शुक्रवार, २० मार्च, २०२६

बंधुभाव जपणारी ईद

 बंधुभाव जपणारी ईद



सदा हँसते रहो, जैसे हँसते हैं फूल ।

दुनिया के सारे दुःख, तुम जाओ भूल । 

सब तरफ फैले है, खुशियों के गीत । 

इसी आशा के साथ, आपको मुबारक हो ईद ।


          रमजान ईद हा आनंद साजरा करण्याचा, मौज मजा करण्याचा उत्सव. इस्लाममध्ये रमजान ईद हा अतिशय पवित्र व महत्वाचा सण साजरे करतात. एक रमजान ईद. या ईदला ईदुल फित्र असे ही म्हणतात. दुसरा सण म्हणजे बकरी ईद या ईदला ईदुल जुहा असे म्हणतात. ईद म्हणजे आनंद किंवा खुशी व फित्र म्हणजे मुभा किंवा मोकळीक. ईद-उल् फित्र म्हणजे निर्बंध मोकळे झाल्याची, कर्तव्यपूर्ती झाल्याची खुशी वा आनंद होय. रमजानचे तीस दिवस उपवास संपल्यानंतर इस्लामी पंचांगाप्रमाणे एक शव्वालला रमजान ईद साजरी केली जाते. प्रथमतः रमजान ईद अल्लाह आदेशाने ३० डिसेंबर ६२३ साली साजरी केली गेली. ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे.


           या दिवशी सर्व मुस्लिम बंधू भगिनींना सकाळी सूर्य उगवण्याच्या सुमारास सुबहची नमाज पठण करावी लागते व साडे आठच्या सुमारास सर्व बांधवांनी एकत्र येऊन ईदची नमाज पठण करावे लागते. ही नमाज प्रत्येक प्रौढ व सुजाण व्यक्तीवर सक्तीची असून नमाज पठण न करणे शरीअतमध्ये गुन्हा समजला जातो. ही नमाज सामुदायिकरित्या पठण केली जाते. ही नमाज पढण्याकरिता हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम शहराच्या बाहेर मैदानात जात असत. याच प्रथेनुसार सर्व मुस्लिम बांधव भल्या पहाटे उठून शूचिर्भूत होऊन, नवी वस्त्रे परिधान करून, ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज पढतात. नमाज पठण करताना कुणीही मोठा नसतो. कुणी श्रीमंत नसतो, सर्वजण अल्लाहचे उपासक असतात. त्यामुळे गरीब श्रीमंत, छोटा-मोठा, उच्च-नीच, सुशिक्षीत-अशिक्षित असा भेदभाव मनात न ठेवता खांद्याला खांदा लावून एकत्र बसतात व नमाज पठण झाल्यावर एकमेकांची गळाभेट करतात.


         रमजान महिना अत्यंत पवित्र, ईश्वर साधनेचा, दानधर्माचा मानला जातो. या महिन्यात अल्लाह आपल्या कृपावंत हाताने भरभरून रहमत म्हणजे कृपा देतो. आपल्या अनुयायांना त्यांनी केलेल्या चुकांची माफी देतो. या महिन्यात जी व्यक्ती अत्यंत नम्रपणे, भावून वृत्तीने माफी मागते त्या व्यक्तीस अल्लाह माफ करतो. जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित आहे. असा संदेश अल्लाहचे सर्वात लाडके हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांनी सर्व मानवजातीला दिला आहे.


           या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याचे रोजे म्हणजे उपवास करतात. सेहरीपासून इफ्तारपर्यंत इबादत केली जाते. या महिन्यात एक आम मुस्लिम बंधू-भगिनींच्या दिनचर्येची सुरूवात पहाटे ३ ते ४ वाजता सुरू होते. यावेळी भोजन पहाटे चार ते साडेचारच्या आधी करावे लागते. या भोजनाला सेहरी म्हणतात. सेहरी नंतर सकाळी सुबहची नमाज असते. त्यानंतर सकाळपासून दैनंदिन कामकाज सुरू होते. दुपारची जोहरची नमाज, सायंकाळी असरची नमाज, सूर्यास्तानंतर मगरीबची नमाज व रात्री ईशाव तरावीहची नमाज अदा केली जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रार्थनेचे हे सत्र सुरूच असते. तरावीहच्या नमाजमध्ये कुरआनचे क्रमबध्द पठण होते. नमाजी संपूर्ण महिन्यात कुरआनच्या श्रवण आणि मननचा लाभ घेतात. लाखो मुस्लिमांना कुरआन हा ग्रंथ तोंडपाठ आहे.


           रमजान महिन्यातील सर्व रात्री रम्य होतात. सर्व मुस्लिम वस्त्या, मोहल्ल्यातील वातावरण आनंदी व उत्साही असते. रात्रभर हॉटेल्स व गरजेच्या सामानांची दुकाने सजलेली असतात. पहाटे रोजदारांना ताजे व गरम अन्न मिळावे म्हणून सर्वजण प्रयत्नशील असतात. सायंकाळी इफ्तार अर्थात रोजा खोलण्याचे वेळी जास्त आनंदी वातावरण असते. यावेळी फळे खजूराच्या ठेल्यापासून ते अनेक स्वादिष्ट पदार्थांचे ठेले असतात. एकंदरीत या महिन्यात सर्वत्र भक्ती-प्रार्थनेचे, दान धर्माचे वारे जोरात वाहत असते. महिन्याभरातील उपवासानंतर एक वेगळाच आनंद रोजेधारकांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. रमजान ईदला उपवासांची सांगता करण्यात येते.


           रमजान ईदला सर्व मुस्लिम बांधव आपल्या मित्रपरिवाराला सुमधूर शिरकूर्मा व चविष्ट भोजनासाठी आमंत्रित करतात व अन्य धर्मिय बांधव आनंदाने, प्रेमाने आमंत्रण स्विकारतात. खेड्यापाड्यात, शहरा-शहरात हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये या सणामुळे भाईचारा म्हणजे बंधूभाव वाढतो. हा बंधूभाव देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी उपयुक्त ठरतो. बंधूभावामुळेच देश महान बनतो. अशा या पवित्र ईदच्या दिवशी समस्त बांधवांनी उच्च विचार व आचार, सुसंस्कार, एकाच ईश्वराची भक्ती, महिलांना आदरणीय स्थान, साधनाशिवाय ईश्वरभक्ती संयमाचे पालन इत्यादी अतिशय उच्च शिकवण देणाऱ्या इस्लाम धर्माचे पालन अगदी मनापासून करावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा