तौबा : एक अद्भुत उपासना
नमाज, रोजा, हज्ज आणि जकातच्या व्यतिरिक्तदेखील अनेक उपासना आहेत. त्यात 'तौबा' या उपासनेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. 'तौबा' या संज्ञेचा शाब्दिक अर्थ होतो पश्चाताप, पस्तावा, अनुपात, उपरती अथवा खेद, सुगम मराठी भाषेत याकरिता परतणे, रूजू होणे किंवा पश्चाताप असे शब्द वापरता येतील.
आपल्या हातून कुठलेही अवज्ञाकारी कृत्य घडल्यानंतर व्यक्तीला पश्चाताप होणे नैसर्गिक आहे. या पश्चातापाची खरी पूर्ती करावयाची असेल तर अल्लाहच्या चरणी अशी एक प्रतिज्ञा करावी लागते की, माझा हातून जो गुन्हा घडला आहे, त्याची पुनरावृत्ती माझ्या हातून यापुढे कधीही होणार नाही. याकरिता मी अल्लाहसमोर वचनबध्द आहे. मी अल्लाहच्या आज्ञांकडे पुनश्च रूजू होत आहे. माझ्या हातून जे काही घडले, त्याचा मला खूप पश्चाताप आहे. म्हणून आजपासून मी माझ्या अवज्ञाकारी आणि दुष्कर्मी जीवनाच्या दुष्ट चक्रातून अल्लाहच्या आज्ञाधारी जीवनाकडे परत फिरलो आहे. अंत:करणापासून वाममार्गाचा तिरस्कार करणे व सद्मार्गाचा अवलंबन करणे हा तौबाचा मूळ अर्थ आहे. तौबा देखील उपासनेचा एक अत्यंत मौल्यवान प्रकार आहे. अवज्ञाकारी जीवन, पाप, गुन्हा, दुष्टप्रवृत्ती आणि तामसिक जीवन असे घाणेरडेपणाचे अनेक प्रकार आहेत. ज्याप्रकारे घाणीवर आपण स्वच्छ पाणी टाकून जागेला स्वच्छ करतो, त्याचप्रकारे ही घाण जर आपल्या वृत्तीत साचत राहिली तर मने क्रुर व कठीण बनतात. अशा मनावर प्रेमळ उद्गारांचा आणि कोमल शब्दांचा परिणाम होत नाही. कुणाची दुर्दशा त्यांना प्रभावित करू शकत नाही. अशी माणसे पापाला पाप समजत नाहीत ते अल्लाहला भीत नाहीत. म्हणजे एकंदर त्यांच्या सात्विक जीवनात श्रध्दा अवस्थेवरच पूर्णविराम लागतो. यालाच ईमानविरहित जीवन म्हणतात. व्यक्तीच्या जीवनात ही जाणीव सतत जागृत राहिली पाहिजे की इहलोकातील जीवन क्षणभर आहे. खरे जीवन तर परलोकजीवन आहे. जेथे अल्लाह श्रध्दावंतांवर आपल्या सर्व देणग्यांचा वर्षाव करील ज्या देणग्यांचे त्याने पवित्र कुरआनातून आणि प्रेषित साहेबांच्या मुखातून वचन दिले आहे. अल्लाहची प्रसन्नता ही खरी मेजवानी आहे. हे ध्येय साध्य झाले म्हणजे आपल्या जीवनाचे मनोरथ पूर्ण होईल. अल्लाहचा खरा दास किंवा बंदा तो आहे जी पाप घडो अथवा न घडो, अल्लाहचरणी त्याचे प्रायश्चित सदैव सुरू असते. तौबा हा शब्द पवित्र कुरआनात वापरला गेला असून या शीर्षकाचा पवित्र कुरआनमध्ये एक संपूर्ण अध्याय आहे. सदरच्या अध्यायात अनेकेश्वरवाद्यांना चिथावणी, मुदत आणि करारांवर कायम राहण्याची संधी देण्यात आली आहे. अनेकेश्वरवादी श्रध्दावंतांशी करारही करायचे, पण त्याचे पालन करत नसत आणि करारभंग करूनसुध्दा तमाम सवलती घेण्यास तत्पर असत. ते मक्केमधील अल्लाहच्या मस्जिदीचे म्हणजे काबागृहाचे सेवक बनण्याचा आग्रह धरायचे या परिस्थितीत सदर अध्यायात त्यांना उघड उघड तंबी देण्यात आली आहे की, त्यांनी तौबाचा मार्ग पत्करावा म्हणजे अनेकेश्वर तत्वापासून मुक्त व्हावे. एकेश्वर तत्व स्विकारावे. नमाज अदा करावी आणि जकात द्यावी. अल्लाह क्षमा प्रदान करणारा क्षमाशील व दया दाखविणारा आहे.
पवित्र कुरआनात तौबा पत्करणाऱ्या म्हणजे अवज्ञाकारी जीवनापासून आज्ञाकारी जीवन स्विकारणाऱ्यांकरिता शुभवार्ता देण्यात आली आहे आणि त्यांची शिफारस अशाप्रकारे करण्यात आली आहे. ते जणू एका निष्पाप, नवजात अर्भकासारखे नुकतेच आईच्या गर्भातून जन्मले आहे. खऱ्या मनाने तौबा केल्यास त्यांचे मागचे सर्व पाप नाहीसे करण्यात येईल एकही पाप न करता त्यांनी उर्वरित जीवन व्यतीत केले तर मरणोत्तर त्यांना कसलेही जाब विचारले जाणार नाहीत. त्यांना स्वर्गातील अशा नंदनवनात पाठविले जाईल जेथे यातनांची चाहूलसुध्दा लागणार नाही.
तौबा स्विकारण्याचे सर्व हक्क अल्लाहकडे आहेत. अल्लाहकडे पश्चाताप स्विकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादे वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लगेच पश्चाताप करतात. अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीने पुन्हा लक्ष देतो. अल्लाह सर्वज्ञ, विवेकशील व बुध्दीमान आहे. परंतू, पश्चाताप त्या लोकांकरिता नाही जे वाईट कृत्ये करतात. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची मृत्यू घटका जवळ येवून ठेपते तेव्हा तो म्हणतो की, आता मी पश्चाताप केला आणि याचप्रकारे पश्चाताप त्या लोकांकरिता नाही जे मरेपर्यंत अश्रध्दावंत राहिलेत अशा लोकांकरिता तर दुःखकारक शिक्षा तयार करून ठेवली आहे. असे अन्निसा अध्यायातील १७ व्या व १८ व्या श्लोकात म्हटले आहे.
रमजानचा महिना अनेक वाईट कृत्यांपासून 'तौबा' करण्याची सर्व उपवासधारकांना उत्तम संधी प्रदान करतो. तौबा म्हणजे पापापासून मुक्ती आणि श्रध्दावंतांबरोबर पुनर्वसनाची संधी आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा