रोजा इफ्तार: बंधुभावाचा सोहळा
रमजान महिन्यातील रोजा इफ्तारची वेळ हा बंधुभावाचा आगळावेगळा सोहळा असतो.
सायंकाळी पाच वाजता 'असर' ची नमाज (प्रार्थना) झाली की महिलांची स्वयंपाकाची लगबग सुरू होते, कारण रोजा इफ्तारच्या वेळेपुर्वीच स्वयंपाक तयार करावा लागतो. घरातील पुरुष मंडळी रोजा सोडण्यासाठी व तिन्हीसांजेच्या (मगरीबच्या) प्रार्थनेसाठी मशिदीत जाणार असतात. त्यांच्यासाठी दररोज वेगवेगळे पदार्थ करून देण्यासाठी महिला सज्ज असतात.
रोजा सोडण्यासाठी आपापले डबे घेऊन पुरूष मंडळी-मुले मशिदीत जमा होतात. आपल्या डब्यातील पदार्थ रोजा सोडण्यासाठी जमलेल्या सर्वांना वाटतात. त्यामुळे रोजा सोडताना विविध प्रकारचे रुचकर व पौष्टिक पदार्थ सर्वांना खायला मिळतात. कुणाच्या डब्यात गुलगुले, शिरा, उप्पीट, पोहे असतात, कुणाच्या डब्यात केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब, पेरू या फळांच्या फोडी व फणसाचे गरेसुध्दा असतात. कुणाच्या डब्यात मसालेभात, पोळी-भाजी, खिचडी असते. तर कुणी भडंग, चिवडा, फरसाणा, भजी, वडे व समोसे आणलेले असतात. जमलेले सर्वजण हे पदार्थ मिळून-मिसळून आनंदाने खातात. आपल्याला आवडलेले पदार्थ दुसऱ्याच्या डब्यातून हक्काने घेतात. हे पदार्थ केवळ शरीराची भूक भागवतात असे नाही तर मनाचीही भूक भागवतात. एकमेकात बंधुभाव निर्माण करतात.
या सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन तिन्हीसांजेची (मगरीबची) नमाज पढून सर्व बांधव आपापल्या घरी परततात.
छान
उत्तर द्याहटवा