रविवार, १ मार्च, २०२६

दुआ : एक आत्मिक शक्ती

दुआ : एक आत्मिक शक्ती



          दुआ हा आरबी भाषेतील शब्द असून त्याकरिता मराठी भाषेत पर्यायी शब्द शोधणे कठीण आहे. इंग्रजी भाषेत दुआ करीता 'सप्लिकेशन' असा शब्द आहे. दुआ म्हणजे अल्लाहचरणी दीनपणे याचना करणे, नम्र प्रार्थना करणे, नम्र विनंती करणे दुआ म्हणजे फक्त अल्लाहला ध्यानीमनी ठेवून आपल्या गरजा मांडण्याची आणि त्या साकार होवोत हे मागण्याच्या उपासनेचे नाव आहे. मुस्लिम बांधव प्रत्येक नमाजनंतर, कुरआन पठणानंतर ईदच्या दिवशी, शबेकद्रच्या रात्री, शुक्रवारच्या दिवशी, बिकट प्रसंगी दिवस आणि रात्रीच्या कुठल्याही प्रहरी अल्लाह समोर हात पसरवू शकतो आणि जे पाहिजे ते सर्व अल्लाहकडून मागून घेवू शकतो. तो देणारा जबरदस्त आहे. आपणास त्याच्याकडून मागता आले पाहिजे.


         अल्लाहचे म्हणणे आहे की, 'माँगनेवालो को हम दुनिया भी नयी देते है।' अल्लाहजवळ मागण्यासाठी कुणी मध्यस्थ लागत नाही. त्याचा उपासक त्याच्याबरोबर संपर्क साधू शकतो. एकदा अल्लाहशी संपर्क प्रस्थापित झला तर याचकाचे मन स्वतः ग्वाही देते की तो अल्लाहच्या संपर्कात आहे. ज्याच्याकडे कोट्यवधी माणसांनी मागितले आहे मात्र त्या दात्याच्या खजिन्यात कणमात्रसुध्दा कमतरता आली नाही. याच अल्लाहकडे पीर-फकीर आणि सम्राटांनी मागितले आहे. प्रेषित पैगंबरांनी मागितले आहे. प्रेषित आदम, नूह, इब्राहिम, मूसा, ईसा आणि तमाम प्रेषितांचे सरदार हजरत मुहम्मद सलेलल्लाहु अलैवस्सलाम यांनी सुध्दा मागितले आहे. त्या दात्याकडे अशी प्रथा नाही की त्याने फक्त दिग्गजांना द्यावे आणि दीन-दुबळ्यांना इन्कार करावा तो देणारा आहे त्याला मागणारा हवा आहे. त्याच्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रध्दा राखणारा हवा आहे. मागितली जाणारी वस्तू मात्र निषीद्ध नसावी. मानवतेकरीता आणि सृष्टीकरीता हानिकारक नसावी.


         दुआ मागत असताना एकचित्त रहावे. मागण्यांचे प्रदर्शन नसावे. आरडाओरड किंवा गोंगाट करता कामा नये. त्यात दिखावा नको. त्यात ढोंग किंवा दगलबाजी नको तो देणारा असला तरी आपल्या ऐपतीपेक्षा जास्त मागू नये. एखाद्या मजूराने जागतिक सत्ता किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या मालकाचा वध करण्याची शक्ती मागू नये. मागण्यात सर्वात उत्तम मागणी मरणोत्तर सफलतेची मागणी आहे. मोक्षप्राप्तीची मागणी आहे. कारण खरे जीवन मरणोत्तर जीवन आहे. त्याकरीता सत्कर्माबरोबरच 'दुआ'चीही साथ हवी आहे. पवित्र कुरआनचे सुप्रसिध्द भाष्यकार आणि भाषाशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल्लाह अब्बास नदवींच्या मते, "दुआ अर्थात प्रार्थना ही श्रध्दावंतांची एक मोठी शक्ती आहे. श्रध्दावंतांचा फार मोठा सहारा आहे. दुआ श्रध्दावंतांची तलवार ही आहे आणि दुआ हीच श्रध्दावंतांची ढालसुध्दा आहे. दुआच्या तलवारीनेच तो हल्ला चढवितो आणि दुआच्या ढालीवरच तो शत्रूचे वार रोखतो. दुआ उपासकाला अल्लाहकडून मिळणारी एक महान पात्रतात आणि सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य अल्लाहच्या प्रिय लोकांनाच प्रदान करण्यात येते. यालाच तौफिक म्हणतात. तौफिक अल्लाहच्या मान्यता प्रक्रियेला असे अच्छादित करते जसे पावसाआधी पाण्याच्या थंडगार थेंबांनी भरलेले ढग तहानलेल्या जमिनीला अच्छादित करतात. इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना आणि दुरूद म्हणजे हजरत मुहम्मद पैगंबरसाहेबांवर पाठविले जाणारे स्तुतीपर सलाम व प्रार्थना ही दोन्ही दुआची आभूषणे आहेत. दुरूद स्वतः एक अत्यंत प्रेरणादायी उपासना आहे. एक अशी याचना जी कधीच रद्द होत नाही. आपण अल्लाहच्या दया, कृपा आणि करूणामयी स्वभावावर सदैव विश्वास बाळगला पाहिजे. भाग्य किंवा नशीब अटळ आहे. जी आपत्ती एखाद्यावर येणे पालनकर्त्याने ठरविले आहे, ती आल्याशिवाय रहात नाही परंतू सुरक्षिततेची दुआ आपत्तीच्या त्या अवधीला पुढे ढकलत रहाते. संकट विविध दिशेने आपला हल्ला चढवत असते. परंतू, आपण मागितलेली दुआ त्याच्या मुकाबल्याकरीता सज्ज असते. संकटाला पृथ्वीतलावर उतरू देत नाही.


        संकट यायच्या आधी मागितलेली दुआ संकट आल्यावर मागण्यापेक्षा कितीतरी पटीने लाभदायक आहे. तरूण वयात मागितलेल्या दुआचा दर्जा वृध्दापकाळी मागितल्या जाणाऱ्या दुआपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. दुआ मागितल्यावर माणसाने दुराग्रही आणि गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. दुआ कधीच रद्द होत नाही. यावर विश्वास ठेवला पाहिजे. उचित वेळी त्याचे फलित आपणास मिळते. थोडासा संयम आणि थोडीशी सबुरी बाळगल्याने दुआ या उपासनेचा लाभ मिळतो.


        म्हणून रमजान महिन्यात ईश्वरासमोर (अल्लाहसमोर) अत्यंत लीनपणे दुआ मागण्यात गर्क राहिल्यास त्याला इच्छित गोष्टी प्राप्त होतात. म्हणून रमजानची संधी अत्यंत बलवान आहे. त्यात जे काही मिळविता येईल ते मिळवून घ्यावे. अमीन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा