गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज - विशेष मराठी लेख


छत्रपती शिवाजी महाराज - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र:

       शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन राजांनी आपसांत वाटून घेतला होता. त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी कारभार पहात होते. हे राजे मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. रहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपसांत लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या सर्व गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.


       शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले. त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी त्यांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. त्यांना वर्षासने लावून दिली. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते.


शिवरायांचे उदार धार्मिक धोरण:

       शिवरायांनी साधुसंतांचा आदर केला. शिवरायांची कुलदेवता भवानीदेवी. तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना गीता पूज्य होती. त्यांनी कुराणाचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरानाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडिराज, भूषण इत्यादि विद्वानांचा त्यांनी सत्कार केला तसेच रामदास, तुकाराम, बावा याकुत, मौनीबाबा इत्यादी संतांचा त्यांनी बहुमान केला. 'सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे 'हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला .


शिवरायांचा स्वदेशाभिमान:

       शिवराय एका जहागिरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखासमाधानाने जगता यावे, मराठी भाषेला स्वधर्माला मान मिळावा यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी त्यांनी राजव्यवहारकोश करवला.


हिंदवी स्वराज्य स्थापना:

       हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, ते हिंदवी. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य.


शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिम्मत सोडली नाही.

काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.

बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरांयानी न्यायाची बाजू घेतली.

बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत.


शिवरायांच शौर्य व धैर्य:

       शिवरायांनी वयाच्या अठराव्या वर्षी शंभू महादेवासमोर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस वर्षाचा हा काळ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि विजय मिळविले. त्यांचे आयुष्य युद्ध प्रसंगानी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सद्दीही होते. शक्ती कमी पडली तेंव्हा त्यांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकतीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल लावला. धो-धो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शायिस्तेखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून युक्तीने ते निसटले!त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण !


शिवरायांच्या सरदारांची स्वामिनिष्ठा:

       शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनविले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती! शिवरायांना वाचविण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जिवावर उदार होऊन लढवला. तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या सेवकांच्या स्वामिनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.


शिवरायांची सेवकांवरील माया:

       बाजीप्रभूंनी देशासाठी मरण पत्करले, शिवरायांनी त्याच्या मुलाचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले, शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले. आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव धोक्यात घातला, शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. अशा किती गोष्टी सांगाव्यात! शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांची त्यांनी पित्याप्रमाणे काळजी घेतली.


शिवरायांनी चांगले ते केले:

       जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणे हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त वसूल करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धती बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमाविसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धती त्यांनी सुरू केली. 


शिवरायांचे आठवावे रूप:

काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची;

संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचे;

बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवतजायचे;

सहकाऱ्याना उत्साह देत व शत्रूंना सता चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. 

आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की, पुन्हा पुन्हा वाटते.....


शिवरायांचे आठवावे रुप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप।।

शिवरायांना कोटी मानाचे मुजरे ।।

(आधारित)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा