नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी - विशेष लेख
ओरिसा प्रांतातील कटक या शहरात राहणाऱ्या जानकीनाथ बोस या तेजस्वी अशा पित्याच्या घरात छोट्या सुभाषबाबूना कसलीही कमतरता नव्हती. सुभाषचंद्र यांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण होताच त्यांच्या वडिलांनी त्यांचे नांव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केले.
एके दिवशी सुभाषचंद्र शाळेतून परत आले ते संताप आणि दुःख यामुळे रडत रडतच. ते वडिलांना रडतच म्हणाले, "मी त्या शाळेत परत कधीच जाणार नाही." त्याचे कारण विचारल्यांवर ते म्हणाले, "तिथली मुले मला इंडियन म्हणूनच हिणवतात." वडील म्हणाले, "अरे सुभाष, मग त्यात तुला लाज वाटण्यासारखे अथवा अपमानित होण्यासारखे काय आहे? माझ्या मते काहीच नाही. अरे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक अशी सर्व मोठी माणसे 'इंडियन' म्हणजे भारतीयच आहेत ना?"
सुभाषचंद्र म्हणाले, "ते खरे आहे पण मी वर्गात पहिला आलो तरी म्हणे स्कॉलरशिपला बसायचं नाही. मला कवायत येते, तरीही मला दलात घेत नाहीत. शिवाय त्या शाळेत अजून एक वाईट पद्धत आहे. आम्ही बंगाली मुले आपापसात बंगाली बोलू लागलो की आम्हांला हटकतात, दंड करतात आणि फक्त इंग्लिशमध्येच बोलण्याची सक्ती करतात."
जानकीनाथांनी लहानग्या सुभाषचंद्राची तक्रार ऐकून घेतली व त्यांना ती पटलीही. त्यांनी लगेच त्या शाळेच्या प्राचार्यांना अर्ज केला. त्यात लिहिले, "माझा मुलगा बंगाली आहे. त्याची मातृभाषा बंगाली आहे व धर्मभाषा संस्कृत आहे. तुमच्या मान्यवर शाळेत बंगाली व संस्कृत या भाषांना बंदी आहे, तरी कृपया माझ्या मुलाचे नांव आपण आपल्या शाळेतून कमी करून त्याचा दाखला त्वरित द्यावा". त्यानुसार त्यांचा दाखला मिळाला व सुभाषचंद्र यांचे नांव दुसऱ्या शाळेत दाखल केले. ज्या शाळेत जवळजवळ सर्वच विद्यार्थी बंगाली होते. असे होते सुभाषचंद्र मायभूचा व मायबोलीचा अभिमान बाळगणारे थोर सुपूत्र.
दुसरा एक असाच त्या शाळेत असतानाचा प्रसंग...
आपला भारत त्यावेळी इंग्रजांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे साहजिकच इंग्रजांच्या मुलांचा, इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मुलांचा भारतीय मुलांकडे पहाण्याचा कल हा तुच्छतेचा असे. या तुच्छतेच्या मानसिकतेतून इंग्रज अधिकाऱ्यांची मुले त्या शाळेत शिकणाऱ्या भारतीय मुलांना तुच्छतेची वागणूक देत. त्यांना शिव्या देत, त्यांना मारत असत.
एके दिवशी मधल्या सुट्टीत इंग्रज अधिकाऱ्यांची मुले मैदानात खेळत होती. दुसरीकडे एका झाडाखाली भारतीय मुलं झाडाखाली बसून खेळ बघत होती. सुभाष तेथे आला आणि त्या बसलेल्या मुलांकडे बघत म्हणाला, "तुम्हाला खेळायला आवडत नाही का?" मुले म्हणाली, "खूप आवडतं, पण ती इंग्रजांची मुले खेळू देतील तर ना. ती मारतात आणि तिथं खेळूही देत नाहीत." हे ऐकून सुभाष म्हणाला, "तुम्हाला हात नाहीत का, तुम्ही शेणामातीचे आहात का? चला काढा चेंडू, आपणही खेळू". आधी तर भारतीय मुलं जरा बिचकली. ती एकमेकांकडे बघू लागली, पण मग सुभाषचा उत्साह आणि आत्मविश्वास बघून ती सगळी सुभाषसह मैदानाकडे वळली. त्यांनीही खेळायला सुरुवात केली. हे बघितल्यावर इंग्रज मुलांनी त्यांना अडविले. दोघांमध्ये चांगलीच जुंपली. भारतीय मुलांनी इंग्रज मुलांना चांगलेच बदडले. शिक्षक, प्राचार्य मध्ये पडले आणि त्यांनी त्यांची मारामारी सोडविली. प्राचार्यांनी सगळ्यांना समजावले आणि पुन्हा असं न करण्याबद्दल सक्त ताकीद दिली.
दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूची मुलं तयारीतच होती. दुसऱ्या दिवशीही पुन्हा मारामारी झाली. पुन्हा इंग्रजांच्या मुलांना भारतीय मुलांनी चांगले बदडून काढले. या सगळ्या भारतीय मुलांचे नेतृत्व सुभाष करीत होता. प्राचार्यांनी सुभाषबाबूंच्या वडिलांना जानकीनाथ दासांना चिठ्ठी पाठवली. 'तुमचा मुलगा अभ्यासात हुशार आहे, पण तो मारामारीतही पुढे आहे, त्याला समज द्या.'
वडिलांनी जेंव्हा सुभाषला जवळ बोलावून विचारले तेंव्हा त्यांनी सगळ्या घडलेल्या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. शेवटी वडिलांना त्यांनी सांगितले, 'तुम्हीदेखील त्यांना उत्तर देऊन कळवा की, तुम्ही इंग्रजांच्या मुलांना सांगा. त्यांनी जर आम्हाला शिव्या दिल्या, आम्हाला मारलं किंवा आम्हाला खेळताना अडविले तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांनी आम्हाला मारलं तर आम्हीही त्यांना बदडून काढू.'
असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस. लहानपणापासून ते स्वाभिमानी आणि जिद्दी होते. या स्वाभिमानातूनच पुढे त्यांनी 'आझाद हिंद सेनेचे नेत्रुत्व केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.'
अशा महान देशभक्तास त्रिवार मुजरा.