लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

लघुकथा संग्रह क्र.१०

      

मराठी लघुकथा संग्रह क्र.१०

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


लघुकथा क्रमांक - ४६ - पत्र वाचून दाखवा सर


माजी नगरसेवक शरद देसाई यांच्या मुलीचे ज्योतीचे लग्न थाटामाटात झाले. लग्नाला ज्योतीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक पवार सर यांनाही निमंत्रण होते कारण ते देसाई यांचे जवळचे स्नेही होते. लग्नानंतर देसाई यांनी पवार सरांची ओळख जावयांना करून दिली, 'हे ज्योतीचे शिक्षक पवार सर. आदर्श शिक्षक म्हणून यांचे पंचक्रोशीत नांव आहे". ही घटना आहे तीस वर्षापूर्वीची. त्यावेळी फोन, मोबाईल नव्हते. संपर्कासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. योगायोगाने ज्योती व तिचे पती पवार सर रहात असलेल्या काॅलनीत रहायला आले. ज्योती त्यावेळी डिलिव्हरी साठी माहेरी गेली होती. ज्योती दिसायला सुंदर होती पण अभ्यासात मंद होती. त्यामुळे सातवी पास झाली तरी तिला फारसं लिहायला वाचायला येत नव्हते. पेपरमध्ये तिने लिहिलेला एकही शब्द वाचता येत नसे. पेपर पूर्ण लिहिलेला मात्र असे. त्यामुळे अशीच ढकलत ती दहावीपर्यंत गेली होती. एक दिवस ज्योतीचे पती पवार सरांकडे आले व म्हणाले, "तुम्ही ज्योतीचे शिक्षक ना, ज्योतीने मला लिहिलेले पत्र मला जरा वाचून दाखवा.  पवार सरांना मेल्याहून मेल्यासारखे झाले".


लघुकथा क्रमांक - ४७ - हा दुसरा फोटो कुणाचा?


२ऑक्टोबरला शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये सर्व शिक्षण मंडळ सदस्यांची मिटींग आयोजित केली होती. या निमित्ताने सर्व सदस्य हजर राहतील व या दोन थोर विभूतींच्या प्रतिमेचे पूजन सर्वांच्या उपस्थितीत पार  पडेल हा त्यामागील हेतू होता. सकाळी आठ वाजता सर्वांना हजर रहायचे होते. नियोजनाप्रमाणे सर्वजण हजर झाले. प्रतिमा पूजन झाले. एक सदस्य साडेआठनंतर हजर झाले. प्रतिमेला वंदन करतांना त्यांना दोन प्रतिमा दिसल्या. त्यांनी शिपायाला विचारले, "अरे हा दुसरा फोटो कुणाचा?" शिपाई म्हणाला, "हा फोटो भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा आहे. सर्वजण मनात म्हणाले, "आता हे महाशय शिक्षणाचा प्रसार, विकास व उद्धार नक्की करणार!"


लघुकथा क्रमांक - ४८ -  आधुनिक शाम


एका वर्गात मॅडम् 'शामची आई' या पुस्तकातील एक प्रसंग सांगतात. एक हरिजन समाजातील वृद्ध स्त्री जळणाचा बिंडा समोर ठेवून उभी असते. बिंडा डोक्यावर उचलून घेण्यासाठी तिला मदत हवी असते. ती प्रत्येकाला मदतीसाठी विनंती करत असते पण सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जात असतात. बारा-तेरा वर्षाच्या शामने कसलाही विचार न करता त्या आजीबाईना बिंडा उचलायला मदत केली. घरी गेल्यावर सर्वजण रागावणार की तू त्या हरिजन स्त्रिला मदत का केलीस म्हणून. हे शामला माहित असूनही त्याने हे धाडस केले. मॅडमनी  शरदला विचारले, "शरद , तू अशा प्रसंगी काय केलं असतं, अशी मदत केली असती का?" शरद म्हणाला, "मॅडम्, मी पटकन् आमच्या टेंपोवाल्या काकांना फोन केला असता. ते टेंपो घेऊन आले असते. बिंडा टेंपोत टाकून, आजीबाईनाही टेंपोत बसवून तिच्या घरी पोहचवल असतं. शामने अर्धवट मदत केली. मी संपूर्ण मदत केली असती मॅडम्". यावर मॅडम् काय बोलू शकतात?

 

लघुकथा क्रमांक - ४९ - टाॅमी, शेरू आणि मोत्या


दोन मैत्रिणी सपना व अरूणा मंडईत अचानकपणे भेटतात. हाय, हॅलो झाल्यावर सपना म्हणते, "अरुणा, तुझी साडी छान आहे गं."

अरुणा: माझ्या भावाने घेतलीय भाऊबीजेला. सात हजाराची आहे पण आमच्या टाॅमीला अजिबात आवडली नाही ही साडी.

सपना: काय गं! कुत्र्याची आवड पण लक्षात घेतेस का साडी नेसतांना?

अरूणा: अगं, टाॅमी हे माझ्या मिस्टरांना म्हणते मी. लाडानं, तसं त्यांना सर्वजण टायगर म्हणतात.

सपना: म्हणजे माझ्यासारखंच की, आमच्या यांना सगळे शेरखान म्हणतात पण मी लाडानं शेरूच म्हणते.

इतका वेळ या दोघींचा संवाद ऐकत असलेली भाजीवाली म्हणाली, "मी पण आमच्या मोतीरामना मोत्याच म्हणते."


लघुकथा क्रमांक - ५० - थांबा चहा करते 


शिक्षिका असलेल्या सुरेखा शनिवारी सकाळची शाळा साडेअकराला सुटल्यानंतर सात कि. मी. अंतरावरील गावात बँकेच्या कामासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत शेती अधिकारी असलेले पतीराज होते. बँकेत गेल्यावर समजले की त्यांचे काम चेअरमन आल्यानंतरच होणार आहे. ते दोन अडीच तासांनी बँकेत येतील. कदाचित लवकर पण येतील. पती म्हणाले, "जा ये करण्यापेक्षा इथे जवळच माझे परममित्र शिंदेसाहेब राहतात. बरेच दिवस झाले त्यांची भेट नाही. ते वारंवार घरी येण्याचा आग्रह करतात, तेंव्हा थोडावेळ जाऊ त्यांच्याकडे. बँकेतून फोन आला की निघू तिथून. त्यांच्या घरी गेल्याबरोबर पाण्याचे ग्लास आले. दोघा मित्रांच्या जुन्या गप्पा सुरु झाल्या. सुरेखा मॅडम् ही त्यांच्या मॅडमशी गप्पा मारण्यासाठी किचनमध्ये गेल्या. एक तास संपला. चहाचं नावंच निघेना. तासानंतर शिंदेसाहेबांनी एकदा आत येऊन चहाचं बघा असं सांगितलं पण मॅडमनी सोईस्करपणे दुर्लक्ष केले. सुरेखाच्या पोटात कावळे ओरडू लागले. कारण सकाळपासून चहाच्या एका कपाशिवाय त्यांच्या पोटात कांहीच नव्हते. दुपारचे दीड वाजून गेले होते. पावणेदोन वाजता मॅडम् उठल्या. गॅसजवळ गेल्या. सुरेखाला थोडं हायसं वाटलं पण मॅडमनी दूध गरम करून मांजराच्या थाळीत ओतलं तेवढ्यात बँकेतून फोन आला. मॅडम् म्हणाल्या, "थांबा ना चहा करते"


गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

लघुकथा संच क्र. ९

            मराठी लघुकथा संच क्र. ९

लघुकथा क्रं ४१    

झाशीची राणी बघ 

                एक इतिहासाचे तज्ज्ञ शिक्षक असतात. ते आपल्या वर्गात १८५७ चे युद्ध हा धडा शिकवून आलेले असतात. त्यांच्या शहरातील झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याचा संदर्भ देत या राणीने युद्धात दामोदर या दत्तकपुत्राला पाठीशी बांधून लढल्याचे रसभरीत वर्णन प्रभावीपणे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले होते. विद्यार्थीही या पाठात तल्लीन झाले होते. त्यामुळे  ते खूश होते. घरी आल्यावर ते पेपर वाचत बसले. नोकरीवरून दमून आलेली त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. एवढ्यात त्यांचे छोटे बाळ झोपेतून उठले व रडू लागले. बायको म्हणाली," जरा बाळाला घ्या ना " शिक्षक म्हणतात," अगं, राणी लक्ष्मीबाईनी मुलाला पाठीशी बांधून युद्ध केले .तू फक्त स्वयंपाक सुद्धा त्याला पाठीवर घेऊन करू शकत नाहीस ?काय हे!"

लघुकथा क्रं ४२   

खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं

                 अलकाची आई कन्या शाळेत शालेय पोषण आहाराचे तांदूळ न्यायला आली. देसाई मँडम् म्हणाल्या," अलका पंधरा दिवस गैरहजर होती त्यामुळे तिला या महिन्याचे तांदूळ मिळणार नाहीत." त्यानंतर आई कुमार शाळेत शिकणाऱ्या अमोलकडे गेली. कुंभार सरांनी अमोलचे तांदूळ दिले. आई सरांना म्हणाली," तुम्ही तांदूळ दिलासा पण देसाई मँडम् अलकाचे तांदूळ देता येत नाही म्हणाल्या्!" कुंभार सर म्हणाले," अमोल गैरहजर असतानाही मी हजेरी मांडली म्हणून तांदूळ मिळाले तुम्हाला"सरांचे आभार मानून आई मँडम्कडे गेल्या व म्हणाल्या," तुम्ही अलकाची हजेरी का नाही मांडली ? जरा शिका त्या अमोलच्या सरांकडून गरिबांना मदत करायला. ते सर किती चांगले आहेत बिचारे! तुम्ही जरा खऱ्यानं वागायला शिका मँडम्  !" मँडम् मनात म्हणाल्या ' खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं '

लघुकथा क्रं ४३

चष्मा धुतला स्वच्छ

                    रमाकाकूचं वय झालं होतं.त्यांना  फारसं बाहेर जाणं होत नव्हतं. त्यामुळे बेडवर बसल्या बसल्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांचं निरिक्षण चालू असायचं. शेजारी एक नवीन कुटुंब रहायला आलं.त्यामुळे रमाकाकूना निरिक्षण करायला एक नवा विषय मिळाला.त्या कुटूंबातील स्त्री रमाकाकूंच्या खिडकीच्या समोर दररोज कपडे धुवून वाळत घालायच्या.रमाकाकू मनात म्हणायच्या या अजिबात कपडे स्वच्छ धुत नाहीत सारे धुतलेले कपडे मळकटच वाटतात. एके दिवशी रमाकाकू आपल्या पतीना गोपाळरावांना म्हणाल्या," इतके दिवस मी बघते त्यांचे कपडे अस्वच्छच असतात. आज मात्र त्यांनी कपडे स्वच्छ धुतलेले दिसतात." गोपाळराव हसत म्हणाले," त्या दररोजच कपडे स्वच्छ धुतात. तुला मात्र आज स्वच्छ दिसताहेत कारण तू झोपल्यावर मी तुझा चष्मा स्वच्छ धुवून पुसला आहे." रमाकाकू लाजत म्हणाल्या," अस्सं होय "

लघुकथा क्रं ४४

विमानाने सर्वेक्षण

                    कोरोना लाँकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी प्राथमिक शाळेतील  शिक्षकांना दिली होती. प्रत्येक कुटुंबात जाऊन साठ वर्षावरील व्यक्ती किती आहेत. त्यापैकी कुणाला बी.पी. शुगरचा त्रास आहे याची नोंद करायची होती. नोंदीनंतर दररोज त्यांच्या घरी जाऊन कुणाला कांही त्रास आहे का हे विचारुन तसा रिपोर्ट ग्रामसेवकांच्याकडे द्यायचा होता. मोबाईलवरून पहिल्या आठवड्यात काम चोखपणे बजावल्यानंतर व कुणाला विशेष त्रास नसल्याने कामात थोडी शिथिलता आली होती .त्यात पावसाने जोर धरला होता. नद्यांना पूर आला होता. रस्ते बंद झाले होते. जवळच्या शहरात राहणाऱ्या एका मँडमनी ग्रामसेवकांना रिपोर्ट पाठवला.बी.पी.-०, शुगर-० . ग्रामसेवकांनी मँडमना मेसेज पाठवला.' मँडम् पुलावर पाणी आलय.रस्ते बंद आहेत सर्वेक्षण विमानांनी केलं का?बाकीच्या मँडम् सावध झाल्या व मनात म्हणाल्या,'  बरं झालं मी रिपोर्ट नाही पाठवला.'

लघुकथा क्रं ४५

साडीऐवजी घर

                     सुषमाने नवीन साडी घेण्यासाठी पती सुरेशकडे हट्ट केला.सुरेश म्हणाले," किती ढीगभर साड्या आहेत त्यातील एखादी नेस ना,काँलनीतला नवरात्र उत्सव तर आहे.' सुषमा म्हणाली," तशा भरपूर साड्या आहेत हो माझ्याकडे, पण त्या सर्व काँलनीतल्या सर्वाऔनी पाहिलेल्या आहेत.नवीनच आणा ना एखादी !" ठीक आहे म्हणत सुरेश आँफिसला गेले. सुषमा संध्याकाळी सुरेश यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली, हे नक्की आणणार नवीन साडी म्हणून! संध्याकाळी ते रिकाम्या हाती परतले. सुषमाने विचारले," का नाही आणली साडी? " सुरेश शांतपणे म्हणाले," साडी आणण्याऐवजी दुसऱ्या काँलनीत घर बघून आलोय. एक तारखेला तिकडे शिप्ट होवू या.त्या काँलनीतल्या कुणीच तुझ्या साड्या पाहिलेल्या नाहीत. पुढील एक दोन वर्षे तरी माझा साडी खरेदीचा त्रास वाचेल! होय ना सुषमा!"

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

लघुकथा संच क्रमांक: ८

 

मराठी लघुकथा संच - ८

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




लघुकथा क्रमांक - ३६


एका घरामध्ये गावाकडे राहणारे आजोबा वरचेवर मुलाच्या नोकरीच्या गांवी येत असतात. आजोबा आले की, त्यांचा नातू ज्या ठिकाणी अभ्यासाला बसायचा त्या ठिकाणी आरामात बसायचे. सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या नातवाला आजोबांचा फार राग यायचा. तो आपल्या आईच्या मागे भुनभुन लावायचा, तू आजोबांना सांग दुसऱ्या ठिकाणी बसा म्हणून. आजोबा फार रागीट होते. त्यांना इथून उठून तिथे बसा म्हणून सांगायची सोय नव्हती. त्यामुळे आई त्याला समजावत म्हणाली, "बाळ, तूच दुसरीकडे बसून अभ्यास कर, असं करायचं नाही आजोबा आल्यावर. तू उद्या मोठा झालास की आम्ही तुझ्या नोकरीच्या गांवी येणार त्यावेळी आमच्यावर असंच रागावणार का?" मुलगा म्हणाला, "त्यावेळी मी नाही रागावणार, माझी मुलं रागावतील".


लघुकथा क्रमांक: ३७


एक गवंडी एका शिक्षिकेच्या घरातील किरकोळ बांधकाम दुरूस्तीसाठी आला व म्हणाला, "मॅडम मला ओळखलंत का"? मी धर्मा. मॅडम म्हणाल्या, "अरे धर्मा किती मोठा झालास रे कशी ओळखणार मी". मी तुला बघितलं तेंव्हा एवढासा बिटका होतास." धर्मा म्हणाला, "मॅडम तुम्हाला एक विचारु का?" मॅडम म्हणाल्या, "विचार ना." धर्मा म्हणाला, "आम्ही तुमच्या हाताखाली शिकून लहानाचे मोठे झालो. तुमच्यापेक्षा वयस्क दिसू लागलो पण मी बघतोय मला त्यावेळी शिकविणारे तुमच्यासह सर्व शिक्षक आमच्या मानाने तरूण व ताजेतवाने कसे काय दिसतात?" मॅडम म्हणाल्या," तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. आम्ही शिक्षक टवटवीत, गोजिरवाण्या, सजीवफुलांच्या बागेत काम करतो, म्हणून त्यांच्याप्रमाणेच आम्ही टवटवीत राहतो. तुम्ही लोक काम करता निर्जीव दगड, विटा आणि मातीसोबत". धर्मा म्हणाला, "खरं आहे मॅडम."


लघुकथा क्रमांक: ३८


एका पतीपत्नीची मुलाखत सुरु होती. पती पोलिस होते. ते खिलाडू वृत्तीचे होते कारण ते कब्बडीपटू होते. मुलाखतकारानी एक सूचक प्रश्न विचारला. ते म्हणाले, "तुमच्या पत्नी कधीच रागवत नाहीत याचं रहस्य काय?" यावर गोड हसत पती म्हणाले, "खूप रागावते. फारच चिडते."

मुलाखतकार म्हणतात, "मग त्या राग कसा व्यक्त करतात?"

पती म्हणतात, "अस्सखलितपणे तोंडाचा पट्टा चालूच ठेवते."

मुलाखतकार म्हणतात, "कब्बडी खेळताना, शत्रू पक्षावर चाल करून परत येईपर्यंत तुमचा दम टिकतो, कब्बडी कब्बडी म्हणताना. तुमच्या पत्नीचा बोलत राहण्याचा दम किती वेळ टिकतो?"

पती हसत हसत म्हणतात, "साधारण सात सात मिनिटांंचे चार डाव संपेपर्यंत."

तिघेही मोठमोठ्याने हसू लागतात.


लघुकथा क्रमांक: ३९


एक आजोबा शेतातील गव्हाचे छोटे पोते घेऊन लेकीच्या घरी निघालेले असतात. एस् .टी. स्टँडवर रिक्षावाल्याला विचारतात, "अमक्या ठिकाणी जायला किती भाडं घेणार?" तो म्हणतो, "ऐंशी रूपये घेईन."

आजोबा विचार करतात एवढ्याशा पोत्यासाठी याला ऐंशी रूपये कशाला द्यायचे? त्यांना पोतं डोक्यावर घेऊन चालत जाणं सहज शक्य होतं पण लेक जावई रागावतील पोतं डोक्यावर घेऊन गेलो तर शिवाय त्यांचं प्रेस्टीज कमी होईल म्हणून बरंच अंतर चालत गेल्यानंतर एका रिक्षावाल्याला भाडं विचारलं. रिक्षावाला म्हणाला, "शंभर रुपये."

भाडं ऐकून आजोबांना फार राग येतो. ते रिक्षावाल्याला अस्सल गावरानी भाषेत म्हणतात, "तुला रिक्षाचं भाडं इचारतोय, रिक्षा इकत मागत न्हाय."

रिक्षावाला हात जोडून नमस्कार करून म्हणतो, "इथंच भेटलात बरं झालं, वर भेटू नका म्हणजे झालं"


लघुकथा क्रमांक: ४०

ऑनलाइन शिक्षणाचा इयत्ता पाचवीचा वर्ग सुरु असतो. मॅडम एक लेसन् शिकवितात व होमवर्क देतात की तुमचं एक आवडतं वाक्य चाररेघी वहीत सुंदर अक्षरात लिहा व माझ्या नंबरवर सेंड करा. एका विद्यार्थ्यांने आय् लव्ह यू लिहिले व सेंड केले. मॅडमना फार राग आला. रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याला क्लासमधून डिसमिस केले. तो रडत रडत त्याच्या पप्पाकडे जातो. पप्पा फोनवर मॅडमना विचारतात, "माझ्या मुलाला तुम्ही का डिसमिस केले?"

मॅडम म्हणाल्या, "विचारा तुमच्या मुलालाच काय केलं त्यानं ते".

पप्पानी मुलाला विचारल्यावर मुलगा म्हणतो, "पप्पा मॅडमनी आवडतं वाक्य लिहायला सांगितलं होतं मी आय् लव्ह यू लिहिलं. मॅडमनीच परवा सांगितलं होतं की सर्वावर प्रेम करा म्हणून. मी तसं लिहिलं यात माझा काय  दोष?"

बापानं डोक्याला हात लावला.


शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

मराठी लघुकथा संच - ७


मराठी लघुकथा संच - ७


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - ३१


शांताबाई गेली पाच वर्षे प्रमिलाकडे धुणीभांडी, फरशी पुसण्याचे काम करायच्या प्रमिला तिला अडी नडीला मदत करायच्या. बरीच उचल होती त्यांच्या अंगावर, पण प्रमिलाची एक अट होती. कामाला खाडं करायचं नाही. खाडं केलं की जाम चिडायच्या. गेले दोन महिने प्रमिलाच्या दोन्ही लेकी व त्यांची चार मुलं लॉकडाऊनमुळे इथेच अडकली होती. त्यामुळे शांताबाईंच काम तिपटीने वाढलं होतं. शिवाय कोरोनाच्या भितीने सॅनिटायझरने हात धुवून मास्क लावून, टेंपरेचर बघूनच त्यांच्या घरात प्रवेश मिळे. या सर्व कामाचा शांताबाईना फार कंटाळा आला होता. तिला वाटायचं मी पण माणूसच आहे ना? किती काम करायचं दररोज? एक दिवसही सुटका नाही यातून! असा विचार करत असतानाच तिला एक मस्त आयडिया सुचली. तिने प्रमिलाला फोन केला, बाईसाहेब काल तुमच्याकडून आल्यावर मला ताप आलाय. डॉक्टरनी टेस्ट करायला सांगितलय. प्रमिला म्हणाल्या, होय का मग महिनाभर आली नाहीस तरी चालेल. काळजी घे. तुझा पगार कापला जाणार नाही.


लघुकथा क्रमांक - ३२


एका शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. पोळा या सणादिवशी त्याने बैलांना सजवले. पत्नीने बैलांचं पूजन केले. औक्षण करून नैवद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांही वेळाने मंगळसूत्राची शोधाशोध सुरू झाली. एक बैलाने नकळतपणे वैरणीबरोबर ते खाल्ले. शेतकऱ्याला शंका आल्यावर त्यांनी डाक्टरांकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब मंगळसूत्र ५०/६० हजाराचे असेल, ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या सख्याला त्रास होता कामा नये. माझा सखा ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले आणि विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात प्राणीप्रेम।


लघुकथा क्रमांक - ३३


जयाताई प्राथमिक शिक्षिका होत्या. शिक्षणशास्त्र विषयाच्या जानकार होत्या. त्यांचं मत होतं की मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यावे. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. दहावीला ७८% मार्कस् असूनही आपल्या मुलीला त्यांनी कला शाखेत पाठवले, कारण तिचा कल कलेकडे होता. तिच्या सर्वांगिण विकासासाठी तिला टायपिंग आणि कॉम्प्युटर क्लासला घातले, तिला हार्मोनियम वादनाची आवड असल्याने ती त्या क्लासलाही जावू लागली. वक्तृत्व स्पर्धेत चमकू लागली. क्रीडाक्षेत्रातील धनुर्विद्येत ती राज्यस्तरीय खेळाडू बनली. बारावीनंतर तिने डी. एड्. ला ऍडमिशन घेतले. स्टाफ मेंबर जयाताईना म्हणाले, "तुमची मुलगी हुशार असूनही तिला डॉक्टर, इंजिनिअर बनवायचं सोडून शिक्षिका बनवणार?" जयाताई म्हणाल्या, "तुमची सर्वांची मुलं डॉक्टर, इंजिनिअर होणार त्यांच्या मुलांना शिकवायला कुणीतरी शिक्षक व्हायला हवंच ना?"


लघुकथा क्रमांक - ३४


शामराव खूपच विनोदी होते. आपल्या कुटूंबियांवर त्यांची खूप माया होती. लहान मुले त्यांना खूप आवडायची. त्यांच्याशी ते फार मोकळेपणाने बोलायचे, त्यांच्यात रमायचे. त्यांना एक सवय होती. एक काम ते फार दिवस करायचे नाहीत. चार दिवस काम केले की आठ दिवस आराम करायचे, परत दुसऱ्या कामाला सुरूवात करायचे. त्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीमुळे त्यांच्या संसारात कायम आर्थिक चणचण असायची. उधारी पाधारी व्हायची. उधारी वसूल करायला कुणी आलं की पुढचा वायदा सांगून, त्यांच्याशी गोड बोलून, एखादा विनोद सांगून हसवून परत पाठवायचे. एके दिवशी भाजीपाला विकणारी मावशी रागानेच उधारी वसूल करायला आली. तिला शामराव म्हणाले, "कुणाची उधारी दिलीया आजपर्यंत आमी, तवा तुमची बुडवायची हाय।" भाजीवाली मावशी हसतच परत गेली.


लघुकथा क्रमांक - ३५


दोन जिवलग मैत्रिणी असतात. लॉकडाऊनच्या काळात त्या एकमेकींना भेटू शकत नव्हत्या. पण फोनवरून संपर्कात होत्या. पहिलीने कोरोनाची फारच धास्ती घेतली होती. फळे, फळभाज्या, पालेभाज्या आणायचे तिने सोडून दिले होते. फक्त कडधान्यावरचं भागवू लागली. हे नाही खायचं ते नाही खायचं करत बसली. दुसऱ्या मैत्रिणीलाही तिने तसाच सल्ला दिला. दुसरीने तिला समजविण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ धुवून फळे, भाज्या खाण्याचा सल्ला दिला पण तिने ऐकला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. तिला व तिच्या मिस्टरांना अशक्तपणा जाणवू लागला. चालतांना धाप लागू लागली म्हणून डॉक्टरांना दाखविले. त्या दोघांचा एच्. बी. पाचवर गेला. ऑक्सिजन लेवल ८४ झाली. कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू झाले. तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला व म्हणाली, "तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. माझंच चुकलं, तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. यापुढे मी सर्व भाज्या, फळे स्वच्छ धुवून खात जाईन आणि हो कोरोनाची धास्ती घेणार नाही. त्याचा सामना करीन. मैत्रीण म्हणाली, "शानी झाली माझी बाय।"


मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मराठी लघुकथा संच - ६


मराठी लघुकथा संच - ६


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - २६


एक व्यक्ती पोलिस असते. ती पोलिस ठाण्याच्या हेड ऑफिसमध्ये कार्यरत असतात. त्यांची पत्नीही पोलिस असते. लॉकडाऊनच्या काळात पन्नास वर्षावरील पोलिसांना सुट्टी दिल्याने तिला ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी करावी लागते. एके दिवशी पती ड्युटीवर निघालेले असताना ती सांगते हेल्मेट घाला, पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते निघून जातात. ड्युटी संपल्यानंतर परत येताना बघतात तर पत्नी पोलिस त्यांना अडवते. बिगर हेल्मेट प्रवास करणाऱ्याचा कॅमेरा चालू करून फोटो घेते व पाचशे रूपये दंडाची पावती फाडून दंड वसूल करते. पोलिस पतीना फार राग येतो पत्नीचा, पण पत्नी अविचलपणे आपले कर्तव्य पार पाडते. त्या दिवसापासून पती महाशय हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. याला म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त।


लघुकथा क्रमांक - २७


एका ऑफिसमधील सर्व स्टाफ एका कर्मचाऱ्याच्या आईचे निधन झाल्याने त्याच्या सांत्वनासाठी भाड्याने गाडी ठरवून त्यांच्या बॉससह निघतात. अर्थात गाडीभाडे टी. टी. एम्. एम्. करून द्यायचे ठरते. स्टाफचे बॉस बॉसच्या रूबाबात ड्रायव्हर सीटच्या जवळच्या सीटवर बसतात. गाडी पेट्रोल भरायला थांबते. ड्रायव्हर खाली उतरतो. पाठोपाठ बॉसही उतरतात. स्टाफला बरे वाटते. आता बॉस पेट्रोल चे पैसे भागवणार नंतर हिशोब करून सर्वांचे पैसे गोळा करून देऊ त्यांना, असा विचार करतात. पण बघतात तर काय। बॉस महाशय लघुशंकेसाठी निघून जातात. दुसऱ्या एकाने पैसे भागवून गाडी निघाल्याचा  हॉर्न वाजल्यावरच परत येतात. स्टाफने काय ओळखायचे ते ओळखले, एकमेकांजवळ कुजबुजले असा हा बॉस आणि याला वाटतं मला सर्वानी मानलं पाहिजे. आधी बॉस सारखं वाग ना।


लघुकथा क्रमांक - २८


एस्. टी .स्टँडवर एस्. टी. बस थांबली. प्रवासी भराभर वर चढू पहात होते. कंडक्टर मॅडमनी त्यांना थांबवलं व म्हणाल्या ज्यांच्याकडे सुट्टे पैसे असतील त्यांंनीच गाडीत चढा. कांही प्रवासी चढायचे थांबले. तिकीट काढणे सुरु झाले. मॅडम एका महिलेजवळ आल्या. तिनं शंभरची नोट काढून दिली व एक तिकीट द्या म्हणाली. कंडक्टर म्हणाल्या, "सुट्टे सतरा रुपये  द्या, तुम्हांला त्र्याऐंशी रुपये कुठले देऊ परत? तुम्हाला सांगितले होते ना, सुट्टे पैसे असतील तरच वर चढा म्हणून." आता मात्र ती महिला जाम चिडली व फणकाऱ्याने म्हणाली, "आम्हाला सांगतीस सुट्टे पैसे असतील तरच गाडीत चढा, तुझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत मग तू कशाला गाडीत चढलीस. तुला काय वाटतं एस्. टी. तुझ्या बापाची हाय?" यावर कंडक्टर मॅडम काय बोलणार?


लघुकथा क्रमांक - २९


सुवर्णा एक समंजस, सुजाण महिला होती. घरातील व्यक्तींशी, नातेवाईकांशी तिचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते कारण सुवर्णा सर्वांशी प्रेमाने वागत होती. आपल्यामुळे कुणालाही कसलाही त्रास होणार नाही याची ती नेहमी काळजी घ्यायची. सर्वांचा पाहुणचार करणे, रीतीभाती सांभाळणे यात ती नेहमीच अग्रेसर होती सर्वजण तिच्या वागणुकीवर खूष होते. आत्तापर्यंत तिने कुणाला नावं ठेवायची संधीच दिली नव्हती. तिला ही आपल्या वागण्यावर ठाम आत्मविश्वास होता. एकदा तिच्या जाऊबाईंचे काका गैरसमजामुळे तिला म्हणाले, "सुवर्णा तू एका परीक्षेत नापास झालीस." सुवर्णा ठामपणे म्हणाली, "माझी परीक्षा घेणारा परीक्षकच कच्चा असेल काका, रिचेक करा हवं तर!"


लघुकथा क्रमांक - ३०


कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटना एका मंत्री महोदयांनी भेट दिली. "तुमची सर्व व्यवस्था चांगली आहे का? नाष्टा, जेवण, वेळेवर मिळतं का? हे विचारलं." सर्व पेशंटनी व्यवस्था चांगली आहे, नाष्टा, चहा, जेवण वेळेवर व चांगलं मिळतं असं सांगितलं. एक महिला पेशंट मध्येच ऊठून म्हणाली, "साहेब एकच गैरसोय आहे बघा. चार साडेचार वाजता चहा मिळतो बघा, त्या चहाबरोबर बिस्कीट फिस्किट देण्याची व्यवस्था करा. रात्री साडेआठपर्यंत फार भूक लागते हो. आम्ही की न्हाय कामाची आणि भरपूर खाल्ला्या पिल्ला्याली माणसं हाय!" साहेब मनात म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. सरकारी पाहुणे आहात ना।"


रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ५

 

मराठी लघुकथा संच - ५


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - २१

      एका काकांनी पुतणीला शिकण्यासाठी खूप मदत केली. काका केवळ शिक्षण देऊन थांबले नाहीत तर तिला नोकरी लावण्यासाठीही खूप प्रयत्न केले. पुतणीला नोकरी लागली. तिला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. एक स्थळ जुन्या पाहुण्यातलं होतं. मुलगा आय. टी. आय. होऊन एक कारखान्यात नोकरी करत होता. ते लोक काकांच्या मागे लागले होते. त्याकाळी फोनची व्यवस्था नसल्याने काकांनी पुतणीला पत्र पाठवून याबाबतीत काय करायचं ते विचारलं. पुतणीने काकांना पत्रात लिहलं, "काका तुम्हाला याबाबतीत जे योग्य वाटेल ते करा, कारण मला खात्री आहे की माझं वाईट करायला प्रत्यक्ष परमेश्वर जरी आले तरी तुम्ही परमेश्वराला तसं करण्यापासून विनवणी करुन रोखाल." काकांनी पाहुण्यांना नकार कळवला व म्हणाले, "त्याला माझ्या मुलीची भाषाही कळणार नाही."


लघुकथा क्रमांक - २२

      एका मामाकडे दहा-बारा वर्षांची भाची शिकवण्यासाठी राहिली होती. भाचीची आजी स्वभावाने फारच कडक होती. मामीला वरचेवर माहेरी जाऊच द्यायची नाही, म्हणून मामा-मामी दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, की माहेरी जाऊन यायचे. सोबत भाची असायचीच. तिला आजीला सांगू नकोस असे सांगितले जायचे. ती मामाला ब्लॅकमेल करायची, मला हे घेऊन द्या नाहीतर आजीला सांगते. मामा बिचारे तिला काय हवं ते घेऊन द्यायचे. पुढे भाचीचे लग्न झाले. ती सासरी गेली पण ब्लॅकमेल करायची सवय मात्र गेली नाही. तिच्या सासरी एकत्र कुटुंब पद्धत होती. भाची नवऱ्याच्या संमतीने काही रक्कम आईकडे आणून ठेवायची. मामीच्या भावावर एक संकट आले. तो बहिणीच्या मळातल्या घरात राहून कामधंदा करुन उदरनिर्वाह करु लागला. ही गोष्ट आजीला माहीत नव्हती. एके दिवशी भाचीने मामीला फोन केला व म्हणाली, "मला सोन्याच्या रिंगा करून द्या नाहीतर आजीला सांगते." मामी वैतागून म्हणाली, "सांग, माझ्याकडे तुझ्या सासूचा फोन नंबर आहे, तिला तू पैसे साठवल्याचं सांगते." भाची सुतासारखी सरळ झाली.


लघुकथा क्रमांक - २३

     खाडे सर एकदम हुशार होते. अध्यापन उत्कृष्ट होतं. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा याबाबतीत विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घ्यायचे. त्यामुळे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक त्यांच्यावर खूष होते. खाडे सरांना एकच वाईट सवय होती. प्रत्येक दोन-तीन वाक्ये बोलले की त्यानंतर 'च्याआयला' म्हणायचे. त्यांच्या या बोलण्याची सवय झाली होती. त्यांच्या शाळेत एक नवीन विद्यार्थी आला. त्याला ही गोष्ट खटकली. त्याने ही गोष्ट पालकांना सांगितली. पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की, सर आईवरून शिव्या देतात. अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्यांना बोलावले व याबद्दल विचारले. खाडे सर म्हणाले, "साहेब, सवय आहे च्याआयला!" यावर साहेब काय बोलणार?


लघुकथा क्रमांक - २४

     पाटील काकूंचं घर रिकामे झाले होते. त्यांच्याकडे राहणाऱ्या कुळाची बदली अन्यत्र झाली होती. भाड्यानं घर हवंय म्हणून घर बघण्यासाठी एक नवीन कूळ आलं. ते डी. फार्मसी. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. किती लोक राहणार? भाडं किती? वगैरे बोलणं झाल्यानंतर त्यांनी घर पसंत असल्याचं सांगितलं. पाटील काकू निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पी. एच्. डी. पदवी प्राप्त केली होती. त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. साधी राहणी व उच्च विचारसरणी असं वागणं होतं. प्राध्यापक म्हणाले, "मी बी. फार्म. झालोय, बी. फार्म. म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला?" काकी म्हणाल्या, "बॅचलर इन फार्मसी, मी पी. एच्. डी. झाले आहे. पी. एच्. डी. म्हणजे काय माहीत आहे ना तुम्हाला?". प्राध्यापक महाशय मागे न बघता निघून गेले.


लघुकथा क्रमांक - २५

      एक कुटुंबात तीन आपत्ये असतात. मोठा मुलगा असतो व त्याहून लहान दोन बहिणी असतात. तिघांत काही कारणाने कुरबुर झाली की, आईबाबा म्हणायचे, "अरे तू मोठा आहेस, त्या काय मागतात ते दे, रडवू नकोस त्यांना." हे शब्द ऐकून ऐकून मुलगा कंटाळला होता. प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचे असं त्याला वाटत होतं. तो आता बारा वर्षांचा झाला होता व बहिणी दहा व आठ वर्षांच्या होत्या. एके दिवशी मुलींना रडताना पाहून आईबाबांनी पुन्हा तीच कॅसेट लावली. मुलगा म्हणाला, "हे बघा, मी मोठा आहे हे मला मान्य आहे. पण पुढे आयुष्यभर मी मोठाच राहणार आहे. या दोघी म्हाताऱ्या झाल्या तरी माझ्यापेक्षा लहानच असणार म्हणून काय प्रत्येक वेळी यांना मीच समजूनच घ्यायचं का?" आईबाबा अवाक् होऊन मुलाकडे पाहू लागले.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ४

 

मराठी लघुकथा संच - ४


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



लघुकथा क्रमांक - १६


    जयश्री आणि विमल दोघी डी.एड्. कॉलेजच्या मैत्रिणी. एकाच शिक्षण मंडळात नोकरीस लागल्या. विमल मॅडमना जी शाळा मिळाली, ती सुशिक्षित लोक असलेल्या वस्तीतील होती. पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती चांगली होती. याउलट जयश्री मॅडमना जी शाळा मिळाली ती झोपडपट्टी वस्तीतील. विद्यार्थी नियमित शाळेत येत नव्हते. एक दिवस शाळा तपासणी अधिकारी जयश्री मॅमच्या वर्गात आले व म्हणाले, "काय हे मॅडम, त्या अमक्या शाळेत एक नविन मॅडम आल्या आहेत, त्यांचा वर्ग बघा, त्यांच्यापासून कांहीतरी शिका जरा." जयश्री मॅमना फार दुःख झाले. कारण त्या खूप प्रयत्न करत होत्या. पुढच्या वर्षी विमल मॅमची बदली जयश्री मॅमच्या शाळेत झाली. विमल मॅम आजारी रजेवर असताना ते साहेब विमल मॅमच्या वर्गाची तपासणी घेऊ लागले व म्हणाले, "हा कुणाचा वर्ग आहे? एवढा कच्चा. जयश्री मॅम म्हणाल्या, "तुम्ही गेल्यावर्षी माझ्यासमोर फार कौतुक केलंत ना त्या विमल मॅमचा!" साहेब गप्पच बसले.


लघुकथा क्रमांक - १७


     कोविड  सेंटरमधील कोरोनाबाधित रूग्णांना फोन करून चौकशी करायची जबाबदारी कांही उत्साही शिक्षकांवर सोपविण्यात आली होती. शिक्षकांनी पेशंटला फोनवर विचारले, "कसे आहात तुम्ही, जेवणखाण चांगले मिळते का, वेळेवर मिळते का, सर्व सुविधा आहेत का तिथे?" पेशंट  म्हणाला, "सर्व सुखसोयी आहेत इथे, जेवण वेळेवर व चांगले मिळत आहे, हे चौदा दिवस कधीच संपू नये असं वाटतय. तुम्हाला सांगतो, घरात दररोज हे आणा, ते आणा ही कटकट असते. खिशात पैसे नसतानाही या 'आणा' च्या कटकटीने जीव मेटाकुटीला आला आहे. इथं आपलं बरं आहे. कांहीही आणून न देता निवांत खायला मिळतय. मी कोरोनाचे आभार मानतो."


लघुकथा क्रमांक - १८


   अरूणराव व त्यांच्या पत्नी अनघा दोन महिन्यांंसाठी लेकीकडे स्कॉटलंडला गेले. ते परत येणार होते, तोपर्यंत कोरोनाचा कहर सुरु झाला. लॉकडाऊनमुळे विमान सेवा बंद झाली. त्यांना मायदेशी येण्याची, घरच्या लोकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती पण त्यांचा नाईलाज झाला. शेवटी दोन महिन्यांनंतर ते परत आले. त्यांना होम क्वारंटाइन केले. त्यांनी येण्यापूर्वीच मुलाला फॅमिलीसह गांवी निघून जायला सांगितले. पण आईवडिलांना भेटण्यासाठी तो घरी राहिला. अरूणरावांची गाडी दारात आली, त्यांनी मुलांना पाहिले व भावना बाजूला ठेवून सांगितले, "तू बाहेर पडल्याशिवाय आम्ही आत येणार नाही." मुलाच्या आणि सुनेच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या, नातवंडांनी आजोबा आजी म्हणत जोरात टाहो फोडला  होता. पण त्यांनी मोह टाळला. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हेच खरे!


लघुकथा क्रमांक - १९


    अंजलीचे शिक्षण पूर्ण होताच नोकरी लागली. अभ्यासामुळे घरातील संपूर्ण स्वयंपाक करण्याची जबाबदारी तिच्यावर कधी पडली नाही. तशी ती आई आजीला स्वयंपाकात अधूनमधून मदत करायची, पण पूर्ण स्वयंपाक येत नव्हता. तिच्या लग्नाचा योगही लवकर जुळून आला. त्यामुळे ती पूर्ण स्वयंपाक करताना गोंधळून जायची. तिच्या नोकरीच्या गांवी तिचे मिस्टर दोन दिवस सुट्टी असल्याने गेले. त्यावेळी दोघांच्या पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर पडली. जावई परत येताना वाटेवरच असलेल्या सासुरवाडीत आले. सासूबाई नी त्यांना विचारले, "अंजलीने स्वयंपाक केला का व्यवस्थित?" जावई म्हणाले, "खाण्यालायक केला होता, चवीचं नंतर बघू."


लघुकथा क्रमांक - २०


    गीताच्या घरी तिला पहाण्यासाठी पाहुणे आले. मुलाबरोबर त्याचे आई वडील, काका काकूही असतात. नवरदेव मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झालेले  असतात. गीता पोह्यांच्या डीशचा ट्रे घेऊन आली. तिने डीश टीपॉयवर  ठेवली व आत निघून गेली. काकांनी नवरदेवाला हळूच विचारले, "काय कशी वाटली मुलगी पसंत आहे का?" नवरदेव म्हणाले, "अजून मुलगी बघण्याचा कार्यक्रम कुठे झालाय?" काका म्हणाले, "अरे मघाशी मुलगी पोहे घेऊन आली होती." नंतर त्या दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ दिला गेला. गीता म्हणाली, "प्रथम मोबाईल बंद करून ठेवा आणि ऐका मी काय म्हणते. लग्नानंतर मोबाईलवर गेम खेळणार नसाल तर माझ्याकडून होकार आहे." 


शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ३

 

मराठी लघुकथा संच - ३


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



लघुकथा क्रमांक - ११


       एक भाऊजी फार गप्पीष्ट होते. ते आपल्या मेहुणीला म्हणाले, "मी तुला एका झाडाचे रोप आणून देतो. फार सुंदर दिसते ते झाड. त्या झाडाची पाने फुलासारखी दिसतात. ते झाड फार मोठे होत नाही. गेटच्या जवळ दर्शनी भागातच लाव बरं का! फार शोभिवंत दिसेल बघ तुझ्या दारासमोर." मेहुणी म्हणाली, "ठीक आहे' आणून द्या." हे बोलणे होऊन दोन वर्षे झाली तरी रोप काही भाऊजींंनी आणून दिले नाही. एकदा भेटल्यावर मेहुणी भाऊजीना म्हणाली, "भाऊजी, तुम्ही दिलेलं झाड इतकं छान वाढलय! त्याची पानं फुलासारखी सुंदर दिसत आहेत. दर्शनी भागात लावल्यामुळे सर्वजण विचारतात, कुठून आणलं हे रोप? मी तुमचं नाव सांगते." भाऊजींचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला.



लघुकथा क्रमांक - १२


       एक महिला पालक आपल्या साडेचार वर्षाच्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी आली. शिक्षकांनी सांगितले, "यावर्षी त्याचं वय बसत नाही, तुम्ही सांगत असलेल्या तारखेवरून. पुढच्या वर्षी त्याचं नाव दाखल करू या." पुढच्या वर्षी लवकर नांव दाखल करताना शिक्षकांनी तिला विचारले, "तुमच्या  मुलाची जन्मतारीख सांगा?" ती म्हणाली, "गेल्या वर्षी जन्मतारीख सात ऑगस्ट २०१३ होती, यावर्षी सात ऑगस्ट २०१४ झाली, व्हय की न्हाय? मी पण मॅट्रिक शिकल्याली हाय, अडाणी न्हाय. मला पाठच हाय सगळं." शिक्षक डोक्याला हात लावून बसले!



लघुकथा क्रमांक - १३


       मीनाचे लग्न एका इंजिनिअर मुलांशी ठरले. ती स्वतः इंजिनिअर होती पण तिला अद्याप नोकरी नव्हती. योगायोगाने लग्न ठरल्यावर कांही दिवसांनी एका कंपनीकडून तिला ऑर्डर मिळाली. ती नोकरीवर हजर झाली. पहिला पगार मिळाला. मीनाच्या आईने नवस केला होता की, मीनाला नोकरी लागू दे, तिचा पहिला पगार गावातील मंदिर बांधकामासाठी देणगी देईन. मीनाने पगार आईच्या हातात दिला. आईने देणगी दिली. ही गोष्ट नियोजित सासूच्या कानावर गेली. तिने मीनाला फोनवर चांगलेच खडसावले. आम्हाला विचारल्याशिवाय हा कारभार केलासच कसा? आणि कांहींबाही बोलली. तिच्या मुलानेही तिला दुजोरा दिला. यानंतर मीनाने मेसज पाठवला, मला तुमच्याशी लग्न करायचंच नाही. आत्ताच असं तर पुढं कसं?



लघुकथा क्रमांक - १४


       रमेश त्याच्या प्रेग्नंट पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी वाहनाची वाट बघत रस्त्यावर उभा होता. तो येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबविण्यासाठी हात करत होता, पण येणारे प्रत्येक वाहन सुसाट पुढे जात होते. त्याची बायको वेदनेने तळमळत बसली होती. हा प्रकार जवळील एक पानपट्टीवाला पहात होता. तो रमेशजवळ आला. त्याने मध्यम आकाराचा एक दगड उचलून घेतला व एका कारच्या दिशेने भिरकावला. कारची मागची काच फुटली. कार उभी राहिली. लोक गोळा झाले. कारवाला तावातावाने म्हणाला, "चल तुला पोलिसांच्या हवाली करतो." पानपट्टीवाला हात जोडून म्हणाला, "मला पोलिसांच्या हवाली जरूर करा पण त्याआधी या तळमळणाऱ्या स्त्रीला दवाखान्यात पोहचवा प्लीज. मी माझ्या मोटरसायकलने पोलिस स्टेशनला येतो, चला लवकर."



लघुकथा क्रमांक - १५


       सुलभाने दहावीची परीक्षा दिली. तिला गणिताचा पेपर अवघड गेला. परीक्षा दिल्यापासून तिला वाटत होते की ती गणितात नापास होणार. आपली परिस्थिती गरिबीची आहे. मी नापास झाले की शाळा सोडायला लागणार. आपल्याला पुढे शिकता येणार नाही. ही गोष्ट तिनं फारच मनाला लावून घेतली. पूर्वीप्रमाणे ती कुणाशी जास्त बोलत नव्हती. सतत आपल्याच विचारात गुंग असायची. आईच्या लक्षात ही गोष्ट आली होती तिने आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला होता. एके दिवशी घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास लावून घेतला. दोन दिवसांनी रिझल्ट लागला. तिला गणितात शंभरपैकी बावन्न मार्कस् होते. ती पास झाली होती.


रविवार, २६ जुलै, २०२०

मराठी लघुकथा संच - २


मराठी लघुकथा संच - २


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




लघुकथा क्रमांक - ६

संध्याकाळी साडे-सातची वेळ होती. सासरेबुवाना भूक लागली होती. म्हणून त्यांनी सुनेला विचारले, "भाकरी केल्यास का?" सून म्हणाली, "नाही अजून केल्या. मी बचतगटाच्या मिटिंगला निघाले आहे. आल्यावर भाकरी करणार आहे." ती गेली मिटींगला. सासऱ्यानी शिळी भाकरी तर आहे का पहावी म्हणून बुट्टीत बघितलं तर गरमागरम भाकरी दिसल्या. त्यांनी दोन भाकरी फस्त केल्या व आरामात बसले पुस्तक वाचत. सूनबाईनी आल्यावर बुट्टीत बघितले भाकरी कमी झाल्याचे पण सासऱ्याना विचारले नाही कारण उत्तर आलं असतं न केलेल्या भाकरी कोण कसा बरं खाईल ?


लघुकथा क्रमांक - ७

सासूबाईनी आपल्या उच्चशिक्षित पण बाळ लहान असल्याने नोकरी न करणाऱ्या सूनबाईना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. शहरात पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला जाण्यास सांगितले आणि नातवाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. आपल्या सूनबाईना फॅशन डिझायनिंगची आवड आहे हे सासूबाईनी ओळखले होते. सूनबाईनी अगदी मनापासून तो कोर्स जॉईन केला. कोर्समध्ये तिनं एक छानशी पर्स तयार केली. खरंच पर्स खूप सुंदर व नीटनेटकी बनवली होती. फोटो काढून  स्टेटस ठेवला होता. सासूबाईनी सुनेला क्लासमध्ये मेसेज पाठवला, "यू आर गुड फॅशन डिझायनर." सुनेने रिप्लाय पाठवला "इट्स  क्रेडिट गोज टू यू." सासूबाई जाम खूष।


लघुकथा क्रमांक - ८

संदीप ब्लिचिंग कारखान्यात अगदी प्रामाणिकपणे काम करत होता. सुट्टीच्या दिवशीही कारखान्यात जाऊन ओव्हर टाईम करायचा. दरवर्षी दहावीत शिकणाऱ्या, परिस्थितीने गरीब असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या इंग्रजी विषयाच्या क्लासची फी भरायचा. त्या  मुलांना नियमित क्लासला जायची विनंती करायचा. एका मित्राने त्याला विचारले, "का करतोस संदीप हे सगळं?" संदीप म्हणाला, "क्लास न लावल्यामुळे मला इंग्रजीमध्ये सात मार्क कमी पडले व माझे शिक्षण थांबले. त्याची शिक्षा मी भोगतोय. असं कुणाचं शिक्षण थांबू नये, त्यांना माझ्यासारखी शिक्षा होवू नये म्हणून."


लघुकथा क्रमांक - ९

प्राथमिक शाळेची पहाणी करणाऱ्या भागाधिकाऱ्याना सवय होती की, शिक्षकांचा वर्ग त्यांच्या नकळत खिडकीतून डोकावून पहाण्याची. एका वर्गाच काम व्यवस्थित सुरु होतं. मुले अध्ययनात रमली होती. स्वाध्याय करत होती. वर्गातून फिरताना त्या मॅडमनी स्वतःच्या रूमालाने एका विद्यार्थ्यांचे नाक पुसल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना त्या मॅडमच्या या कृतीचे फार कौतुक वाटले. स्टाफ मिटींगमध्ये अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्या मॅडमचा सत्कार केला. बाकीच्या मॅडम मात्र नाराजी ने पुटपुटल्या, साहेबांना काय माहिती तो तिचा स्वतःचा मुलगा आहे म्हणून।


लघुकथा क्रमांक - १०

सूनबाई शाँपिंगला गेल्यावर सासूबाईंच्या लक्षात आले की एक वस्तू आणायला सांगायची विसरली. त्यांनी फोन करून सूनबाईना सांगितले, "अग लता, येतांना एक पर्स घेऊन ये. " सूनबाईनी खरेदीच्या नादात लगेच फोन बंद केला. येताना एक साधी, कमीत कमी किमतीची, मळकट रंगाची पर्स आणली. सासूबाई म्हणाल्या, "अगं तुझी आई उद्या आपल्याकडे पुण्याला जाता जाता येणार आहे ना, त्यांचा उद्या वाढदिवस आहे, विसरलीस की काय. त्यांना गिफ्ट देण्यासाठी पर्स आणायला सांगितली तुला." सूनबाई मनात म्हणाल्या, "तसं सांगायचं ना आधी."



मराठी लघुकथा संच - १

मराठी लघुकथा संच - १


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - १

तिन्हीसांजेची वेळ होती. गावच्या वेशीजवळच समीर व रेश्मा यांची दुचाकी बंद पडली. जवळच्याच गॅरेजमध्ये समीर गाडी दुरूस्त करून घेत होता. बाजूला रेश्मा ऊभी  होती. गावातील लोक शेतातून घरी परत येत होते. डोक्यावर जळणाचा भारा घेतलेली एक स्त्री रेश्माजवळ येऊन थांबली. गाडी नादुरुस्त झालीय का म्हणत रेश्माला न्याहाळू लागली . रेश्माला तिची नजर चांगली वाटली नाही, म्हणून तिने पदराने गळ्यातील दागिने झाकून घेतले. हातावरही पदर ओढून घेतला. ती स्त्री म्हणाली बाई, किती वेळ उभी आहेस?  हे समोरच माझं घर आहे. तिथं बस चल. चहा करून देते तुला. पण रेश्मा नको नको म्हणाली, थोड्याच वेळात ती स्त्री हातात चहाचे कप घेऊन गॅरेजकडे आली व म्हणाली, "चाललं नव्हं गरिबाचा चहा?"


लघुकथा क्रमांक - २

एका कार्यक्रमासाठी बहिणी चे कुटूंबिय व भावाचे कुटूंबिय गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोघांच्याही चारचाकी एकदम बाहेर पडल्या. वाटेत सर्वानी मिळून चहा घेतला कारण दोन्ही कुटुंबे वेगवेगळ्या गावी जाणार होते. एक फकीर मोरपिसांची जुडी घेऊन त्यांच्यासमोर आला. बहिणी च्या मिस्टरांनी त्याच्या ताटात दहाची नोट ठेवली. तो भावाकडेही मागू लागला. भाऊ म्हणाला, "आम्ही दोघे एकाच घरातील आहोत". तो बाजूला गेला. बहीण दुसऱ्या गावाला गेली, भाऊही आपल्या गावाला निघाला. थोड्याच अंतरावर मागून येणाऱ्या ट्रकने भावाच्या कारला जोराची धडक दिली. सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. पण कारचे दार चेपून गेले, लोक गोळा झाले. जमलेल्या लोकात मगाचचा तो फकीर पण होता. दार बदलण्यास पाच हजार खर्च झाले.


लघुकथा क्रमांक - ३

दहा बारा वर्षाचा एक मुलगा पळत पळत मेडिकलमध्ये आला. त्याच्या हातात एक पुस्तक, एक डॉक्टरांची चिठ्ठी व दहा रुपयांची नोट होती. त्याने चिठ्ठी मेडिकलवाल्याला दिली. मेडिकलवाला म्हणाला, या गोळ्यांंना शंभर रूपये लागतील. मुलगा म्हणाला, "काका माझी आई फार आजारी आहे, हे दहा रुपये घ्या आणि एका दिवसाच्या तरी गोळ्या द्या." तो म्हणाला, असं कसं देता येईल? मुलगा म्हणाला, हे पुस्तक घ्या ठेवून तुमच्याकडे. मला निबंध स्पर्धेत बक्षिस मिळालय.पन्नास रूपये किंमत आहे याची. मी पैसे दिले की मला परत द्या. दुकानदार म्हणाला, हे दहा रूपये कुठून आणलेस? मुलगा म्हणाला, त्या समोरच्या बंगल्यातील बागेत काम करून आणले. उद्या आणखी काम करून पैसे देईन तुमचे. दुकानदाराने पुस्तक ठेवून न घेता त्याला पूर्ण औषधे दिली व सांगितले, तुझी आई बरी झाली की मला भेटायला ये.


लघुकथा क्रमांक - ४

एक समाजसेवक वृद्धाश्रमात देणगी देण्यासाठी गेले होते. आश्रम चालकांनी त्यांना कांही वृध्दांशी संवाद साधण्याची संधी दिली. समाजसेवक प्रत्येकाला पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारत होते. वृद्ध मंडळीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली, कारण बऱ्याच दिवसांनी कोणीतरी त्यांची आपुलकीने चौकशी करत होते. त्यांनी एका वृद्धेला प्रश्न विचारला आजीबाई तुम्हांला मुलंबाळं आहेत का? ती म्हणाली, "हो आहेत ना मुलंबाळं, म्हणूनच मी इथे दाखल झाले आहे".


लघुकथा क्रमांक - ५

एक तरुण कार्यकर्ता आपल्या निवडक मित्रांसह कोल्हापूरला ला एका महत्वाच्या कामासाठी निघाला होता. रिमझिम पाऊस पडत होता. हातकणंगले बसस्टँडजवळ एक वयस्क शेतकरी पावसात भिजत भाजीविक्री करत बसला होता. त्या कार्यकर्त्याने ते दृश्य पाहिले. गाडीत असलेली छत्री उचलली, गाडीतून उतरला व छत्री उघडून त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर धरली. त्याला नमस्कार करून गाडीत बसला. त्या दिवशी त्यांच्या सेवा संघाच्या रजिस्ट्रेशनचे रखडलेले काम चुटकीसरशी फत्ते झाले, शासनाचे अनुदानही मिळाले.