समाज सुधारतोय !
गणेशोत्सवातील साधेपणा:
कोरोनाच्या संकटाने जगभर सर्वच गोष्टीना मर्यादा आल्या आहेत. जगाचे आतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मंदीचे सावट सर्व क्षेत्रात दिसू लागले आहे. महागाईने डोके वर काढले आहे. बेकारी वाढली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर धार्मिक सणांंवरही मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनाचं सावट प्रकर्षाने जाणवत असल्याने उत्सवाच्या निमित्ताने होणारी कोट्यावधींची उलाढाल लक्षणीयरीत्या घटली आहे. आकर्षक भव्य मूर्ती, सजावट, देखावे, प्रबोधनात्मक कार्यक्रम यांंसह विविधता जपणाऱ्या मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाचं केली नाही. शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी कटाक्षानं सुरु आहे. वर्षानुवर्षे धामधुमीची परंपरा जपणाऱ्या मंडळानी कोणताही गाजावाजा न करता लहान मंडपात किंवा छोट्याशा पोर्चमध्ये केवळ लहानशा मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाची औपचारिकता पूर्ण केली आहे. यावर्षी वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही दारात फिरकले नाहीत हे समाजसुधारणेचं शुभचिन्हचं मानावं लागेल.
कोल्हापूर जिल्ह्याची सध्य: स्थिती:
कोल्हापूर जिल्ह्यातील एकतीस पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१९ मध्ये ७,३२६ नोंदणीकृत सार्वजनिक मंडळानी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ४० टक्के म्हणजेच ३,१८० मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाच केली नाही. दुःखात काही प्रमाणात सुख दडलेले असते असं म्हणतात हे यावर्षीच्या गणेशोत्सवातून दिसून येते.
हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचा आदर्श:
दुसरी आशादायी व आनंददायी घटना म्हणजे गणेशोत्सव व मोहरम एकत्र साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. कुरूंदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील नागरिकांनी धार्मिक एकात्मता जोपासत मशिदीत भक्तिमय वातावरणात गणपती व पीरपंजाची प्रतिष्ठापना केली आहे. यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजाला मिळत आहे. यातून कुरूंदवाडची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट होत आहे. मोहरममध्ये भेटीसाठी पीर धरण्याचा बहुतांश मान हिंदू समाजातील बांधवांना आहे. खत्तलरात्री अग्नीकुंडातून जाणाऱ्यामध्ये हिंदू बांधवांची संख्या मोठी आहे. कुरुंदवाड चा हा आदर्श आजूबाजूच्या गावातील लोक घेत आहेत.
अशा प्रकारे गणेशोत्सव व मोहरम सामाजिक बांधिलकी जपत काटकसरीने व साध्या पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे समाजसुधारणेची नांदी होय. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य हे प्रगतीचे पहिले पाऊल होय. गणरायांंवर पूर्ण श्रद्धा ठेवून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची ही पद्धत कायम ठेवली तर समाजाचे भले होईल व गणरायानांही ते फार आवडेल. होय ना सुजाण वाचकहो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा