'रमजान' महिन्याच महत्व
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरूवात आजपासून होत आहे. रमजान इस्लामी हिजरी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. इस्लामी पंचागांत दिवसाची गणना आणि वेळेचे मोजमाप सुर्याच्या हालचालीचा हिशोब लावून केले जाते, तर महिना चंद्रदर्शनावर आधारित म्हणजेच चांद्रमासावर अवलंबून आहे. इस्लामी परंपरेप्रमाणे सर्व दिवस आणि सर्व महिने शुभ व कल्याणकारी आहेत. परंतु काही दिवस व काही महिने अतिशुभ मानले गेले आहेत. त्यापैकीच एक अतिशुभ महिना रमजान होय. रमजानला इस्लाममध्ये वेगळे स्थान आहे.
कुरआन उतरविण्याचे व आदेशाना ग्रंथीत करण्याचे काम रमजान या पवित्र महिन्यात झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हदीस म्हणजेच पैगंबर वाणीनुसार कुरआनचे एक एक अक्षर वाचणाऱ्यांला या महिन्यात दसपट पुण्य लाभते, अशी मुस्लिम बांधवांची धारणा आहे. त्यामुळे कुरआन वाचनाचे प्रमाण या महिन्यात दसपटीने वाढते. कुरआन वाचून झाल्यानंतर इमानधारक अल्लाहजवळ जी दुआ मागेल ती मंजूर होते, रद्द होत नाही अशी पूर्ण श्रध्दा ठेवून कुरआन वाचन होते.
'रोजा' उपवास इस्लामच्या पाच आवश्यक उपासनांपैकी एक आहे. रमजानचे रोजे चाँद दिसल्यापासून सुरू होतात. रोजे म्हणजेच उपवास करणे याचा अर्थ केवळ उपाशी तापाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जागविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना करण्याचा अगदी मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. रोजे म्हणजे इंद्रियांना वश करण्याचा तप आहे. या महिन्यात वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच, त्यांच्याबाबत विचार करणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, खोटे बोलणे अथवा दुसऱ्याला त्रास होईल असे बोलणे निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे केल्यानंतर वाईट पाहू नये. वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वतःला शिस्तबध्द आणि संयमित ठेवणे आवश्यक आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांति व समाधान मिळविण्याची नामी संधी उपासकाला अल्लाहने दिली आहे.
रमजान महिन्यात रोजाधारकांची मने द्रवतात आणि त्यांच्या नजरेसमोर मानवी जीवनाचे नवे आयाम उभे राहतात. या महिन्यात आपल्या उपासकाला उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत सुर्यास्तापर्यंत ताटकळत ठेवण्यात अल्लाहचे काहीच हीत नाही. परंतु, रोजे राहण्याची ही उपासना उपवास धारकाच्या फारच हिताची आहे. या महिन्यात अल्लाहने रोजेधारकाला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या संधीचे सोने करणे सर्वस्वी रोजेधारकाच्या हाती आहे.
या महिन्यातील संपूर्ण वातावरण पुण्य प्राप्तीच्या प्रयत्नांनी बहरले असल्यामुळे लोकांची मने भलाई, उपकार, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाकडे वळलेली असतात. चांगले मित्र, चांगली पुस्तके, चांगला परिवार ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आणि विचारात बदल घडवून आणतात त्याप्रमाणे या पवित्र महिन्यात अंत:करणपूर्वक केलेली उपासना, उपासनेनंतर मागितलेली दुआ मानवाच्या जीवनात विलक्षण संस्कार घडवून आणते. रोजा राहिल्याने मनुष्य अल्लाहच्या अधिक जवळ जातो. रोजेधारकांना मनःशांती मिळते.
रमजानच्या पवित्र महिन्यात प्रत्येक रोजाधारकाला प्रातः काळापासून उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत रहावे लागते. भुकेलेल्या, तहानलेल्या अवस्थेत माणसाचा रक्तदाब म्हणजेच बी. पी. कमी होतो. पण त्याच्या पुण्याईकडे कल वाढल्याने त्याच्या रक्तात डोपामिनसारख्या विधायक द्रव्याचे प्रमाण वाढते आणि मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या सबल होऊन समाजहितासाठी स्वतःला वाहून देण्यासाठी सज्ज होतो. एवढेच नव्हे तर एका रोजाधारकाकडून या महिन्यात केवळ घेत राहण्यापेक्षा देत राहण्याची सवय लागते. कारण रोजाधारकाकडून जकात, फित्रा, सदका, कफ्फारा, फिदीया, अतिया इत्यादीसारख्या आर्थिक दानधर्माच्या उपासनाही रोजाधारकाकडून सातत्याने करवून घेतल्या जातात. या महिन्यात या सर्व शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि अध्यात्मिक उपासनां सतत महिनाभर करत असल्याने एका श्रध्दावंताच्या जीवनात एक प्रकारची क्रांती घडून येते. तो उपवासधारक विनम्र होण्याचे शिकतो. इतरांच्या भुकेची, तहानेची त्याला जाणीव होते. तो अंतरात्म्यात डोकावून पहाण्यास शिकतो. रोजाधारक एका अदृश्य म्हणजे निर्गुण निराकार शक्तीच्या प्रसन्नतेसाठी ही उपासना करतो. अल्लाह ! सर्वांना रोजे करून यश प्राप्तीसाठी संधी देवो.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा