पती बनले प्रेरणास्थान
२५ मे १९८० साली आम्ही विवाह बंधनात गुंतलो. त्यावेळी मीही शिक्षिका म्हणून कार्यरत होते. मी फक्त एफ. वाय. बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. लग्नानंतर पुढे शिकण्याचा मनोदय व्यक्त करताच त्यांनी कसलीही आडकाठी न घालता परवानगी दिली पण एक सूचना दिली की, तुझ्या शिक्षणाचा नोकरीमध्ये, अध्यापनामध्ये कसलीही कुचराई होता कामा नये. आपल्याला जीवनात स्थैर्य देणारी नोकरी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांची सूचना शंभर टक्के पाळून मी प्रथम श्रेणीत हिंदी शिष्यवृत्ती मिळवून बी.ए झाले.
लग्नाच्या वेळी मी खूपच अशक्त व सडपातळ होते. कॉलेजमध्ये 'वाऱ्यापासून सावधान', 'ग्राईप वॉटरचा अभाव' असे 'फिशपाँड' मला मिळाले होते. मला पाहिल्यावर माझ्यादेखत पतींना लोक म्हणायचे, 'काय बायको पसंत केलीस मर्दा! नुसती नोकरी पाहिलीस वाटतं. अंगात ताकद आहे का तिच्यात नोकरी करायची तरी?' लोकांचे हे बोलणे यांनी चांगलंच मनावर घेतलं व माझं आरोग्य सुधाण्यासाठी पूर्ण लक्ष दिलं. फळं-भाजीपाला यांच्या बरोबरच रात्री भिजवलेली हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे मला सक्तीने खायला लावले. ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनीही काही गोळ्यांचा कोर्स दिला. त्या महागड्या होत्या. नव्या संसाराची उभारणी चालू होती, लग्नासाठी झालेले कर्ज फेडायचे होते. मी गोळ्यांना नको म्हटले तरी पतीराजांनी माझं काही एक न ऐकता तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायला लावला. चार वर्षात नावे ठेवणाऱ्या लोकांची बोलती बंद केली. मला आरोग्याचं सुंदर लेणं मिळवून देणाऱ्या पतीराजांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन.
बीए झाल्यानंतर पुढची आठ-दहा वर्षे संसार नेटका करण्यात, नोकरीत, मुलांच्या संगोपनात व स्वतःचे घर बांधण्यात वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. मग मी बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून एम.ए.साठी एडमिशन घेतले. त्यानंतर सुट्टीतील बी. एड. चा कोर्स सोलापूर येथे जाऊन पूर्ण केला. त्यावेळी पतींसह सर्व नातेवाईकांनी मुलांची जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे मी एम.ए. बी एड. झाले. माझा मुलगा मोहसीन बीकॉमचा अभ्यास करत होता. कन्या अरमान डी. एड.चा कोर्स पूर्ण करत होती व छोटी कन्या यास्मीन बी. ई (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यास करत होती. मी पी.एच. डी. होण्याची मनीषा व्यक्त करताच मुलांसह पतीराजांनी आनंदाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या सक्रिय, भक्कम पाठिंब्यावरच मी उच्चतम शिक्षण घेऊ शकले. पी.एचडी झाले. आज माझ्या हातून जे लेखन कार्य होत आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या पतींना व कुटुंबियांना देते. अशा प्रेमळ, समंजस पतीसाठी मी परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा