बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला

 जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला (सकारात्मक दृष्टीकोन)


                            फोटो साभार:गुगल



शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं । 

काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं । 

काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं । 

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं ।

                        सांगा कसं जगायचं ?


        कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या या सर्वश्रुत ओळी जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगून जातात. ग्लास अर्धा भरला आहे असं म्हणता येतं. ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं. ग्लास पूर्णपणे भरलेला नाही असंही म्हणता येतं. या अर्ध्या भरलेल्या ग्लासातील पाण्याने माझी तहान निश्चित भागू शकते असे म्हणत समाधानाने पाणी प्राशन करुन तृप्त होणे हाच जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला. यालाच सकारात्मक दृष्टिकोन म्हणावे व जीवन सुंदर करावे.


       संतोष आणि विनोद हे दोन मित्र फिरायला जातात. वाटेत टवटवीत गुलाबांनी फुललेले एक झाड त्यांच्या दृष्टीस पडते. त्याला पाहून विनोद म्हणाला, "संतोष, ते पहा गुलाबाचे झाड, देव तरी किती दुष्ट आहे पहा, अशा सुंदर फुलांना बोचऱ्या काट्यांवर उभे केले आहे." संतोष म्हणाला." तसं नाही मित्रा हे झाड मुळात काटेरीच होते. आपल्या कृपाळू ईश्वराने या काट्यांवरसुध्दा किती सुंदर फुले निर्माण केलीत!" झाडं तेच काटे तेच, फुलंही तीच पण दोघांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. संतोषचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यामुळे संतोषचे जीवन सुंदर आहे. होय ना ?


दआपल्या संत महात्म्यांनी शिकवण दिली आहे की, 

'ठेविले अनंते तैसेचि रहावे। 

चित्ती असू द्यावे समाधान।' 

संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज व नरसी मेहता पंढरीत विठुरायांना वंदन करताना म्हणतात,


संत एकनाथ महाराज - 'विठुराया, तू मला किती चांगली अर्धांगिनी दिलीस. तिच्यामुळेच मी भक्तिमार्गाला लागलो. भक्तीत रमता आले.'


संत तुकाराम - विठुराया मला किती छान कजाग अर्धांगिनी

दिलीस. तिच्यामुळेच मला तुझ्या भक्तीत रमता आले.


नरसी मेहता - 'विठुराया, माझ्या अर्धांगिनीला अकालीच मरण दिलेस त्यामुळेच मला तुझ्या भक्तीचा लाभमिळाला. 

         या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य देवाला व दैवाला दोष देत निराशेच्या गर्तेत जीवन जगतात पण संतमहात्म्ये प्रत्येक गोष्टीत समाधान मानतात त्यामुळे त्यांचे जीवन कृतार्थ होते. तुकाराम महाराजांनी जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला 'मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण' या ओवीतून सांगितला आहे. एक हरीबा नावाचा शेतकरी होता. थोडीशी शेती व पशूपालन करुन त्याचा उदरनिर्वाह कसाबसा चालायचा. गेली वीस वर्षे त्याने पंढरीची वारी कधी चुकवली नव्हती. एकदा तो वारीत अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर घरुन फोन आला की, त्याच्या दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हरीबाला फार दुःख झाले. कारण ती म्हैस म्हणजे त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार होता. वारी अर्ध्यावर सोडून तो घरी परत जाण्यासाठी निघाला एवढ्यात एक सद्गृहस्थ त्याच्यासमोर उभा राहिला व म्हणाला, "हरीबा, विठुरायाचे आभार मान, तुझी श्रध्दा अशी डळमळीत होवू देऊ नकोस" हरीबा म्हणाला, "हेच फळ दिले का विठुरायाने माझ्या भक्तीला म्हणून त्याचे आभार मानू का?" सद्गृहस्थ म्हणाले, "हरी अरे विठुरायाच्या कृपेने तुझा जीव वाचला. तुझ्या म्हैशीचा मृत्यू सर्पदंशाने झाला. तू तर नेहमी म्हैशीच्या बाजूला गोठ्यातच झोपतोस ना? तुझ्या जीवावर आलेलं संकट त्या मुक्या माऊलीने आपल्या जीवावर घेतले. इतके दिवस तुझा संसार चालविला व जाताना तिची लेक तुझ्या पदरात घालून गेलीय. तिचा सांभाळ कर, ती तुझा संसार चालवेल." हरीबाच्या डोक्यात प्रकाश पडला व तो आनंदाने 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत नाचू लागला, एवढ्या-तेवढ्या कारणाने आपण देवाला दोष देतो, चिडतो, वैतागून जातो असे न करता असे करण्यामागे देवाचा काहीतरी उदात्त हेतू असावा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जीवन अधिक सुंदर होईल, होय ना?


        प्राप्त परिस्थितीत जीवन सुंदर करणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर श्री. व सौ. बाणदार मॅडम्. गेली ४२ वर्षे गोरगरीब जनतेची अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि अखंडपणे सेवा करत आहेत. त्यांच्या एकुलत्या एक १९ वर्षाच्या डॉक्टर बनू पाहणाऱ्या उमद्या तरुण मुलाचं अपघाती निधन झालं. प्रयत्नांची शर्थ करुनही तो वाचला नाही. सारा परिसर दुःखाच्या सागरात बुडून गेला. डॉक्टरांचे नातेवाईक, पेशंट सगळे आक्रोश करत होते पण डॉक्टर दीपस्तंभासारखे उभे होते. खरं तर जीवन उद्ध्वस्त होण्याचा तो प्रसंग पण अशा वेळीही डॉक्टरांनी मशिदीसमोर लाडक्या पुत्राची डेडबॉडी ठेवून शांतपणे नमाज अदा केली. 'ज्यानं आम्हाला पुत्र दिला., त्यानंच त्याला नेलं असं मानून, पुन्हा रुग्णसेवा सुरु केली. आजही सुरु आहे. आभाळाएवढं दुःख उराशी बाळगून रुग्णसेवा करण्यात रमणारे डॉक्टर जीवन सुंदर असल्याचा मंत्रच देतात. चार वर्षापूर्वी डॉ. मॅडमांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. लक्षणे ओळखून डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेले. व आधुनिक उपचार केले. उपचारा दरम्यान मी त्यांना म्हणाले, "डॉक्टर, हे काय झालं हो, तुम्ही दोघेजण रात्रंदिवस रुग्णसेवा करता, त्यांच्या वेदना दूर करता आणि तुमच्याच वाट्याला हे नवीन संकट कसे आले हो ?" मला मध्येच थांबवत डॉक्टर म्हणाले, "असं नाही समजायचं मॅडम्, आम्ही उपचार करत असलेल्या सर्व पेशंटच्या सदिच्छेने व आशिर्वादाने, ईश्वर-अल्लाहच्या कृपेने आमच्या मॅडम या व्याधीतून मुक्त झाल्या आहेत. त्यांची तब्बेत सुधारत आहे. लवकरच बऱ्या होऊन त्या रुग्णसेवेत रुजू होतील." डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी भारावून गेले व जीवन सुंदर करण्याचा नवा कोरा फॉर्म्युला घेऊन आले.


        सुप्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या बालपणातील एक प्रसंग. ते ज्या कॉलनीत रहात होते. त्या कॉलनीतील सर्व घरे स्लॅबची होती. त्यांचे एकुलते एकच घर पत्र्याचे होते. हे छोट्या गणेशच्या जेंव्हा लक्षात आले तेंव्हा त्याने आईला विचारले की, "आई सर्वांची घरे स्लॅबची आणि आपलेच घर पत्र्याचे का?" त्यांची आई त्यांना म्हणाली, "बाळा तुझे वडील शिक्षक आहेत" गणेश मध्येच म्हणाला, "शिक्षकांनी स्लॅबच्या घरात रहायचं नसतं का?" आई शांतपणे म्हणाली, "बाळ, तुझे वडील भूगोल शिकवतात. तुला सर्व ऋतूंची ओळख व्हावी म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे. पत्र्याच्या घरात पाऊस आला की लगेच कळते, उन्हाळा आला की पत्रे तापतात, घामाच्या धारा निघू लागल्या की उन्हाळा सुरु झाल्याचे कळते. स्लॅबच्या घरात पावसाळा, उन्हाळा कळतच नाही. म्हणून आपले पत्र्याचे सुंदर घर पप्पांनी उभं केलंय." या ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य स्त्रीने घर बापाचा उद्धार केला असता पण तिला जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला कळला होता ना ?


          आयुष्य जसे समोर आले आहे तसे आनंदाने स्वीकारावे, जीवनात घडलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल खेद किंवा खंत बाळगू नये. कारण जीवन जगणं हीच मुळात अत्यंत सुंदर गोष्ट आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाचा, अनुभवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, जीवन समजून घेणं हीच उत्कट आणि आनंददायी बाब आहे.


रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

माझी सोनुली-सोनुली

 माझी सोनुली-सोनुली

       


                                 फोटो साभार: गुगल



         नको नको, पाहू या नंतर म्हणत ढकलत पुढे नेलेला माझ्या आयुष्यातील तो सोनेरी क्षण आला. माझ्या माहेरच्या अंगणाची सय संपली. २५ मे १९८० रोजी माझा भैय्या सौ. बिस्मिल्लाशी व मी मन्सूरसाहेबांशी एकाच मंडपात, एकाच मुहूर्तावर विवाहबध्द झालो. मला समजून घेणारे समजूतदार-समंजस, आमच्याप्रमाणेच गरिबीचे चटके सोसलेले जीवनसाथी मला लाभले. सुखा समाधानाचा संसार सुरू झाला. आर्थिक परिस्थितीची रेल्वे सुधारणेच्या रूळावरून झुक् झुक् करत धावू लागली. हे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये क्लार्क पदावर विटा ता. खानापूर जि. सांगली येथे कार्यरत होते. माझी प्रेमळ आजी लग्नानंतरही माझ्यासोबत होती कारण हे वीकएंडला इकडे यायचे. 'आजीची फार लाडकी आहेस नांदायला जाताना बरोबर नेणार का ?' असे लहानपणी लोक विचारायचे. त्यांना आता मी म्हणून दाखवायची 'बघा आजीला आणलय की नाही सासरी'.


        मातृत्व हा स्त्रीला मिळालेला सर्वात श्रेष्ठ, सर्वांत सुंदर अलंकार आहे. १९८२ सालाच्या सुरूवातीलाच मला मातृत्वाची गोड चाहूल लागली. दोन्ही परिवार आनंदात बुडून गेले. सर्वांनी खूप कोडकौतुक केले. माहेरच्यांनी आर्थिक ओढाताण असतानाही थाटामाटात डोहाळजेवण केले. माझी आई डिलेव्हरीसाठी माळवाडीला नेण्यासाठी आली. हे आईला म्हणाले, "तुमच्या गावात दवाखान्याची सोय नाही. इथेच राहू द्या तिला तुम्हीच इकडे या रहायला." आई म्हणाली, "जावईबापू आमच्या गावात दवाखाना नाही म्हणता हे अगदी बरोबर आहे पण आमच्या गावातील सर्व स्त्रियांच्या डिलेव्हरी सुखरूप होतात म्हटलं, तुमच्या बायकोची व बाळाची आम्ही काळजी घेवू." आईच्या या वक्तव्याने हे निरूत्तर झाले व मला आई माळवाडीस घेवून गेली.


        ६ सप्टेंबर १९८२ रोजी परमेश्वराने मला पहिल्यांदा आई होण्याचा बहुमान दिला. अतिशय अशक्त असलेली मी पहिलटकरीन असून घरात सुईणीच्या देखरेखीत आई झाले. आईवडिलांना खर्च नको, त्रास नको या तीव्र इच्छाशक्तीमुळे डिलेव्हरीच्या अनंत यातना सोसण्याचं बळ देवाने दिले. एका छान, नाजूक, गोऱ्यापान गुलाब कळीने माझ्या पोटी जन्म घेतला. बाळाचं सुहास्य मुख पाहताच सर्व वेदना विसरून गेले. आई झाल्याच्या धुंदीत मी स्वर्गीय आनंदात डूंबून गेलेली असतानाच बाळाला न्हायला घालताना तिच्या पाठीवर जखम असल्याचे निदर्शनास आले. आई-आजी-वहिनी आपसात कुजबुजू लागल्या. फॅमिली डॉक्टरांना दाखवताच ते गंभीर झाले व माझ्या काळजात चर्र झाले त्यांनी तिला सांगलीतील चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉ. करमरकरना दाखवा असे सांगितले. मला व बाळाला घेवून स्पेशल गाडी करून जाण्यासारखी परिस्थिती नसल्याने गावात मुक्कामाला येणाऱ्या एकुलत्या एक एस.टी.ने माझी आई व मावस बहीण बाळाला घेवून गेल्या. डॉक्टरांनी सांगितले की या बाळाला लवकरात लवकर सिव्हील हॉस्पिटलला एडमिट करा. खूप चिंता वाटली. हे आल्यावर पाचव्या दिवशीच एस.टी.ने सिव्हिल हॉस्पिटलला घेवून गेलो. 


       एवढ्याशा चिमुकलीला घेवून एक्स रे, ब्लड टेस्ट, युरिन टेस्टसाठी इकडे तिकडे फिरावे लागले. बाळाला घेवून मी पाचव्या दिवशीच भरभर जीने चढत धावू लागले. पुढचे बारा दिवस एडमिट करावे लागले. बाळाला चिल्डून यार्डात एडमिट करावे लागल्यामुळे त्या ठिकाणी फक्त बाळासाठी तयार केलेले कॉटस होते. मला त्यावर झोपता येत नव्हते. हवं असेल तर तुम्ही डिलेव्हरीच्या वार्डात एडमिट व्हा. बाळ इथेच राहील असे सांगण्यात आले. इवल्याशा बाळाला तिथे सोडून जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे मी दिवसभर बाळाजवळ बसून रहायची. परमेश्वराचा धावा करत. दर पंधरा मिनिटाला शिकावू डॉक्टर यायचे, स्पेशालिस्ट यायचे, तपासायचे, तपासणी केल्यावरचे त्यांचे चेहरे पाहूनच बाळाच्या तबेत्तीची गंभीरता माझ्या लक्षात येवू लागली. बाळ एक पाय हलवत नसल्याचेही लक्षात आले. काळजी वाढू लागली. माझा छोटा भाऊ सांगलीला कॉलेजला यायचा. येताना जेवणाचा डबा घेवून यायचा पण तो पोहोचायचा साडेआठ वाजता. सकाळी ८ ते १२ वार्डमध्ये एका नातेवाईकाशिवाय कुणालाही थांबायची परवानगी नव्हती. त्यामुळे आई स्टोव्ह तांदूळ घेवून खाली जायची व मी बाळाजवळ थांबायचीं पहाटे उठून केलेला डबा बारानंतर मला मिळायचा. एवढं गार जेवण बाळंतिणीने खायचे नसल्यामुळे मी थोड्याशा गरम् भातावरच भागवत असे. संध्याकाळीही फक्त भातच खावा... लागायचा. हे सर्व मी आनंदाने सहन करत होते. माझ्या  लाडक्या बाळासाठी.


        मला वाटायचे एखाद्या डॉक्टरांनी यावे व म्हणावे या बाळाला काहीच झाले नाही. थोडासाच दोष आहे व तो औषधाने बरा होण्यासारखा आहे. मी बरं करू शकतो या बाळाला. मी डोळ्यात जीव आणून, कान टवकारून उभी असायची आणि डॉक्टर काही न बोलताच निघून जायचे. मी उदास व्हायची. तोपर्यंत बाळ रडायचे, तिला भूक लागलेली असायची. हे पाहून मला माझे बाळ नॉर्मल नाही हे लक्षातच येत नव्हते. तिला बरी कर हे देवाला परोपरीने मी सांगत होते. प्रार्थना करत होते.


       पहिल्यांदा मातृत्वाचं वरदान लाभलेली मी चिंतेचं मोठं गाठोडं डोक्यावर घेऊन परमेश्वराकडे आर्त विनवणी करत होते. बारा दिवसानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला. या कालावधीत यांच्या ऑफिसमध्ये असेलेल्या देवर्षी मॅडम् बाळाला बघण्यासाठी आल्या. येताना एक भाकरी, वरण व भेंडीची भाजी घेऊन आल्या. त्या भाकरीची गोडी एवढ्या वर्षानंतरही मी विसरू शकले नाही. बाळाला मिळालेल्या थोड्याशा पाण्यातच माझेही अंग पुसून घ्यायची. अंगाला पाणी व डोळ्यांना झोप क्वचितच मिळाली. हे सर्व सहन करण्याची क्षमता दिल्याबद्दल देवाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत...


       बघता बघता चाळीस दिवस संपत आले. बाळाला पाळण्यात घालून तिचे नांव, मलिका ठेवले. पाठीची जखम दररोज ड्रेसिंग केल्यामुळे बरी होऊ लागली. मी शाळेत हजर होण्यासाठी जयसिंगपूरला आले. बाळाला न्हायला घालायचे, ड्रेसिंग करून आजीच्या स्वाधीन करून शाळेत जायची. बाळाला बघण्यासाठी मैत्रिणी, ओळखीच्या स्त्रिया यायच्या बाळाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव मी टिपण्याचा प्रयत्न करायची. त्याचवेळी मला समजायचे माझं बाळ अशक्त आहे. बघायला येणारे प्रत्येकजण वेगवेगळ्या डॉक्टरांबद्दल सांगायचे, आणि दुसऱ्याच दिवशी बाळाला घेऊन आम्ही तिथे हजर रहायचो. मिशन हॉस्पिटलमध्ये खात्रीपूर्वक इलाज होतात हे ऐकून तिथे बाळाला घेवून गेलो. तपासणी नंतर डॉ. यजुर्वेदीनी वस्तुस्थिती सांगितली व हसत हसत म्हणाले, 'मॅडम हिला आहे तोपर्यंत सांभाळा व दुसरा चान्स घ्या'. डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून आभाळ कोसळले, चक्कर आली. पण मी आशा सोडली नव्हती, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक सर्व डॉक्टरांना भेटले बरं करा हो माझ्या सोनुलीला असे कळवळून सांगितले. डॉक्टर म्हणायचे, 'प्रयत्न करू या' चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉ. आनंद भिंगे यांना भेटले व सांगितले, 'डॉक्टर वाट्टेल ते करा, ऑपरेशन करा पण हिला बरी करा.' दोन दिवसांनी त्यांचे मित्र पुण्याहून येणार होते. त्यांना दाखवून बघू या असं डॉक्टरांनी म्हणताच मला आशेचा किरण दिसला, डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेपूर्वीच बाळाला घेऊर हजर झाले. त्यांनी तपासणी केल्यावर सांगितले, 'ऑपरेशन करून फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, उलट आहे त्या स्थितीत औषधोपचार ठेवले तर कदाचित थोडीफार सुधारणा होईल. फॅन चालू असताना दुरुस्ती करणे जितके अवघड तितके हे ऑपरेशन अवघड आहे.' अश्रुंचा बांध आवरत घरी आले. बाळाला मांडीवर घेऊन म्हणू लागले.


बाळा! तुझ्यासाठी स्वर्गात जाऊन मागितली असती दाद

पण जन्म घेतलास कलियुगात, येथे घेतो कोण कुणाची दाद

ईश्वरा, तुला तरी ऐकू येईल कारे माझा साद! 

       

           दिवसामागून दिवस जात होते. बाळाच्या पाठीची जखम पूर्ण भरली. खूप बरे वाटले, पण तो केवळ आभास होता. जखम बरी झाल्यावर बाळाच्या डोक्याचा आकार वाढू लागला. तिला दवाखान्यात नेऊन दाखवणे चालूच होते. १४ जानेवारी १९८३ हा संक्रातीचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. बाळाला डॉ. जमादार यांच्याकडे घेऊन जायचे ठरले होते. बाळ पहारटे उठले होते, दुग्धपान करून झोपवताना टकमक बघत होते. आजी म्हंणाली 'तू लाल स्वेटर घातला आहेस म्हणून बघत असेल'. तिला झोपवून मी ही झोपले सकाळी ६.३० ला आजीने उठवले. मी . उठल्यावर हात हलवणारी मलिका हात का हलवली नाही म्हणून बघते तर माझी मलिका माझा डोळा चुकवून देवाघरी निघून गेली होती. शेजारचे लोक जमा झाले. हे त्यावेळी आटपाडीला होते. फोनची सुविधा नव्हती. आक्रंदन करणाऱ्या मनाला शांत करून, नव्हे काळजावर दगड ठेवून मी शेजाऱ्यांना सांगितले की बाळाचा अंत्यविधी माझ्या माहेरात होईल. तुम्ही आटपाडीला ग्रामपंचायतीतं फोन करा व माळवाडीला येण्यास सांगा व एक रिक्षा ठरवून द्या. शेजाऱ्यांनी फोन करून रिक्षा आणली व शेजारच्या १४-१५ वर्षाच्या रघूला आमच्यासोबत पाठविले. दुःखाने गर्भगळीत झालेली. हातपाय गळालेली आजी थरथर कापत होती. तिला आधार देत, लाडक्या सोनुलीचं कलेवर छातीशी घट्ट धरून मी माहेरी निघाले होते. माझं बाळं पूर्वजांच्या सोबत रहावं. ईदच्या नमाज नंतर नातेवाईकांकडून तिच्या मृतात्माला सलाम मिळावेत ही अपेक्षा ठेवूनच मी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला; कारण माझं सासर माहेरच्या मानाने खूप लांब होते. माहेरात गेल्यावर आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला..


       त्यावेळी मला जाणीव झाली की जगात अनेक दुःखे आहेत पण सर्वात मोठे दुःख कोणते असेल? तर आई-वडिलांच्या देखत त्यां अपत्याचा मृत्यू. सर्वजण मत्वा धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण उपयोग होत नव्हता. माझे आक्रंदन अखंड सुरू होते. हे पण खूप चिंतेत होते बाळ तर निघून गेलं आता हिला काय झालं तर? माझे भाऊं बहिणी माझ्याजवळ बसून समजावत होत्या. रात्री दहाच्या सुमारास माझा भैय्या शेवटच्या एस.टी.ने आला. मला समजावत स्वतःच खूप रडला. माझ्या डोक्याला हात लावताच माझे डोके खूप गरम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. धाकट्या भावाला सोबत घेऊन बॅटरीच्या उजेडात एरंडीची पाने त्यांनी शोधून आणली. पानांना तेल लावून डोक्यावर रूमालाने बांधली व डोके मांडीवर घेऊन बसला. दिवसभराच्या आकांताने ग्लानी आली. पहाटे जाग आली पहाते तरं काय भैय्या डोके मांडीवर घेऊन बसल्या बसल्या झोपला होता. मनू पायांना तेल लावत बसला होता. भावांच्या या असीम प्रेमामुळेच हे पर्वताएवढे दुःख मी सहन करू शकले.


 परमेश्वराशी संवाद साधताना म्हणत होते 

असूनी कुशल कलावंत, का पाहिलास माझा अंत। 

द्यायचे, नव्हते मला सबळ मातृत्व, 

तर कां घालविलेस व्यर्थ कर्तृत्व !

    

    मलिका.....! गेलीस का? मलिका देवाघरी जणू दाद मागण्यासाठीच निघून गेली असावी. तिच्यानंतर मोहसीनसारखा राजबिंडा पुत्र व अरमान यास्मीन या दोन कोमल कलिका आमच्या संसार वेलीवर उमलल्या. जीवनाला अर्थ आला या तिघांमुळेच....!



       छोट्या मलिका सोबत मी व माझे पती मन्सूर तांबोळी