नानाविध प्रसंग, चढ-उतार त्यांच्याही जीवनात आले पण चढताना त्या घाबरल्या नाहीत व उतरताना दमल्याही नाहीत. टक्केटोणपे खूप खाल्ले. खूप सोसलं पण त्या आज कशाबद्दलही तक्रार करत नाहीत की, कुणाबद्दल अढीही धरत नाहीत. ज्यांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याशी त्या प्रेमाने वागतात. उलट मनापासून त्यांचे आभार मानतात, कारण जयाताईंच म्हणणं आहे की, अशा लोकांमुळेच आपल्याला जगण्याची, लढण्याची व जिंकण्याची नवी उर्जा मिळत गेली. बहुधा ही सकारात्मक वृत्तीच त्यांच्यासाठी शक्तीस्त्रोत ठरत असावी कारण साठी ओलांडल्यानंतरही त्या प्रचंड क्रियाशील व मनाने कणखर आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारताना अनेकदा जयाताई आपल्या पूर्वायुष्यातील घटना सांगत असतात तेव्हा त्यांनी परिस्थितीशी केलेला संघर्ष मनाला स्पर्शून तर जातोच शिवाय एक प्रेरणाही देतो.  त्यांच्या क्षमाशील वृत्तीचे दर्शनही घडते. दुसऱ्याकडून घडलेल्या चुका, घडलेले प्रमाद, त्यामुळे स्वत:ला झालेल्या यातना हे सारे मागे टाकून आनंदाने जगण्याची त्यांची वृत्ती आपल्याला बरंच काही शिकवून  जाते. आयुष्यभर त्या अशाच वागल्या आहेत. कोणासाठी काही करताना त्या स्वतःचा आनंद शोधत असतात. कुणाला काही मदत करताना त्यांचा निरपेक्ष भाव दिसतो. व्यक्तीगत आयुष्यात त्यांचे वागणे शिस्तप्रिय व वक्तशीर असते. स्वच्छतेबाबत त्या कमालीच्या आग्रही आहेत पण स्वच्छतेचा बाऊ करणे त्यांना आवडत नाही. आपले घर, अंगण, छोटासा बगीचा कुटुंबियांच्या मदतीने स्वच्छ व नीटनेटका ठेवतात. आपल्या बगिच्यात उमललेली फुले, फुलांच्या स्वतः तयार केलेल्या वेण्या, पुष्पगुच्छ व बुके तयार करून देण्यात त्यांना अनमोल आनंद मिळतो. त्यांच्या बागेत आलेली फळे पै-पाहुणे, स्नेह्यांच्या दृष्टीने गोड मेवा-मिठाई ठरते. अशा रितीने जयाताई हरितहस्तही आहेत.


        जयाताईना लेखन, वाचन, संगीत, कला नाट्य यात खूप रस आहे. आपल्याला आवडलेले कार्यक्रम, मालिका त्या रसिकतेने पाहतात पण नुसतंच पहात बसत नाहीत त्याचवेळी भाजी निवडत असतात किंवा शेंगा सोलत असतात. आकाशवाणीवरचे कार्यक्रम स्वयंपाक करताना, शिवणकाम करताना लक्षपूर्वक ऐकतात. कामात व्यस्त राहून ऐकण्या-पाहण्याचे त्यांचे कसब खरंच अनुकरणीय आहे. स्मरणशक्ती ही त्यांना मिळालेली दैवी देणगी असावी. आपल्या जीवनात येऊन गेलेल्या प्रत्येकाचं नाव, गाव, आपल्यावर उपकार केलेल्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये, तो प्रसंग बारीकसारीक तपशीलासह त्यांना लख्ख आठवतो व तो प्रसंग त्या इतक्या खुबीनं आपल्यासमोर ठेवातात की एक सुरेख चित्रपट पाहिल्याचा भास होतो, पण त्यांच्या स्मरणाच्या मर्यादा इथपर्यंतच नव्हे तर बहीण-भावांच्या, मुलांच्या, परिचितांच्या कानावर पडलेल्या गोष्टी जशाच्या तशा मनाच्या कागदावर टिपून ठेवतात व दुसऱ्याला समजावताना, धीर देताना प्रकट करतात. त्यांनी सांगितलेला एखादा विनोदी प्रसंग उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडवून जातो. अशाप्रकारे जयाताई म्हणजे साठ वर्षापूर्वीचा चालता बोलता सुपर रोबोच वाटतो.


        एरवी आपल्या संसारात काटकसरी असलेल्या जयाताई एखादी चिंधीही जपून ठेवून त्याचा सदुपयोग करणाऱ्या, अन्न वाया जावू नये म्हणून शिळं खाणाऱ्या त्या, कुणी शिक्षणासाठी मदत किंवा देणगी मागितली तर हजाराची नोट अगदी सहजपणे काढून देतात. गरजू स्त्रीला वापरत असलेली चांगली साडीही देऊन टाकतात हे त्यांचे वर्तन म्हणजे कुणालाही न सुटलेले कोडे आहे, असे वाटते.


        एरवी शांतपणे ऐकून घेणाऱ्या, मोलाचा सल्ला देणाऱ्या, मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या जयाताई समोरच्या व्यक्तिने जाणून बुजुन कांही चूक केली किंवा त्यांच्या अस्मितेला धक्का देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांचा अवतार कडाडणाऱ्या विजा प्रमाणे असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्ती जरा सांभाळूनच असतात. कारण एरवी प्रेमळपणाचा वर्षाव करणाऱ्या त्या रागावल्याचं दुःख समोरच्याला पचवणं फार जड जातं. उधळपट्टी करणाऱ्याला काटकसरीचे महत्व सांगायलाही त्या योग्य संधीची वाटच पाहत असतात.


        चांगल्याचुंगल्या वस्तू जमविणे आणि इतरांना भेटीदाखल देणं हा त्यांचा छंद आहे. आणि हो, बारशाला जाताना स्वतः शिवलेली दुपटी, टोपडी, बाळलेणी न्यायला त्यांना फार आवडते. रुखवत सजविण्यासाठी स्वतः तयार केलेली वस्तू हमखास नेतात. एकंदरीत आपल्या जीवनात सर्वांच्यात मिसळूनही स्वतःचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. हा वेगळेपणा जपत असतानाच इतर कुणालाही त्रास होणार नाही याविषयी त्या नेहमीच दक्ष असतात. जयाताईंचे व्यक्तिमत्व असे संपन्न व बहुपेडी आहे. 

    

        त्यांचे आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे गतिमान  धकाधकीच्या या जमान्यात, बदलत्या हवामानात, सर्वांच्या वाट्याला येणाऱ्या तबेत्तीच्या तक्रारी त्यांच्याही वाट्याला आल्या पण त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. इतरांसमोर आपल्या तब्येतीच्या तक्रारी सतत मांडत बसणे त्यांना आवडत नाही. आपल्या अशा वृत्तीने समोरच्या व्यक्तीला नकळतपणे दुःखी करतो असे त्याना वाटते. त्यामुळे त्यांच्यासमोर कुणी माझं डोकं दुखतय म्हटलं की जयाताई सहज म्हणतात, आपलं आहे म्हणून दुखतं ते दुसऱ्याचं असतं तर दुखलं असतं का ?' समोरचा एकदम मोठ्याने हसतो.


        जयाताईच्या जीवनशैलीकडे पाहिले की वाटते काही माणसं आपल्या जीवनात काही मापदंड शिरोधार्य मानून आपली वाटचाल करीत असतात. कोणाला तरी आदर्श मानून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनात मार्गक्रमण करीत असतात. व आपले आयुष्य सफल संपूर्ण यशस्वी बनवतात. जयाताईंसारख्या व्यक्ती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इतरांसमोर जगण्याचे मापदंड प्रत्यक्ष उभे करतात हेच खरे!


 जयाताईंच्या जगण्याकडे पाहून शेवटी म्हणावेसे वाटते,


अशाही व्यक्ति आहेत भवती, जीवन त्यांचे पहा जरा। 'आनंदी जगावे असे' हाचि सापडे बोध खरा।





गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

लघुकथा संग्रह क्र.११ ( विधायक - अलक )

 लघुकथा संग्रह क्र. ११ ( विधायक - अलक )


लघुकथा क्र. ५१ - पुत्र व्हावा ऐसा

माझा सर्दीमुळे आवाज बसला होता. एकत्र जेवताना मी सूनबाई हिनाला म्हटलं, "मला आज थोडीशीच भाजी आणि वरण वाढ. माझं तोंड आलय, तिखट लागू देईना". संध्याकाळी चिरंजीव मोहसीन ऑफिसमधून येतानाच कंठवटी गोळ्या, कफलेट, व तोंड आल्यावर लावायची ट्यूब घेऊन आला तेही न सांगता! ते पाहून माझा बसलेला आवाज खाड्कन उठून ऊभा राहिला आणि आलेलं तोंड मागे न बघता पळून गेलं.


लघुकथा क्र. ५२ - निर्णय त्यागाचा

सुदर्शन इंजिनिअर होऊन अमेरिकेत सर्व्हिसला होता. दोन तीन वर्षानंतर त्याची पत्नी श्वेता व छोट्या स्वराला अमेरिकेत नेण्याचा योग आला. पासपोर्ट, व्हिसा तयार झाला. सुदर्शन श्वेता हरखून जाण्याची  जय्यत  तयारी करत होते. परदेशात संसार थाटण्याची सोनेरी स्वप्ने पहात होते. आता फक्त आठच दिवस उरले होते. एवढ्यात सुदर्शनच्या आईला कँन्सर झाल्याचे निदान झाले. वेळ न दवडता सुदर्शनने आईचं ऑपरेशन करुन घेतलं व श्वेता व स्वराला सोबत न घेताच आईच्या सेवेला ठेवून, वडिलांना आधाराचे बळ देऊन निघून गेला. सुनेच्या सेवा सामर्थ्याने आई लवकरच खडखडीत बरी झाली.


लघुकथा क्र. ५३ - मोठेपणा मनाचा

धीरज व सूरज दोघे भाऊ. वडील BSNL मध्ये नोकरीत होते. सेवेत असतानाच त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. धीरजने नुकतीच बी. ई. सिव्हिलची पदवी घेतली होती तर सूरज बी.कॉम च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर एकाला नोकरी मिळणार होती. धीरज म्हणाला, "मला  कुठेही नोकरी मिळू शकते, सूरजला मिळणे अवघड आहे, त्यालाच या संधीचा फायदा घेवू द्या. पुढे घरांच्या वाटणीची वेळ आली. एक जुना बंगला होता व एक मोठी एरिया असलेला नवा बंगला होता. सूरज म्हणाला, "जुना बंगला मला व नवा बंगला दादाला". नोकरीच्या वेळी मनाचा मोठेपणा दादाने दाखविला आता बारी माझी मनाचा मोठेपणा दाखविण्याची !


लघुकथा क्र. - ५४ वेगळा संसार नको मला !

रिध्दी सिध्दी दोघी जुळ्या बहिणी. रिध्दीचं लग्न ठरलं. तिच्या लग्नासोबतच सिध्दीचंही लग्न उरकून घेण्याचा आईवडिलांचा विचार होता. तिच्यासाठी एक स्थळ आले. मुलगा इंजिनिअर होता. बेंगलोरला मोठ्या कंपनीत सर्व्हिसला होता. आईवडील, भाऊबहिणी व इतर कुटूंबिय गांवी रहात होते. सर्वांना स्थळ पसंत पडलं कारण सिध्दीला बेंगलोरला राजाराणीचा संसार थाटायला मिळणार म्हणून. एवढ्यात सिध्दी म्हणाली, "मला हे स्थळ पसंत नाही. मला एकत्र कुटूंबात रहायचं आहे. फक्त राजाराणीचा संसार मला नको आहे".


लघुकथा क्र. ५५ - अनोखे आजीप्रेम

रौनकला टायफाईड झाल्याने हॉस्पिटलमध्ये ऎडमिट होता. दुर्दैवाने त्याच्या आजीलाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऐडमिट करावे लागले. रौनकला ते समजताच तो त्यांच्या डॉक्टरना म्हणाला, "डॉक्टर माझ्या हाताचे सलाईन लवकर काढा. मला माझ्या आजीला भेटायला जायचे आहे लगेच". आजीला हे समजताच नातवाच्या प्रेमाने भरून पावली. नातवाच्या मायेचे टाॅनिक मिळताच लवकरच बरी होऊन घरी आली.


अशा या विधायक, सकारात्मक कथा समाजापुढे मांडून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणयाचा माझा प्रामाणिक प्रयत्न !

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

आला श्रावण गाजत

                      आला श्रावण गाजत




आला श्रावण गाजत

सृष्टी डोलाया लागली

नव्या स्वप्नांची चाहूल

       भूमी मातेला लागली ।।१।।


होती मृतिका आतूर

पान फुलांची भुकेली

झेप घेऊनी बियांनी

        पिके डोलाया लागली।।२।।


ऋतूराजा हा लहरी

लपंडाव तो दाखवी

छाया इंद्रधनुष्याची 

       रंग मनास मोहवी ।।३।।


श्रावणाची ही किमया

हर्ष माईना मनात

बळीराजा सुखावला

       कष्ट करूनी रानात।।४।।


सरीवर सरी येती

नदी दुथडी भरली

हर्षे चिमणी पाखरे

         घरट्यात विसावली ।।५।।


रान होताच हिरवे

धनी हरखे मनात

पत्नी पाहते स्वप्नात

          तोडे घालीन हातात ।।६।।


मनोहरी श्रावणात

सुख भोगते सासरी

आठवणी बरसता

         मन ओढते माहेरी ।।७।।


 

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

हे वरदविनायका

                          हे वरदविनायका

 


  

     हे वरदविनायका

    तू सत्वर धावत ये

    अंधार फार झालाय

     त्यांना प्रकाश देण्या ये।


जनता वाईटाकडून

वाईटाकडे जातेय

विज्ञानाचा या अघोरी

उपयोग करतेय ।


बाँबस्फोट, भ्रष्टाचार

सर्वत्र बोकाळलाय

मारामाऱ्या, खून,चोऱ्या

धुमाकूळ चाललाय ।


मानवालाच तू मन

अन् विवेक दिलास

मानवाच्या मनातील

माया,ममता खलास ।


आईबाप वृद्धाश्रमी

बाळे पाळणाघरात

राहताहेत दुःखाने

अश्रू गिळून मनात ।


विद्यामंदिरातही या

गलिच्छ प्रकार घडे

साऱ्या नात्यांचे आदर्श

बेशुद्ध होऊन पडे ।


मोबाईल विळख्यात

गुरफटलीय जनता

आपुलकी व जिव्हाळा

नाही राहिली ममता ।


म्हणून ....

हे वरदविनायका

तू सत्वर धावत ये।

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

पावसाची सर

पावसाची सर



फोटो साभार:गुगल


आली सर पावसाची

बळीराजा सुखावला

ओल पाहुनी मृदेची 

   बीजबाळ सुखावला ।।


कोंब कोवळा अंकुरे

सारुनिया माती दूर

रंग पोपटी लेवून

   त्यांचा आगळाच नूर ।।


सारे शिवार रंगले

वारा येई सोबतीला

बहराचे हितगूज

   कानोकानी सांगायाला ।।


नदी दुथडी भरली 

सारी सृष्टी आनंदली

स्वप्नचाहूल सोनेरी

    झाडावेलींना लागली ।।


इंद्रधनूची कमान

दामिणीचे चकाकणे

डोळे भरुन पहावे

     सृष्टीसौंदर्याचे लेणे ।।


         

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

आमची विहीर

आमची विहीर 


                    

    

       १४ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत हाजी मन्सूर रमजान तांबोळी व परिवार यांच्या कोथळी येथील शेतात विहीर खुदाई संपन्न झाली. या कालावधीत अनेक भल्याबुऱ्या अनुभवांचे झरे लागले. या अनुभवांना शब्दबध्द  केलं आहे आमची कन्या सौ.यास्मीन नौशाद शिकलगार हिने. यास्मीन  बी.ई.   (इलेक्ट्रॉनिक्स ) आहे. कराडमध्ये राहते. विशेष म्हणजे १४ एप्रिल हा यास्मीन चा वाढदिवस आहे.


        त्या दिवशी विहीर खुदाईचा आरंभ झाला. व २५ एप्रिल रोजी विहीरीला पाणी लागले. त्या दिवशी आमची कराडची नात सोहा हिचा वाढदिवस आहे. या लेखाचे एडिटिंग माझी सून सौ. हिना हिने केले आहे. चिरंजीव मोहसीन व सौ. अरमान यांनी तिला सहकार्य केले आहे.

  

        


       माझे आई-वडील शेतकरी कुटुंबातून लहानाचे मोठे झाले त्यामुळे माझ्या वडिलांना शेतीची फार आवड. 31 मे 2010 रोजी माझे वडील दुय्यम निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची शेतीची आवड जोपासण्यासाठी त्यांनी जयसिंगपूर या आमच्या गावापासून जवळ कोथळी येथे सव्वा एकर शेत खरेदी केले. आणि या शेतात ते आवडीने काम व देखरेख करतात शेतीला पाणी शेजारच्या शेतकऱ्याकडून चालू होते पण ऐन उन्हाळ्यात शेताला पाणी मिळत नव्हते व त्यामुळे पिकांचे नुकसान होत होते म्हणून आमच्या कुटुंबाने शेतात विहीर काढण्याचा निर्णय घेतला.  

      

        पाणाड्याला बोलवून शेतातील विहीर काढण्याची जागा निश्चित करण्यात आली. 14 एप्रिल 2025 रोजी सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. त्यानंतर विहीर खुदाई साठी एक मोठे पोकलेन शेतात आणण्यात आले. आणि 19 एप्रिल पासून विहीर खुदाई चे काम चालू झाले. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ सुरू झाली. वडील सकाळी नऊ वाजता डबा घेऊन शेतात जाऊ लागले. आणि दिवसभर विहीर खुदाईचे काम पाहून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येऊ लागले. आठ ते दहा फूट खोदल्यानंतर मोठा खडक लागला, मग त्यानंतर सुरुंग लावून खडक फोडण्याचे काम सुरू झाले. आणि 25 एप्रिल ला दुपारीच घरी आनंदाची बातमी कळली. पाणी लागलं घरातील सर्वांना फार आनंद झाला. काम करू देत नव्हतं एवढं पाणी लागलं होतं. मग पाण्याची मोटर खरेदी केली आणि मोटर लावून पाणी शेजारील शेतात सोडले इकडे वीर खोदायचे काम चालू होते. हे काम  उमेश पाटील यांना दिले होते. वीहीर खुदाई, सुरूंग लावायचं काम जोमात चालू होतं. माझ्या वडिलांची व भावाची धावपळ होत होती. भाऊ नोकरीत असल्याने तो पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. पण वडिलांची एकट्याची धडपड सुरू होती आमची शेती पाहणारे सुकुमार चिंचणे व त्यांचा मुलगा चेतन यांची मोलाची साथ मिळाली. 

       

        25 ते 30 फूट विहीर खोदून झाल्यानंतर आणखी सात ते आठ फूट विहीर खोदायचा निर्णय घेतला. त्यानंतर भरपूर अडथळे येऊ लागले एक दोन वेळा खुदाई करताना पोकलेनचे दात तुटले, पोकलेन कामगार व सुरूंग लावणारे कामगार हेही काम हळूहळू करत होते.

         

        घर पहावे बांधून, लग्न पहावे करून, आणि विहीर पहावी खोदून अशी आशयाची म्हण आहे पण अशी म्हण का बरं आली असावी याचा प्रत्यक्ष अनुभव आला. कदाचित या तिन्ही गोष्टी करताना होणारी धावपळ, होणारा त्रास, लागणारा वेळ, घ्यावे लागणारे कष्ट, इत्यादी आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं अनिश्चित स्वरूपाचे बजेट आणि काम पूर्ण होईपर्यंत होणारा प्रचंड मानसिक त्रास होतो तो वेगळाच. 

       

        साधारण 18 मे पर्यंत विहीर खुदाईचा अंतिम टप्पा पार पडला त्यानंतर दोन-तीन दिवस पाईपलाईन व इतर कामे पार पडली. विहिरीच्या चारी बाजूंनी जाई करण्यात आली.

     

       25 मे ला सर्व नातेवाईकांना विहीर पाहण्यासाठी व स्नेहभोजनासाठी शेतात बोलवायचे ठरले सर्व तयारी करण्यात आली. परंतु 20 मे पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस विश्रांती घेत नव्हता. हिरवी पाने हिरवी राने, हिरवी शेती, हिरवी मने,... पण हे वरूण राजा थोडी उसंत घे आणि आमच्या शेतातील स्नेहभोजनाचा  कार्यक्रम पार पडू दे. अशी सर्वांची मनोकामना झाली. त्यानंतर कार्यक्रम पुढील आठवड्यात घेण्याचे ठरले.

       

       माती सुपीक आणि बियाणं सकस असेल तर उगवलेले रोप सशक्त होतंच. सुपीक माती म्हणजे आमचे शेत आणि सकस बियाणे म्हणजे माझ्या आई-वडीलांचे  विचार आणि सशक्त रोप म्हणजे  शेतातील पिक. ते रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यातून आलेले शेती विषयाचे भान माझे आई-वडील त्यांच्या माझ्या आणि पुढच्या पिढीला देऊ पाहतायत.

     

         25 मे ला पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर माझा भाऊ व बहिण शेताकडे गेले. तेव्हा आमची विहीर तुडुंब भरली होती ते पाहून खूप समाधान झाले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम 31 मे 2025 रोजी पार पडला.        


प्राऊड ऑफ यू माय फॅमिली फॉर कम्प्लिटिंग फार्म ऑफ हॅपिनेस 

     माझ्या माहेरी हत्ती ऐश्वर्याचा झुले ,

     आई-वडिलांची शेती प्रेमाणे फुले 


      विहीर आमच्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नाही, तर हृदयातील एक भावना आहे. शेतीच्या प्रवासातील आमची साथीदार आमची विहीर भविष्याची नांदि व्हावी ही सदिच्छा!

शनिवार, २६ जुलै, २०२५

पुस्तक परीक्षण आठवण ( कथा संग्रह )

                 ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


पुस्तक परीक्षण
आठवण ( कथा संग्रह )

लेखक- श्री.आबासाहेब सूर्यवंशी

            निवृत्त शिक्षणाधिकारी

प्रकाशक - सुनंदा प्रकाशन , 

                     जयसिंगपूर

पृष्ठे - ९५

मूल्य - १५० रूपये

प्रथमावृत्ती - ३० मार्च २०२५


      लेखक श्री. आबासाहेब सूर्यवंशी यांचा ' आठवण ' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहामध्ये वीस कथांचा समावेश आहे. हे पुस्तक न थांबता एकाच दिवसात वाचले. माझे पती मन्सूर तांबोळी  यांना वाचनाची विशेष आवड नाही. पण त्यांनीही पुस्तक वाचायला घेतल्यावर एकाच दिवसात वाचले. हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. छोटेखानी कथानक , अनुरूप भाषाशैली , मजेशीर प्रसंग , जिज्ञासा वाढविणारी लेखन शैली या सर्व वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी नटलेल्या कथा वाचतांना अजिबात कंटाळा येत नाही.

    

        या कथासंग्रहातील अस्सल नक्कल , लिफ्ट , लोकप्रतिनिधी , स्पर्धेतील आजोबा , एक एप्रिल , योगायोग , आमचा जीवघेणा प्रवास , एक होता मोहम्मद रफी , राग उथळ प्रेम निथळ , तर आज मी नसतोच , नवरदेवाचा बूट , शिक्षण आणि संस्कार या बारा कथा लेखकांच्या जीवनातील जिवंत अनुभव आहेत. त्यामुळे या कथा वास्तव वाटतात. प्रसंग प्रत्यक्ष पहात आहोत असे वाचतांना वाटते. प्रत्येक कथा  वाचकांना कांही संदेश देवून जातात. या कथा आवडण्याचे दुसरे कारण कथा प्रसंगानुरूप चित्रांमुळे अधिक बोलक्या झाल्या आहेत.


        अस्सल नक्कल कथेमध्ये जातिवंत कलाकार भेटतो , जो अधिकाऱ्यानाही क्षणभर फसवतो. लिफ्ट कथेमधून लिफ्ट देतांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मिळतो. स्पर्धतील आजोबा मधून नातवंडे म्हणजे आयुष्याचा बोनस असतो , त्यांच्यासाठी आजी आजोबा कांहीही करु शकतात हे समजते. एक एप्रिल या कथेतून एकाद्याची गंमत दुसऱ्याला प्रचंड मानसिक त्रास देऊ शकते हे कळते. आमचा जीवघेणा प्रवास  जगात अजूनही चांगल्या व्यक्ती आहेत याची जाणीव करून देते.

    

      मला सर्वात जास्त आवडलेली कथा आहे ' राग उथळ प्रेम निथळ ' लाख मोलाची सद्या दुर्मिळ झालेली एकत्र कुटूंबपद्धती या कथेत लेखकांनी खुबीने मांडली आहे. पत्नीला मारझोड करणे हा पुरूषांचा जन्मसिद्ध हक्क मानला जात होता ही वास्तविकता लेखकांनी हुबेहूब मांडली आहे. कथेचा शेवटही गोड केला आहे. शिक्षण आणि संस्कार मध्ये शिक्षणाधिकारी या नात्याने शिक्षण व संस्काराचे महत्त्व पटवून दिले आहे. शिक्षणातील गाभाभूत घटकांचे विवेचन केले आहे.

    

     हाँटेल सलून ही विनोदी कथा छान मनोरंजन करते. भूस्खलन ही कथा नैसर्गिक आपत्तीची भयानकता दाखवते. ह्रदय पिळवटून टाकते.

       

      सद्याचे जग हे धावते जग आहे. कुणालाच सद्या वेळ नाही. क्रिकेटवेड्या लोकांनाही हल्ली पाच दिवसाची कसोटी आवडत नाही , ट्वेंटी ट्वेंटी आवडते. हे ओळखून लेखकांनी थोडक्यात पण आशयपूर्ण कथा लिहिल्या आहेत.


      लेखकानी कांही सुंदर वाक्यांची सुरेख पेरणी केली आहे. ती अशी स्पर्धेतील आजोबा या कथेत ते म्हणतात ' माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असणारी माझी तरुण वृद्ध  पत्नी , सत्तरीतला मी .' आमचा जीवघेणा प्रवास या कथेत ते म्हणतात ' नवऱ्याच्या भरघाव गाडीला बायकोचा अर्जंट ब्रेक ' अशी म्हण संसारात आणि प्रवासातही महत्त्वाची हे मला पटून चुकले.


     एक होता मोहम्मद रफी या कथेत ते म्हणतात ' परमेश्वर कोणाला कांही देताना जातधर्म पहात नाही. प्रत्येक माणसाजवळ असे काहीतरी असतेच असते. फक्त आपण ते ओळखणे गरजेचे आहे.'


      थोडक्यात उत्कृष्ट बांधणीचे , सुंदर मुखपृष्ठ असलेले , रेखीव मुद्रण व आशयपूर्ण कथा असलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित आवडेल अशी मला आशा वाटते.

लेखकांना पढील लेखनकार्यास हार्दिक शुभेच्छा ।