दसरा सण मोठा
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
दसरा सण मोठा। नाही आनंदाला तोटा।
असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. या सणाच्या वेळी धो धो कोसळणारा पाऊस थोडासा कमी झालेला असतो. नद्यांचा पूर ओसरलेला असतो. वातावरणात सर्वत्र एक प्रकारचा प्रसन्न, आनंदी व आल्हाददायक सुगंध दरवळत असतो. आकाश निरभ्र झालेले असते. शेतामध्ये ज्वारी-बाजरीची, भाताची पिके मजेने डोलू लागतात. झाडे फळाफुलांंनी बहरून गेलेली असतात. अशा सुंदर वातावरणात नवरात्रीची सुरुवात होते. दहाव्या दिवशी दसरा येतो. आश्विन शुद्ध दशमीचा दिवस विजयादशमी किंवा दसरा या नावाने साजरा केला जातो. विजयादशमीला सीमोल्लंघनाचा दिवस किंवा शिलंगणाचा दिवस असेही म्हटले जाते.
पूर्वीच्या काळी अनेक शूर, पराक्रमी राजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वारीसाठी निघत. अन्य राज्यांवर हल्ला चढवत. याला सीमोल्लंघन असे म्हणतात. आपल्या गावाची सीमा ओलांडून दुसऱ्याच्या हद्दीत जाण्याची सुरुवात करणे म्हणजेच सीमोल्लंघन होय.
पांडवांचा अज्ञातवास संपला. त्यांनी विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले व त्या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली आपली शस्त्रास्त्रे परत धारण केली असे महाभारतात नमूद आहे. म्हणून दसरा सणाच्या पूर्वी या घटनेची आठवण म्हणून खंडेनवमी हा सणही साजरा केला जातो. या दिवशी आपल्या घरात वापरली जाणारी सर्व हत्यारे काढून ती स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते. खंडेनवमीच्या निमित्ताने घरातील विळी, कोयते, खुरप्या, कात्र्या, कुऱ्हाडी, खोरी इत्यादी सर्व हत्यारे स्वच्छ व चकचकीत बनतात.
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही कामात यश मिळणारच अशी श्रद्धा आहे. विजयादशमी म्हणजे विजय देणारा दिवस मानला जातो.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठे सरदार स्वारीवर निघायचे. इसवी सन १६३९ साली याच दिवशी शहाजीराजे, जिजाऊ आणि शिवाजीराजे यांना घेऊन बेंगलोरला गेले होते. इ. स. १६५६ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर लढाई करून शिवरायांनी सुपे प्रांत काबीज केला. इ. स. १७२६ मध्ये याच दिवशी थोरल्या बाजीरावांनी निजामवरील मोहिमेसाठी प्रस्थान केले होते. शिवरायांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीचा उत्सव सुरु केला. नऊ दिवस हा उत्सव मोठ्या धामधुमीत आजही साजरा केला जातो. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानी माता यांचा नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे.
पुण्यातील पेशवेकालीन दसरा:
पुण्यात पेशवाईच्या काळात हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा होत असे. हत्ती, घोडे, उंट यांना या दिवशी स्वच्छ धुवून सजविण्यात येई. दुपारी शनिवारवाड्यात समारंभपूर्वक शस्त्रांची पूजा केली जाई. या दिवशी नवा भगवा झेंडा आणि जरीचा पटका उभारून पूजा होत असे. सायंकाळी पालखी मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघत असे. या मोठ्या मिरवणुकीत अनेक सरदार, सरंजामदार, मानकरी नटूनथटून सहभागी होत असत. स्वतः पेशवे अंबारीत बसून मिरवणुकीत हौसेने सहभागी होत असत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पगड्या, शेले आणि रंगीबेरंगी मुंडासे बांधलेले स्वार आपापल्या घोड्यावर स्वार होवून मिरवणुकीबरोबर जात असत. ईशान्येस मुहूर्तावर शमीवृक्षाची पूजा केली जाई. आतषबाजी होई. तोफांची सरबती केली जाई. परत आल्यावर विजयादशमीचा दरबार भरत असे. यावेळी अनेकांना वस्त्रदान केले जाई.
विजयादशमीच्या दिवशी ईशान्येकडे सीमोल्लंघनासाठी जिथे शमीवृक्ष किंवा आपटा असेल तिथे लोक जमतात. शमीची विधीवत पूजा केली जाते. तिथे असलेली आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात. प्रथम देवाला सोने वाहून नंतर घरच्या वडिलधाऱ्यांंना, भावंडांना हे सोने वाटतात.
विजयादशमीला शमी व आपटा या दोन झाडांची पूजा केली जाते. शमी पाप शमवते अशी लोकांची धारणा आहे. पांडवांनी आपली शस्त्रास्त्रे शमी वृक्षात दडवून ठेवली होती. त्यांच्या साहाय्याने त्यांनी कौरवांचा पराभव केला. आपट्याचा वृक्ष आहे तो शत्रूंचा नाश करणारा व सर्व दोष निवारण करणारा आहे. म्हणून त्या दिवशी आपट्याची पूजा करण्याची प्रथा पूर्वजांनी घालून दिली आहे. यातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे... हाच संदेश पूर्वजांनी घालून दिलेला आहे. वृक्षारोपण व संवर्धनाची आणि त्यातून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज असल्याचा संदेश देण्याचा दृष्टीकोन पूर्वजांकडे होता, हे आपल्याला मान्यच करावे लागेल.
दसरा या सणास ऐतिहासिक व पौराणिक परंपरा आहे. त्याचे महत्व सांगणाऱ्या त्या काळानुसारच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत त्या कथांपासून नवा अर्थ, नवा बोध आणि नवा विचार घ्यावा लागेल. विजयादशमीला सीमोल्लंघन, शमीपूजन व शस्त्रपूजा केली जाते, त्या सर्वामागे पूर्वजांनी महत्वपूर्ण घटनांचा आधार सांगितलेला आहे.
पुराणामध्ये दसऱ्यासंबधी एक कथा अशी आहे. प्रभू रामचंद्रांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदांनी प्रभू रामचंद्राना नवरात्र व्रत आचरण्यास सांगितले. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीदेवीने प्रभू रामचंद्रांना दर्शन दिले व सांगितले की, तुझ्या हातून रावणाचा वध होईल. देवीने आशीर्वाद दिल्यानंतर रामांनी नवरात्र व्रत पूर्ण करून दहाव्या दिवशी लंकेवर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्रीदुर्गेने अशाप्रकारे दैत्यांचा पराभव केला. त्यांच्यावर विजय मिळविला तो दिवस नवरात्री नंतरचा दहावा दिवस होता, म्हणून या सणाला विजयादशमी म्हणतात.
विजयादशमीच्या पौराणिक कथा:
पूर्वी गुरुकुल पद्धती ही शिक्षणाची आदर्श पद्धती होती. साक्षात भगवान कृष्ण यांनी सांदिपनी रूषींच्या आश्रमात राहून विद्यार्जन केले. वरतंतू नावाचे एक ऋषी होते. त्यांचा कौत्स नावाचा एक शिष्य होता. वरतंतूच्या आश्रमात राहून कौत्साने विद्यार्जन पूर्ण केले. ऋषींचा निरोप घेऊन घरी परतताना त्याने गुरूंना विचारले, "मुनीवर्य, मी आपल्याला गुरूदक्षिणा काय देऊ?" गुरू म्हणाले, "काहीही नको, मी शिकवलेल्या विद्येचा योग्य उपयोग कर, म्हणजे झाले."
कौत्स म्हणाला, "तसं म्हणू नका..? कांहीतरी मागा."
"मग चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे." निर्लोभी मुनीवर्य रागानेच म्हणाले.
कौत्स, मुनींच्या आश्रमातून जो बाहेर पडला तो थेट रघू राजाकडे गेला. रघू राजाने नुकतेच विश्वजित यद्न्य केले हौते. त्यामुळे त्याचा खजिना रिकामा होता. त्याच्याजवळ फक्त एक मातीचं भांडं होतं पण अतिथीला रिक्त हस्ते परत पाठवण्याची रघुकुलाची रीत नव्हती. रघुने कुबेरांशी युद्ध करण्याची तयारी केली. तेंव्हा कुबेराने रघूशी युद्ध टाळण्याच्या दृष्टीने आकाशातून सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला. तेंव्हा रघू कौत्साला म्हणाला, "आपल्याला हव्या तेवढ्या मोहरा आपण घ्याव्यात। त्यापैकी नऊ कोटी मोहरा कौत्साने मोजून घेऊन त्या वरतंतू ऋषीना अर्पण केल्या. बाकीच्या मोहरा लोकांनी वेचल्या आणि त्या परस्परांना प्रेमाने दिल्या. त्या दिवशी तिथी होती दशमी. तीच तिथी पुढे विजयादशमी म्हणून साजरी होवू लागली. त्या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पाने वाटू लागले. ज्या झाडावर सोन्याचा पाऊस पाडला गेला, ते झाड होते आपट्याचे. म्हणून या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटून आणतात ते सोने देऊन परस्परांना शुभेच्छा देऊन वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. दातृत्व, गुरुविषयी आदर व वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होण्याची शिकवण या सणातून मिळते. शेवटी असे म्हणावेसे वाटते.
आला आला दसरा।
चेहरा करा ना हसरा ।
दुःख, चिंता विसरा।
आनंदाचे मोती पसरा।
👌🙏
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख...
उत्तर द्याहटवा