शुक्रवार, ३ जुलै, २०२०

चला लॉकडाउनच्या काळात झाडावेलींपासून थोडं जगणं शिकूया आनंदानं!


चला लॉकडाउनच्या काळात झाडावेलींपासून थोडं जगणं शिकूया आनंदानं!

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

        


  रमजानचा महिना सायंकाळची वेळ, महिनाभरचे उपवास, ५ ते ५:३० च्या दरम्यानची असरची नमाज अदा केली. रोजा इफ्तारची वेळ होती ७ वाजता. उपवासामुळे थोडासा अशक्तपणा जाणवत होता. कोरोना लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने कुणा नातेवाईकांची, मैत्रिणींची भेट झाली नव्हती. फोनवर होते भेट, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद झाला नव्हता. ईद दोनच दिवसावर आली होती. कुणालाही रमजान ईदचा शीरखुर्मा प्राशन करण्यासाठी बोलवता येत नव्हते. माझ्या बऱ्याच मैत्रिणी कंटेनमेंट झोनमध्ये होत्या. सासर-माहेर सांगली जिल्ह्यात. जिल्हा बंदीमुळे कुठेही जाता येत नव्हते. माझ्या पूज्य आईचे निधन सहा महिन्यांपूर्वीच झालेने माहेरी सण साजरा होणार नव्हता. तिकडे जाऊन शीरखुर्मा देणे लॉकडाउनमुळे शक्य नव्हते. अशा एक ना अनेक विचारांमुळे डोकं सुन्न झाले होते. मनात नैराश्येचे मळभ दाटून आले होते. म्हणून आमच्या छोट्याश्या बागेत फेरफटका मारायचे ठरवून दुसऱ्या मजल्या वरून खाली गेले. सर्व झाडावेलींवर नजर टाकली. 

        प्रथमतः फुलांनी डवरलेल्या अबोलीने माझे लक्ष्य वेधून घेतले. मी तिच्याकडे कौतुकाने पाहू लागले, आणि काय आश्चर्य ! अबोली हसून चक्क माझ्याशी बोलू लागली. ती म्हणाली, ताईसाहेब, तुमच्या प्रमाणे आम्हीही लॉकडाऊनमध्ये आहोत ना ? पण आम्ही लॉकडाउनला हसत खेळत स्वीकारले आहे. आम्ही अजिबात निराश झालो नाही. आमची जागा सोडली नाही. उमलायचं सोडलं नाही. उन्हाचे चटके झेलून वाऱ्याच्या झुळकीबरोबर डुलणे सोडले नाही. मी विचार करत आहे आमच्या ताईसाहेब उत्साहानं फुलं तोडायच्या, गजरा करून माळायच्या, मैत्रिणींना गजरे करून द्यायच्या, कार्यक्रमात समईला गजरा घालण्यासाठी माझा उपयोग करायच्या. यावर्षी काय झालाय माझ्या ताईला? बाहेर कुठं जायचं नाही म्हणून गजरा नाही माळला. घरात असला म्हणून काय झालं ताई? गजरा करून केसांत घाला. घरातले लोकं आनंदीत होतील. तुम्हाला स्वतःलाही प्रसन्न वाटेल. अबोलीचे बोलणे शांतपणे ऐकणाऱ्या गुलबक्षीनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

        त्यानंतर थोडे पुढं आले. लिंबूच झाड फळांनी लगडलेले दिसलं. मला पाहून ते म्हणाले, काय ताई असं निराश कशाला होता तुम्ही? आम्ही बघा लॉकडाउनमध्येही तुमच्यासाठी फळे घेऊन तयार आहोत. आमचा उपयोग खाण्यासाठी करा व रोगप्रतिकारशक्ती वाढावा. त्याचं बोलणं संपतंय न संपतंय एवढ्यात एक पिकलेला पिवळाधमक आवळा अंगावर पडला, जणू लिंबूवृक्षाच्या बोलण्याला त्याने अनुमोदन दिले, हिरव्यागार पानांनी बहरलेली सीताफळाची झाडं पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे उभं राहून आपली ड्युटी निभावत होती. त्यांच्याकडे निरखून पहाते तर काय छोट्या छोट्या सीताफळांनीही हजेरी लावली होती. ती झाडं अदबीनं म्हणाली, आमचं ठरलंय ताईसाहेब! आहे तिथंच राहून तुमची मनोभावे सेवा करायचं. फळांनी तुम्हाला तृप्त करायचं. आम्ही निश्चय केलाय आपल्यावर देवाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचीच, जे काम आपल्याला करायचंच आहे ते काम आनंदाने करावं म्हणजे काम केल्याचं अमाप समाधान मिळतं. त्यांच्या शेजारी असलेलं कडिलिंबाचं झाड वाऱ्याने डुलू लागलं. त्याची नव्याने आलेली लुसलुशीत पानं पाहून मनात आनंदाची लहर उमटली, ते म्हणालं, नैराश्येला पळवा, माझा उपयोग करुन आरोग्य कमवा, नैराश्य पळवून लावा.

        मध्येच देशी गुलाबाच्या रोपावर फिकट गुलाबी रंगाची दोन फुले माझ्याकडे पाहून गालात हसली. पिवळ्या गुलाबावरही एक सुंदर टपोरं फूल दिसलं. डार्क गुलाबी रंगाच्या फुलाचं गुलाबाचं झाड कळ्यांनी अगदी गच्च भरलं होतं. त्या कळ्या, ती फुलं मला समजावत म्हणाली, कोरोना व्हायरस आलाय हे खरं आहे. पण नुसतं निराश होऊन, काळजी करून काय उपयोग? काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या, वरचेवर हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाऊ नका, सकस आहार घ्या, मास्क बांधा, प्रतिकारशक्ती वाढावा व्यायामाने, आम्ही जसे काट्यासोबत रहायला शिकलोय ना तसं तुम्ही कोरोना सोबत रहायला शिका.

        गुलाबाचं बोलणं पटलं मला. तोपर्यंत लक्ष गेलं मोगऱ्याच्या वेलीवर व जाईच्या वेलीवर, मोगऱ्याची टपोरी फुलं, जाईची नाजूक सुंदर फुलं, मला आयुष्याची मर्म सांगू लागली, म्हणाली आमच्याकडं पहा ताईसाहेब. आमचं आयुष्य किती थोडं आहे, हे आम्हाला माहित असूनही आम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदानं हसत खेळत जगत असतो. ज्यांनी आम्हांला वाढवलं, त्यांनाच न्हवे तर सर्वानाच सुगंधी आनंद देत असतो. तसं तुम्हीही आनंदी रहा, हसत खेळत कोरोनाचा सामना करा. मधल्या वेळेत तुळस, गवती चहा, पुदीना, कोरफड यांनीही मला सांगितलं आम्हाला उपयोगात आणा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा. आम्ही आहोतना तुमच्या सेवेला मग कशाला भिता? स्वस्थ व मस्त राहा. झाडावेलींचे हे अनमोल बोल ऐकून निराशेचे मळभ कुठल्या कुठे पळून गेले. मन आनंदित झाले. मनाला वाटले, कोरोना लॉकडाउनच्या काळात झाडावेलींपासून थोडं जगणं शिकूया आनंदानं!

1 टिप्पणी: