पैगंबरसाहेबांचा वचनपालनाचा आदेश
मुहम्मद पैगंबर प्रेषितत्वप्राप्ती आधीपासूनच वचनपालन व सत्यपालन करत होते. अफ्रिकेतील अव्हेसिनियाच्या बादशहाने त्यांची ख्याती ऐकून त्यांचे कडवे विरोधक अबूसुफियानला विचारले की "काय मुहम्मद (स.) वचन आणि कराराचा भंग करतात?" अबूसुफियान म्हणाले "नाही". यावरुन असे दिसून येते की पैगंबरसाहेबांचे विरोधकही त्यांची वचनबध्दता मान्य करत होते.
याबाबतचे एक उदाहरण देता येईल. बद्रची लढाई अत्यंत कठीण परिस्थितीतून लढली गेली होती. पैगंबर साहेबांच्या जवळ मनुष्यबळ अत्यंत कमी, एकूण ३१३ माणसे होती. समोर १००० बलशाली सैन्य होते. साधनसामग्रीही अत्यंत कमी होती. या लढाईत भाग घेण्याकरिता हुजैफा बिन यम्मान आपले स्नेही अबूहसील यांच्याबरोबर मदिनेहून निघाले, परंतु गनिमांच्या तावडीत सापडले. विचारणा केल्यावर ते म्हणाले, "आम्ही मदिन्याला निघालो होतो, वाट चुकलो" गनिमांनी त्यांना एका शर्तीवर सोडले, की मदिनेला जा, युद्धात सामील होऊ नका. ते लपत छपत मुहम्मद (स.) पर्यंत पोचले आणि जे घडले ते सांगितले. पैगंबर साहेबांनी त्यांना मदिनेला परत जाण्याचे आदेश दिले व म्हणाले की, "तुम्ही काफिरांबरोबर केलेले वचन पाळा आणि त्यांच्याबरोबर मुकाबला करण्याची शक्ती अल्लाहकडे मागतो". (मुस्लिमशरीफ) यावरुन मुहम्मद पैगंबर प्रतिकूल परिस्थितीतही वचन पाळा हाच संदेश देत होते हे सिध्द होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा