गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

पुत्र लाभला ऐसा.

        पुत्र लाभला ऐसा.



                         स्व. प्रा.एस.डी.पाटील 



           मी शिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या संस्थेत नवीन शिक्षक भरती झाली. डी.एड्.एम.ए.एम्. विथ् इंग्लिश झालेले एक शिक्षक हजर झाल्याचे समजले. ते कोल्हापुरात 'शिवम्' क्लासेस चालवत असून आठवी ते बारावीचे तीनशे विद्यार्थी व ४-५ शिक्षक त्यांच्या क्लासमध्ये आहेत ते सुपर फास्ट इंग्लिश बोलत असल्याचे ऐकले व त्यांना एकदा पाहण्याची उत्सुकता वाढली. थोड्याच दिवसात सर्व शिक्षकांसाठी एका गटसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. एका ख्यातनाम व्याख्यात्याला कोल्हापूरहून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते पाहुण्यासोबत ऐटीत आले आणि कोणीतरी मला म्हणाले, परवा मी सांगितलं ना ते हेच सर बघा'. सहा फुटापेक्षा जास्त उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व, कमालीचा स्मार्टनेस असलेले शिक्षक पाहून वाटले शिक्षक असावा तर असा !

 

       योगायोगाने १९८५ साली ते सर ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेत माझी बदली झाली. मी पदवीधर अध्यापिका म्हणून पाचवी ते सातवी वर्गावर अध्यापन करणार होते. ते सर पण त्यांना आपण पाटील सर म्हणू त्याच वर्गावर अध्यापन करत होते. माझ्या सहकाऱ्यांनी अंदाज बांधला. पाटील सरांचे क्लासेसमुळे या नोकरीकडे दुर्लक्ष व्हायचे. वेळेवर व नियमित ड्युटी करणे त्यांना जमायचे नाही. या मॅडम ड्युटीला चिकटून असतात. प्रत्येक काम चोख व व्यवस्थित करतात. आता मॅडम व पाटील सर एकत्र काम करणार. मॅडमना त्यांचं काम आवडणार नाही त्यामुळे त्यांच्यात मतभेद होणार व आपल्याला खमंग वादावादी ऐकायला मिळणार. सहकाऱ्यांचा हा अंदाज साफ चुकीचा ठरला.


        सरांचं इंग्लिश चांगलं होतं पण मोठ्या मुलांना शिकवायची सवय असल्यामुळे एबीसीडी पासून शिकवणे त्यांना शिक्षाच वाटायची. वाचन, लेखनात अप्रगत मुलांचा भरणाच असल्यामुळे सर इंग्लिश टू इंग्लिश शिकवू लागले की मुले मुली वर तोंड करून बसायचे सर म्हणाले, पाचवीचं इंग्लिश मॅडम् तुम्हीच घ्या मी हिंदी घेतो मी म्हणाले ठीक आहे. हिंदी विषय शिकवताना त्यांना कांही शब्द अडायचे. आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे मला येऊन विचारायचे, 'मॅडम उन म्हणजे काय? फुलवारी म्हणजे काय? अशाप्रकारे थोडाफार संवाद होऊ लागला. त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं की ते एका मृगजळामागे धावत आहेत. आयुष्याच्या अंतापर्यंत धावलो तरी मृगजळ आपल्याला मिळणार नाही हे ही हुशार असल्यामुळे त्यांना कळत होत पण वळत नव्हतं. ते वळवण्यासाठी अतिशय गोड शब्दात मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. तात्विक पातळीवर माझे बोलणे त्यांना पटायचे पण 'दिल है की मानता नहीं' अशी त्यांची अवस्था व्हायची. असेल ते पाठवा व नसेल ते भेटवा या वृत्तीमुळे आपण सुखी राहू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न मी सोडलेला नव्हता. एके दिवशी बोलता बोलता सर मला म्हणाले, 'मॅडम् एक सांगू का?' मी  म्हटलं, 'सांगा अगदी मोकळेपणानं सांगा'. सर म्हणाले, 'मॅडम् तुमचे सर्व नातेवाईक फार भाग्यवान आहेत'. मी म्हटलं, 'मी नाही समजले'. सर पुढं म्हणाले, 'त्यांना तुमच्यासारखी समंजस, समजून घेणारी जाणती नातेवाईक आहे'. मी म्हटले, 'खरं तर मीच भाग्यवान आहे


        कारण मला नातेवाईकांनी खूप माया, प्रेम  दिलयं'. सर पटकन् म्हणाले, 'मॅडम्  मला तुमचा मुलगा मानाल ?' मी म्हणाले, का नाही मानणार?' आणि त्या दिवसापासून एका उच्चशिक्षित, बुध्दीमान, धाडशी, आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असलेल्या मुलाची आई बनले. माझ्या तीन अपत्यासाठी अल्लाहजवळ जी दुआ मागितली होती. जे धार्मिक वाचन केलं होतं. त्या वाचनाला  सुरूवात केली. सर नियमित शाळेत येऊ लागले. आईने आणलेला पोळी भाजीचा डबा आवडीने खाऊ लागले. कारण क्लासवरून घरी न जाता इकडे येत होते. मृगजळामागे धावणेही त्यांनी कमी केले होते पण ते करताना त्यांच्या मनाची प्रचंड घुसमट व्हायची. मानसिक अवस्था बिघडायची. मी त्यांना एकदा म्हणाले, 'तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे. आपण जाऊ या त्यांच्याकडे ?' सर पटकन् म्हणाले, 'त्या (कोल्हापुरी अस्सल शिवी) ला काय कळतय. तुम्ही मला बरं करू शकता'. माझा आत्मविश्वास आणखीन दुणावला व मी त्यांना माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करू लागले.


        क्लास सांभाळूनही या शैक्षणिक वर्षात नियमित शाळेत येण्याचं वचन त्यांनीच मनाशी ठरवून मला सांगितलं होतं. वर्ष संपायला कांही दिवस बाकी असताना त्यांच्या बाईकला छोटासा ऍक्सिडेंट झाला. पायाला जखम झाली. पाच-सहा टाके पडलेले असतानाही ते शाळेत आले. पत्नीला सांगितलं त्यांनी की मॅडमना मी तसं वचन दिलय मला गेलंच पाहिजे. माझ्याबद्दल असलेला आदर पाहून मी अगदी भारावून गेले. एकदा स्टाफमध्ये त्यांच्या हातून एक चूक झाली. ते खूप डॅशिंग व रागीट असल्याने मुख्याध्यापकांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्याशी वाद घातला. त्यांचा अपरोक्ष अधिकारी चौकशीला आले. त्यांनी मला काय घडलय ते विचारलं. मी त्यांना सत्य हकीकत सांगितली. वर हे ही सांगितल की सरांना त्यांच्या चुकीबद्दल योग्य शिक्षा व्हायला हवी. अधिकारी त्यांच्याच गावचे होते ते सरांना म्हणाले, 'तुम्ही ज्यांना आई म्हणता ना त्यानीच सांगितलय तुम्हाला शिक्षा करायला'. सर त्यांना म्हणाले, 'शी इज माय रियल मदर' हे ऐकल्यावर माझ्या काना अंगावर आई म्हणून मुठभर मांस चढले.


       अशाप्रकारे सर आमच्या कुटूंबाचे एक सदस्य तर बनलेच शिवाय माझ्या सासर-माहेरचेही जवळचे सदस्य बनले. कारण प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी ते आपल्या पत्नी मुलांसह आवर्जून हजर असायचे. एकदा माझी तबेत्त अचानक बिघडली. श्वासोच्छवासास त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. त्यांना समजल्यावर दवाखान्यात आले. मला खूप जास्त त्रास झाला माझं कांही खरं नव्हत असं सांगितल्यावर सर पटकन् म्हणाले, 'तुम्हाला काय करून देवाला वर रहायचं नसेल'. हसावं की रडावं हा प्रश्न पडला मला. पण त्यावेळेपासून मी आजारी पडायचं सोडून दिलं.

        

        गेल्या पंचवीस वर्षात खूप उलाढाली झाल्या. सरांनी मृगजळामागे धावणे कधीच सोडून दिलं. व एका शाश्वत सुखात ते रमून गेले. प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीला रामराम ठोकला त्यांनी पण यशाच्या एकेक पायऱ्या चढतच निघाले. आपला बिल्डिंग डेव्हलपिंगचा व्यवसाय सांभाळत विविध पदे भूषवु लागले. अखिल भारतीय मानवाधिकार संस्थेचे अध्यक्ष झाले माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील व सद्याचे राष्ट्रपती मा.प्रणव मुखर्जी यांच्या समवेत परदेश दौरा करून आले.  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष झाले. शिक्षकांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून शासनासमोर मांडणारा खंबीर शिक्षक नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. शिक्षकांनी आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी हजारो शिक्षकांसमोर 'माझ्यात जे कांही चांगलं आहे ते माझ्या या आईचं आहे. तिनंच मला जगायचं कसं हे शिकवलं. संस्काराची शिदोरी दिली. असं जेंव्हा त्यांनी सांगितले तेंव्हा माझ्या या मानसपुत्राचा मला खूप अभिमान वाटला. मी परमेश्वराला एवढचं म्हणते, 'देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू दे यश दे माझ्या लेकरांना'.

    

        मी ईश्वराजवळ मनोभावे प्रार्थना केली पर एक प्रार्थना ईश्वराला मंजूर करता आली नाही. माझे मानसपुत्र एस डी. पाटील कर्करोगासारख्या असाध्य आजाराने ग्रस्त झाले  ते १३ जून २०१७ रोजी हे जग सोडून गेले. ईश्वर इच्छेपुढे नाईलाज आहे. पण या पहाडीपुत्राची आई होता आले हे ही नसे थोडके।.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा