बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

ग्राहका तुझ्याचसाठी - विशेष मराठी लेख

 

राष्ट्रीय ग्राहक दिन अर्थात
ग्राहका तुझ्याचसाठी......


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

        २४ डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होतो. दिनांक २४ डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक पंचायतीचे संस्थापक आदरणीय बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला. हा कायदा म्हणजे देशाच्या सामाजिक व आर्थिक कायद्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, तसेच त्यांच्या तक्रारींचे सुलभतेने, विनाविलंब आणि अत्यल्प खर्चात निवारण करणे, यासाठी यंत्रणा निर्माण करणे, हा ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश आहे. आपला समाज संघटित नाही म्हणून ग्राहक चळवळीचे सूत्र आहे ग्राहक संघटन.


        आपल्या देशात एक चमत्कारिक चित्र उभे ठाकल्याचे दिसत आहे. एका बाजूला धान्य टंचाई, महागाई, भडकलेल्या किंमती, अपुरी साधने, लाचखोरी, भ्रष्टाचार, अन्न, वस्त्र, निवारा यांचे मोठ्ठे प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हांची सोडवणूक करण्यासाठी, हे विद्रूप चित्र बदलण्यासाठी ग्राहकांचे संघटन होणे आवश्यक आहे. सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, अभाव आणि अन्याय याविरुद्ध उभे राहायचे असेल तर केवळ शब्दांचे फुलोरे निर्माल्यवत् आहेत. घोषणांच्या गर्जनांनी आकाश कोंदून टाकता येईल, पण या भूमीच्या पुत्रांचा कोंडमारा मोकळा होणार नाही.


        यातून मार्ग कसा काढता येईल? सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता याविरुद्ध उभे रहायचे असेल, अभाव आणि अन्यायाचा मुकाबला करायचा असेल तर रचनात्मक कामाचे नवे दुर्ग आपण उभे करायला हवेत. स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सुराज्याची, समृद्धीची चळवळ आपण उभी केली पाहिजे. समृद्धी, संपन्नता पिकल्या जांभळाप्रमाणे झाडावरून खाली पडत नाही. ती हजारो माणसांच्या कष्टातून, श्रमातून, बुद्धीतून, ज्ञानातून, संघटनेतून आणि समर्पणातून निर्माण होते. अशा विविध मार्गातील एक मार्ग म्हणजे ग्राहक चळवळ आहे. ग्राहक चळवळ हा स्वयंप्रेरित आर्थिक परिवर्तनाचा एक प्रकल्प आहे. हा ग्राहक चळवळीचा मूलभूत  उद्देश आहे.


       ग्राहक हाच व्यापार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. सर्व उद्योग उभारले जातात ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ग्राहकांसाठीच. सर्व आर्थिक व्यवहारात, उलाढालीत ग्राहक हाच पाया आहे. हा ग्राहक म्हणजे कोण, तर तुम्ही आम्ही सर्वच ग्राहक आहोत. कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेणारी वा अशी वस्तू किंवा सेवा वापरणारी व्यक्ती या कायद्याने ग्राहक म्हणून ओळखली जाते. वस्तू वा सेवा खरेदी करणारी व्यक्ती स्वतः उपभोक्ता असेल तर, ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेस पात्र ठरते. सर्व व्यवहाराचा आत्मा ग्राहकच आहे. पण आज तो नगण्य आहे, कारण ग्राहक हा विखुरलेला समाजघटक आहे. त्यांच्यात संघटना नाही. म्हणून शक्तीही नाही, आवाज नाही. त्याच्या हिताची कोणी जपणूक करीत नाही. यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ग्राहकांचे संघठन, त्यासाठी हवे ग्राहकांचे प्रबोधन. आपले हक्कच आपल्याला माहित नसतात. आज कुणीही उठावे, आपल्याला फसवून टोपी घालावी. स्वस्ताचे गाजर दाखवून आपली हातोहात फसवणूक करावी. एकावर एक फ्री, अमक्या मालावरही स्कीम, सोने खरेदीवर लकी ड्रॉ, जुनी वस्तू द्या व नवी वस्तू घेवून जा, अशा प्रकारच्या प्रलोभनांना भलेभलेही भुलतात, तर मग अशिक्षतांचे काय? प्रलोभने माणसाला भुरळ पाडतात. जरूरी नसतानाही मग व्यक्ती गोड भुलथापांना किंवा विक्रेत्याच्या गोड बोलण्याला फशी पडते. खरे पहायला गेले तर दुकानदार कोणतीही वस्तू फुकट देत नसतो किंवा आपला तोटा करून घेत नसतो. त्याच्या भूलथापांना आपण बळी पडतो. हा आपला अज्ञानीपणा आणि त्याचा बनेलपणा असतो. एकतर अशा मालाची पावती तो देत नाही. त्यामुळे फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार कुठेही करू शकत नाही. कारण पावतीशिवाय व्यवहार झाल्यामुळे खरेदीचा पुरावा जवळ नसल्यामुळे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. न्याय मागू शकत नाही. म्हणून जागरूक ग्राहकांनी अशा मोहजालात न अडकता वस्तू खरेदीची योग्य पावती घ्यावी. आमच्यावर विश्वास नाही का? या दुकानदाराच्या बोलण्यावर बसू नये. पावतीचा आग्रह जरूर करावा. वीस रूपयांवरील मालावर पावती मागण्याचा हक्क ग्राहकाला असतो.


       शेवटी राष्ट्रीय ग्राहक दिनी एवढेच सांगावेसे वाटते ग्राहक हा राजा आहे. अशी नुसती घोषणा उपयोगाची नाही. ग्राहक तेंव्हा राजा होईल जेंव्हा त्याची हुकूमत वस्तूमूल्य, वस्तूची गुणवत्ता आणि वस्तू वितरण यावर राहील.


       ग्राहक बंधू भगिनींनो, पूर्ण जागे रहा, जागरूकपणे खरेदी करा, डोळे उघडे ठेवून व्यवहार करा, कारण काळ मोठा बिकट आहे.


राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्व ग्राहक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा ।



1 टिप्पणी: