लघकथा संग्रह क्र.१४
थीम - लग्न जमता जमेना मुलाचं
फोटो:साभार गूगल
(१) हरीभाऊना दोन मुले. मोठा मुलगा ग्रज्युएट झाला. नोकरीवाल्या मुलाला मागणी जास्त आहे म्हणून घरच्या शेतीचं काम करायला लावायचं सोडून त्याला नोकरीला लावलं. पण नोकरी खाजगी आहे, कमी पगाराची आहे म्हणून नकार येऊ लागले. कुणाला शेत जास्त पाहिजे होते, कुणाला घर स्लपचं पाहिजे होतं. अशीच तीन वर्षे लोटली. धाकट्या मुलाच लग्नाचं वय झालं. तो आईवडिलांना म्हणाला," दादानं ट्राफिक जाम करून टाकलय पण मी काही थांबणार नाही. माझ्या लग्नाचं बघा नाहीतर मला दुचाकी घेऊन मार्ग काढत पुढं जाव लागेल. "आता काय करावं हरीभाऊनी !
शीर्षक- ट्राफिक जाम
(२) निदान पोहेतरी......
दोन मित्र वधूशोध मोहिमेत सहभागी होते. पहिला म्हणाला, "दोन वर्षे झाली मुली बघतोय. पंचवीस मुली बघून झाल्या अजून एकीन पण होकार दिला नाही. " यावर दुसरा म्हणाला," तुझं अजून बरं चाललय बाबा, बायोडाटा बघून मुलगी बघायला या म्हणतात. तू अजून मुलगी बघून, पोहे तरी खाऊन येतोस मर्दा ! माझं बघ मी मुली बघायला सुरुवात करून पाच वर्षे झाली. मुलगी बघायला या असा फोन येणं ही बंद झालय! काय करू सांग?
(3)मोठेपणा नडला
नारायणरावानी आपला रूबाब दाखविण्यासाठी आपल्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या मेहुण्याचा व पुतण्याचा बायोडाटा मध्ये उल्लेख केला होता. एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची मुलगी नारायणरावांच्या मुलाने पसंत केली. त्याना हुंडा, मानपान कांहीच नको होते. त्यांनी मुलीच्या वडिलांना मुलगी पसंत असल्याचे कळविले पण मुलीकडून स्पष्ट नकार आला का तर मुलगी म्हणाली, "आत्तापासूनच तुम्ही मेहुण्या पाहुण्यांचा उल्लेख करून रूबाब दाखवत आहात. आमच्या सारख्या गरीबांना हा रूबाब पेलणार नाही. " परोपरीने समजाऊन सांगितले तरी मुलगी लग्नास तयार झाली नाही.
(४)मुलाचं लग्न महत्त्वाचं की दौलत?
शामराव एक सामान्य शेतकरी होते. शेतीत कष्ट करून कुटूंबाचा उदर्निवाह चालवित होते. त्यांचा मुलगा खाजगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता. त्याला पगार कमी होता. पण या एकुलत्या एक असलेल्या सुनिलचं लग्न कांही केल्या ठरेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या राज्यातील एक मुलगी एजंटमार्फत पसंत केली. त्या पाहुण्यांनी दोन लाखाची मागणी केली. ही रक्कम लग्नापूर्वीच द्यावी लागणार होती. शामरावांना ही रक्कम भरणे अवघड झाल्याने ते गप्पच बसले. सुनील ने एजंटला फोन केल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. सुनील वडिलांना म्हणाला, " तुम्हाला दोन लाख महत्त्वाचे की मुलाचे लग्न? शेत गहाण टाका आणि माझ्या लग्नाचं बघा" हे ऐकून शामरावांना चक्करच आली.
(५) लग्न झालं एकदाचं पण....
रामभाऊना मुलाच्या लग्नाची फार चिंता लागली होती. पाच सहा वर्षे अशीच टेंशनमध्ये निघून गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती म्हणून त्यांनी चार लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घालण्याची पाहुण्यांनी अट घातली. त्यांची अट मान्य केल्यानंतर विवाह सोहळा पार पडला. पूजाअर्चा झाली. त्या दोघांना त्यांनी हनीमूनला पाठवले. आणि घडलं भलतंच! नवरदेवाला रेल्वे स्टेशनवर बसवून मी स्वच्छतागृहाला जावून येते असं सांगून नवरीबाई गेली पळून! नवरदेव एकटेच घरी परतले. सांगा काय करायचं?
