गुरुवार, १९ मार्च, २०२६

हज यात्रा : महान शारीरिक व वित्तीय उपासना

हज यात्रा : महान शारीरिक व वित्तीय उपासना


        हज एक महान शारीरिक आणि वित्तीय उपासना आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, 'तरूण वयात हज करणे, अल्लाहचरणी केवळ स्वीकृतीचे प्रतीक नसून ते आनंददायकही आहे. तेही अशा व्यक्तीवर, ज्याच्याजवळ येण्याजाण्याचा मुबलक खर्च करऱ्याची क्षमता आणि स्वास्थ्य असेल. सहप्रवाशांच्या खर्चावर आरोग्यावर अवलंबून राहून हज्ज करणे उचित नाही. वित्तीयदृष्ट्या ज्या व्यक्तीवर हज्ज करणे लागू झाले असेल, मात्र त्याचे आरोग्य- स्वास्थ्य त्याला प्रवासासाठी जाण्याची परवानगी देत नसेल, अशा व्यक्ती आपल्या ऐवजी दुसऱ्याला हज यात्रेवर पाठविण्याची मुभा आहे. स्वास्थ्य प्राप्त होताच स्वतःला हज्ज करावा लागतो. इतरांमार्फत आपले हज्ज करण्याच्या पध्दतीला 'हजे बदल' असे म्हटले जाते.


        हजची पवित्र यात्रा हिजरी पंचांगाप्रमाणे जिलहिजच्या महिन्यात होते रमजान आणि हजच्या महिन्या दरम्यान फक्त दोनच महिन्यांच अंतर असते. त्यामुळे हज यात्रेवर जाणाऱ्यांना रमजानच्या महिन्यातच खूप तयारी करावी लागते. हजची ही पवित्र यात्रा हज्ज कमिटीमार्फत अथवा खाजगी टूर कंपन्यांमार्फतही करता येते. दोन्ही ठिकाणी भरपूर खर्च करावा लागतो. हज्ज यात्रेवर केला जाणारा खर्च आपल्या हलाल व पवित्र अशा कमाईतून करावा असे संकेत आहेत. जी माणसे अशा वित्त संस्थांमधून काम करतात, जेथे व्याज व्यवहारात आणले जाते आणि कर्मचाऱ्याला व्याजाचे व्यवस्थापन करावे लागते. अशा कमाईतून हज यात्रेवर जाणे हाम (निषिद्ध) आहे. व्यक्तीने पवित्र कमाईतून हज यात्रा करण्याची व्यवस्था करावी. हज यात्रेकरूने आधीपासूनच यात्रेची तयारी आणि योग्य तो सराव करणे उचित होय. रमजानचा महिना या सरावासाठी उत्तम संधी आहे. या महिन्यापासून हजच्या परिसराची माहिती, पार पाडल्या जाणाऱ्या विधींची सविस्तर माहिती अनुभवी व जाणकार व्यक्तींकडून समजून येणे निश्चितच उपयोगी पडते म्हणून रमजानचा महिना हज यात्रेच्या मानसिक तयारीसाठी एक संधी म्हणून वापरता येणे शक्य आहे. या पवित्र यात्रेसाठी वित्तीयदृष्ट्या आपण कितीही सज्ज असलो तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सज्ज असणे आवश्यक आहे.


         सुमारे पन्नास लाखाहून अधिक लोक  एकाच वेळी व एकाच ठिकाणी एकत्रित येणे  साधी सोपी गोष्ट नाही. सऊदी सरकारमध्ये हज यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी एक वेगळे मंत्रालय आहे. ते हज्जला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सुखसोई आणि सुखरूप येण्याजाण्याचे प्रबंध करतात.