मंगळवार, २८ जुलै, २०२०

ईद-उल-अज़हा (बकरी ईद) : त्यागाचे प्रतीक - विशेष मराठी लेख.


ईद-उल-अज़हा (बकरी ईद) : त्यागाचे प्रतीक

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल


        प्रत्येक धर्मात व त्यांना मानणाऱ्या मानवी समूहात अनेक आनंदाचे क्षण येत असतात. जगातील सर्व समाज आपापल्या श्रद्धेनुसार हे आनंदाचे क्षण साजरे करतो. यालाच आपण धार्मिक सण म्हणतो. इस्लाम धर्मात दोन धार्मिक सण अतिशय महत्वाचे मानले जातात. रमजान ईद आणि बकरी ईद. बकरी ईद ला ईद-उल-अज़हा अथवा ईद-उल-अद्'हा, ईद-उल-झुआ, ईद-ए-कुर्बां असेही म्हणतात. हा सण कुर्बानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो. 
        समाजात अशा व्यक्तीलाच मानसन्मानाचा उच्च दर्जा प्राप्त होतो की जी व्यक्ती आपल्या जीवनात त्यागाला महत्व देते. बकरी ईद ही इब्राहिम अलैहिसल्लाम यांच्या ईश्वरावरील दृढ श्रद्धेचे, सहनशीलता आणि आदराचे तसेच बलिदानाचे प्रतीक म्हणून, अल्लाहने हजरत ईस्माइल अलैहिसल्लाम यांच्या बदल्यात बकऱ्याची कुर्बानी मान्य केली, या अद्भूत घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ, एक त्यागाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण मुस्लिम जिल्हेज महिन्याच्या दहा तारखेस जगभर साजरा केला जातो. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास ७० दिवसानंतर हा सण साजरा केला जातो.


        इस्लामच्या महत्वाच्या घटनाक्रमामध्ये हजरत मुहम्मद पैगंबर सल्ललाहु अलैहिवस्सलम यांच्या जन्माच्या पूर्वी ज्या घटनाक्रमांचा प्रकर्षाने पवित्र कुरआनमध्ये उल्लेख आला आहे त्यापैकी कुर्बानीची महत्वपूर्ण घटना नमूद आहे. मूलतः इस्लाम धर्म हा हजरत मुहम्मद पैगंबर (स. अ.) यांच्यापासून पुढे चालू झाला असा समज आहे परंतु खरा इस्लाम धर्म आदम अलैहिस्सल्लाम व त्यांच्या हव्वा या मूळ महापुरुषांपासूनच अस्तित्वात आहे. कालचक्रानुसार ज्या वाईट सवयी व चालीरिती समाजात येतात, जातात त्यांच्यापासून मनुष्यजातीचे संरक्षण करावे याकरिता अल्लाहने वेळोवेळी प्रेषित पाठविले व त्यांना मनुष्यजातीला पापांपासून दूर ठेवण्याचे साधन बनविले. अल्लाहनी आपले संदेशवाहक व प्रेषित म्हणून त्यांना दर्जा दिला. पवित्र कुरआनमध्ये यापैकी बऱ्याच प्रेषित किंवा पैगंबरांची नावे उल्लेखित आहेत. साधारणत: आदम अलैहिस्सल्लाम यांच्यापासून हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांच्यापर्यंत एक अल्लाहनी मानवाच्या कल्याणासाठी या भूतलावर एक लाख चोवीस हजार प्रेषित पाठविले. या प्रेषितांना वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे आदेश मिळत गेले व त्यांचे अनुपालन त्यांनी केले. काळाच्या ओघात पाप आणि पुण्य यांची लकेर पुसली जात आहे असे वाटले त्या त्या वेळी अल्लाहने पैगंबराची जगामध्ये पाठवण केली. ज्या पैगंबरांचा पवित्र कुरआनमध्ये उल्लेख आला आहे ते म्हणजे हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम या पिता-पुत्रांना त्यांच्या कर्तृत्वावर अल्लाहने विशेष गौरविले आहे.

        अशा या महान प्रेषिताचा इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांचा जन्म साडेचार हजार वर्षांपूर्वी इराक या राष्ट्रामध्ये झाला.  हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना ख्रिश्चन व यहूदी लोक अब्राहम या नावाने मानतात. त्यांचे वडील प्रसिद्ध पंडीत होते. त्यामुळे घरामध्ये भरपूर सुखसंपत्ती होती. त्यांना वंशपरंपरागत सर्व संपत्ती मिळत होती. परंतु त्यांनी सर्व संपत्तीचा त्याग करून सहनशीलतेने कष्टप्रद जीवन जगणे मान्य केले. ते सतत एका ठिकाणी बसून विश्वाच्या उत्त्पतीच्या रहस्याचे चिंतन करीत. पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे या सृष्टीतील पशू पक्षी मानव यांचा निर्माणकर्ता एकच ईश्वर आहे. या ईश्वराच्या इच्छेनुसार सर्वकाही बदल होत असतात. आपली धनसंपत्ती अल्लाहची अमानत आहे म्हणून तिचा त्याग केला पाहिजे असे त्यांना वाटे.

         हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना दोन पत्त्नी होत्या एका पत्नीचे नाव हाजरा व दुसरीचे नाव साहरा. साहरापासून त्यांना इसहाक हा पुत्र झाला. इसहाक यांच्या वंशात पुढे हजरत याकुब, हजरत मुसा म्हणजेच मोझेस ईसा (येशू) असे प्रेषित झाले. हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम ईश्वराचा दिव्य संदेश लोकांना देण्यासाठी इराक देश सोडून सिरिया, इजिप्त, फिलीस्तान आणि अरबच्या मक्का भूमीत फिरत राहिले. तेंव्हा त्यांच्याबरोबर हाजरा या पत्नी होत्या. त्यांना अद्याप पुत्रप्राप्ती झाली नव्हती. हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना वयाच्या ८६ व्या वर्षी हाजरा या पत्नीस पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव ठेवले 'ईस्माइल'. ते आईवडिलांचे प्रिय पुत्र होते. इब्राहीम अलैस्सलाम यांची अल्लाहवर अतूट अशी श्रद्धा होती. 

       अल्लाहनी ज्या ज्या वेळी प्रेषितांची परीक्षा घेतली त्या त्या वेळी त्यात ते खरे उतरले. असाच एक प्रसंग हजरत इब्राहीम व त्यांची पत्नी हाजरा व पुत्र ईस्माइल यांच्या बाबतीत घडली. त्यांना सर्वात पहिली अल्लाहची आज्ञा झाली की आपली प्रिय पत्नी 'हाजरा' आणि पुत्र 'ईस्माइल' यांना वाळवंटातील सुनसान जागेत सोडून यावे. अल्लाहची आज्ञा झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांची तमा बाळगली तर ते पैगंबर कसले? म्हणून त्यांनी पत्नीप्रेम, पुत्रप्रेम यापेक्षा अल्लाहचे आदेश महत्वाचे समजून त्यांना वाळवंटात सोडले. वाळवंटात भन्नाट वारा, कडाक्याचे ऊन, आजूबाजूस चीट पाखरुही नाही अशा परिस्थितीत माय लेकांच्या स्थितीची कल्पना काय करावी? तान्हुल्यास तहान लागल्यानंतर प्रचंड विस्तारलेल्या वाळवंटात आईची घालमेल सुरु झाली. हाजराने मुलास एका ठिकाणी ठेवून पाण्याचा शोध सुरु केला. त्यासाठी वाळूच्या या टेकडी-वरून त्या टेकडीकडे सातवेळा पळत राहिली. पाणी कुठेच दिसेना. त्या निर्जन ठिकाणी छोट्या ईस्माइलची धडपड पाहवत नव्हती. जशी त्याची व्याकुळता वाढली तसा आईचा फेराही वाढत गेला. प्रत्येक वेळी तिचे मुलाकडे पाहत पळणे अखंडपणे चालू राहिले आणि सरतेशेवटी तिने पहिले की, मुलाचा नरम मुलायम पाय जमिनीवर घासला जात होता. त्या ठिकाणी जमिनीतून एक झरा फुटला. तो झरा आजही 'सफा-मरवा' या टेकड्यांच्या जवळून वाहतो आहे. हाजरामातेने झरा पाझरला त्या ठिकाणी लहानसे मातीचे कडे करून पाणी रोखले आणि तान्हुल्याची तहान भागली. त्या झऱ्याला 'आबे जमजम' असे संबोधले जाते. बकरी ईदसाठी मक्का येथे गेलेले प्रत्येक मुस्लिम बांधव 'आबे जमजमला' भेट देतात व आबे जमजमचे पाणी पवित्र जल म्हणून घेवून जातात. जमजमचे पाणीसुद्धा हजरत इब्राहीम यांच्या कुटुंबीयांमुळेच जगभरास मिळाले.

        पुढे मक्का हे तीर्थस्थान हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी बांधले. हे तीर्थस्थान इतके पवित्र मानले जाते की, त्या दिशेला तोंड करुन जगभरात नमाजपठण केले जाते. बकरी ईदनिमित्त जगभरातून सुमारे ७० ते ७५ लाख हज यात्रेकरू मक्का येथे जमतात. बकरी ईदनिमित्त मक्का येथे 'संगे अस्वद' याला प्रदक्षिणा घातली जाते. सात वेळा घातलेल्या प्रदक्षिणेस 'तवाफ' असे म्हटले जाते.

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांची अतूट श्रद्धा होती अल्लाहवर, त्यामुळे अल्लाहनी  त्यांना 'खलीलुल्लाह' म्हणजेच ईश्वराचा दोस्त अशी पदवी दिली. काही प्रेषितांंनी अल्लाहना प्रश्न केला की, ते तुमचे दोस्त कसे? या प्रेषितांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांची अंतिम परीक्षा घेण्याचे अल्लाहने ठरविले. त्यांच्या स्वप्नामध्ये अल्लाहनी प्रेषितांंमार्फत सांगितले की कुर्बानी कर. त्यांनी या संदेशाबाबत खूप विचार केला. या संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशीही रात्री स्वप्नामध्ये अल्लाहनी प्रेषितांंमार्फत सांगितले की तुझी सर्वात प्रिय गोष्ट कुर्बान कर. इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी या स्वप्नाचे चिंतन केले आणि त्यांचा ठाम विश्वास झाला की, ईश्वराला (अल्लाहला) आपला प्रिय पुत्र हजरत ईस्माइल याची कुर्बानी हवी आहे. अल्लाहचा आदेश त्यांनी ईस्माइल व हाजरा यांना सांगितला. ते दोघेही अल्लाहचे परमभक्त होते. ईस्माइल यांनी आई-वडिलांसमोर त्वरित  अल्लाहइच्छेला व वडिलांच्या कर्तव्यपूर्तीला आपली तयारी दर्शविली. इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी प्रिय पुत्र ईस्माइल यांना कुर्बानी देण्यासाठी मक्का शहराजवळील मीना पर्वताच्या टेकडीवर घेवून निघाले. वाटेत सैतानाने ईस्माइलला तीन वेळा मज्जाव केला परंतु ते जराही विचलित व भयभीत झाले नाहीत. मीना पर्वताच्या टेकडीवर अल्लाहची प्रार्थना करुन इब्राहिमनी आपल्या लाडक्या ईस्माइलच्या मानेवर सुरी चालविली, परंतु सुरी चालेना. म्हणून ईस्माइलनी वडिलांना सुचविले की, त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधावी, म्हणजे पुत्रप्रेमापोटी न चालणारी सुरी चालू लागेल. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि अल्लाहचे स्मरण करुन सर्व शक्तीनिशी आपल्या मुलाच्या मानेवर सुरी चालविली. गरम रक्ताचा स्पर्श इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना झाला. आपण अल्लाहची इच्छा पूर्ण केली असे त्यांना वाटले आणि त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली. पाहतात तो काय चमत्कार, त्यांच्या समोर एक दुंबा बकरा बळी पडला होता. अल्लाहनी आपला दूत जिब्राईल यांच्यामार्फत हजरत ईस्माइल यांच्या जागी दुंबा बकरा ठेवला होता आणि शेजारी ईस्माइल जिवंत उभे होते. या घटनेच्या स्मरणार्थ ईस्लाम धर्मात अल्लाहवरील श्रद्धेचे प्रतिक म्हणून बकऱ्याची कुर्बानी केली जाते.

        इब्राहिम अलैहिस्सल्लाम अल्लाहच्या इच्छेपुढे कोणत्याही गोष्टीची पर्वा करीत नसत. त्यांना 'खलीलुल्लाह' अशी पदवी का दिली ते इतरांना या प्रसंगामुळे समजले. 

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम या पिता-पुत्रानी मक्का या पवित्र भूमीत अल्लाहची उपासना करण्यासाठी एक काबागृह बांधले. त्या काबागृहाला अल्लाहनी आपले घर म्हणून घोषित केले. तसेच ज्या कोणाला उपासना अर्थात नमाज पठण करायचे असेल त्यांनी काबागृहाकडे आपले तोंड करुन ती करावी अशी आज्ञा केली. जगातील कोणत्याही भागात कानाकोपऱ्यात राहणारा असो, त्यांची ऐपत असल्यास आयुष्यात एकदा तरी या काबागृहाचे दर्शन घेण्यासाठी, तवाफ म्हणजेच प्रदक्षिणा घालण्याकरिता यावे, हज यात्रा करावी असे अल्लाह म्हणतात.

        पुढे हजरत ईस्माइल यांच्या वंशात इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांचा जन्म या पवित्र मक्का भूमीत झाला. त्यांनी काबागृहाचा जीर्णोद्धार कुरेश लोकांच्या सहाय्याने केला. पैगंबर साहेबांनी पाच आचार नियमांचे पालन करण्याची आज्ञा ईस्लाममध्ये केली आहे. या पाच नियमांना 'अरकाने दीन' म्हणतात. पहिली आज्ञा ईमान, दुसरी नमाज, तिसरी रमजानचे रोजे, चौथी आज्ञा जकात व पाचवी हजची यात्रा बकरी ईदच्या वेळी केली जाते. हजयात्रा ही एक महान उपासना आहे. हज यात्रेस जाणाऱ्या श्रद्धावानाचे आचरण पवित्र असावे. तो अत्याचारापासून दूर, अपवित्र गोष्टीपासून दूर असावा. तो पूर्णतः अल्लाहच्या चिंतनात गढून गेलेला असावा. हज यात्रेमध्ये प्रत्येक हाजी पुरुषाला दोन पांढऱ्या चादरी परिधान कराव्या लागतात. त्यांना 'एहराम' म्हणतात. मक्का या पवित्र भूमीत काबागृहाजवळ प्रत्येक हाजी 'लब्बैक अल्लाहुमा लब्बैक' म्हणजे हजर आहे अल्लाह हजर आहे असा उदघोष करतात.

        हज यात्रेस विविध ठिकाणाहून लाखो श्रद्धावान हाजी मक्केत येतात. सर्वजण सामुदायिकरीत्या एकाच वेळी नमाजपठण करतात. त्यांच्यात गरीब-श्रीमंत, कृष्णवर्णीय-गौरवर्णीय अथवा प्रांतिक असा कोणताही भेदभाव केला जात नाही. आपण सर्वजण प्रथम मानव हजरत आदम अलैस्सलामची संतती आहोत अशीच प्रत्येकाची प्रेमभावना असते.

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम, हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम आणि हाजरा यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी हज यात्रेस गेलेले हाजी विविध विधी पूर्ण करतात. इस्लामच्या उद्याच्या चिरकाल आठवणी व तत्कालीन अवशेष तेथे पावलोपावली हाजीसमोर उभे राहतात. ते केवळ इस्लामच्या महानतेची साक्षच देत असतात. या सर्व चिरकाल आठवणीने व तेथील पुण्यस्थळे पाहून हाजी लोकांची अंत:करणे अल्लाहच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागतात व आयुष्यभर स्मरणात राहतात. मक्का येथील अल्लाहमय वातावरणाचे वर्णन शब्दातील आहे. एकीकडे हज यात्रेकरु हजचा आनंद घेत असतात व जगभर सर्वजण कुर्बानीचा आनंद साजरा करतात.

        बकरी ईदच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत झाल्यावर नवे कपडे घालून इमामांच्या सूचनेनुसार पुरुष सामुदायिक नमाज पठण करतात. नंतर इमामांचे प्रवचन होते. त्यानंतर एकमेकांना भेटून 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा दिल्या जातात. नमाज पठाणांनंतर कुर्बानी केली जाते. इस्लामी धार्मिक इतिहासाचे वाचन केल्यास आपणास असे दिसून येते की, अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी भक्तिभावाने ज्या गोष्टी सणाप्रसंगी केल्या जातात ती प्रत्येक गोष्ट कोणत्यातरी प्रेषितांच्या जीवनाशी संबंधित असणारी, त्यांनी केलेली कृती किंवा त्यांच्या कृतीची आठवण देणारी असते. यालाच इस्लाम धर्मात सुन्नत म्हणतात. एके दिवशी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना त्यांच्या एका मित्राने म्हणजेच साहबीने विचारले, "या रसूलुल्लाहू, यह कुर्बानी क्या है?" आकाने जवाब देते हुये कहा, "यह तुम्हारे बाप हजरत इब्राहिम खलीलुल्लाह की सुन्नत है!" त्यांनी अल्लाह आज्ञेनुसार केलेल्या महान अशा त्यागाची आठवण आहे. सर्वोच्च अल्लाहला, कुर्बान करण्याच्या भावनेचे प्रतिक म्हणून इस्लाममध्ये कुर्बानी जरुरीची ठरली हे सर्वोच्च समर्पण आहे. कुर्बानी ही इस्लाममध्ये इमान व परमेश्वरावरील विश्वासाचे प्रतीक आहे. ज्याची आठवण म्हणून आज जगभरातील मुस्लिम बांधव कुर्बानी देवून बकरी ईद साजरी करतात. हेतू हा की, प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या अंतर्मनात समर्पणाची तीच भावना, इस्लामवरील ईमान, अल्लाहवरील प्रेम जागृत रहावे. कुर्बानी करण्यामागे खरा उद्देश हाच आहे की मानवाने आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहसाठी कोणताही त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे.

        कुर्बानीचा दुसरा अर्थ कुर्बे रब्बनी म्हणजेच अल्लाहशी जवळीक साधणे असा होय. ईद साजरी करताना आपल्या शेजारी-पाजारी कोणीही भुकेला राहू नये, आपला कुणीही नातेवाईकही उपाशी राहू नये, आपल्याला मिळणाऱ्या सुविधांपासून कोणीही वंचित राहू नये याचीही जबाबदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हीच इस्लामची शिकवण आहे. हेच इस्लामचे सार आहे. 

        असा हा ईद-ए-कुर्बान हा सण म्हणजेच बकरी ईद, असीम त्याग व सहनशीलतेचा संदेश मानवाला देतो. सहनशीलता व त्याग जोपासणारे कधीच अंत पावत नाहीत. आज मानवजातीच्या कल्याणासाठी या दोन गुणांची गरज आहे. अशा प्रकारे बकरी ईदच्या निमित्ताने हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम, त्यांच्या मातोश्री हाजरा अजरामर झाले आहेत.