सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पवित्र रमजान मधील सेहरी - विशेष लेख


पवित्र रमजान मधील सेहरी

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       रमजान महिन्यात श्रध्दा, भक्ती व उपासना यांना भरती आलेली असते. सर्वांची मने भक्तिभावाने ओलीचिंब झालेली असतात. एरवी आळस करणाऱ्या सर्वांच्या मनाची पहाटे 'सेहरी' करण्यासाठी गाढ झोपेतून उठण्याची तयारी पक्की झालेली असते. घरातील महिलांना सेहरीचा स्वयंपाक करण्यासाठी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान उठावे लागते. पण हे काम महिला स्वयंस्फुर्तीने व आनंदाने करतात. अंगावर पिणारे लहान बाळ असलेल्या व गर्भवती महिला रोजे (उपवास) करू शकत नाहीत, पण घरातील रोजे करणाऱ्या सर्वांना सेहरीसाठी ताजा स्वयंपाक करून देतात. त्यामुळे अशा महिला अल्लाह मेहरबानीच्या कृपाप्रसादातील वाटेकरी होतात, त्यांनाही रोजांचे सवाब (फळ) मिळतात.


       रोजे (उपवास) करण्यासाठी ४-५ वर्षापासूनची मुले-मुली उत्सुक असतात. रात्री झोपतानाच आईजवळ मला उठव म्हणून हट्ट धरतात. आईने उठवले नाही तरी घरातील हालचाल ऐकून जागे होतात व रोजा धरतात. साडे चौदा तास पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे सायंकाळी कांही वेळ व्याकुळ होतात पण लहानपणापासून त्यांना संयम राखण्याची सवय लागते. अल्लाहची उपासना करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी होते. रोजा केलेल्या आपल्या बालकाचे आई-वडील कौतुक करतात. पहिल्यांदा रोजा केलेल्या बालकांला नवीन कपडे आणतात. हारतुरे घालून त्यांचे अभिनंदन करतात. एकंदरीत रमजान हा महिना सर्व महिन्यांचा 'सरताज' आहे. भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन होण्याची संधी या महिन्यात मिळते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा